आशावाद, विश्वास आणि आत्मविश्वास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2018
Total Views |




 

 

भारतात निवडणुका कशा लढल्या जातात आणि त्या कशा जिंकायच्या हे पूर्णपणे माहीत असलेला नेता म्हणून नरेंद्र मोदींकडे पाहाणे अपरिहार्य आहे, पण यापलीकडे जाऊन देशासाठी मांडत असलेला आशावाद, विश्वास आणि आत्मविश्वास हाच त्यांच्या भाषणाचा गाभा आहे.
 

आत्मविश्वास म्हणजे काय? आणि तो व्यक्तीच्या रूपात कसा दिसतो? या प्रश्नांनीची उत्तरे हवी असतील तर काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून केलेले भाषण जरूर पाहावे. हे भाषण केवळ १५ ऑगस्टच्या निमित्ताने केलेला उपचार नव्हता. अशा भाषणाच्या पद्धतीला मोदींनी आपल्या पहिल्या भाषणातच फाटा दिला होता. यापूर्वी अनेक पंतप्रधान आले आणि गेले, परंतु जी चेतना आज १५ ऑगस्टच्या भाषणात पाहायला मिळाली त्याची तुलना प्रारंभीच्या काळातले नेहरू नंतर अटलजींच्या भाषणातच पाहायला मिळाली आहे. हा फक्त नरेंद्र मोदींच्या व्यक्तिमत्त्वाचाच प्रभाव नाही. हा प्रभाव एका सुनियोजित प्रवासाचा आहे. भारताला हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा आहे. विज्ञान, खगोलशास्त्र, गणित या विषयातले आपले संचित कुणालाही नाकारता येणारे नाही, पण त्याचबरोबर परकीय आक्रमणांचा एक काळा इतिहास आपल्या कपाळी लिहिलेला आहे. त्यातून येणारी राजकीय अस्थिरता आणि राष्ट्रउभारणीच्या प्रवासात येणारे अडथळे यातून आपण इथवर येऊन पोहोचलो आहोत. यापूर्वी ज्यांनी या देशाचे नेतृत्व केले त्यांना वारंवार दोष देण्याचे कारण नाही. मात्र, सगळाच प्रवास सकारात्मक होता, असे म्हणायला आज तरी वाव नाही. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात ज्या अर्थक्रांतीचा उल्लेख केला ती सर्वसामान्य माणूस, शेतकरी महिला, अनुसूचित जाती-जमाती यांच्यापर्यंत विकासाची गंगा पोहोचेपर्यंत अपूर्ण आहे. देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीच्या भाषणात आज त्यांच्याबाबात चिंतन असावे, हे राजकीय स्थिरतेचे यश मानावे लागेल. उत्तम बहुमताने आलेले खंबीर सरकारच असे निर्णय घेऊ शकते. ज्याच्यामागे बहुमताचा खंबीर आधार आहे, अशी व्यक्तीच देश पुढे नेण्यासाठी काम करू शकते. आज केंद्रात एनडीएचे सरकार असले तरी नरेंद्र मोदींना कुणी पाठिंबा काढून घेण्याची भीती नाही. कुणी कितीही म्हटले तरी सरकार गेले तर जे काही करण्याचे संकल्प आपण करतो तेदेखील कुठल्याही राजकीय नेतृत्वाला पूर्ण करता येणार नाहीत. नेता खंबीर असणे, सक्षम असणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वयंपूर्ण असणे आवश्यक आहे. आजच्या घडीला नरेंद्र मोदींना या सगळ्यातून पर्याय नाही. ज्या प्रकारचे राजकारण आपल्या देशात निवडणुकीच्या विजयासाठी खेळले जाते त्यातून जे साध्य होते त्याची उदाहरणे आपण पाहिली आहेत. अल्पजीवी सरकारेदेखील आपण पाहिली. अपघाताने पंतप्रधान झालेले लोकही या देशाने अनुभवले. शीर्षस्थ प्रक्रियाच जर अशा डळमळीत असतील तर निर्णय काय होतील आणि सर्वसामान्यांना त्याची फळे काय भोगायला मिळतील याचा विचारही केलेला बरा. दिल्लीतील आजची स्थिती किमान विश्वास ठेवण्यासारखी तरी आहे. निलगिरी वनात फुलणाऱ्या ज्या मिलकुरंजी पुष्पाचे उदाहारण पंतप्रधानांनी आपल्या भाषणात दिले तशीच काहीशी स्थिती आज देशात आहे. एका मोठ्या अवकाशानंतर देशाला एक आश्वासक नेतृत्व आणि खंबीर, स्थिर सरकार मिळाले आहे. पंतप्रधानांच्या भाषणाने आज देशाला जो संदेश दिला, त्यापेक्षाही कितीतरी गंभीर प्रश् आज देशासमोर उभे आहेत. जगातली सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आपण झालेलो असलो तरी शेवटच्या रांगेतल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यात अद्याप तरी यश आलेले नाही. या टप्प्यावर येऊन आपण ते साध्य करू शकतो, असा विश्वास पंतप्रधानांच्या भाषणात नक्कीच होता. भाषण संपताच टीकेचे सूरही सुरू झालेच, पण जो विश्वास नरेंद्र मोदी आपल्या भाषणातून दाखवित आहेत, तो कुणीही नाकारू शकत नाही. सहाव्या क्रमांकाची आर्थिक सत्ता हे ऐकायला उत्तम अनुभवायला अभिमानास्पद वाटत असले तरी त्याबरोबरच अनेक प्रकारच्या आव्हानांनाही आपल्याला तोंड द्यावे लागणार आहे. रुपयाचे अवमूल्यन, भारतीय उत्पादनांना जगाच्या बाजारपेठेत सामोरे जाव्या लागणाऱ्या स्पर्धा, या स्पर्धेत उतरावे लागत असताना लागणारे मनुष्यबळ यासारख्या कितीतरी समस्या आपल्याकडे आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तरहून अधिक वर्ष झालेली असताना आपला शेतकरी अद्याप निरनिराळ्या प्रश्नांनी घेरलेला असतो, ही काही भूषणावह स्थिती नाही. पंतप्रधानांच्या भाषणात त्यांनी या घटकाचा उल्लेखही ठळकपणे केला. एक काळ असा होता की, आपल्याला सर्वच प्रकारच्या अन्नधान्यासाठी अन्य देशांवर अवलंबून राहायला लागत होते. गहू, अन्य धान्ये हीदेखील आपल्यासाठी अन्य देशांची मक्तेदारी होती. आज काही धान्यांच्या विक्रमी उत्पादनांची चर्चा आपण करू शकतो. ‘अग्रीकल्चर एक्सपोर्ट पॉलिसीची जी चर्चा आज झाली त्यासाठी सहाहून अधिक दशकांचा काळ आपल्याला वाट पाहावी लागली आहे. केवळ काही धान्ये नाही तर सर्वच धान्यांच्या बाबतीत आपल्याला यासाठी पुढे जावे लागेल. आशियाई देशांमध्ये यासाठी आपल्याला मोठी स्पर्धा आहे. अनेक देश आपले एक उत्पादन घेऊन जागातिक बाजारपेठेत स्पर्धक म्हणून उतरत आहेत. आपल्यासारख्या बहुविध कृषी उत्पादने असलेल्या देशाला याचा विचार करावा लागेल.

 

विकासाच्या ज्या विविध प्रक्रिया पंतप्रधानांनी आपल्या भाषणात ध्वनित केल्या आणि त्यातील महिलांचा जो सहभाग दर्शविला, त्याचप्रमाणे महिलांनी या विषयात अधिकाधिक प्रमाणात उतरावे यासाठी सरकार येणाऱ्या काळात जे काही करणार आहे, त्याची माहिती दिली. पुढील १५ ऑगस्ट हा ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल असेल. एका मोठ्या सिंहावलोकनाची ही संधी असेल. आज जसा एक ठाम पंतप्रधान या देशाला मिळाला आहे, तसाच ठाम पंतप्रधान आपल्याला नरेंद्र मोदींच्या रूपाने पाहायला मिळेल. आपल्या भाषणात जो आशावाद पंतप्रधानांनी मांडला, तो देशासाठी नक्कीच उपयुक्त आहे. जागतिक मूल्यांची पोपटपंची करणाऱ्या अन्य नेत्यांनी असा आशावाद यापूर्वी मांडला आहे. मात्र, तो आशावाद फलस्वरूप वास्तवात उतरविण्यासाठी लागणारा विश्वास आणि आत्मविश्वास असावा लागतो तो फक्त नरेंद्र मोदींच्या ठायीच दिसतो. येणारे काही महिने निवडणुकींचे असतील. आज लाल किल्ल्यावरून भाषण करीत असलो तरी पुढचे काही महिने गेल्यानंतर आपण केलेल्या कामांच्या आधारावर लोकांकडे मते मागण्यासाठी आपल्याला जावे लागणार आहे, याची नरेंद्र मोदींना पूर्ण कल्पना आहे. आज त्यांनी केलेले भाषण हे पुढच्या पाच वर्षात त्यांना काय करायचे आहे, याची कल्पना देणारे होते. निवडणुकांचे राजकारण भारतात कसे खेळले जाते, याची पुरेपूर कल्पना असलेले आणि या सगळ्यावर मात करून कसे जिंकायचे याची पूर्ण कल्पना असलेला नेता म्हणून मोदींकडे पाहावे लागेल. त्याच्याठायी असलेला आशावाद, विश्वास आणि आत्मविश्वास च या देशाला पुढचा पंतप्रधान देईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.

 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@