शिखंडी आणि भीष्म

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2018
Total Views |



भीष्मांच्या जवळ दुर्योधन व त्याचे भाऊ होते. तसेच द्रोण, अश्वत्थामा, भगदत्त, कृतवर्मा, कृप हे सर्व भीष्मांचे रक्षण करण्यासाठी उभे होते. पाठोपाठ शकुनी, कांबोज राजा व त्रीगर्त तयारीत होते. भीष्मांनी बाणांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. ते सैन्याचा संहार करत पुढे आले. त्यांचा वाढता क्रोध पाहून कौरव आनंदित झाले. आज ते अधिक जोशाने आणि तरुण योद्ध्यासारखे लढत होते.

 

युद्धाचा दहावा दिवस हा भीष्म यांचा अतिशय आनंदाचा दिवस होता. कारण, आज अर्जुन त्यांचा वध करणार होता. इकडे अर्जुन मात्र खूपच अस्वस्थ होता. पण, शब्द दिला होता म्हणून त्याने आपले कर्तव्य पार पाडायचे ठरविले होते. त्याचा हा निश्चय पाहून श्रीकृष्ण आनंदात होता. पांडवांनी ठरविल्याप्रमाणे शिखंडीला पुढे ठेवून आपले सैनिक पाठविले. भीष्मांनी आज असूरव्युह रचला होता. त्याला उत्तर म्हणून पांडवांनी देवव्युह रचला होता. आघाडीला शिखंडीच होता आणि दोन्ही बाजूंनी भीम व अर्जुन त्याचे रक्षण करत होते. मागोमाग अभिमन्यू, द्रुपदाचे नातू, सात्यकी आणि धृष्टद्युम्न होते. त्यानंतर युधिष्ठीर, नकुल आणि सहदेव होते. विराट, द्रुपद, घटोत्कच आणि धृष्टकेतु त्यांना साथ देत होते. आज तुंबळ युद्ध करून भीष्मांना कोंडीत पकडून मारायचे, असेच जणू सर्व ठरवून आले होते.

 

भीष्मांच्या जवळ दुर्योधन व त्याचे भाऊ होते. तसेच द्रोण, अश्वत्थामा, भगदत्त, कृतवर्मा, कृप हे सर्व भीष्मांचे रक्षण करण्यासाठी उभे होते. पाठोपाठ शकुनी, कांबोज राजा व त्रीगर्त तयारीत होते. भीष्मांनी बाणांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. ते सैन्याचा संहार करत पुढे आले. त्यांचा वाढता क्रोध पाहून कौरव आनंदित झाले. आज ते अधिक जोशाने आणि तरुण योद्ध्यासारखे लढत होते.

 

शिखंडी भीष्मांच्या पुढे येऊन उभा ठाकला, त्याच्याकडे तुच्छतेने पाहून भीष्म म्हणाले, “आता जरी तू पुरुष वेषात असला तरी अजून मी तुला एक स्त्रीच समजतो. मी तुझे आव्हान स्वीकारत नाही, कारण तू एक नारी आहेस आणि मी नारी बरोबर युद्ध करणार नाही. ते माझ्या प्रतिष्ठेला शोभून दिसत नाही. बाजूला हो!” हे भाष्य ऐकून शिखंडी क्रुद्ध झाला. तो म्हणाला, “तुम्ही सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहात आणि तुम्ही भार्गवांना पण हरविले आहे. पण, अंबेचे प्रेम झिडकारून तुम्ही भार्गवांशी लढणे पसंत केलेत. आज मी शिखंडी तुम्हाला युद्धाचे आव्हान देत आहे. मी तुम्हाला द्वंद्वयुद्धाचे आव्हान करतो. आज मी तुम्हाला ठार करीनच!” असे म्हणून शिखंडीने पाच बाण भीष्मांकडे सोडले. हे पाच मदनबाण आहेत, असे कदाचित पुरुष वेष धारण केलेल्या अंबेने ठरविले असावे. एवढ्यात अर्जुन शिखंडीजवळ आला आणि म्हणाला, “तू भीष्मांच्या समोरून अजिबात हलू नको. तू त्यांना सतत आव्हान देत राहा. मी तुझ्या बाजूलाच आहे. मी त्यांना सामोरा जाईन. भीष्म तुझ्याशी लढणे नाकारत आहेत. तेव्हा तुला त्यांच्याशी युद्ध करता येणार नाही.” कौरवांना दिसत होते की, भीष्मांचा जीव आता धोक्यात आहे. दुर्योधन दु:शासनाला म्हणाला, “आता भीष्म आजोबांचे रक्षण करणे, हे आपलं प्रमुख काम असेल. तू त्यांच्याकडे लक्ष ठेव.” तो भीष्मांकडे येऊन म्हणाला, “आजोबा, अर्जुन आणि भीम दोघेही खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सैन्याची कत्तल करत आहेत. त्यांना आत्ताच मारले पाहिजे नाहीतर आपल्या सैन्याचे काही खरे नाही.” भीष्म चिडून बोलले, “मी तुला सुरुवातीपासून सांगतो आहे की, मी पाच पांडवांपैकी कोणालाही मारणार नाही. मात्र, सैन्याची कत्तल जरूर करीन आणि आताही मी तसेच करतो आहे. याहून अधिक अपेक्षा माझ्याकडून ठेवू नकोस. पांडवांना मारा, अशी एकसारखी कटकट माझ्या मागे करू नकोस! मी अर्जुनाला मारू शकत नाही, उलट तो मात्र मला मारू शकेल. आज मला युद्धात वीर मरण येईल हे तू पाहशील.”

 

धृष्टद्युम्न आणि अभिमन्यू भीष्मांवर चाल करून आले. त्यांना नकुल, सहदेव, युधिष्ठीर आणि कुंतिभोज यांनी साहाय्य केले. भीम भीष्मांजवळ येऊ नये, म्हणून भूरिश्रवास यत्न करत होता. एकूण सर्वांचे लक्ष्य आता भीष्मांकडे होते. अर्जुन व दु:शासन यांचे निकराचे युद्ध झाले. अश्वत्थामा आपल्या वादिलासमवेत उभा होता. द्रोण त्याला म्हणाले,”मला खूप अपशकुन होत आहेत. हे आपल्या सैन्यासाठी बरे नाही. आज कौरव मोठ्या संकटात सापडणार आहेत. माझे काळीज भीतीने कापत आहे. तोंड कोरडे पडते आहे. भीम, अर्जुन आणि शिखंडी तिघेही एकत्र आले आहेत आणि आज अर्जुन भीष्मांना मारणारच असे वाटते आहे. आपण त्यांना वाचवू या. लवकर तिकडे जा आणि अर्जुनाला प्रतिबंध कर! ते पाहा सात्यकी, अभिमन्यू, धृष्टद्युम्न, भीम, नकुल आणि सहदेव भीष्मांभोवती कडे करून उभे आहेत. हे त्यांचे कडे त्वरेने जाऊन तोड!” हे ऐकून अश्वत्थामा वेगाने भीष्मांकडे जाऊ लागला.

 

-सुरेश कुळकर्णी

@@AUTHORINFO_V1@@