‘अटल’युगाचा अस्त...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2018
Total Views |


 

 
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी कालवश
 

नवी दिल्ली : जनसंघ आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाला अक्षरशः शून्यातून उभा करण्यात सिंहाचा वाटा उचलणारे धुरंदर नेता, उत्कृष्ट संसदपटू, ओघवत्या शैलीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे प्रभावी वक्ता, संवेदनशील कवी, तीनवेळा देशाचे पंतप्रधानपद भूषवणारे अजातशत्रू राजकारणी आणि जवळपास ५० वर्षांहून अधिक काळ राजकारणात विरोधकांच्याही आदराचा विषय ठरलेले भारतीय राजकारणातील स्टेट्समनअर्थात, ‘भारतरत्नअटलबिहारी वाजपेयी यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेले अनेक दिवस ते नवी दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचार घेत होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली.

 

 
 

आज सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी एम्स रुग्णालयाने अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्याची अधिकृत माहिती दिली. दि. ११ जूनपासून वाजपेयी मूत्रमार्गाचा संसर्ग झाल्याने एम्स रूग्णालयात उपचार घेत होते. तसेच, दीर्घकाळापासून डिमेंशिया या विसरण्याच्या आजारानेही ते ग्रस्त होते. सक्रीय राजकारणातून त्यांनी जवळपास १०-१२ वर्षांपूर्वीच निवृत्ती घेतली होती. त्यानंतर ते नवी दिल्ली येथील ६-ए, कृष्णमेनन मार्ग या निवासस्थानी राहत होते. आजारपणामुळे बोलण्यासह त्यांच्या सर्वच हालचालींवर बंधने आली होती. गेले काही दिवस त्यांना जीवरक्षक प्रणाली अर्थात व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकारणातील अटलयुगाचा अस्त झाला आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे देशातील तसेच आंतरराष्ट्रीय राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक वर्तुळातून मोठ्या प्रमाणावर शोक व्यक्त करण्यात येत आहे.

 
 
१९५५ साली त्यांनी पहिल्यांना लोकसभेची निवडणूक लढवली. १९५७ ते १९७७ या २० वर्षांच्या काळात ते जनसंघाच्या संसदीय दलातील नेते होते. मोरारजी देसाई यांची सरकार स्थापन झाल्यावर वाजपेयी यांनी परराष्ट्रमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. ६ एप्रिल १९८० मध्ये स्थापन करण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाचा भार देखील अनेकदा त्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आला. १९९७ मध्ये त्यांनी भारताच्या पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारला. केवळ एक मताने सरकार पडण्याची ऐतिहासिक घटना त्यांच्याच कार्यकाळात घडली. आपल्या संपूर्ण आयुष्यात अटल बिहारी वाजपेयी यांनी ३ वेळा पंतप्रधान पद भुषवले.
 

भारतातील परमाणू परीक्षण, कागरिलचे युद्ध, पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यासाठी करण्यात आलेले त्यांचे प्रयत्न, अशा अनेक ऐतिहासिक घटना संपूर्ण भारताने त्यांच्या कार्यकाळात अनुभवल्या आहेत. आज भारतीय राजकारणातील एक अत्यंत महत्वाचा, तेजपुंज मोती निखळला. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यामातून अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 
  
 
 
 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही ट्विटरवरून अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे दु:ख व्यक्त केले.

 
 
 
 

अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर मान्यवरांच्या प्रतिक्रिया..

 

विलक्षण नेतृत्व, दूरदृष्टी आणि अद्भुत वक्तृत्व यांमुळे अटलबिहारी वाजपेयी एक विशाल व्यक्तिमत्वबनले होते. भारतीय राजकारणातील एक महान विभूती असलेल्या अटलजींचे हे विराट व्यक्तिमत्व आमच्या सदैव आठवणींमध्ये राहील. अटलबिहारी वाजपेयी स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली.

- डॉ. रामनाथ कोविंद

राष्ट्रपती

 

मी निःशब्द झालो आहे. मात्र, मनात भावनांचा कल्लोळ दाटून आला आहे. आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण अटलजींनी राष्ट्रासाठी समर्पित केला. त्यांचं जाणं एका युगाचा अंत आहे. अटलजी आपल्यात नाहीत पण त्यांची प्रेरणा, मार्गदर्शन प्रत्येक भारतीयाला, प्रत्येक भाजप कार्यकर्त्याला सदैव मिळत राहील.

- नरेंद्र मोदी

पंतप्रधान

 

अटलजींच्या रूपाने भारतीय संस्कृती आणि मूल्यांना आपल्या विचार आणि आचरणातून पुढे नेणारे, एक प्रखर, दृढ आणि सर्वमान्य व्यक्तिमत्व आज आपल्यातून हरपले आहे. समाजजीवनात ही पोकळी भरून निघणे सोपे नाही. अटलजींच्या पुण्यस्मृतींस शत शत नमन..

- डॉ. मोहनजी भागवत

सरसंघचालक

 

आपल्या जीवनाचा क्षण-क्षण आणि शरीराचा कण-कण देश, संघटन आणि विचारधारेसाठी समर्पित करणे एवढे सोपे नाही. अटलजींना आम्ही एक आदर्श स्वयंसेवक, कवी, समर्पित कार्यकर्ता, ओजस्वी वक्ता आणि अद्भुत राजनेत्याच्या रुपात पाहिले. त्यांच्या स्मृतींस कोटी-कोटी नमन..

- खा. अमित शाह

राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप

 

अटलजी आपल्यात नाहीत, हे सत्य स्वीकारताना मन कठोर करावेच लागेल. अटलजींवर ज्यांनी नि:स्सिम प्रेम केले त्या तमाम नागरिकांच्या दु:खात मी सहभागी आहे. एकमेकांना धीर देण्याच्या पलिकडे आपल्या हातात तरी काय आहे? अटल, अढळ, अचल असलेले हे नेतृत्त्व नित्य आपल्यासोबत राहील. दिशादर्शकाच्या रूपाने...

- देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री, महाराष्ट्र

 
@@AUTHORINFO_V1@@