अरुण गवळी आणि गांधीगिरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Aug-2018
Total Views |


 

महात्मा गांधींच्या आदर्शांवर आधारित प्रश्नावलीद्वारे नुकतीच एक परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये १५९ कैदी सहभागी झाले होते.
 

सहयोग ट्रस्ट, सर्वोदय आश्रम, मुंबई सर्वोदय मंडळातर्फे नागपूरच्या केंद्रीय कारागृहात महात्मा गांधींच्या आदर्शांवर आधारित प्रश्नावलीद्वारे नुकतीच एक परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये १५९ कैदी सहभागी झाले होते. परीक्षा ऐच्छिक होती. अहिंसेच्या तत्त्वाचे पुजारी महात्मा गांधी आणि संकल्पनांवर आधारित प्रश्नावली सोडवली कोणी? तर गुन्हा केलेले, त्यामुळे सजा भोगणारे कैदी. बरं, या परीक्षेत ८० पैकी ७४ गुण म्हणजे जवळजवळ ९३ टक्के गुण मिळवले, ते दगडी चाळ फेम डॉन अरुण गवळी याने. सध्या अरुण गवळी नागपूरच्या केंद्रीय कारागृहात एका खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत

 

अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करणाऱ्या सेवाभावी संस्थांचे आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कैद्यांचेही कौतुकच वाटते. कारण, कोणताही माणूस जन्मतःच गुन्हेगार नसतो. त्याला परिस्थिती आणि त्यानुसार त्याने केलेले कर्मभाव गुन्हेगार बनवत असतात. अर्थात, त्यामुळे त्याने केलेल्या गुन्ह्याचे परिणाम दुर्लक्षित करता येत नाहीत म्हणा. कारण चुकीला माफी नाही. पण, तरीही अशा प्रकारच्या परीक्षांमधील कैद्यांचा सहभाग पाहिला की वाटते, गुन्हेगाराच्या दगड झालेल्या मनात आणि खुरापतखोर मेंदूतही कल्पकता, सर्जनशीलता आणि अभिव्यक्त होण्याची खुमखुमी दडलेली आहे. फक्त इतकेच, हे सारे मार्ग सोडून ते भरकटलेले आहेत. त्यांचे भरकटणे कधी स्वनिर्णित, तर कधी लादलेले असते. असो, कारागृहात झालेल्या या परीक्षेत सहभागी झालेले कैदी आता उर्वरित सारे आयुष्य गांधीगिरीनुसार आयुष्य जगतील असे मानणे म्हणजेही स्वप्नरंजनच. पण, अशा प्रकारच्या परीक्षेत सहभागी होऊन गुण मिळविण्याची सकारात्मक हुशारी आपल्यात आहे, ही जाणीव सहभागी कैद्यांना होणे, हेही काही कमी नाही. कारागृहातील कैद्यांच्या माणूसपणाला जागवणारे अनेक उपक्रम कारागृहात आयोजित केले जातात. अशा उपक्रमांमुळे कैद्यांच्या भरकटलेल्या जगण्याला, अंतर्मनाला पुन्हा समाजप्रवाहात आणणे शक्य असेल, नसेल, पण यामुळे कैद्यांना स्वतःतले दडलेले, दडपलेले माणूसपण निसटतेपणाने का होईना, ओळखता आले तरी बस. त्यामुळेच अरुण गवळीची ही परीक्षेतली गांधीगिरी अभिनंदनीय आहे.

 
 

चौकशी कराच!

 

वर्सोवाच्या एका ब्युटी सलूनमध्ये ११ ते १६ वर्षांच्या मुलींना भरपूर मेकअप केला जात होता. सलूनमध्ये आलेल्या अभिनेत्री प्रीती सूद यांनी सहज प्रश्न विचारला की, “या मुलींना एकाचवेळी इतका मेकअप का केला जात आहे?” यावर तिला उत्तर मिळाले की, “त्यांना अमेरिकेमध्ये त्यांच्या पालकांकडे पाठवले जाणार आहे.” पुढे अभिनेत्री प्रीती सूदच्या सतर्कतेमुळे या घटनेची पोलीस तक्रार झाली. त्यातून जे सत्य बाहेर आले, ते संतापजनक आणि तितकेच आपल्या मानवी जगण्याला कलंकनीय म्हणावे लागेल.

 

गुजरातमध्ये स्थायिक असलेला राजू गमलेवाला आणि अमिर खान, ताजुद्दीन शेख, अफजल शेख या चौघांचे राक्षसी कृत्य जगासमोर आले. राजू गमलेवाला याने एक पथक बनवले होते. ते पथक वय वर्षे ११ ते १६ पर्यंतची मुलं असलेल्या गरजू गरीब कुटुंबाना हेरत. त्या पालकांकडून त्यांची वय वर्षे ११ ते १६ वर्षांपर्यंतच्या मुले/मुली विकत घेत. त्यांना मुंबईतल्या वर्सोव्याच्या ब्युटी सलूनमध्ये आणून मेकअप केला जाई. नंतर मेकअप केलेल्या फोटोचा वापर करून पासपोर्टही बनवला जार्ई. पुढे परदेशात पाठवून त्यांना वेश्याव्यवसायात जबरीने ढकलले जाणार होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे तर या रॅकेटने ३०० अल्पवयीन मुलींना अशाप्रकारे परदेशात पाठविण्याची तयारी केली होती. भयंकर आणि शब्दातीत... बालिकांची तस्करी करणाऱ्या या नराधमांना आणि स्वतःच्या मुलांना विकणाऱ्या उलट्या काळजाच्या त्या आईबापांविरुद्ध योग्य ती कारवाई व्हायला हवी. इथे प्रश्न असा आहे की, त्या मुलींना एकत्र आणताना कुणी पाहिलेच नसेल का? वर्सोव्याच्या ज्या सलूनमध्ये त्यांना मेकअप केला जात होतो, तिथे कुणालाही प्रश्न पडलाच नाही की, या मुलींना इथे का? कुणी आणि कशासाठी आणले? कुणी म्हणेल की, इथे वेळ कुणाला आहे दुसर्यांच्या चौकश्या करण्यासाठी. असेलही असे, पण असा विचार करून आपली सुटका होणार नाही. त्या निष्पाप अजाण मुलींचे दुर्दैव हे हिमनगाचे टोक आहे. अशाप्रकारे कितीतरी घटना आपल्या आजूबाजूला घडत असतील, घडत आहेत. म्हणून गरज आहे ती मानवी संवेदनशीलतेने डोळे आणि मन उघडे ठेवण्याची. संशय आला तर चौकशी करायलाच हवी.

@@AUTHORINFO_V1@@