खासदार पाटील, आमदार कथोरेंचा बदलापूरमधील नागरिकांशी संवाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2018
Total Views |



बदलापूर : बदलापूर शहरातील समस्या सोडविण्याचे काम वेगाने होण्यासाठी भाजपचे खासदार कपिल पाटील आमदार किसन कथोरे यांनी नागरिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. काल रविवारी दोन्ही नेत्यांनी थेट जनतेशी संवाद साधण्याबरोबरच काही कामांची भूमिपूजनेही केली. बदलापूर नगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामांचे भूमिपूजन खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते झाले. त्याचबरोबर खासदार कपिल पाटील आमदार किसन कथोरे यांनी थेट नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या.

 

बदलापूर शहरातील सर्व रस्त्यांचा कायापालट होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रस्ते कॉंक्रीट करण्यासाठी ५३ कोटी रुपयांचा निधी दिला आहे, अशी माहिती खासदार पाटील आमदार कथोरे यांनी दिली. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक १४ मधील नगरसेवक किरण भोईर यांच्या प्रभागातील तीन कोटींचा कॉंक्रीट रस्ता नगरसेवक संजय भोईर यांच्या प्रभाग क्रमांक २९ मध्ये दोन कोटी तीन लाखांच्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. या दोन कामांप्रमाणेच आणखी रस्त्यांची कामेही लवकरच सुरू केली जातील, असे आमदार कथोरे यांनी सांगितले. बीएसयूपीची घरे मंजूर झालेल्या लाभार्थींना लवकरच घराच्या चाव्या दिल्या जातील. याबाबत नगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे खासदार पाटील यांनी सांगितले. बदलापूर येथील होम प्लॅटफॉर्मची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या ऑक्टोबरमध्ये होम प्लॅटफॉर्मचे भूमिपूजन करण्यात येईल, असे खासदार पाटील यांनी सांगितले. प्लॅटफॉर्म क्रमांक दोनची उंची वाढविण्यासाठीही पाठपुरावा केला जाईल, असे ते म्हणाले. या वेळी महानगर गॅसची लाईन पूर्वेप्रमाणेच पश्चिमेकडेही देण्यात येण्याची मागणी नागरिकांनी केली. त्याबाबतही पाठपुरावा करण्याचे आश्वासन खासदार पाटील यांनी केले. बदलापूरमधील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी दर आठवड्याला प्रभागांना भेट दिली जाईल, त्याला आपण आमदार कथोरे उपस्थित राहतील, असे खासदार पाटील यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@