राजकीय नवतेचा अग्रदूत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2018
Total Views |


 

कुणी बिगरकाँग्रेसी राजकारणी या देशात यशस्वी होऊ शकतो आणि तो पाच वर्षे सरकारही चालवू शकतो, हा विश्वास अटलजींनी निर्माण केला. भारतीय लोकशाहीच्या वाटचालीचे मूल्यांकन जेव्हा जेव्हा केले जाईल, तेव्हा तेव्हा अटलजींच्या योगदानाची चर्चा या आयामातून करावीच लागेल.

 

अध्यक्ष महोदय, जेव्हा मी राजकारणात आलो, तेव्हा मी कधीच असा विचार केला नव्हता की, मी खासदार होईन. मी पत्रकार होतो आणि हे राजकारण ज्या प्रकारे चालते ते मला रुचत नाही. मी राजकारण सोडू इच्छितो पण राजकारण मला सोडत नाही. तरीसुद्धा मी विरोधी पक्षाचा नेता झालो. आज मी पंतप्रधान आहे. काही काळानंतर मी पंतप्रधानही नसेन. असे मुळीच नव्हते की, पंतप्रधान झाल्यावर माझे मन आनंदाने उचंबळून आले होते. त्यामुळे जेव्हा मी हे सारे सोडून जाईन तेव्हा माझ्या मनात कुठल्या प्रकारची विषण्णता नसेल.” ही वाक्ये होती अटलबिहारी वाजपेयी यांची. लोकसभेत त्यांचे सरकार पाडले गेले, तेव्हा केलेल्या भाषणातला हा सर्वोच्च बिंदू. वर्षानुवर्षे सत्ता मिळवूनही जे साध्य करता येत नाही, ते इथे सत्ता गेल्यानंतर वाजपेयींना साध्य झाल्याचे दिसते. महात्मा गांधी गेल्यानंतर अल्बर्ट आईन्स्टाईनचे वाक्य होते. पृथ्वीतलावर खरोखरच असा कुणी माणूस होता, असा विश्वास ठेवणे पुढच्या पिढीला मुश्किल असेल. अटलजींचेही तसेच झाले आहे. एका बाजूला भारतीय राजकारणातले एकाहून एक मोठे दिग्गज आणि दुसऱ्या बाजूला अटलजी. अटलजी कवी होते, लेखक होते, पत्रकार होते पण अटलजींच्या शब्दात सांगायचे तर ते अपूर्ण राजकारणी होते. मात्र ही अपूर्णता इतकी समावेशक होती की, पूर्णत्वाचा आव आणणारे त्यापुढे अपुरे पडावेत. देहरूपाने अटलजी आज आपल्यात नसतील पण भारतीय राजकारणात त्यांचे जे काही योगदान आहे, त्यामुळे ध्रुव ताऱ्याप्रमाणे अटलजी लोकशाहीच्या अवकाशात चमकतच राहतील. ते ज्या विचारांचे पाईक होते, त्या विचारांच्याच नव्हे तर प्रत्येकाला संसदीय लोकशाहीचे मापदंड प्रस्थापित करणाऱ्या या महापुरुषाचे स्मरण करावे लागेल.

 

अटलजींना कुणीही संसदेच्या सदनात कागद फेकताना पाहिले नाही. अध्यक्षांसमोर घोषणाबाजी करताना ते कधीही आढळले नाहीत. कुणावरही अभद्र किंवा असंसदीय भाषेत त्यांनी टीका केली नाही. त्यांच्या भाषणातली वाक्ये कामकाजातून कधीही काढून टाकावी लागली नाहीत. याउलट अटलजी बोलायला उभे राहिले की संसद आतुरतेने ते काय बोलतील, याचे कुतूहल कानात साठवून स्तब्ध राहायचे. सोनिया गांधींनी आपल्या भाषणात अटलजींना अनेक संबोधने लावली. नाकर्तेपणाची सगळी विशेषणे त्यांच्यासाठी वापरली. यावर संतप्त झालेला त्यांचा चेहरा स्पष्ट दिसतो. मुखातील वाणी मात्र अत्यंत संयत आहे. ते म्हणतात, “या संसदेला एक मर्यादा आहे. तिचे पालन करा.” यापूर्वीही अशा कितीतरी मूल्यांची कास धरणाऱ्या भाषणांची मेजवानी संसदेने अनुभवली. संसदेतील भाषणे, थेट प्रक्षेपण करण्याची पद्धत तोपर्यंत सुरू झालेली नव्हती. त्यामुळे देश अटलजींच्या कितीतरी भाषणांना मुकला. आजच्या पिढीलाही युट्यूबसारख्या माध्यमांतून सदस्य त्यांची भाषणे ऐकता येतात. या सगळ्या भाषणांची प्रेक्षकसंख्याही तिथे पाहाता येते. हा आकडा थांबणारा आहे. अन्य कुठल्याही राजकीय वक्त्याच्या नशिबी असले भाग्य आलेले नसावे. संसदेत कसे वागावे, याचा वस्तुपाठच अटलजींनी घालून दिला. अटलजी खरोखरच अजातशत्रू होते. आपल्याच नव्हे तर अन्य अनेक पक्षांतही अटलजींना स्वत:चा असा अनुयायी वर्ग होता. ते मित्र होते. सल्लागार होते आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे इतका कडवट संघर्ष करूनही अटलजींनी आपल्या व्यक्तिमत्त्वातला गोडवा हरवलेला नव्हता. भारतीय राजकारणात जेव्हा नेहरूंसारखा तारा तळपत होता, त्यांना पर्याय म्हणून राष्ट्रीय स्तरावर अटल बिहारी वाजपेयी पुढे येत होते. ही प्रक्रिया लहान नव्हती. सुमारे 40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर अटलजींच्या वाट्याला देशाचे पंतप्रधानपद आले आणि तेही चांगल्याच लपाछपीनंतर. अटलजींची ही सगळी कारकीर्द स्वच्छ राहिली आहे. पक्षाच्या चिन्हाप्रमाणेच चिखलात उमलूनसुद्धा कुठलाही डाग पडलेली. अटलजींचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी भारतीय जनता पक्षाला दिलेला आत्मविश्वास . पाठीशी असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आणि देशभर पसरलेले बिगर राजकीय संघटन हा एकमेव वारसा त्यांना लाभलेला होता. त्यावर त्यांनी जे काही उभे केले ते त्यांचे व्यक्तिगत क्षमतांमधून आणि मूल्यांच्या आधारावर. दिल्लीतले विचारवंत अटलजींना सर्वसमावेशक मानायचे. ‘अटलजी तर चांगले आहेत पण पक्ष...’अशी टीकाही व्हायची. डाव्या, उजव्याचा ते संगम आहेत, असे म्हटले जायचे. पण अटलजी खरे काय होते, याचा परिचय त्यांनी आपल्या कवितांतून दिला होता. राहिली गोष्ट राजकारणाची तर तिथेही त्यांनी तडजोडी केल्या नाहीत. ‘ऐसी सत्ता को मै चिमटे से भी छुना पसंत नही करूंगाहे त्यांचे वाक्य चांगलेच गाजले होते. आपल्या पक्षाचे विसर्जन त्यांनी केले होते, ते अशाच सर्वसमावेशक कारणासाठी. आणीबाणीनंतर जनता पक्षासाठी जनसंघाचे विसर्जन त्यांनी केले होते. “अब सवेरा हो गया है, दीपक बुझाने का समय गया हैअशी त्यांची भूमिका होती. सत्तेसाठी आपलाच पक्ष फोडून पदे पटकाविणाऱ्याच्या गर्दीत अटलजींचे व्यक्तिमत्त्व खुलून आले. जनता पक्षाचे सरकार आले आणि ते सत्तेतही होते. दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा आला. दुटप्पी समाजवाद्यांनी त्यांच्या निष्ठेविषयीच प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली. अटलजींची भूमिका स्पष्ट होती. निष्ठा अविचल होत्या. त्यांनी सरळ भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेचा निर्णय घेतला. सत्तेला लाथ मारली आणि आपल्या मूल्यांसोबत राहाणे पसंत केले.

 
 

जेव्हा त्यांनी रालोआचे सरकार स्थापन केले तेव्हाही अनेक विरोधाभास एकत्र सांभाळले. आतून खूप संघर्ष केला, मात्र बाहेर कुणावरही कधीही कटू टीका केली नाही. पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतरही आघाडीचे सरकार चालविताना घटक पक्षातील आपल्या सहकाऱ्याच्या अवाजवी मागण्यांवर त्यांना रोखून धरणे पण त्यांचा उपमर्द होऊ देणे ही किमया फक्त अटलजीच साधू शकले. अटलजी माध्यमांचे लाडके होते. मात्र पंतप्रधानपदावर असताना त्यांना टीकेलाही सामोरे जावे लागले. त्यांच्या प्रकृतीबाबत शंका उपस्थित केल्या गेल्या. एका राष्ट्रीय मासिकाने त्यांच्यावर मुखपृष्ठ कथा केली होती. आपल्या नर्मविनोदी शैलीत त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली होती. ‘ना टायर्ड ना रिटायर्ड.’

 
 

सत्ता अनेकांनी उपभोगली. पंतप्रधान होऊन काही ना काही योगदानही दिले. भारतीय राजकारणातले अटलजींचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी एक बिगर काँग्रेसी पंतप्रधानही या देशात यशस्वी होऊ शकतो, हा विश्वास भारतीय जनता पक्षाला आणि या देशातल्या जनतेला दिला. आज भाजपला देशभरात जे काही घवघवीत यश मिळते आहे, त्याची बिजे यातच दडलेली आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा पक्ष म्हणजे काँग्रेस आणि या पक्षाचे मालक असलेले गांधी घराणेच हा देश चालवू शकते, ही पक्की चौकट अटलजींनी मोडून काढली. कधीकाळी फक्त दोन खासदार असलेल्या पक्षाचा एक प्रतिनिधी पंतप्रधान होतो, ही कित्येकांना पचलेली घटना. त्यामुळे रालोआच्या भवितव्याबद्दल नेहमी शंका व्यक्त केल्या जायच्या. बुद्धिजीवींच्या मते तर हा पक्ष अस्पृश्यच होता. अटलजींनी या सगळ्या धारणा मोडून काढल्या आणि या देशातल्या राजकीय नवतेचा मार्ग मोकळा केला. आज नरेंद्र मोदींच्या रूपाने आपल्याला जे मिळाले आहे, ते याच प्रतिरूपाचे प्रतीक आहे. अटलजी चिरस्मरणीय ठरले ते याचमुळे. त्यांचे खरे योगदान हेच आहे. भारतीय लोकशाहीच्या वाटचालीचे मूल्यांकन जेव्हा जेव्हा केले जाईल, तेव्हा तेव्हा अटलजींच्या योगदानाची चर्चा या आयामातून करावीच लागेल. अटल संघर्ष करून अमर झालेल्या भारतमातेच्या या सुपुत्रालामुंबई तरुण भारततर्फे श्रद्धांजली.

 
 
@@AUTHORINFO_V1@@