स्वातंत्र्याची दिशा...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2018
Total Views |

 

 
 
 

यंदाचा हा ७२ वा स्वातंत्र्यदिन! गेल्या काही वर्षात देशात अनेक बदल झाले. देशातील सध्याच्या आर्थिक व सामजिक विकासाचा आढावा घेतला आहे. ग्रामीण व शहरी भागातील जीवनमानातील तफावत तसेच गरीब व श्रीमंत यांच्यातील दरी यांवर टाकलेला एक दृष्टिक्षेप...

 
देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७१ वर्ष लोटलीत. ७२ व्या वर्षात देशाने पदार्पण केले आहे... या काळात अनेक बाबी बदलल्या, विकासाचे अनेक मॉडेल तयार झालेत. त्यामुळे भारतामध्ये निश्चितच सकारात्मक परिवर्तन घडत आहेत. पण स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर भारताचा सर्वकष विकास होत असतानाही समाजातील ग्रामीण शहरी भागातील दरी कमी झालेली नाही असेच चित्र दिसते. गरीब श्रीमंतांमधील दरी दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरे काही गावं स्मार्ट होण्याच्या दिशेने आपली पावले टाकत असताना आजही अनेक गावे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असल्याचे चित्र आहे. भूक, दारिद्रय, शिक्षण, आरोग्य उपजीविका यातील विषमता दूर झालेली नाही. देशातील अनेक भागात आजही आवश्यक सोयी सुविधा पोहोचलेल्या नाहीत... देशात आजही भुकेने मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या बातम्या ऐकायला वाचायला येतात तेंव्हा मन सुन्न होते...

 

अशा वेळी वाटते की देशातील प्रत्येक नागरिकाने स्वातंत्र्य दिन साजरा करीत असतांना आनंदोस्तवासोबतच देशातील नागरिकाने अशा प्रश्नावर चिंतन करावं आणि आपण यासाठी काय करू शकतो याचाही विचार करावा. देशात बुलेट ट्रेनची निर्मिती होणे हे नक्कीच देशाच्या विकासासाठी भूषणावह आहेच पण सोबतच देशातील दुर्गम भागात आजही साधे रस्ते नाहीत याचाही विचार गंभीरतेने करणे गरजेचे आहे. कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशात कृषी विकासाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत किती पोहोचतात याचाही विचार होणे आवश्यक आहे. कृषिप्रधान देशात शेतकरी आत्महत्या करतो हे नक्कीच देशाला शोभणारे आहे. शासन सर्वकाही करेल हा विचार करता आपण आपल्या देशासाठी काय करू शकतो याचा विचार सर्वार्थाने व्हायला हवा.

 

देश हमे देता है सबकुछ,

हम भी तो कुछ देना सिखे...

 

या ओळींप्रमाणे आपण आपल्या स्तरावर काही का होईना समाजहिताचे काम करण्यास पुढाकार घेऊन समाजाच्या अनेक समस्यांना सोडवू शकतो. ग्रामीण शहरी भागातील वाढलेली दरी आपण नक्कीच दूर करू शकतो. यासाठी गरज आहे इच्छाशक्तीची आणि धाडस करून समोर येण्याची. ग्रामीण शहरी भागातील विषमतेचे चित्रण करताना एका कवीच्या ओळी मला नेहमी आठवतात...

 

कोणत्या शतकाच्या गोष्टी करता राजेहो...

इकडे आमच्या गावात सादी गाडी जात नाही आणि,

तुम्ही म्हणता चंद्रावर बंगले बांधू,

तुराटाच्या, कुडाच्या भिंती आमच्या पाठच सोडायला तयार नाहीत...!

 

या ओळींचा मतितार्थ लक्षात घेतला तर असे लक्षात येईल की, आजच्या समाजात ग्रामीण, शहरी जीवनात जीवनमानात फार मोठी दरी निर्माण झाली आहे. समाजाचे दोन टोक निर्माण झालेत. एकिकडे आपण चंद्रावर पोहोचलो आणि दुसरीकडे गरिबीमुळं समाजातील काही घटकांना एक वेळेचं जेवायला मिळत नाही. सांगायचे तात्पर्य हेच आहे की, समाजामध्ये विषमतेचे दोन टोक निर्माण झालेत. देशविकासाच्या अनेक प्रभावी योजना आज कार्यरत आहेत. अनेक शासकीय योजनेतून ग्रामीण जनतेचे प्रश्न सोडले गेले आहेत. आज शासनाच्या अनेक महत्वाकांक्षी योजना आहेत ज्यामुळे लोकांचे जीवनमान उंचावले आहे. ग्रामीण भागात काम करीत असतांना शासनाच्या अनेक महत्वाकांक्षी योजनेतून लोकांचे जीवनमान उंचावत आहे. जास्तीत जास्त योजना ऑनलाईन झाल्यामुळे जास्तीत जास्त लोकांना त्याचा आज फायदा होताना दिसत पण आहे. ग्रामविकासाच्या अनेक कल्पना आज अस्तित्वात आहे. त्याचे चांगले काम पण सुरू आहे. यासाठी शासनाचे खरच अभिनंदन करावे वाटते. पण असे सगळे सकारात्मक बाबी असताना ग्रामीण भागात काम करीत असल्यामुळे मुख्यतः काही गोष्टी अनेकदा खटकतात. वाटते यात कधी बदल घडेल, कधी सामाजिक परिवर्तन निर्माण होईल, कधी समाज जागृत होईल, कधी लोकांना आपले हक्क कर्तव्ये कळेल, कधी पोकळलेली शासकीय यंत्रणा गावापर्यंत समाजातील गरीब घटकापर्यंत पोहोचेल. असे अनेक प्रश्न मनात सतत घुटमळत असतात. ग्रामीण शासकीय यंत्रणेवर ग्रामीण जनतेला बिलकुल विश्वास नसल्याचे चित्र आढळून येते. स्वातंत्र्यानंतर अनेक कायदे आले, सर्वसामान्य नागरिकांना फायदा होईल आणि समाजातील सर्व घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने अनेक योजना आल्या...पण हे कायदे आणि योजना पुरविणारी यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असल्याचे दिसते. त्यामुळे गोरगरीब जनतेचा विश्वास उडत चालला आहे. गावपातळीवर योजना पुरविणाऱ्या यंत्रणेवरच लोकांना विश्वास नसेल तर यावर विचार करून मार्ग काढण्याची गरज आहेराष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणतात की, "सत्ता मिळवून खरे स्वराज्य साकार होणार नाही तर सत्तेच्या दुरुपयोगाला विरोध करण्याचे सामर्थ्य ज्यावेळी जनतेमध्ये निर्माण होईल त्यावेळी खरे स्वराज्य साकार होईल" हे गांधीजींचे विचार खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचे यथोचित विश्लेषण करणारेच म्हणावे लागेल. भ्रष्टाचाराने आकंठ बुडालेल्या यंत्रणेचा विरोध करता आला पाहिजे...यासाठी शासन सर्वकाही करेल याची अपेक्षा ठेवता समाजातील सर्व घटकांनी समोर येत समाजातील गरीब घटकाला सर्वतोपरी साहाय्य केलं तर खऱ्या अर्थाने विषमता दुर होण्यास मदत होईल. समाजातील सर्व घटकातील लोकांनी पुढे येत प्रेरणादायी कार्य करण्याची गरज आजही आहेच. समाजातील प्रत्येकांनी आपले हक्क आपल्या कर्तव्यानुसार आचरण केले तर समाजाला पर्यायाने देशाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यापासून कोणी रोखू शकणार नाहीतर मित्रांनो चला तर मग आपण आपल्यापासून सुरुवात करूया. समाजातील सामाजिक आर्थिक दरी दूर करण्यास आपला हातभार लावूया. समाजातील सकारात्मक बदलाचे आपण प्रत्यक्ष साक्षीदार होऊया... समाज जागृत झाला तर नक्कीच संपूर्ण देश जागृत होईल... तर या स्वातंत्र्याच्या पर्वावर आपण संकल्प करूया सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करण्याची.

वंदे मातरम!

- बाळू दत्तात्रय राठोड

@@AUTHORINFO_V1@@