'इंडिया पोस्ट पेमेंट' डिजीटल बॅंकेचे २१ ऑगस्ट रोजी उद्घाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2018
Total Views |


 

शासकीय योजनांचे अनुदान खात्यात घेता येणार

 

मुंबई : राज्यातील इंडिया पोस्ट पेमेंट या डिजीटल बँकेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २१ ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे. मुंबईतील पोस्ट कार्यालयामध्ये या सेवेचा शुभारंभ करण्यात येणार असून शासकीय योजनांचे अनुदानही या बँक खात्यातून मिळण्याची सोय उपलब्ध होणार आहे. चीफ पोस्ट जनरल ऑफ महाराष्ट्र एच.सी.अग्रवाल यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी मुख्य पोस्ट सेवेच्या संचालक सुमिता अयोध्या, मुंबई क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल गणेश सावळेश्वरकर, वरिष्ठ अधीक्षक रूपेश सोनावले उपस्थित होते.
 

देशात पहिल्यांदाच एकाच वेळी ३ हजार २५० पोस्ट कार्यालये आणि शाखांमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट या डिजीटल बॅकेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. राज्यातील ४० शाखा आणि २०० प्रवेश केंद्राचे उद्घाटनही यावेळी करण्यात येणार आहे. या डिजीटल बँकेमुळे सामान्यांना कोणाच्याही मदतीशिवाय आपले खाते सुरू करता येणार आहे. तसेच यासाठी पोस्टमास्तर घरोघरी जाऊन याबाबत सहकार्य करणार आहेत. यामुळे कोणतेही डिजीटल आर्थिक व्यवहार, खरेदी -विक्री, लाईट बील, टेलीफोन बील आदींसारखे व्यवहार करता येणे शक्य होणार आहे.

 

डिसेंबरपर्यंत १ लाख कार्यालयांमध्ये सुविधा

दरम्यान, हा या उप्रकमाचा पहिला टप्पा असून डिसेंबरपर्यंत १ लाख ३० हजार पोस्ट कार्यालयात हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. विविध टप्प्यात देशातील एकूण १ लाख ५५ हजार पोस्ट कार्यालयात ही सेवा उपलब्ध होणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@