इमरान खान : रात्र थोडी सोंगे फार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2018
Total Views |

 

 
 
 

 

पाकिस्तानचे वझिर-ए-आझम म्हणून १८ ऑगस्ट रोजी शपथग्रहण करणारे माजी क्रिकेटपटू इमरान खान यांच्या रंगीनरंगेल आणि विक्षिप्त स्वभावाचे ‘रात्र थोडी सोंगे फार’ असेच वर्णन करावे लागेल. इमरान खान यांच्या जीवनक्रमातील विविध प्रसंगांवरून त्यांच्या या एकूणच व्यक्तिमत्वाचा घेतलेला हा धांडोळा...
 
 
२२ वर्षांच्या प्रदीर्घ आणि अवघड अशा राजकीय प्रवासानंतर अखेर इमरान खान १८ ऑगस्ट रोजी पाकिस्तान या इस्लामी गणराज्याच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी सज्ज झाले आहेत. एक क्रिकेपटू, ‘काऊबॉय’पासून एका यशस्वी राजकीय नेत्याच्या भूमिकेत इमरान खानचे झालेले रुपांतर सर्वाधिक आश्चर्यकारक आहे. यंदाच्या निवडणुकीत पाकिस्तानी जनतेने त्यांच्यावर जो विश्वास दाखवला, त्याच्या मुळाशी ज्याप्रमाणे काही स्वप्ने, उमेद आहेच, पण त्याचबरोबर भीतीची पार्श्वभूमी आणि अनिश्चितचे सावटदेखील आहे. पाकिस्तानच्या गटतट आधारित राजकीय व्यवस्थेत जिथे कौटुंबिक नातेसंबंध आणि जनजातीय संबंध महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात, तिथे इमरान खान यांचा बिगरराजकीय पार्श्वभूमीतून राष्ट्रीय राजकारणात झालेला उदय हा पाकिस्तानच्या एका मोठ्या लोकसंख्येसाठी नक्कीच प्रेरणादायक आहे. कारण, पाकिस्तानच्या लोकशाहीच्या इतिहासात आतापर्यंत असे कधीही झाले नव्हते. 
 
 
 
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर १९९६ साली इमरान खान यांनी एका राजकीय पक्षाची म्हणजेच पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफची (पीटीआय) स्थापना केली. इमरान खान यांनी १९९७ साली एनए- ५३ मियांवली आणि एनए-९४ लाहोर या दोन मतदारसंघातून पीटीआयच्या चिन्हावर सार्वत्रिक निवडणूक लढवली. पण, त्यांना दोन्हीही ठिकाणी पीएमएल-एनच्या उमेदवारांकडून दारूण पराभव पत्करावा लागला होता. खान यांनी त्यानंतर १९९९ साली जनरल परवेझ मुशर्रफ यांनी केलेल्या लष्करी विद्रोहाचेही समर्थन केले होते. परवेझ मुशर्रफ भ्रष्टाचाराचा नायनाट करतील आणि राजकारणातील माफियांना-गुंडांना संपवतील, अशी यामागे इमरान खान यांची धारणा होती. त्यांच्या मतानुसार, २००२ साली पंतप्रधानपदासाठी मुशर्रफ यांची इमरान खान हेच पहिली पसंत होते, पण त्यांनीच स्वतः तो प्रस्ताव नाकारला. २००२ साली ते मियांवाली मतदारसंघातून नॅशनल असेम्ब्लिवर निवडून आले. त्यावेळी त्यांनी पाकव्याप्त काश्मीर आणि लोकलेखा स्थायी समिती सदस्य म्हणूनही काम पाहिले. पुढे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर २००८ साली झालेल्या निवडणुकीवर इमरान खान आणि त्यांच्या पक्षाने बहिष्कार टाकला. पण, २०१३ च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला मिळालेल्या यशामुळे राष्ट्रीय राजकारणात त्यांचा प्रभाव ठसठशीतपणे समोर आला.
 
 
 
१९९६ पासून इमरान खान यांनी सातत्याने पाकिस्तानचा विकास आणि देशाच्या एकूणच बिकट परिस्थितीवरून प्रस्थापित राजकीय नेतृत्वाविरोधात आवाज बुलंद केला. ‘पनामा पेपर प्रकरणा’त नवाझ शरीफ यांचे नाव समोर आल्यानंतर इमरान खान यांनी हे प्रकरण न्यायालयात नेले. या माध्यमातून नवाझ शरीफ यांना देशाच्या राजकीय पटलावरून हद्दपार करण्यात आणि शेवटी पाकिस्तानमध्ये मुस्लीम लीगला सत्ताच्युत करण्यात खान यांनी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. पण, एक गोष्ट नक्कीच लक्ष घेण्यासारखी आहे की, ज्या वाईट गोष्टी आणि आमिषांचा ते आपल्या घणाघाती भाषणशैलीद्वारे विरोध करतात, त्यापासून इमरान खान यांचे वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्य दूर राहू शकलेले नाही. उलट, या गोष्टींचे प्रतिबिंब त्यांच्या जीवनशैलीत स्पष्टपणे दिसून येते. मात्र, ते आपल्या वर्चस्व गाजवण्याच्या एकूणच शैलीद्वारे या गोष्टींना दाबण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

 

इमरान खान क्रिकेटमुळे नावारूपाला आले खरे, पण क्रिकेट हे साहजिकच राजकारणापेक्षा भिन्न आहे. इथे इटालियन तत्त्वज्ञ, राजकारणी मॅकियोवेलीच्या एका वाक्याचा उल्लेख करणे गरजेचे ठरते, ते म्हणजे, “राजकारणाचा नैतिकतेशी कुठलाही संबंध नसतो.” पण, इमरान खान राजकारणच नव्हे, तर त्यांच्या खेळाप्रतीदेखील कधी इमानदार नव्हतेच. कारण, १९९४ साली त्यांनी स्वतःच कबूल केले होते की, आपल्या क्रिकेटच्या कारकीर्दीत त्यांनी चेंडूशी नेहमीच छेडछाड केली आहे. आपल्या क्रिकेटजीवनात ड्रग्ससेवनाच्या आरोपामुळे इमरान खान नेहमीच वादाच्या भोवर्‍यात राहिले. इतकेच नाही तर त्यांच्याच संघातील कितीतरी खेळाडूंनी वेळोवेळी त्यांच्यावर ड्रग्सच्या आहारी गेल्याचे आरोपही केले. १९८७ साली पाकिस्तानच्या कासिम उमर या वरिष्ठ क्रिकेटपटूने खुलासा केला की, पाकिस्तानी संघातील कित्येक खेळाडू मादक पदार्थांचे सेवन करतात आणि रात्री उशिरापर्यंत दारुच्या नशेत आकंठ बुडालेले असतात. उमरने हेदेखील सांगितले की, ते इमरानला ड्रग्स उपलब्ध करून देत असत. त्यानंतर युनिस अहमद या आणखी एका पाकिस्तानी क्रिकेटपटूने इमरान खानवर अय्याशीचा आरोप केला. त्याचवेळी इमरान खान यांचा हेकट आणि अभद्र व्यवहारही पाकिस्तान संघामध्ये नाराजीचे वेळोवेळी कारण ठरला. इमरानबरोबर खेळलेले जवळपास सर्वच वरिष्ठ क्रिकेटपटू त्यांना अतिशय गर्विष्ठ आणि अव्यवहार्य मानतात. १९९३ साली संघातून हकालपट्टी केल्यानंतर जावेद मियांदादने मोकळेपणाने इमरान खानवर कितीतरी थेट आणि गंभीर आरोप केले होते. यावरून असे दिसते की, राजकारणाची बाराखडी इमरानने खेळाच्या मैदानावरच शिकली होती आणि त्याची अंमलबजावणी करायलाही सुरुवात केली. दुसरीकडे इमरान खान आपल्या रंगेलपणामुळे नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. इमरानने पहिल्यांदा १९९५ साली ब्रिटिश अब्जाधीश जेम्स गोल्डस्मिथ यांची मुलगी जेमिमा गोल्डस्मिथ हिच्याशी विवाह केला. त्यानंतर जेमिमा हिने आपल्या पतीच्या वैयक्तिक आणि नव्या राजकीय कारकिर्दीशी जुळवून घेण्याचा नऊ वर्षे सातत्याने प्रयत्न केला. पण, त्यात अपयश आल्याने तिने शेवटी २२ जून २००४ रोजी इमरानला तलाक दिला. पुढे २०१५ साली सुप्रसिद्ध वृत्तनिवेदिका रेहम खानशी इमरानचा दुसरा विवाह झाला. पण, हा विवाहदेखील एखाद्या तुफानी खेळीसारखा अवघ्या दहा महिन्यातच निकाली लागला. इमरान खानच्या भूतकाळातील ‘प्लेबॉय’ प्रतिमेला या रेहम खानने निवडणुकीच्या काही दिवसांआधी चांगलेच चर्चेत आणले. रेहमने याबाबत एक पुस्तकही लिहिले आहे, ज्याचे अद्यापही प्रकाशन झालेले नाही. या पुस्तकात रेहम खानने इमरान खानला सेक्स, ड्रग्स आणि रॉक एन. रोलने भरलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या रूपात दाखवले आहे. रेहम खानने हा दावादेखील केला की, ६५ वर्षीय इमरान खान कुराण वाचू शकत नाही. ते काळ्या जादूवर विश्वास ठेवतात आणि भारतात त्यांची काही अवैध अपत्ये आहेत. दरम्यान, इमरान खान यांनी नुकता आपली आध्यात्मिक मार्गदर्शिका बुशरा मनेकाशी विवाह केला असून दोघांचे नाते हिंदोळे खात आहे. इमरान खान यांनी नुकत्याच हामिद मीर यांना दिलेल्या एका दूरचित्रवाणी मुलाखतीत सीटा वाइटशी संबंधित एका प्रश्नावर उत्तर दिले की, “जी व्यक्ती देशाचे नेतृत्व करण्यासाठी पुढे येऊ इच्छिते, तिच्यात फक्त एक महत्त्वाची गोष्ट असली पाहिजे आणि ती म्हणजे अशा व्यक्तीचा आर्थिक भ्रष्टाचाराशी तसूभरही संबंध असता कामा नये.” पाकिस्तानी संविधानातील ‘सादिक’ आणि ‘अमीन’चे कलम प्रामुख्याने याच्याशीच संबंधित आहे. पण, सुदैवाने इमरान खानला अजून तरी आर्थिक भ्रष्टाचाराची कुठलीही संधी मिळालेली नाही. 
 
 
 
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इमरान खान आतापर्यंत जे जीवन जगतोय, त्याचा इस्लामिक पद्धतीशी दुरान्वयानेही संबंध नाही आणि त्याचमुळे इस्लामिक धर्ममार्तंड इमरान खानवर अत्यंत कडवटपणे टीका करतात. इस्लामी धर्ममार्तंडांच्या मते, इमरान खानने इस्लाम विरोधाची मर्यादा ओलांडली आहे. असे असले तरी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केल्यानंतर मात्र इमरानने एखाद्या कट्टर इस्लामी मतानुयायासारखी भूमिका धारण केली. याचे एक उदाहरण म्हणजे, २०१२ साली भारतात एका कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये प्रसिद्ध लेखक सलमान रश्दीही सहभागी होते. यावेळी इमरान खानने सलमान रश्दी यांच्यासह एका मंचावर येण्यास साफ नकार दिला. कारण, इमरान खानच्या मते, ज्याने जगभरातील मुस्लिमांच्या भावनांना ठेच पोहोचवली, अशा कोणत्याही व्यक्तीबरोबर ते मंचावर उपस्थित राहण्याचीही कल्पना करू शकत नाहीत. खैबर पख्तुनख्वा आणि फाटामध्ये तालिबान व अन्य इस्लामिक दहशतवादी संघटनांविरोधात लष्करी मोहिमांचा इमरानने प्रखर विरोध केला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी जमियत-उलेमा-ए-इस्लामच्या समी-उल-हक गटाशी समझोतादेखील केला. हे तेच समी-उल-हक आहेत, जे दारुल हक्कानियाचे प्रमुख आहेत आणि तालिबानच्या जन्मदात्याच्या रूपात जगभरात ओळखले जातात.
 
 
 
खैबर पख्तुनख्वाच्या परवेझ खट्टक यांच्या नेतृत्वातील पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफच्या सरकारने या मदरशाच्या नवनिर्माणाच्या नावावर कोट्यवधी रुपयांची माया जमवली आहे. पाकिस्तानच्या यंदाच्या निवडणुकीत इमरान खानच्या विजयामध्ये लष्कराने सर्वाधिक महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. या निवडणुकीत लष्कराचे सर्वच ८५ हजार मतदान केंद्रांवर थेट नियंत्रण होते. लष्कराशी इमरानची जवळीक गेल्या काही काळापासून पाहायला मिळत होती. लष्कराचे नवाझ शरीफ सरकारशी नेहमीच खटके उडायचे. त्यामुळे इमरानला लष्करी सहकार्य करणे हा त्याचा परिपाकही असू शकतो. पण, इमरान खानचा स्वभाव स्वच्छंदपणे सत्तेचा उपभोग घेण्याचा असल्याचे त्यांच्या आतापर्यंतच्या वर्तनावरून तरी किमान दिसून येते. नेमका लष्कराचा स्वभाव याउलट असून ते नेहमीच नागरी सरकारला आपल्या ‘आयन फिस्ट’मधून बाहेर पडू द्यायला तयार नसते. इमरान खानची इच्छा असेल की, लष्कराने आपले काम करावे. पण, पाकिस्तानच्या लष्कराने ना कधी आपले काम केले ना भविष्यात ते तसे करण्याची शक्यता आहे आणि अशा स्थितीत इमरान आणि लष्करादरम्यान कशी परिस्थिती उद्भवू शकते, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. 
 
 
 
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इमरान खान स्वतःच चंचल आणि बेभरवशाची व्यक्ती आहेत. आपण १९९६ पासूनच्या त्यांच्या राजकीय कारकीर्दीकडे पाहिले तर हे स्पष्ट होते की, ते मोठ्या प्रमाणात त्यांच्या लहरी स्वभावानुसार वागणारे गृहस्थ आहेत आणि त्यांच्यात कोणत्याही मूल्याविषयी सातत्य आणि सचोटीचा सदैवच अभाव राहिला आहे. इमरान खान अशी इच्छा व्यक्त करतात की, पाकिस्तानचे ‘मदीना’ व्हावे (पण, खरं तर अशा स्थितीत आपल्या कलुषित वागणुकीमुळे दगडांचा मार खाणारी पहिली व्यक्ती तेच ठरतील.) परंतु, असे करण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही राजकीय कार्यक्रम नाही. इमरान खान पाकिस्तानला शांतता आणि विकासाचे वातावरण प्रदान करू इच्छितात. पण, त्याचवेळी ते दहशतवाद्यांना आश्रयही देतात आणि निवडणुकीसाठी त्यांच्याशी आघाडी करण्यापर्यंतही त्यांची मजल जाते. इतकेच नाही तर महिलांच्या सन्मान आणि अधिकारांच्याही ते मोठमोठ्या बाता मारतात आणि त्यांच्याच पक्षातील महिला कार्यकर्त्या मात्र इमरान खानकडून त्यांची झालेली दुर्दशा आणि एखाद्या सावजाप्रमाणे वागवल्याच्या पीडा जगजाहीर करतात. अशी बुद्धिभेदाची स्थिती सरकारी कामांमध्येही प्रतिबिंबित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
 
 
 
पाकिस्तानी शासन प्रणालीमध्ये सुधारणा करण्याच्या आश्वासनासह भ्रष्टाचाराविरोधातील मोहिमेचे नेतृत्व करत ‘नव्या पाकिस्तान’च्या घोषणेसह इमरान खान यांनी निवडणुकीत विजय तर प्राप्त केला; पण आता त्यांच्यापुढचे सर्वात मोठे आव्हान आहे ते आश्वासनांच्या पूर्ततेचे. खान यांच्या पक्षाच्या घोषणापत्रात अनेक आमिष दाखवणार्‍या आश्वासनांचा समावेश आहे, जसे की आगामी पाच वर्षांत ५० लाख परवडणार्‍या घरांची निर्मिती, एक कोटी नव्या नोकर्‍यांच्या संधी इत्यादी. विरोधात राहून सत्ताधार्‍यांवर टीका करण्यापेक्षा अधिक गंभीर काम आता इमरान खान यांच्यासमोर आहे. देश आणि परकीय आघाडीवर आर्थिक, राजकीय समस्यादेखील त्यांच्या प्रतिक्षेत आहेतच. देशातले तमाम विरोधी पक्ष त्यांच्या विरोधात एकवटले असून लष्करही नेहमीप्रमाणेच संधीच्या शोधात आहे. या पार्श्वभूमीवर इमरान खान यांचा सत्तेच्या खेळपट्टीवर कसा टिकाव लागतो, हा पाकिस्तानमध्ये आणि जगभरातही कुतुहलाचा विषय झाला आहे. सोबतच हे पाहणेदेखील औत्सुक्याचे ठरेल की, इमरान खान आपल्या या राजकीय भूमिकेमध्ये चेंडूशी छेडछाड करण्याच्या जुन्या खोडीपासून मुक्त होतात वा नाही.
संतोष कुमार वर्मा

( अनुवाद : महेश पुराणिक)

@@AUTHORINFO_V1@@