तुमचं ‘चाल-चलन’ कसं आहे?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



 


अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा खात्याने तर ‘मानवी वर्तन विभाग’ या नावाचा एक खास विभागच सुरू केला आहे. विशिष्ट वर्तनावरून संशयास्पद हालचालींचे काही सर्वसामान्य नमुने तयार करता येतील का आणि यावरून संभाव्य अतिरेकी ओळखता येतील का, यावर त्यांचं संशोधन सुरू आहे. त्यांनी आपलं लक्ष माणसाच्या चेहऱ्यावर केंद्रित केलं आहे.

 

११ सप्टेंबर २००१ च्या वर्ल्ड ट्रेड सेंटर दुर्घटनेनंतर अमेरिकेसह सगळ्याच पाश्चिमात्य देशांमधल्या सुरक्षा यंत्रणा अतिशय सतर्क झाल्या. तरीही लंडनच्या भुयारी रेल्वेत बॉम्बस्फोट झालेच, पण सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेमुळे अनेक संभाव्य घातपाती हल्ले टळले, हीसुद्धा उल्लेखनीय गोष्ट आहेच. आता सर्वत्रच सुरक्षा कॅमेरे बसवलेले असतात आणि सुरक्षा कक्षात बसलेली माणसं त्यांच्या समोरच्या पडद्यावरची चित्रं एकाग्रतेने पाहत असतात. त्यामुळे संशयास्पद हालचाल करणारी व्यक्ती लगेच नजरेत येते. पण, या यंत्रणेत अनेक त्रुटीही आहेतच. अनेकदा असं आढळून आलेलं आहे की, बसस्टॉप, रेल्वेस्टेशन, मॉल अशा प्रचंड वर्दळ असलेल्या सार्वजनिक ठिकाणी अनेक माणसं उगीचच फिरत असतात. अशी माणसं सुरक्षा कॅमेऱ्या ने वारंवार टिपल्यावर सुरक्षारक्षकांनी प्रत्यक्ष जाऊन त्यांना हटकलं, तेव्हा असं आढळलं की, त्यातला कुणीही अतिरेकी वगैरे नव्हता, पण प्रत्येक नमुना वेगळा होता. म्हणजे काही जण निरुद्योगी असल्यामुळे उगीचच वेळ घालविण्यासाठी फिरत होते, काही जण कुणाची तरी वाट पाहत होते, काही जण भुरटे चोर होते, काही जण वेश्यांचे एजंट होते. एका माणसाने तर कमालच केली. भुयारी रेल्वे स्थानकाच्या जिन्यावरून वारंवार चढउतार करताना दिसल्यावरून त्याला हटकण्यात आलं. पहिल्यांदा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, पण त्यामुळे आपण संभाव्य अतिरेकी ठरू, असं लक्षात येताच त्याने ताबडतोब कबुली दिली की, “आपण हा नसता उद्योग केवळ ‘नेत्रसुख’ घेण्यासाठी करत आहोत.” सुरक्षारक्षकांनी कपाळावर हात मारून घेतला. या भंपक, रंगेल रावापायी त्यांचा बहुमोल वेळ फुकट गेला होता.

 
 

यातून सुरक्षा यंत्रणा अतिशय सावध आहेत, हा महत्त्वाचा संदेश सर्वसामान्य लोकांपर्यंत गेला, हे जरी खरं असलं तरी खरंखुरं संशयास्पद वर्तन आपल्याला अजून पकडता येत नाही, हेही संगणक कॅमेरा प्रणाली बनविणाऱ्या लोकांच्या लक्षात आलं. आता या संबंधात आणखी संशोधन, चाचण्या वगैरे सुरू आहेत. मिशिगनच्या सायबरनेट सिस्टिम कंपनीचा प्रमुख चार्ल्स कोहेन हा अमेरिकन लष्कराच्या संशोधन प्रयोगशाळेसाठी संगणक कार्यक्रम बनवतो. त्याने या संदर्भात नवीन कार्यक्रम बनवले आहेत. मेरीलँडच्या अमेरिकन लष्करी केंद्रात काही तज्ज्ञ मानसशास्त्रज्ञ व शरीरशास्त्रज्ञ माणसांच्या चालण्याच्या विविध शैलींचा, ढबींचा अभ्यास करत आहेत. फ्रँक मोरेली हा तज्ज्ञ त्या गटाचा प्रमुख आहे. एखाद्या व्यक्तीची चाल-चालणूक कशी आहे, असा प्रश्न अनेकदा चर्चिला जात असतो. आपल्याकडे विशेषतः लग्न ठरवताना मुलाची, मुलीची चाल-चालणूक कशी आहे, हे पाहिलं जातं. पूर्वी तर हे फारच काटेकोरपणे पाहिले जात असे. याचा अतिरेक होऊन मुलगी दाखविण्याच्या कार्यक्रमात मुलीला चालून दाखविण्यास सांगण्यात येत असे. हे अपमानास्पद प्रकार दु:खदायकच आहेत आणि आता ते बरेचसे बंदही झाले आहेत, पण यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चालीवरून व्यक्तीचा स्वभाव, विचार ओळखता येऊ शकतात. मुलीला (आणि फक्त मुलीलाच. मग मुलाला का नाही?) चालून दाखविण्याच्या वाईट रुढीने चालीवरून माणूस ओळखण्याचं सूक्ष्म ज्ञान मारून टाकले, ही खरी हानी आहे.

 

पण, फ्रँक मोरेली आणि त्याचा तज्ज्ञ गट आता या पारंपरिक ज्ञानाचा उपयोग सुरक्षा यंत्रणा अधिक अचूक व्हाव्यात म्हणून कसा करता येईल, याबाबत प्रयोग करत आहेत, अफगाणिस्तान आणि इराकमधल्या जादा शहाण्या अतिरेकी गटांनी स्वत:च्या विविध हालचालींची दृश्ये इंटरनेटवर टाकली आहेत. त्यांचाही या गटाने अभ्यास केला आहे. मोरेलीचं म्हणणं असं की, “एखाद्या माणसाची चाल अभ्यासताना त्याचे गुडघे, पावलं आणि हातांचे कोपर यांच्या हालचालींवरून त्याच्या मानसिक स्थितीचा अंदाज येऊ शकतो. समजा, विमानतळासारख्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन एखादा माणूस एखादं पार्सल कुठेतरी ठेवतोय, असं दृश्य सुरक्षा कॅमेऱ्या ने पकडलं, तर त्यात काही स्फोटकं असतील का?, हे त्या माणसाच्या चालीवरून कळू शकेल. एखाद्या माणसाने आपल्या कंबरेला किंवा अंगावर कुठेही स्फोटकांचा पट्टा बांधलेला असेल तर ते त्याच्या चालीवरून, कोपर आणि ढोपर यांच्या विशिष्ट हालचालींवरून कळू शकेल.” अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा खात्याने तर ‘मानवी वर्तन विभाग’ या नावाचा एक खास विभागच सुरू केला आहे. विशिष्ट वर्तनावरून संशयास्पद हालचालीचे काही सर्वसामान्य नमुने तयार करता येतील का आणि यावरून संभाव्य अतिरेकी ओळखता येतील का, यावर त्यांचं संशोधन सुरू आहे. त्यांनी आपलं लक्ष माणसाच्या चेहऱ्या वर केंद्रित केलं आहे.

 

सर्वसामान्यपणे माणसाच्या मनातला राग, द्वेष, प्रेम, तिरस्कार, आशा, निराशा, दु:ख, उत्साह अशा भावना ताबडतोबच त्याच्या चेहऱ्या वर झळकतात, पण या झाल्या ढोबळ भावना, त्यांच्या मनातले खोलवरचे विचार अगदी सूक्ष्म स्वरूपात त्याच्या चेहऱ्या वर दिसतात. कॅलिफोर्निया विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक पॉल एकमन हे अंतर्गत सुरक्षा खात्याच्या मानवी वर्तन विभागासाठी, मानवी चेहऱ्या वरील या सूक्ष्मातिसूक्ष्म भावना कशा वाचता येतील, याबाबत प्रयोग करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, अशा ४० प्रकारच्या सूक्ष्मातिसूक्ष्म भावना आहेत की, ज्यावरून माणसांच्या मनातले खोल विचार जाणता येतात. या सूक्ष्म भावना एका सेकंदाच्या एक विसांश इतक्या भागात माणसाच्या चेहऱ्या वर चमकून जातात आणि त्यामुळे समोरच्या माणसाच्या साध्या डोळ्यांना त्या समजत नाहीत किंवा संपूर्ण चेहऱ्या वर कुठेतरी एखाद्या अगदी बारीक रेषेच्या स्वरूपात त्या दिसूही शकतात, पण त्यांचा अन्वयार्थ लावता येतोच असं नाही. प्रशिक्षित अतिरेक्यांना तर चेहऱ्या वर कोणत्याही भावभावना दिसू न देण्याचं खास प्रशिक्षण दिलेलं असतं. पॉल एकमन संगणकीय कॅमेऱ्यासाठी अशी प्रणाली विकसित करीत आहेत की, जो अशा तरबेज अतिरेक्यांच्या चेहऱ्या वरील सूक्ष्म भावनासुद्धा पकडू शकेल. पॉल एकमन यांच्या म्हणण्यानुसार, चेहऱ्या वर स्पष्टपणे दिसू शकणाऱ्या भावना लपविण्याचा प्रयत्न केला की, उलट या सूक्ष्म भावना जास्तच ठळक होतात. मानवी वर्तन विभागाच्या संचालक शर्ला रॉश याचं वर्णन ‘मायक्रो फेशल लीकेज’ म्हणजे ‘चेहऱ्या वरील सूक्ष्म भावनांची गळती,’ अशा गमतीदार भाषेत करतात.

 

या सगळ्यात फार काही नवीन आहे असं नाही. चेहऱ्यावरून मनातल्या ढोबळ भावना सगळ्यांनाच कळतात. सूक्ष्म भावना जाणण्याचं कौशल्य काही मोजक्या लोकांना प्राप्त झालेलं असतं. त्यालाच, माणसाची पारख करण्याचे शास्त्र, असं म्हटलं जातं; काहींना ते जन्मत:च अवगत असतं. बरेच जण ते प्रयत्नपूर्वक अवगत करून घेतात. व्यवहारात मग अशी माणसं लोकनेते, समाजधुरीण होतात किंवा मोठी अधिकारपदं भूषवतात. यातला नवीन भाग हा आहे की, यावरून संभाव्य अतिरेकी ओळखणं एवढंच नव्हे, तर सुरक्षा कॅमेऱ्या च्या डोळ्याने संभाव्य अतिरेक्याच्या चेहऱ्या चं निरीक्षण करून धोक्याचा इशारा देणं, अशी संगणकीय कॅमेराप्रणाली विकसित करणं. मानवी वर्तन विभागाने नुकताच आणखी एक प्रयोग केला. विविध प्रकारचे कॅमेरे, संवेदक (सेन्सर्स) बसवलेल्या एका विशिष्ट मार्गावरून १४० लोकांना चालविण्यात आले. यापैकी प्रत्येकाला विशिष्ट रीतीने वागण्याची सूचना देण्यात आली होती. म्हणजे, काही जणांनी सर्वसामान्य सभ्य प्रवाशांप्रमाणे चालायचं होतं. काहींनी विमान लेट झाल्यामुळे संतापलेल्या प्रवाशांप्रमाणे वागायचं होतं. काहींनी हत्यारं किंवा प्लास्टिक स्फोटकं चोरून न्यायची होती इत्यादी. या १४० लोकांनी आपापल्या भूमिकेशी शक्य तितकं एकरूप व्हायचं होतं. मार्गावरच्या कॅमेऱ्या नी या लोकांची चाल, चेहरे, डोळे यांचं निरीक्षण केलं, तर संवेदकांनी त्यांच्या शरीराचे तापमान, रक्तप्रवाहाची शैली, हृदयाचे ठोके, श्वासाची गती, इतकंच नव्हे तर प्रत्येकाच्या शरीराला येणारा विशिष्ट गंध यांचीदेखील नोंद केली. या प्रयोगात ८० टक्के यश मिळालं. म्हणजे कॅमेरे आणि संवेदक यांना देण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीने ८० टक्के इतक्या अचूक प्रमाणात संभाव्य अतिरेकी शोधून काढले.

 

प्रगत सुरक्षा यंत्रणेसाठी संगणकाचा वापर हा मानवी सुरक्षारक्षकांना पर्याय ठरू शकत नाही, याची मात्र या सगळ्या संशोधकांना स्पष्ट जाणीव आहे, मानवी यंत्रणेला मदत म्हणूनच या पद्धती वापरता येऊ शकतात, असंच त्यांचं म्हणणं आहे.  मुळात पाश्चिमात्य देशांमध्ये, विशेषत: अमेरिकेत लोकसंख्या कमी आणि प्रदेश अवाढव्य असल्यामुळे माणसांची कामे करण्यासाठी यंत्रांची योजना झाली. मग माणसांना अधिकाधिक सुखसोयी देण्याच्या दृष्टीने यंत्रं आणखी विकसित होत गेली, माणसांची कामं यंत्र जास्त सफाईदारपणे, शिस्तबद्धपणे आणि बिनबोभाट करतात, पण जिथे सारासार विचार करून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, तिथे माणूसच हवा, नुसताच कुणीतरी येरागबाळा माणूस नव्हे, तर निर्णय घेण्याची क्षमता असणारा कुशल माणूस हवा. हाच अत्यंत नाजूक बिंदू आहे, जिथे यांत्रिक साधनांनी, वा मानवी खबऱ्या नी पुरवलेल्या माहितीनुसार त्वरित निर्णय घेणारी माणसं असतात, तिथे दुर्घटना टाळल्या जातात, पण जिथे अशी माणसं नसतात, तिथे हाहाकार होतो. अनेक पत्रकार आणि अभ्यासक यांचा असा दावा आहे की, ११ सप्टेंबर २००१ रोजी घडलेल्या घटनेची सूचना बुश प्रशासनाला अगोदर मिळाली होती, पण त्यांनी त्वरित निर्णय घेतला नाही आणि पुढे जे घडायचं ते घडलं.

 
@@AUTHORINFO_V1@@