अटल स्वयंसेवक !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Aug-2018   
Total Views |


 
 
१९३६ च्या आसपासचा काळ. देश पारतंत्र्यात होता. या परचक्राची कारणे शोधून देशाला केवळ स्वातंत्र्य मिळवून देण्याचे मर्यादित लक्ष्य न ठेवता पुन्हा अशी वेळ देशावर येऊ नये यासाठी हिंदू समाज संघटित करून देश परमवैभवाला नेण्यासाठी शिस्तबद्ध युवकांची संघटना बांधून चारित्र्य निर्माणाचे काम करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होऊन ११ वर्षे झाली होती.देशातील अनेक राज्यांमध्ये संघाचे काम आता सुरु झाले होते व हळूहळू बाळसे धरत होते. साधारण याच सुमारास नागपूरमधील एक सामान्य स्वयंसेवक संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांना भेटायला आला. दिसायला तसा साधारणच. अंगी फार काही शारीरिक कौशल्य किंवा बुद्धिचातुर्य नव्हते. पण संघाची शाखा लावण्याचे आणि संघटन करण्याचे कौशल्य मात्र होते. त्या युवकाने डॉक्टरांजवळ प्रचारक म्हणून पूर्णवेळ संघाचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली. सुरुवातीला डॉक्टरांनी थोडी नापसंती दर्शवली मात्र त्या तरुणाने फार आग्रह धरल्यामुळे मग त्यांनी त्याला प्रचारक जाण्यास अनुमती दिली. या साधारण दिसणाऱ्या तरुणाकडून भविष्यात एवढे मोठे कार्य होईल याची कल्पना त्यावेळी कोणीच केली नव्हती. अखेर डॉ. हेडगेवारांनी त्या तरुणाला संघाची प्रार्थना व प्रतिज्ञा लिहिलेला कागद, त्याबरोबर चार-पाच रुपये आणि परिचितांच्या नावाने एक चिठ्ठी देऊन ग्वाल्हेरला पाठवले. आपण लावणार असलेल्या शाखेत देशाचा पंतप्रधान घडणार आहे असे जर त्यावेळी कोणी सांगितले असते तर त्याचाच काय कोणाचाच विश्वास त्यावर बसला नसता. त्या तरुणाचे नाव म्हणजे नारायण विश्वनाथ तरटे आणि त्यांच्या शाखेत घडलेला तो स्वयंसेवक म्हणजे अटल बिहारी वाजपेयी.
 
 
अटलजींचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी कृष्णबिहारी व कृष्णा देवी या वाजपेयी दांपत्याच्या पोटी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला. वडील शिक्षक असल्यामुळे लहानपणापासून अटलजी अतिशय पारंपरिक व शिस्तप्रिय वातावरणात वाढले. त्याकाळी उत्तर भारतात आर्य समाजाचे खूप मोठे काम होते. लहानपणापासून अटलजी आर्य समाजाचा विद्यार्थी विभाग अर्थात आर्य कुमार सभेचे काम करत असत. १९३८-३९ च्या सुमारास याच आर्य कुमार सभेच्या भूदेव शास्त्री या त्यांच्यापेक्षा वयाने थोड्या मोठ्या असलेल्या युवकाने त्यांना शाखेत येण्याचा आग्रह केला. नारायणरावांनी ग्वाल्हेरमध्ये संघाचे काम सुरु केल्यानंतर १९३७ च्या सुमारास संघाची नित्य शाखा स्थिरावली होती. नारायणराव स्वतः त्या शाखेकडे लक्ष देत असत. भूदेव शास्त्रींच्या आग्रहावरून अटलजी त्या शाखेत रोज जाऊ लागले. शाखेत होणारे मैदानी खेळ आणि साप्ताहिक बौद्धिकवर्ग याची त्यांना गोडी लागली. कुशल संघटक असलेल्या नारायणरावांनी त्यांच्यातील गुण ओळखले नसते तरच नवल. यावेळी अटलजींचे वय साधारण १४-१५ वर्षांचे होते. नारायणराव खरंतर त्यांच्यापेक्षा ११ वर्षांनीच मोठे होते पण त्यांच्या साधेपणाचा, त्यांच्या संघटन कौशल्याचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या प्रेमळ स्वभावाचा अटलजींवर जबरदस्त प्रभाव पडला. नारायणरावांमुळेच अटलजींची संघकामातील रुची अधिक वाढली. याच सुमारास त्यांनी संघासाठी अधिक काळ काम करण्याचा निर्णय घेतला आणि देशासाठी आयुष्य झोकून देण्याचे ठरवले.
 
 
अटलजी हे मुळातच कविमनाचे होते. त्यातच संघात जायला सुरुवात केल्यामुळे त्यांच्या काव्यप्रतिभेला देशभक्तीचा, हिंदुत्वाचा साज चढला नसता तरच नवल. शाखेत जायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांनी त्यांची ‘हिंदू तन-मन, हिंदू जीवन, रग-रग हिंदू, मेरा परिचय’ ही सुप्रसिद्ध कविता लिहिली. यावेळी अटलजी जेमतेम दहावीमध्ये होते. मात्र आजही ती कविता वाचल्यावर जीवनाचा पुरेपूर अनुभव घेतलेल्या एखाद्या तपस्व्याने केले चिंतन असावे असे वाटते. इतक्या कमी वयात अटलजींच्या प्रतिभेने खूप मोठी झेप घेतली होती. पुढचा काही काळ अटलजी आर्य समाज व संघ असे दोन्हीचे काम करत होते. याच काळात अटलजींचा संबंध संघाचे तत्कालीन अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख व आद्य प्रचारक बाबासाहेब आपटे यांच्याशी आला. बाबासाहेबांच्या मृदूभाषीपणामुळे व वागण्यातील सहजता व प्रेमळपणामुळे ते खूपच प्रभावित झाले. तसेच ज्यांचा अटलजींच्या जीवनावर मूलगामी परिणाम झाला असे पंडित दीनदयाळ उपाध्याय व भाऊराव देवरस यांचीही भेट याच काळात त्यांना ग्वाल्हेरमध्ये झाली.
 
 
 
१९४० च्या नागपूरमधील तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाला अटलजी गेले होते. तशी आठवणच त्यांनी एका नियतकालिकाला दिलेल्या लेखात लिहून ठेवली आहे. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार त्या वर्गात काही काळासाठी आले होते. डॉक्टरांच्या जीवनात दिलेला शेवटचा बौद्धिक वर्ग याच वर्गातील होता. या काळात डॉक्टरांची तब्येत अत्यंत खालावली होती. गेली १५ वर्षे सतत अथक प्रयत्नांनंतर देशातील प्रत्येक प्रांतातून स्वयंसेवक तृतीय वर्षाला येण्याची ती पहिलीच वेळ होती. याच बौद्धिक वर्गात डॉक्टरांनी आपल्याला विराट हिंदू राष्ट्राचे छोटे दर्शन या सर्व स्वयंसेवकांच्या रुपाने झाले असल्याचा उल्लेख केला होता. अटलजींनी डॉक्टरांना पहिल्यांदा पाहिले ते येथेच. त्यानंतर लगेचच २१ जून १९४० या दिवशी डॉक्टरांचे देहावसान झाले. याचि देहि याचि डोळा भारताचे परमवैभव बघायचे डॉक्टरांनी दिलेले स्वप्न अटलजींनी आपले जीवनध्येय बनवले. केवळ ५१ वर्षांच्या आयुष्यात देशासाठी, हिंदू समाजासाठी आपला देह झिजवून बलाढ्य संघटना उभी केलेल्या डॉक्टरांच्या ओजस्वी वाणीमुळे भारावून न गेलेला कदाचित त्या मैदानात कोणीच नसेल. अटलजी तर कवी, हळव्या मनाचे.
 
 
१९४१, ४२ आणि ४४ अशी तीन वर्षे आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत असतानाच अटलजींनी संघाचे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाचे संघ शिक्षा वर्ग पूर्ण केले. १९४२ च्या चलेजाव आंदोलनात देशभरातील अनेक स्वयंसेवकांप्रमाणेच त्यांनीही भाग घेतला. त्यासाठी त्यांना व त्यांचे बंधू प्रेम या दोघांना अटक झाली व २३ दिवस कारावासही भोगावा लागला. त्यावेळी अटलजी जेमतेम १२वीमध्ये शिकत होते. ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया महाविद्यालयातून त्यांनी हिंदी, इंग्रजी आणि संस्कृतमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर कानपूरच्या डीएव्ही महाविद्यालयातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांना खरंतर विधी अभ्यासक्रम पूर्ण करायचा होता मात्र त्याच काळात देशाची फाळणी झाल्यामुळे त्यांना अभ्यासक्रम अर्धवट सोडावा लागला. त्यानंतर त्यांनी अधिक वेळ न दवडता संघाचे पूर्णवेळ काम करायचे ठरवले आणि १९४७ पासून ते संघाचे प्रचारक झाले. नंतरच्या काळात अटलजींच्या जीवनात अनेक स्थित्यंतरे आली मात्र त्यांची प्रचारक ही मनोवस्था शेवटपर्यंत तशीच राहिली. शेवटपर्यंत ते एका प्रचारकाप्रमाणेच व्रतस्थ जीवन जगले.
 
१९४८ मध्ये गांधीहत्येच्या खोट्या आरोपाखाली काँग्रेसने संघावर बंदी आणली. अटलजी त्या काळात उत्तर प्रदेशात प्रचारक होते. बंदीकाळात संघाने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी अटलजींनी चोखपणे पार पाडली. मात्र त्यानंतर संघाच्या सांगण्यानुसार त्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विचारांच्या नियतकालिकांसाठी लेखन करायला सुरुवात केली. राष्ट्रधर्म हे हिंदी मासिक, पाञ्चजन्य हे हिंदी साप्ताहिक, स्वदेश आणि वीर अर्जुन ही दैनिके यांसाठी त्यांनी लिखाण केले. यापैकी काही नियतकालिकांचे ते काही काळ संपादकही होते. १९४९ साली संघावरील बंदी काँग्रेसला मागे घ्यावी लागली. मात्र त्यानंतर संघाची बाजू संसदेत मांडणारी काही व्यवस्था असावी याचा गांभीर्याने विचार सुरु झाला. द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींच्या चिंतनातून व डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जीच्या नेतृत्वात २१ ऑक्टोबर १९५१ रोजी भारतीय जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना झाली. त्याचवेळी काळाची गरज ओळखून प्रचारक व पत्रकार राहिलेल्या अटलजींना गुरुजींनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्यासोबत जनसंघात जायला सांगितले. तिथूनच पुढे अटलजींची राजकीय कारकीर्द सुरु झाली. १९५१ ते ५४ या तीन वर्षांत अटलजी दीनदयाळजी व श्यामाप्रसाद मुखर्जींच्या सोबत सावलीसारखे राहिले. १९५४ साली काश्मीरबाहेरील नागरिकांना काश्मीरमध्ये दुय्यम वागणूक देण्याविरोधातील आंदोलनात मुखर्जींनी तुरुंगात आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला व त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला अटलजी त्यांच्या बरोबरच होते. श्यामाप्रसाद मुखर्जी व दीनदयाळ उपाध्याय यांचा खूप प्रभाव अटलजींवर होता.
 
जनसंघाचे काम करत असतानाही अटलजींमधील स्वयंसेवक कधीच लोप पावला नाही. ज्या राज्यात ते प्रवास करत असत त्या त्या भागातील स्वयंसेवकांना, संघाच्या अधिकाऱ्यांना ते आवर्जून भेटत असत. भेट झालेल्या स्वयंसेवकांची अठवण ठेवत असत व पुढील प्रवासात आवर्जून त्यांची चौकशी करत असत. द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींशी त्यांचा विशेष ऋणानुबंध होता. ज्या दिवशी गुरुजींचे निधन झाले त्या दिवशी देखील सकाळीच अटलजींची त्यांची भेट झाली होती. अटलजी जनसंघाच्या काही कार्यकर्त्यांना घेऊन गुरुजींची भेट घ्यायला आले होते. त्यावेळी त्यांच्यात झालेले बोलणे व या भेटीचा अनुभव अटलजींनी पुढे सांगलीला झालेल्या एका बौद्धिक वर्गात सांगितला तेव्हा तो सर्वांना कळला. भाऊराव देवरसांचाही फार मोठा प्रभाव अटलजींवर होता. खरंतर भाऊरावांचे कार्यक्षेत्र कधीच ग्वाल्हेर नव्हते. मात्र बाबासाहेब आपटेंच्या बरोबर एकदा ग्वाल्हेरला झालेल्या प्रवासात दोघांचीही ओळख झाली आणि पुढे मग मैत्री झाली. साहजिकच त्यामुळे भाऊरावांचे भाऊ व तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचाही त्यांचा चांगला स्नेह होता. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या दुर्दैवी हत्येनंतर १९६८ पासून ते १९७२ पर्यंत अटलजी जनसंघाचे अध्यक्ष होते. १९७५ साली देशावर आणिबाणी लादली गेली. संघासह जनसंघावरही बंदी घातली गेली. त्याकाळात अटलजींना देखील देशातील बहुसंख्य स्वयंसेवकांप्रमाणे १९ महिने कारावास भोगावा लागला होता. १९७७ साली आणिबाणी मागे घेतल्यानंतर मात्र जनसंघ जनता पक्षामध्ये विलीन केला गेला व जनता पक्षाचे सरकार आले. अटलजी त्या सरकारमध्ये परराष्ट्र व्यवहार खात्याचे मंत्री होते. १९७९ मध्ये हे सरकार अंतर्गत विरोधामुळे पडले. त्यानंतर १९८० साली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली ज्याचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष वाजपेयी झाले. पुढील काळातही राजेंद्रसिंह व के. एस. सुदर्शन या सरसंघचालकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले. वेळोवेळी संघाच्या विविध कार्यक्रमांमध्ये ते सहभागी झाले व कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.
 
 
 
नव्वदच्या दशकात रामजन्मभूमी आंदोलनाने मोठे रूप धारण केले. या आंदोलनात देशभरातील कारसेवकांना व रामभक्तांना योग्य मार्गदर्शन करण्यात अटलजींची भूमिका निर्णायक ठरली. त्यानंतर देशभरातील वातावरणच बदलून गेले. भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणावर मान्यता मिळाली. या सर्व लाटेचे नेतृत्व अटलजींनी केले. खऱ्या अर्थाने अटलजी देशाचे नेते झाले. अबकी बारी अटलबिहारी अशा घोषणांना देश दुमदुमून गेला. अखेर १९९६ साली अटलजींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. देशाच्या इतिहासात प्रथमच एक स्वयंसेवक पंतप्रधानपदावर विराजमान झाला होता. पंतप्रधान म्हणून अटलजींची कारकीर्दही इतकी सोपी नव्हती. २७ पक्षांचे आघाडी सरकार चालवताना त्यांना आयुष्यभर केलेल्या संघटनाच्या कामाचा अनुभव कामी आला. जो जसा आहे तसे त्याला स्वीकारावे आणि आपल्याला हवे तसे घडवावे हे संघाचे सूत्रच त्यांना या बाबतीतही उपयोगी पडले. २००४ च्या निवडणुकीत झालेला पराभव त्यांनी मोठ्या मनाने मान्य केला. २००५ ते २००९ ते खासदार होते मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते फार बाहेर दिसत नसत. २००९ नंतर मात्र ते सक्रीय राजकारणातून निवृत्त झाले. या काळातही कोणताही मोठेपणा न मिरवता ते अत्यंत साधेपणाने लोकांना सामोरे जात असत. 'पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढते जाना । सब समाज को लिये साथ में आगे है बढते जाना ।।' या ओळी तेे अक्षरशः जगले. या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत अटलजींच्या चारित्र्यावर शंका घेण्याचे कोणाचेही धाडस कधी झाले नाही. निष्कलंक चारित्र्य आणि सर्वांना सामावून घेणारे विशाल अंतःकरण हीच त्यांची जीवनातील खरी जमापूंजी राहिली.
 
 
आपल्या संपूर्ण जीवनात अटलजींनी कायम आपण स्वयंसेवक असल्याची जाणीव ठेवली. आपल्याकडे लोक एक कार्यकर्ता, एक स्वयंसेवक म्हणून पाहतात याची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळेच कधीही वाजपेयींकडून कोणतेही गैरकृत्य झाले नाही. अर्थात तसा त्यांचा स्वभावही नव्हता. पण अतीव रागातही कधीही त्यांच्या तोंडून कधीही एखादा वावगा शब्द किंवा एखादे वावगे कृत्य घडले नाही. संयमाचे मूर्तिंमत उदाहरण म्हणजे अटल बिहारी वाजपेयी. आपल्या वागण्या बोलण्यातून आपल्या संघटनेला कमीपणा येणार नाही याकडे त्यांचा कटाक्ष असे. तसेच आपल्या वागण्यामुळे कोणीही आपल्यापासून, संघटनेपासून तुटणार नाही याचे भान त्यांनी कायम ठेवले. आपल्या प्रतिभेचा, वक्तृत्वाचा, संघटन कौशल्याचा उपयोग त्यांनी केवळ आपला विचार पोहोचवण्यासाठी केला. कितीही मोठ्या पदावर ते गेले असले तरी लोकांना जोडायचा आपला मूळ पिंड त्यांनी सोडला नाही यातच त्यांच्यातील स्वयंसेवकत्व दिसून येते. जिथे जातील तिथे ते आपल्या वागण्याचा ठसा उमटवत असत. राजकारणात राहूनही अजातशत्रू असे व्यक्तिमत्व त्यांचे होते. आपले स्वयंसेवकत्व त्यांनी कधीही लपवले नाही. उलट ते आनंदाने, अभिमानाने मिरवले. संघाविषयी त्यांच्या मनात अनन्यसाधारण असे भाव होते. संघ हा तर माझा आत्मा आहे असे ते म्हणत असत.
 
 
संघाच्या अनेक पद्यांपैकी एक पद्य म्हणजे ‘स्वयं प्रेरणा से माता की सेवा का व्रत धारा है। सत्य स्वयंसेवक बनने का सतत प्रयत्न हमारा है।।’ हे पद्य होय. या ओळी खूप काही सांगून जातात. ज्या प्रमाणे सैन्यातील कितीही मोठा अधिकारी मरण पावला व त्याला कितीही मोठ्या शौर्यपदकांनी सन्मानित केले तरीही त्याच्यासाठी सर्वोच्च सन्मान हाच असतो की तो एक सच्चा सैनिक होता. ‘He was a True Soldier’. हे शब्द हीच खरी त्याच्या कामाची पावती असते. त्या एका वाक्यासाठी तो आयुष्यभर झुंजत असतो. त्याचा तो सर्वोच्च गौरव असतो. मग अन्य सर्व मानमरातब त्यापुढे कमी ठरतात. त्याचप्रमाणे कोणत्याही संघाच्या कार्यकर्त्याला हेच शब्द सर्वाधिक प्रिय असतात की त्याच्या मृत्यूनंतर त्याच्याविषयी ‘तो खरोखर एक स्वयंसेवक होता’ असे म्हटले जावे. ‘He was a True Swayamsevak’. तीच खरी त्यांची ओळख असते. अटलजी हे त्या अर्थाने खरोखर स्वयंसेवक होते. सत्य स्वयंसेवक. अशा या सच्च्या स्वयंसेवकाला कोटी कोटी प्रणाम !!!

 
@@AUTHORINFO_V1@@