आयआयटी-मेट्रोसाठी १९१ झाडे कापणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2018
Total Views |


 

मुंबई : ‘मेट्रो’ आणि ‘आयआयटी’च्या विविध कामांसाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने तब्बल १९१ झाडे तोडण्याची परवानगी आज दिली. यावेळी झाडे तोडण्याच्या प्रस्तावांना शिवसेनेने विरोध केला, मात्र हा विरोध आयुक्तांनी धुडकावत प्रस्ताव मंजूर केला.
 

पहिल्या प्रस्तावात आयआयटीसाठी ३१, दुसर्‍या प्रस्तावात ७५, तिसर्‍या प्रस्तावात - ७४ तर चौथ्या प्रस्तावात मेट्रोसाठी ११ झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. तोडणे आणि पुनर्रोपण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेल्या प्रस्तावांमधील झाडांमध्ये जंगली झाडे, ग्लिसिडिया (गिरीपुष्प), विलायती चिंच, बोर, पंगारा, निरगुडी, शेवगा, आंबा, कडूनिंब, बदाम, नारळ, उंबर, जांभूळ, पुत्रंजीवा, पेरू, पिंपळ, पळस, गुलमोहर अशा झाडांचा समावेश आहे.

 

वृक्ष प्राधिकरणाने १६ जून २०१० मध्ये अंधेरी पूर्व येथील ९ झाडे पुनर्रोपणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मात्र ही झाडे मरण पावल्यामुळे तोडण्यासाठी आणि त्या ठिकाणच्या आणखी ९ झाडांच्या पुनर्रोपणासाठी आजच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रस्तावावर आक्षेप घेत संबंधित कंत्राटदाराने या झाडांची योग्य देखभाल केली नसल्यामुळेच झाडे मरण पावल्याचा आरोप केला. तर संबंधित ठिकाणची पुनर्रोपण केलेली झाडे मरण पावल्यामुळे संबंधित कंत्राटदाराकडून घेतलेली प्रतिझाड चार हजारांची अनामत रक्कम पालिकेकडे जमा करण्यात आल्याचे आयुक्त अजोय मेहता यांनी सांगितले. तसेच पुन्हा झाडे तोडण्यासाठी सादर झालेल्या प्रस्तावांमध्ये संबंधितांनी आवश्यक कार्यवाही पूर्ण केल्यामुळेच झाडे तोडणे आणि पुनर्रोपण करण्यासाठी मंजुरी देण्यात आल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

@@AUTHORINFO_V1@@