सरसंघचालकांच्या हस्ते बंगळुरु येथे ध्वजारोहण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2018
Total Views |
 
 
 
बंगळुरू : भारताच्या ७२व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. बंगळुरु येथील राष्ट्रोत्थान विद्या केंद्रात हा कार्यक्रम आज सकाळी साडेआठ वाजता पार पडला. यावेळी संस्थेचे पदाघिकारी, संघाचे स्थानिक पदाधिकारी, परिसरातील नागरिक व केंद्रातील विद्यार्थी उपस्थित होते. दर वर्षी सरसंघचालक आपल्या प्रवासात स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी होतात. यावेळी उपस्थित सर्व स्वयंसेवकांनी राष्ट्रीय झेंड्याला सलामी दिली तसेच राष्ट्रगीताचे गायन केले.
 
 
 
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर झालेल्या कार्यक्रमात सरसंघचालकांनी उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी सरसंघचालकांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. गेल्या वर्षी सरसंघचालकांच्या केरळ प्रवासात त्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला होता. त्यावेळी केरळ सरकारने सरसंघचालकांच्या ध्वजारोहणावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिरंगा ध्वज फडकवण्याचा आपला घटनादत्त अधिकार सरसंघचालकांनी पार पाडला व ध्वजारोहण केले.
 
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्यालयातही आज सकाळी तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. नागपूर महानगराचे संघचालक राजेश लोया यांच्या हस्ते हे ध्वजारोहण करण्यात आले. नागपूर येतील महाल परिसरात असलेल्या संघाच्या केंद्रीय कार्यालयात मोहिते वाड्याच्या मैदानावर हे ध्वजारोहण करण्यात आले. तर दुसरीकडे संघाचे नवनियुक्त सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांच्या हस्ते वाराणसी येथे तिरंगा ध्वजाचे आरोहण करण्यात आले. देशभरातील सर्वच संघ कार्यालयांमध्ये देशाचा ७२वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. तसेच जवळपास सर्वच प्रांत कार्यालयांमध्ये तिरंगा फडकवण्यात आला.
 
 
पुण्यातही झेंडावंदन : 
 
पुण्यातही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यालयात प्रतिवर्षीप्रमाणे आज स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. पुण्यातील मोतीबाग येथे आजच्या शुभप्रसंगी जलदिंडी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वास येवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व स्वयंसेवकांनी राष्ट्रीय झेंड्याला सलामी दिली तसेच राष्ट्रगीताचे गायन केले.
 
या मंगलप्रसंगी पुण्यातील कसबा भागाचे मा. संघचालक सुहास पवार, सहसंघचालक प्रशांत यादव, भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश खेडकर तसेच पर्वती भागाचे संघचालक विजय पानगावे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर प्रमुख पाहुणे डॉ. विश्वास येवले यांनी उपस्थितांना त्यांच्या नदी स्वच्छता कार्याबद्दल माहिती दिली.
 
 
@@AUTHORINFO_V1@@