ते पंधरा दिवस : १४ ऑगस्ट, १९४७

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2018   
Total Views |



कलकत्ता.-

गुरुवार१४ ऑगस्ट.

सकाळची हवा आल्हाददायक आणि प्रसन्न असली, तरी तशी बलियाघाट भागात नाही. पसरलेल्या चिखलामुळे, एक विचित्र प्रकारची घाण आसमंतात भरून राहिली आहे.

गांधीजी सकाळच्या फिरण्यासाठी बाहेर पडले आहेत. अगदी शेजारचीच काही घरं त्यांना तुटक्या, फुटक्या आणि जळक्या अवस्थेत दिसतात. बरोबरचे कार्यकर्ते सांगतात, परवाच्या दंगलीत मुस्लिम गुंडांनी ही हिंदूंची घरं जाळली. गांधीजी थबकतात. विषण्ण नजरेने त्या घरांकडे बघतात, आणि पुन्हा चालू लागतात. आत्ता सकाळी त्यांच्या सोबत शहीद सुहरावर्दी नाही. कारण त्या हैदरी मंझील मधे, काल रात्री झोपण्याची त्याची काही हिम्मत झाली नाही. आता सकाळी ११ वाजता तो येणार आहे.

एक कार्यकर्ता त्यांना सांगतो कि गांधीजींच्या सांगण्या प्रमाणे, पूर्ण कलकत्ता शहरात, ठिकठिकाणी हिंदू आणि मुसलमानांचे संयुक्त मोर्चे निघत आहेत. काल दिवसभरात कलकत्त्यातून दंगलीची एकही बातमी नाही...!

____ ____ ____ ____

कराची.

सकाळचे नऊ वाजताहेत.

साध्याश्या वाटणाऱ्या, पण भव्य अश्या असेंब्ली हालमधे बरीच गडबड उडालेली आहे. काही क्षणातच येथे पाकिस्तान, अधिकृतरीत्या अस्तित्वात येणार आहे.

 
 
 

शंखाकृती आकाराच्या या सभागृहात विविध प्रकारची माणसं बसली आहेत. ही त्या त्या क्षेत्रातली पुढारी माणसं आहेत. यात पठाण आहेत, आफ्रिदी आहेत, वझीर आहेत, महसूद आहेत, पंजाबी आहेत, बलुची आहेत, सिंधी आणि बंगाली ही आहेत. दीड हजार मैलांवर राहत असलेले हे बंगाली, या इतरांपेक्षा वेगळे वाटताहेत.

लॉर्ड माउंटबेटन, आपल्या नौसेना अधिकाऱ्याच्या संपूर्ण गणवेशात आहेत. पहिलं भाषण त्यांनाच करायचं आहे. त्यांचं भाषण लिहिलेलं आहे, जॉन क्रिस्टी यांनी. एकेका शब्दाच्या उच्चारांवर जोर देत माउंटबेटन बोलू लागले,पाकिस्तान चा उदय ही एक ऐतिहासिक घटना आहे. इतिहास कधी कधी एखाद्या हिमखंडाच्या गतीनं संथपणे तर कधी पाण्याच्या जोरदार प्रवाहासारखा सुसाट गतीनं पुढे जात राहतो. आपण, प्रवाहातील अडथळे दूर करून, या घटनांच्या आवेगात स्वतः ला झोकून देत आहोत. आता मागे पाहणे नाही. आता फक्त पुढेच बघायचे आहे..

भावशून्य आणि करड्या चेहऱ्याच्या जीनांकडे बघून, माउंटबेटन पुढे म्हणाले, “या प्रसंगी मला मिस्टर जींनांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हा दोघांमधील जिव्हाळा आणि मित्रता, यामुळे पुढील काळातही आमचे संबंध चांगले राहतील, याची मला पूर्ण खात्री आहे.

  
 
कायदे - आझम जीना, पाकिस्तान च्या गव्हर्नर गण्र्ल पदाची शपथ घेताना.

 

या प्रसंगी जीनांना फारसं बोलायचं नव्हतं. ते त्यांच्या संक्षिप्त भाषणासाठी उठले. चकचकीत आणि लखलखीत शेरवानी. गळ्यापर्यंत बटनबंद केलेली. एकाच डोळ्यावर चष्मा, तो ही नाकाच्या आधाराने. आणि जीना बोलूलागले, “ब्रिटन आणि त्यांनी निर्माण केलेल्या वसाहती, यांचे संबंध विच्छेद होतानाही, परस्परांमधील स्नेहभाव जागा आहे. गेली तेरा शतके अस्तित्वात असलेल्या आमच्या पवित्र इस्लाम कडून, इतर धर्माबद्दलच्या सहिष्णुतेचे पालन केले जाईल, असे मी अभिवचन देतो. आमच्या शेजारील राष्ट्रे आणि जगातील इतरही राष्ट्रांसोबत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यात पाकिस्तान कधीही मागे राहणार नाही..!

या लहानश्या भाषणानंतर, पाकिस्तान चे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून त्यांना शपथ घ्यायची होती. ती त्यांनी घेतली. आणि अधिकृतपणे, पाकिस्तान नावाचं राष्ट्र उदयाला आलं.

आता पुढचा टप्पा होता तो मिरवणुकीचा. एका सजलेल्या काळ्या, उघड्या टपाच्या, रोल्स राईस मोटारीतून ही मिरवणूक निघणार होती. असेंब्ली हॉल पासून ते गव्हर्नर हाऊस पर्यंत, म्हणजेच आत्ताच्या जीनांच्या निवासस्थानापर्यंत. अवघं तीन मैलांचं अंतर. दुतर्फा माणसंच माणसं उभी होती. गाडीच्या मागच्या बाजूला जीना आणि लॉर्ड माउंटबेटन बसले. एकवीस तोफांची सलामी झाली., अन गाडी हळू हळू पुढे सरकू लागली. काही अंतर गेल्यावर, एखाद्या झपझप चालणाऱ्या माणसाच्या वेगा इतका वेग, गाडीला आला.

जीनांना आणि माउंटबेटन यांना असं वाटत होतं की या गर्दीतून कोणी आपल्यावर बॉम्ब फेकेल. रस्त्याच्या दुतर्फा चांगलीच गर्दी होती. हजारो लोकं जीनांचा आणि पाकिस्तान चा जयजयकार करत होते. ठराविक अंतरावर पोलीस आणि सैनिक उभे होते. हे तीन किलोमीटर चं अंतर साधारण पाऊण तासात संपलं.

गव्हर्नर हाऊस च्या दारात गाड्या उभ्या राहिल्यावर, नेहमीच्या करड्या चेहऱ्याच्या जागी, किंचित स्मित हास्य करत आणि आपला हडकुळा हात, माउंटबेटन यांच्या गुडघ्यावर दाबत जीना म्हणाले, “इन्शाल्ला.. मी तुम्हाला जिवंत परत आणू शकलो...!

माउंटबेटन बघतच राहिले..! कोणी कोणाला जिवंत परत आणलं..? ते मनातल्या मनात म्हणाले, “अरे बद्माशा, माझ्यामुळे तू जिवंत परत आला आहेस..!

____ ____ ____ ____

श्रीनगर.

सकाळचे दहा वाजताहेत.

शहरातलं मुख्य पोस्ट ऑफिस. जी. पी. . पोस्टाचे अधिकारी पाकिस्तान चा ध्वज लावताहेत. तेथे उभे असलेले संघाचे दोन स्वयंसेवक हे बघतात. ते ताबडतोप पोस्ट मास्टर ला विचारतात, “तुम्ही पाकिस्तान चा ध्वज कसा काय लावलात..? महाराजांनी, काश्मीर हे पाकिस्तानात विलीन केलेलं नाही.

तो मुस्लिम पोस्ट मास्टर शांतपणे उत्तर देतो, “श्रीनगर चं पोस्ट ऑफिस हे सियालकोट सर्कल च्या अंतर्गत येतं. आणि सियालकोट तर पाकिस्तानचा हिस्सा झालाय. म्हणून आम्ही पाकिस्तान चा झेंडा फडकवला.

हे दोघं स्वयंसेवक, जम्मू-काश्मीर चे प्रांत संघचालक, प्रेमनाथ डोग्रा यांना हे कळवतात. डोग्राजी ताबडतोप महाराजांच्या कार्यालयातल्या जबाबदार अधिकाऱ्यांना हे कळवतात आणि दहा / पंधरा स्वयंसेवकांना मुख्य पोस्ट ऑफिसात पाठवतात.

हे स्वयंसेवक पोस्ट मास्टर ला समजवतात. आणि अवघ्या पाऊण तासात, पाकिस्तान चा झेंडा खाली येतो..!

____ ____ ____ ____

कराची.

दुपारी दोन वाजता.

आपल्या सकाळच्या समारंभाचे दरबारीकपडे बदलून, लॉर्ड माउंटबेटन आणि लेडी माउंटबेटन, दोघेही आता दिल्लीला जायला तयार आहेत. दोघेही प्रसन्नचित्त दिसत आहेत. आज त्यांना रात्रीच्या, भारताच्या राज्यारोहण सोहळ्यात हजर राहायचंय.

कायदे आझम जीना आणि त्यांची बहिण फातिमा, यांनी या दांपत्त्याला निरोप दिला.

एका प्रकारे, नवनिर्मित पाकिस्तानातले, पहिले राजकीय अतिथी, भारताचे गव्हर्नर जनरल, लॉर्ड आणि लेडी माउंटबेटन, जीनांचा निरोप घेत होते..!

____ ____ ____ ____

कलकत्ता एयरोड्रम.

दुपारचे तीन वाजताहेत.

विभाजित बंगाल चे, अर्थात पश्चिम बंगाल चे, गव्हर्नर नियुक्त झालेले चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचं विशेष विमान दिल्लीहून येतंय. आज रात्रीच राजाजींचा शपथविधी आहे.

विमानतळावर कॉंग्रेस चे काही कार्यकर्ते जमलेले आहेत. मात्र त्यांच्यात उत्साह दिसत नाही. बंगाल मधे राजाजींना विरोध आहे. त्यांना बंगाल वर लाद्ल्याच्या निषेधार्थ सुभाष बाबूंचे बंधू आणि बंगाल कॉंग्रेस चे मोठे पुढारी, शरत चंद्र बोस यांनी यापूर्वीच राजीनामा दिलेला आहे.

शेवटी गव्हर्नर हाऊस चे काही अधिकारी, कर्मचारी, राजाजींना, त्यांच्या खास गव्हर्नर साठीच्यामोटारीतून, गव्हर्नर हाऊस वर घेऊन जातात.

____ ____ ____ ____

सिंगापुर.

सिंगापुर च्या इंडियन इंडिपेंडेंस डे सेलीब्रेशन कमिटीने मलायन एअरवेज बरोबर, उद्याचा दिवस साजरा करण्याची एक खास योजना आखली होती. मलायन एअरवेज चं एक विशेष विमान, पडांग च्या वाटरलू स्ट्रीटवरून उड्डाण भरणार होतं. आणि ते ही नेमकं तेंव्हाच, जेंव्हा तिथे भारताचा तिरंगा राष्ट्रध्वज फडकविण्याचा सोहळा साजरा होत असेल.

या विमानात, सुभाष बाबूंच्या आझाद हिंद सेनेचेशिपाई आणि अधिकारी, ‘रानी झांसी रेजिमेंटच्या महिला सैनिक आणि बाल सेनेचे कार्यकर्ते असणार होते. हे सर्व, ध्वजारोहण प्रसंगी विमानातून पुष्पवृष्टि करणार होते.

मात्र आझाद हिंद सेनेचे नाव घेतल्या बरोबरच, सिंगापुर च्या सिव्हील एव्हिएशन विभागाने, या विशेष कार्यक्रमावर हरकत घेतली आणि उड्डाणालाच परवानगी नाकारली..!

आता इंडियन इंडिपेंडेंस डे सेलीब्रेशन कमिटी’, उद्या वेगळ्या पध्दतीने स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची योजना आखत आहे.

____ ____ ____ ____

कराची.

दुपारचे चार वाजताहेत. कराचीतली एक मोठीशी हवेली. संघाशी संबंधित असलेला परिवार. घरच्या दोन महिला राष्ट्र सेविका समितीच्या चांगल्या सेविका आहेत.

या हवेलीत छतावर सेविकांच्या एकत्रीकरणाचा कार्यक्रम ठेवला आहे. कराची शहराच्या हिंदू बहुल वस्त्यांमधून सेविका येताहेत. सकाळची, कायदे आझम जीनांची आणि लॉर्ड माउंटबेटन ची शोभायात्राकधीच संपलेली आहे. त्यामुळे रस्त्यावर आता फारशी गर्दी नाही. आज गुरुवार असुनही, पाकिस्तान च्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शाळा, कॉलेज वगैरे सर्व बंद आहेत.

गच्ची भली मोठी आहे. साधारण सातशे आठशे तरी सेविका असतील. आता बसायला जागा मुळीच शिल्लक नाहीये. खाली पण काही सेविका उभ्या आहेत.

वातावरण गंभीर असलं तरी उत्साही आहे. शाखा लागते. ध्वज लागतो. मनाची उमेद वाढविणारं आणि आत्मविश्वास देणारं गीत होतं. नंतर मावशी, आपल्या धीरगंभीर स्वरात, प्रतिज्ञेचं उच्चारण करू लागतात. त्याच दृढतेने आणि गांभीर्याने, सर्व सेविका, त्यांच्यामागे प्रतिज्ञा म्हणू लागतात. मनाच्या संकल्पशक्तीला आवाहन करणारी ही प्रतिज्ञा आहे. थोडा वेळ प्रश्नोत्तरासाठी आहे. एक तरुण सेविका प्रश्न विचारते, “आमची अब्रू धोक्यात आहे. आम्ही काय करावं..? कुठं जावं..?”

मावशी त्यांच्या आश्वासक स्वरात सांगतात, “जमेल तसं हिंदुस्थानात या. मुंबईला आणि इतरत्र तुमची व्यवस्था केलेली आहे. चिंता करू नका. आपण सर्व म्हणजे एक परिवार आहोत. ही वेळ ही निभाऊन नेऊ.

शेवटी समारोपाच्या लहानश्या भाषणात मावशी म्हणाल्या, “धैर्यशाली बना. धीर धरा. आपल्या अब्रुचं रक्षण करा. आपल्या संघटने वर पूर्ण विश्वास ठेवा. आपल्या मातृभूमीच्या सेवेचं, व्रत या कठीण काळातही चालू ठेवा. आपल्या संघटनेच्या ताकदीवर आपण या कठीण प्रसंगातून सुखरूप बाहेर पडू.

मावशींचे हे आश्वासक बोल ऐकून, सिंध च्या त्या सेविकांच्या मनात, निश्चितच एक आत्मविश्वास उभा राहतोय..!

____ ____ ____ ____

परत एकदा कराची.

 

 
 

जीना, लॉर्ड माउंटबेटन यांच्या बरोबर मिरवणुकीत.

 

 

कराचीतील जीना-माउंटबेटन यांच्या मिरवणुकीतील जयजयकार सोडला तर एकुणातच पाकिस्तानात, स्वातंत्र्य सोहळ्याचा उत्साह फारसा जाणवत नव्हता. पाकिस्तान चे चांद ताऱ्यांचे हिरवे झेंडे बऱ्याच ठिकाणी दिसत होते. पण ते फक्त पश्चिम पाकिस्तानात. पूर्व पाकिस्तानात, औषधालाही पाकिस्तान चे झेंडे नव्हते. कदाचित रमझान चा शेवट असल्याने असे झाले असेल.

मात्र हे निश्चित की पाकिस्तान च्या उदयामुळे, इस्लामी राष्ट्रांत एक मजबूत, नेतृत्व करू शकणारे राष्ट्र निर्माण झाले आहे, असे अनेकांना वाटते आहे.

____ ____ ____ ____

कलकत्ता. बेलियाघाट.


 

भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्व संध्येला, गांधीजींची सायं प्रार्थना सभा.

 

 

 
गांधीजींची सायं प्रार्थनेची वेळ झालेली आहे. आज परतंत्र भारतातली ही शेवटची सायं प्रार्थना. आजवर गांधीजींनी अश्या सायं प्रार्थनेतून अनेक विषय मांडले. अगदी त्यांच्या आवडत्या सूत कताई पासून ते अणुबॉम्ब चा धोका, शरीरातील आतड्यांच्या हालचाली, शौचकुपाची स्वच्छता, ब्रम्ह्चर्य पालनाचे फायदे, भगवद्गीतेतील शिकवण, अहिंसा तत्व वगैरे अनेक..

आज गांधीजी, स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला काय बोलतात, याबद्दल प्रत्येकालाच कुतूहल आहे. आणि म्हणूनच आजची सायं प्रार्थना ही बलीयाघाट च्या सार्वजनिक बगीच्यात होणार आहे.

समोर असलेल्या दहा हजारांच्या जमावापुढे, गांधीजी शांतपणे बोलू लागले, सर्वप्रथम तुम्हां सर्वांचेअभिनंदन. कलकत्त्यात तुम्ही हिंदू आणि मुस्लिम भेद मिटविला, हे फार छान झाले. अर्थात हे तात्पुरतं समाधान नसून नेहमीच तुम्ही अश्या बंधुभावाने राहाल, अशी मी आशा करतो.

उद्यापासून आपण ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त होणार. मात्र त्याचबरोबर आज रात्रीपासून हा आपला देश सुध्दा विभाजित होणार. आणि म्हणूनच उद्याचा दिवस जसा आनंददायक आहे, तसाच दुखःदायक ही आहे. स्वातंत्र्यानंतर, आपल्यावरच्या जवाबदाऱ्या वाढणार आहेत. जर कलकत्ता शहराची बुद्धी आणि बंधुभाव शाबूत राहिला, तर कदाचित आपला देश एका मोठ्या संकटातून वाचेल. जर का एकदा जातीय वैमनस्याच्या ज्वाळांनी हा देश वेढून टाकला तर आपले हे नवीन मिळालेले स्वातंत्र्य तरी टिकेल का..?”

उद्याचा स्वातंत्र्यदिन, वैयक्तिक रित्या मला आनंदी करू शकत नाही, हे सांगताना मला फार दुःख होतेय. माझ्या सर्व अनुयायांना माझं हेच सांगणं असेल, की उद्या चोवीस तासांचे उपोषण करा, प्रार्थनेत वेळ घालवा आणि चरख्यावर सूत कताई करा. यामुळेच आपला देश वाचू शकेल.

____ ____ ____ ____

दिल्ली.

कॉंग्रेस मुख्यालय. संध्याकाळचे सहा वाजताहेत. पाऊस पडतोच आहे.

कांग्रेस च्या राष्ट्रीय अध्यक्षांचे प्रेस वक्तव्य प्रकाशनासाठी जातंय. यात अध्यक्ष आचार्य जे. बी. कृपलानी म्हणतात, “आजचा दिवस हा दुःखाचा आहे. आमच्या प्रिय मातृभूमीचे विभाजन होतेय. मात्र यातूनही आपण बाहेर पडू. एक नवा भारत घडवू..!

____ ____ ____ ____

दिल्ली.

संध्याकाळचे सहा वाजताहेत.

डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा बंगला. नेहरू मंत्रिमंडळातील, नेहरू सोडून, अधिकांश मंत्री उपस्थित आहेत. रक्षा मंत्री बलदेव सिंह हे पंजाब च्या दौऱ्यावर असल्याने अजून पर्यंत पोहोचलेले नाहीत. पण ते लवकरच पोहोचणार आहेत.

या बंगल्याच्या आवारात, येऊ घातलेल्या स्वतंत्र भारताच्या उज्वल भविष्यासाठी यज्ञ चालला आहे. वेद विद्येत नामांकित असलेले आचार्य, यज्ञ करवून घेताहेत. शुध्द संस्कृत मधे खणखणीत मंत्रोच्चार चालले आहेत. बाहेर संथ लयीत पाऊस पडतोय. वातावरण एका प्रसन्न आणि पवित्र भावनेनं भरून गेलेलं आहे.

या यज्ञाच्या पूर्णाहुती नंतर, स्वल्पाहार घेऊन सर्व मंत्र्यांना स्टेट कौन्सिल बिल्डींग मधे राज्यारोहणाच्या समारंभासाठी जायचं आहे.

____ ____ ____ ____

दिल्ली.

रात्रीचे दहा वाजताहेत.

बाहेर पाऊस पडतोच आहे. स्टेट कौन्सिल बिल्डींग मधे, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली चे सर्व सदस्य, मंत्रीगण, वरिष्ठ अधिकारी जमा होताहेत. गोल आकाराच्या त्या सभागृहाच्या बाहेर, पावसाची पर्वा करता, हजारो लोकं उभे आहेत.

पटेल, आझाद, डॉ. राजेंद्र प्रसाद, श्यामा प्रसाद मुखर्जी, डॉ. आंबेडकर, बलदेव सिंह, नेहरू, राजकुमारी अमृत कौर हे मंत्री एका पाठोपाठ एक येताहेत, आणि लोकांचा उत्साह शिगेला पोहोचलाय. ते त्या त्या मंत्र्यांच्या नावाने जयजयकार करताहेत. ओरडताहेत. वंदे मातरम’, ‘महात्मा गांधी की जयच्या घोषणा देताहेत...

सभागृहातील उच्च आसनावर, या सभागृहाचे अध्यक्ष, डॉ. राजेंद्र प्रसाद बसले आहेत. त्यांच्या डावीकडे, खालच्या बाजूला, लॉर्ड माउंटबेटन, पूर्ण सैनिकी पोशाखात आहेत. नेहरूंनी पांढरा शुभ्र चुडीदार, त्यांची नवीन शिवलेली ती अचकन, अर्थात बंद गळ्याचा कोट, त्या कोटावर छानसं जाकीट आणि त्या जाकीटावर गुलाब, असा जामानिमा केलेला आहे.

डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सभेची सुरुवात केली. त्यांनी सर्व ज्ञात अज्ञात सैनिकांचे, स्वातंत्र्यवीरांचे स्मरण केले, ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हाल अपेष्टा सहन केल्या, आणि प्रसंगी मृत्यूही पत्करला. भाषणाच्या शेवटी, त्यांनी गांधीजींचा आवर्जून उल्लेख केला, “आम्हां सर्वांचे गुरु आणि आम्हाला दिशा देणारे दीपस्तंभासारखे गांधीजी आमच्या पासून हजार मैल दूर, शांतता प्रस्थापित करण्याच्या कामात मग्न आहेत...!

नंतर नेहरू बोलायला उभे राहिले. त्यांच्या सुती जाकिटाच्या बटनहोल मधील गुलाबाचे फुल, अगदी मध्यरात्रीही टवटवीत दिसत होते.

नेहरू शांत आणि संथ लयीत बोलू लागले, “अनेक वर्षांपूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता. आज त्याची पूर्ति आपण, पूर्णपणे नसली, तरी बहुतांशी करत आहोत. मध्यरात्रीचा टोला पडताच, सारे जग शांत झोपले असताना, भारत स्वातंत्र्याच्या नव्या युगात, नवा जन्म घेत आहे....!

एकापेक्षा एक सरस शब्दांच्या फुलोऱ्यांनी नेहरूंचे भाषण सजत होते. हे भाषण तयार करण्यासाठी त्यांच्या कितीतरी रात्री खर्च झालेल्या होत्या...!

बरोबर बारा वाजता, त्या सभागृहात बसलेल्या, गांधी टोपी घातलेल्या एका सदस्याने, बरोबर आणलेला मोठाला शंख फुंकला. त्या शंखध्वनीने तेथे उपस्थित प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे राहिले...

एक नवा इतिहास घडत होता. एका नवीन युगाचा प्रारंभ होत होता. अनेक क्रांतीकारकांचे स्वर्गस्थ आत्मे, हे दृश्य बघून तृप्त होत होते, शांत होत होते.

भारत स्वतंत्र झालेला होता..!

____ ____ ____ ____

दिल्ली. मध्यरात्र.

तुफान पाऊस पडतोय. जुन्या दिल्लीत, दरियागंज वगैरे भागात, मिंटो ब्रिज च्या खाली पाणी जमायला सुरुवात झालेली आहे.

अश्या ह्या पावसातही, ४२, कमला नगर येथे संघाच्या लहानश्या कार्यालयात, काही प्रचारक अणि दिल्लीतील संघाचे प्रमुख कार्यकर्ते एकत्र बसले आहेत. अनेक मुद्दे समोर आहेत. पंजाब आणि सिंध मधून अनेक निर्वासित येताहेत. त्यांची व्यवस्था लावायची आहे. उद्या च्या स्वातंत्र्यदिनी, मुसलमानांचे काही समूह गडबड करतील अशी बातमी आहे. तिथेही लक्ष ठेवायचे आहे.

यातील अनेक जन अनेक रात्री झोपलेले नाहीत.

पुढच्याही अनेक रात्री, ह्या अश्याच, आव्हानांनी भारलेल्या असणार आहेत...!

____ ____ ____ ____

कलकत्ता. गव्हर्नर हाऊस.

मध्यरात्रीचा एक वाजतोय.

तिकडे दूर, दिल्लीत सत्तान्तरणाचा कार्यक्रम पार पडत असतानाच, इकडे इंग्रजांच्या जुन्या राजधानीत, कलकत्त्यात, एक नवा अध्याय लिहिला जातोय.

गव्हर्नर हाऊस मधे, चक्रवर्ती राजगोपालाचारींचा, गव्हर्नर म्हणून शपथ घेण्याचा लहानसा कार्यक्रम सुरु होतोय. अक्षरशः लहानसा. मावळते गव्हर्नर, सर फेड्रिक बरोज, हे राजगोपालाचारींना आपली सूत्र देत आहेत. उण्या-पुऱ्या दहा पंधरा मिनिटांचा कार्यक्रम. राजाजींनी इंग्रजीतून शपथ घेतली. मात्र नवनियुक्त मुख्यमंत्री डॉ. प्रफुल चंद्र घोष आणि त्यांच्या इतर मंत्र्यांनी, बंगला भाषेत शपथा घेतल्या.

ह्या कार्यक्रमासाठी, बाहेर प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी जमलेली आहे. आजची रात्र, तशीही स्वातंत्र्याची रात्र. त्यातून आज गव्हर्नर हाऊस लोकांकरता खुले आहे. त्यामुळे अश्या मध्यरात्रीही, प्रचंड मोठा समुदाय तिथे जमला आहे. लोकं मोठमोठ्याने घोषणा देताहेत – ‘जय हिंद’, वंदे मातरम’, गांधीजी जिंदाबाद’... आजपर्यंत जे गव्हर्नर हाऊस समस्त भारतीयांच्या, विशेषतः क्रांतिकारकांच्या, मुळावर उठलं होतं, त्याच गव्हर्नर हाउस मधे, जोरजोरात वंदे मातरमची घोषणा देताना एक वेगळीच थरार, त्या सर्वांना जाणवतोय.

आणि राजाजींनी गव्हर्नर पदाची सूत्र हाती घेताच, हा जमाव बेभान झाला. काय करु आणि काय नाही, असं त्यांना झालं. आणि त्याच आवेशात गव्हर्नर हाऊस मधील किमती वस्तू, चांदीच्या कटलरी वगैरे घेऊन, ‘महात्मा गांधी जिंदाबाद..च्या घोषणा देत, हा जमाव बाहेर पडू लागला...!

स्वतंत्र भारतावर सूर्य अजून उगवला ही नसताना, स्वतंत्र देशाच्या पहिल्या सार्वजनिक कार्यक्रमाचा समारोप हा असा झाला...!

 
मागील लेख तुमच्या वाचनातून राहिला असेल तर त्याची लिंक खालीलप्रमाणे : १३ ऑगस्ट १९४७
 
 

 

- प्रशांत पोळ
@@AUTHORINFO_V1@@