निश्चयी आणि अटल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2018
Total Views |



अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने देश हळहळा होता. देवेंद्र फडणवीस यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्याविषयीच्या आठवणी या लेखातून मांडल्या आहेत...

अमोघ वक्तृत्व, लाघवी बोलणे; पण तितकेच सुस्पष्ट आणि सडेतोड विचार, लोकप्रशासनाचा अतिशय गाढा अभ्यास, प्रचंड मोठ्या उंचीचा नेता असला, तरी सामान्य कार्यकर्त्यांशी जुळलेली घट्ट नाळ, निष्कलंक, नि:स्पृह आणि सहजसंवादी, लोकशाहीवर असलेली अगाध श्रद्धा, एक संवेदनशील कवी, लेखक, पत्रकार, तळागाळात काम करून एकेक टप्पे गाठत देशाच्या पंतप्रधानपदी पोहोचलेल्या, आमच्यासाठी सातत्याने प्रेरणास्थान असलेल्या आणि ज्यांच्या कार्याकडे नुसते पाहिले, तरी सातत्याने ऊर्जा प्राप्त होते, अशा अटलजींबद्दल किती लिहावे आणि किती नाही? असं म्हणतात की, माणूस एखाद्या ध्येयाने झपाटला असला की, त्याचे आयुष्यही तसेच घडत जाते. अटलजींचे आयुष्यही अगदी तसेच होते. इतकी प्रगाढ साधना त्यांच्या आयुष्याला लाभली की, खरेतर केव्हाच ते पक्षातीत व्यक्तिमत्त्व म्हणून पुढे आले होते; पण त्यासाठी त्यांनी कधीही विशेष प्रयत्न केले नव्हते. त्यांच्या कार्याने ते आपोआप साध्य होत गेले; पण भाजपासाठी ते मोठा आधारस्तंभ होते. असे कितीतरी कार्यकर्ते त्यांनी घडविले किंवा केवळ त्यांच्यामुळे स्वत:ला सर्वस्वीपणे झोकून देणारे कितीतरी कार्यकर्ते भाजपात आहेत.

आपल्या राजकीय जीवनात अखंड संघर्ष करणार्‍या अटलजींचा पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला, तो म्हणूनच एका नव्या पर्वाचा प्रारंभबिंदू होता. भाजपाच्या विकासाचा झंझावात, सरकार चालवून दाखविण्याची ताकद त्यातून जनतेला दिसून आली. मधला काही कालखंड वगळता, आज जो सुवर्णकाळ दिसतोय, त्याची पायाभरणी अटलजींसारख्या दिग्गजांनीच केली. अपार संघर्षातून प्रारंभी जनसंघ आणि नंतरच्या काळात भारतीय जनता पार्टीची पायाभरणी अटलजींनी केली. पं. दीनदयाळ उपाध्याय यांची हत्या झाल्यानंतर अटलजींचे जणू पितृछत्र हरपल्यासारखे झाले होते; पण त्यांनी क्षणाचीही विश्रांती न घेता, मुंबईत जनसंघाचे विराट अधिवेशन घेतले. तेथून खर्‍या संघर्षाचा प्रारंभ झाला. जयप्रकाश नारायण यांच्यासोबत लोकसंघर्ष समितीची स्थापना, आणीबाणीविरुद्ध दिलेला लढा, जनता पार्टीची स्थापना, जनता सरकार, भाजपाचा जन्म अशा अनेक ऐतिहासिक घटनांमधील ते कुठे साक्षीदार, तर कुठे कर्णधार राहिले. त्यातून राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांचे अनेकांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले होते. म्हणूनच अटलजी जेव्हा सभागृहात बोलण्यासाठी उभे होत, तेव्हा आवर्जून सारे सभागृह त्यांना ऐकायला हजर राहत असे. आजच्या टीआरपीचे माप त्याकाळी असते, तर कदाचित त्यांच्या भाषणांइतकी टीआरपी अन्य कुठल्याही कार्यक्रमाला मिळाली नसती. संपूर्ण देशाचा प्रवास, सातत्यपूर्ण चिंतन, मनन आणि वाचन, यामुळे त्यांच्या वाणीतून कायम अमृतच कानी पडत असे. एका व्यक्तीचा व्यासंग किती मोठा असावा? साहित्य, कला, चित्रपट, संगीत, कविता हीसुद्धा त्यांची रुची स्थाने. खऱ्या अर्थाने भारताचे रत्न!

मला अजूनही आठवतं. मी अगदी लहान होतो. मला अटलजींसोबत छायाचित्र काढायचे होते. आम्ही प्रमोदजी महाजन यांना गळ घातली. माझे बंधू आशिष हेही माझ्यासोबत होते. प्रमोदजी आम्हाला अटलजींकडे घेऊन गेले. ऐन छायाचित्र काढत असताना माझे वडील गंगाधरराव तेथे आले. त्यांनी विचारले, अरे हे काय चाललंय? अटलजी लगेच माझ्या वडिलांना उद्देशून म्हणाले, “देखो, मै शेरोंके साथ फोटो निकाल रहा हूँ।” सतत आपल्या अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न ठेवणारे व्यक्तिमत्त्व. कुठल्याही नवीन गोष्टीला चालना द्यायची, हा त्यांचा स्वभावच होता. सतत प्रोत्साहन देणे आणि प्रत्येकाची विचारांची स्वतंत्र बैठक आहे, त्याचाही सन्मान आहे, स्वातंत्र्य आहे, हे समजून वागणे, त्यामुळे अटलजींशी क्षणिक संवादही सुखावून जायचा. आणखी एक प्रसंग आठवतो. नागपुरातील माझ्या काही मित्रांनी मॉडेलिंगचा हट्ट धरला होता. मित्रपरिवाराच्या आग्रहाखातर एका कंपनीसाठी मी मॉडेलिंग केले होते. त्या छायाचित्रांवर वाहिन्यांनी बातम्या केल्या होत्या. त्या वेळी अटलजींची भेट झाली होती, तेव्हा त्यांनी “यस मिस्टर मॉडेल एमएलए” असा माझा उल्लेख केला होता. माझे कौतुकच त्या वेळी त्यांनी केले होते.

भारत महासत्ता व्हावी, हेच अटलजींचे स्वप्न. सत्तेत आल्यानंतर त्याची चुणूक त्यांनी लगेच दाखविली. पोखरण अणुचाचणी घेत, त्यांनी आपल्या राजकीय इच्छाशक्तीची भव्यता दाखविली. अटलजींचे नावच त्यांचे व्यक्तिमत्त्व सांगते. एकदा प्रमोद महाजन एका निवडणुकीत पराभूत झाले, तेव्हा ते लगेच मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला निघाले होते. तेव्हा अटलजी त्यांना म्हणाले होते, “क्या हार में, क्या जीत में, किंचित नही भयभीत मै। संघर्ष पथपर जो भी मिला, यह भी सही, वह भी सही।” खऱ्या अर्थाने कुठल्याही परिस्थितीला अटल मनोवृत्तीने सामोरे जाणाऱ्या अटलजींच्या सरकारचा जेव्हा एका मताने सभागृहात पराभव झाला होता, तेव्हा त्यांनी केलेले भाषण त्यांचा धीरोदात्तपणा दाखविते. त्या वेळी दूरदर्शनवर कोट्यवधी लोकांनी ते भाषण ऐकले होते. आगामी निवडणुकीतील त्यांच्या मताधिक्क्याची चर्चा तेव्हाच प्रारंभ झाली होती. अटलजी नेहमीच म्हणायचे, “इससे फरक नही पडता की, आदमी कहाँ खडा है। पथपर या रथपर? तीरपर या प्राचीरपर? फर्क इससे पडता है की, जहाँ खडा है, या जहाँ उसे खडा होना है, वहाँ उसका धरातल कहा है?”

- देवेंद्र फडणवीस


(टीप - सदर लेख दै. मुंबई तरुण भारतच्या भारतरत्न अटलजी या विशेषांकात २६ जानेवारी २०१५ रोजी प्रकाशित करण्यात आला होता. तो लेख वाचकांसाठी आम्ही पुनर्प्रकाशित करत आहोत.)
@@AUTHORINFO_V1@@