स्वातंत्र्याची ७२ वर्षे आणि आपण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2018
Total Views |


 

आपली वाटचाल जुन्याच ध्येयधोरणांवर वा तत्त्वांवर आधारित असावी का? याचा विचार करता आता आपल्याला देशविकासासाठी स्वतःची नवीन मॉडेल्स, धोरणे, योजना, तत्त्वे तयार करण्याची गरज निर्माण झाल्याचे स्पष्ट होते. ती कशी असतील? तर त्यात भारतीयत्वाचा, आपला स्वतःचा आत्मा असेल, भारतीयत्व त्यात वसेल अशी! यातूनच भारताला एकराष्ट्रम्हणून उभे राहावे लागेल.
 

आज भारताचा ७२ वा स्वातंत्र्यदिन! सुमारे साडेबाराशे वर्षे परकीयांच्या गुलामगिरीने जखडलेला देश १९४७ साली स्वतंत्र झाला आणि इथल्या मनामनांत आनंदाचा, उत्साहाचा, चैतन्याचा सागर उसळला. देशाला स्वतंत्र होऊन ७१ वर्षे उलटून गेल्यावर आज आपण एका वेगळ्या टप्प्यावर आल्याचे दिसते. जो जोशाचा माहोल ७१ वर्षांपूर्वी होता, तोच आजही आपल्याला प्रत्येक स्वातंत्र्यदिनी दिसतोच दिसतो आणि आजही दिसणार आहेच. गावागावात, शहराशहरात जिथे शक्य असेल तिथे सर्वच ठिकाणी आज स्वातंत्र्यप्राप्तीच्या आनंदाप्रीत्यर्थ झेंडावंदनाच्या कार्यक्रमांपासून सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाईल, पण एका बाजूला हे सर्व काही घडत असताना स्वातंत्र्याच्या गेल्या ७१ वर्षांत आपणराष्ट्रम्हणून नेमके काय कमावले, काय मिळवले याची गोळाबेरीज करणेही आवश्यक ठरते. राष्ट्र म्हटले की, फक्त उभ्या-आडव्या रेषांनी आखलेला नकाशा नव्हे तर त्या राष्ट्रात राहणारी माणसे, त्यांची संस्कृती, त्यांची भाषा, त्यांची वेशभूषा, त्यांच्या सवयी, त्यांचा इतिहास या सर्वच गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. मात्र, फक्त एवढ्याच गोष्टींनी राष्ट्र निर्माण होते, टिकते, पुढे जाते का? तर नाही. राष्ट्र पुढे जाते ते तिथे राहणाऱ्या नागरिकांच्या विकास, प्रगती आणि उन्नतीने. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण स्वीकारलेल्या धोरणांनी खरोखरच इथल्या नागरिकांचा विकास केला का? नागरिकांसोबतच राज्याचा, देशाचा विकास झाला का? असे विचारले असता, त्याचे उत्तर नक्कीच होकारार्थी द्यावे लागेल. ७१ वर्षांत ज्यांनी कोणी देशाचा कारभार हाकला, त्यांनी देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठीच काम केले, त्याचे बरेवाईट परिणामही आपण भोगले, हे खरेच. देश असो वा राज्य, इथे जे जे सत्तेवर आले त्यांनी दिलेल्या योगदानामुळेच आज आपल्याला ७१ वर्षांपूर्वी आपल्याबरोबरच स्वतंत्र झालेल्या अन्य देशांपेक्षा आपण पुढे निघून गेल्याचे दिसते. पण, हे पुढे जाणे खरोखरच पुरेसे आहे का? ७१ वर्षांचा कालावधी एखाद्या राष्ट्राच्या इतिहासात तसा अल्पसाच आणि या अल्प कालावधीत आपण पुढे जाणार ते किती? हेही खरेच. त्यामुळेच स्वातंत्र्यानंतरच्या ७१ वर्षांतील घटनांकडे पाहिले असता आपल्याला आतापेक्षाही आणखी पुढे आणि तेही सर्वांना सोबत घेऊन जावे लागेल, असे म्हणावेसे वाटते. अर्थात आपली ही वाटचाल जुन्याच ध्येयधोरणांवर वा तत्त्वांवर वा आराखड्यांवर आधारित असावी का? याचा विचार करता आता आपल्याला देशविकासासाठी स्वतःची नवीन मॉडेल्स, धोरणे, योजना, तत्त्वे तयार करण्याची गरज निर्माण झाल्याचे स्पष्ट होते. ही नवीन मॉडेल्स, धोरणे, योजना, तत्त्वे कशी असतील? तर त्यात भारतीयत्वाचा, आपला स्वतःचा आत्मा असेल, भारतीयत्व त्यात वसेल अशी! यातूनच भारताला एक राष्ट्र म्हणून उभे राहावे लागेल. ज्यातून भारताला एक स्वतंत्र, स्वतःच्या तत्त्वाने चालणारे राष्ट्र म्हणून ओळख मिळेल. पराभूत होऊनही दोन हजार वर्षानंतर उभे राहिलेले राष्ट्र म्हणून आपल्याकडे बऱ्याचदा इस्रायलचे उदाहरण दिले जाते. अर्थात इस्रायलने आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले हे खरेच, पण त्याचे उदाहरण देताना आपण त्यांची परिस्थिती, संस्कृती, इतिहास पाहिला असता तो भारताशी कितपत साधर्म्य पावणारा आहे, हाही विचार केला पाहिजे.

 

राष्ट्राच्या इतिहासात कौतुकाचे, गौरवाचे, अभिमानाचे क्षण नेहमीच येत असतात. गेल्या ७० वर्षांत तर भारतासारख्या साधी सुईही तयार करू शकणाऱ्या देशाच्या इतिहासात असे कितीतरी क्षण येऊन गेले. अशा क्षणांचा उल्लेख करताना आपल्याकडून चटकन इस्रो, महासंगणक, महाकाय धरणे, अणुस्फोट, हरितक्रांती आणि नुकत्याच देशातल्या प्रत्येक गावात पोहोचविण्यात आलेल्या वीजजोडणीचे नाव घेतले जाते, पण ही एवढीच आपली यशाची, प्रगतीची, विकासाची क्षमता आणि परिमाणे आहेत का? तर ती तशी नसावी. इथे एकात्म मानव दर्शनाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एका उद्बोधनाचा उल्लेख करणे आवश्यक ठरेल- “इतिहासापासून प्रेरणा घ्यावी, पण तोच आपल्या कर्तृत्वाचा सर्वोच्च बिंदू आहे, असे मानू नये. वर्तमानाचे भान ठेवावे, पण त्याच्या मर्यादांनी स्वतःला बांधून घेऊ नये, इतिहासापासून प्रेरणा घेत, वर्तमानाचे भान ठेवत, भविष्याच्या कालपटलावर आपल्या कर्तृत्वाची पदचिन्हे उमटविण्याची जिद्द बाळगावी.” पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे हे विचार वाचले की, आपल्या देशाचा इतिहास शौर्याचा, वीरतेचा असल्याचे जाणवतेच, पण त्याचवेळी तो तेवढाच असावा, तिथेच थांबावा का? हाही प्रश् उपस्थित होतो. दुसरीकडे आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७० -७२ वर्षे झालीत पण तेवढाच आपला इतिहास नसून हजारो वर्षांचे सांस्कृतिक संचितही आपल्यामागे आहे. याच सांस्कृतिक संचितातून इथल्या मातीत, इथल्या नागरिकांत काही मूल्ये रुजल्याचे पाहायला मिळते. सर्वसमावेशकतेची, सहिष्णुतेची ही मुल्ये! याच मुल्यांच्या आधारेच आपल्यापुढे कितीही मोठी वादळे, संकटे आली तरी आपण त्यांना पराभूत करुन उभे राहिलो. शिवाय या जुन्या काळाने, त्यातील घटनांनीच, त्या इतिहासानेच आपल्याला बरेच काही शिकवले, बराच काही ठेवाही दिला. आता हे जुने सगळेच अनुकरणीय नसेल, नाही; पण त्यातल्या काही गोष्टी टाकून देण्यासारख्या असल्या तरी कितीतरी गोष्टी आजही अनुकरणीयच असल्याचे लक्षात येते अन् याचवेळी दीनदयाळजींच्या भविष्याच्या कालपटलावर आपल्या कर्तृत्वाची पदचिन्हे उमटविण्याची जिद्द बाळगावी, या उद्बोधनाचा खोलवर जाऊन विचार करावासा वाटतो. कर्तृत्व! कोणते कर्तृत्व? देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या सर्वांगीण प्रगतीचे, विकासाचे धोरण तयार करून ते राबवणे, त्याची अंमलबजावणी करणे हे ते कर्तृत्व. यासाठी इथल्या प्रत्येक नागरिकाला शिक्षणाची, रोजगाराची, अन्न-वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा भागविण्याची संधी मिळाली पाहिजे. जेणेकरून इथल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद तर ओसंडून वाहेलच, पण ज्यासाठी स्वातंत्र्य मिळवले, ते साकार झाल्याचे समाधानही झळकेल.

 

स्वातंत्र्य मिळाले की, त्यासोबत संविधान आणि संविधानाने दिलेल्या हक्क-अधिकारांची चर्चा होते. मात्र, जबाबदारी आणि कर्तव्याचीही चर्चा व्हायला हवी की नाही? कारण व्यक्ती जितका आपल्या हक्कांबाबत जागरूक असतो, तितका तो कर्तव्याबाबत उदासीन असल्याचेच नेहमी दिसते. अगदी साधे उदाहरण घेऊया- रस्त्याने जाताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे, हे आपले कर्तव्य आहे, पण त्याचे पालन सर्वचजण करतात का? बहुतांशी नाहीच. म्हणजेच उद्या अपघात झाला, काही बरेवाईट झाले तर आपल्यापुढे जाणाऱ्यालाही इजा होणार, कदाचित त्याचा जीवही जाईल. अशा स्थितीत त्याच्या जीवन जगण्याच्या स्वातंत्र्यावर आपण घातलेला तो घालाच असतो ना? म्हणजेच स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीचे, कर्तव्याचेही भान इथल्या प्रत्येकानेच बाळगले पाहिजे. आणखी एक गोष्ट म्हणजे, ‘राष्ट्रम्हटले की, तिथे राज्य करणाऱ्या सत्ताधाऱ्या चा उल्लेख होतोच होतो. देशाच्या ७१ वर्षांच्या काळात इथल्या प्रत्येकानेच सत्ताधाऱ्या कडून काही ना काही अपेक्षा व्यक्त केल्या. प्रत्येकालाच आपल्या प्रगतीची, विकासाची आशाही निर्माण झाली, पण १३० कोटींच्या देशातल्या प्रत्येकच व्यक्तीची एक एक आशा-अपेक्षा-आकांक्षा या कालावधीत पूर्ण होईलच, हे शक्य नव्हतेच. मात्र, याच कालावधीत अपेक्षांची पूर्तता होत नसल्याचे पाहून इथल्या सत्ताधाऱ्या नी देशातल्या नागरिकांना निश्चितच काही सवयी लावल्या. त्या सवयी मग सर्वच गोष्टी सरकारनेच कराव्या, सरकारनेच प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घ्यावी, अगदी उद्योगधंदेही सरकारनेच उभारावे आणि रोजगारही सरकारनेच द्यावेत इथपासून ते स्वच्छता, कचरा आदी समस्याही सरकारनेच सोडव्यावा इथपर्यंत पोहोचतात. त्यातून आजच्या सत्ताधाऱ्या कडूनही अशाचप्रकारच्या अपेक्षा बाळगल्या जातात. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, सरकारचे, सत्ताधाऱ्या चे काम असते ते प्रशासनाची, कायदेनियमांची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेच्या सुरक्षेची काळजी वाहणे. पण, सरकारने याबरोबरच अन्यही गोष्टी केल्या आणि त्यातूनच त्याची सवय इथल्या नागरिकांना झाली. आता त्यातून बाहेर पडावे लागेलच, त्याला निश्चितच वेळ लागेल, ही गोष्टही खरी. पण, जेव्हा सरकारने कसलीही मदत करता आपण आपल्या प्रगतीची, विकासाची शिखरे पार करत जाऊ तेव्हा तोच आपल्या स्वातंत्र्याचा वास्तविक अर्थ असेल, हेही खरेच ना?

 
@@AUTHORINFO_V1@@