कोठे शोधावा आनंद?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2018   
Total Views |


सर्वेक्षणात कदाचित भारताची हीच मानसिकता त्याचे स्थान एवढे खाली घसरण्यास बाधक ठरली असावी. याउलट युरोपीयन देश मी, माझं, आपलं या धारणेतून जीवनमान व्यतीत करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा जरी आपण घेत असलो तरी तो कुठेतरी आपली काजळी झाकण्याचा आपणच केलेला प्रयत्न असावा.


सीने मे जलन, आँखे मे तूफान सा क्यूं है, इस शहर मे हर शख्स, परेशान सा क्यूं है?” गीतकार शहरयार यांच्या या गीताची आठवण होण्याचे कारण म्हणजे नुकताच जाहीर झालेला जागतिक आनंद निर्देशांक अर्थात वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट- २०१८. संयुक्त राष्ट्र संघाने जारी केलेल्या या अहवालात भारताचे स्थान १५६ पैकी १३३ व्या क्रमांकावर आहे. २०१२ पासून संयुक्त राष्ट्राने हा अहवाल सादर करण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून ११८ ते १३३ क्रमांकावर आपली घसरण चालू आहे. नवल म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ हे आपले शेजारी आपल्या वरचढ आहेत. नेपाळ १०१ व्या क्रमांकावर आहे तर बांगलादेश, श्रीलंका ११५ ११६ व्या क्रमांकावर आहे. चीन, म्यानमार हेही आपल्यापुढे ८६ १३० व्या क्रमांकावर आहेत. म्यानमारमध्ये सध्या बुद्धिस्ट रोहिंगे वाद पेटला आहे. त्यामुळे त्याच्या घसरणीचे कारण स्वाभाविक असावे. या अहवालानुसार टांझानिया (१५ ), दक्षिण सुदान (१५४ ), बुरूंडी (१५६ ) हे देश अत्यंत तळाला आहेत, तर युरोपातील अमेरिका ब्रिटन अनुक्रमे १८ व्या १९ व्या स्थानावर आहेत. तसेच युरोपमधीलच स्कँडेनेव्हियन देश म्हणजे फिनलँड, डेन्मार्क, नॉर्वे, स्वित्झर्लंड हे देश अत्यंत आनंदी आहेत. यंदा फिनलँडने पाचव्या क्रमांकावरून प्रथम क्रमांकावर झेप घेतली आहे.

 

या अहवालात आनंदी जीवनाचे निरोगी जीवनमान, स्वातंत्र्य, सामाजिक सहकार्य, समाजाचा सरकारवर विश्वास, भ्रष्टाचार नियंत्रण, दरडोई उत्पन्न आणि विषमता या निकषांचा फूटपट्टी म्हणून समावेश करण्यात आला आहे. भारतासारख्या खंडप्राय देशात नमुना सर्वेक्षणावरुन अंदाज बांधणे म्हणजे शितावरून भाताची परीक्षा करण्यासारखे आहे, हे जरी मान्य केले तरीही भारतीय आनंदी नसण्यामागे लावण्यात आलेल्या फूटपट्टीतील निकष आपणच ओढवून घेतले आहेत, हे वास्तव नाकारता येण्याजोगे नसावे. तसेच, ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे; चित्ती असू द्यावे समाधान,’ या तत्त्वानुसार जीवनमान व्यतीत करण्याची शिकवण मिळालेले आपण सध्या आपल्या जीवनाकडून जास्त अपेक्षा ठेवत आहोत. स्पर्धात्मक युगात वावरताना भौतिक विकासासाठी जीवनाची कसोटी दैनिक स्वरूपात आपण पाहात आहोत. शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी अंतर्मनाचा वेध घेण्याचे भान मागे पडल्याचे दिसून येते. त्यामुळे जीवनातील अनेक आनंदाचे छोटे क्षण आपण गमावून बसलो आहोत आणि यासाठी महत्त्वाचे कारण म्हणजे, ‘माझ्यावर अन्याय होतो,’ हे पालुपद वापरणे हे आपल्या मानसिकतेचे असणारे व्यवच्छेदक लक्षण, आपल्याला प्राप्त होणाऱ्या आनंदापासून आपल्यालाच दूर सारते. अगदी आनंद नाव असणारे कितीतरी लोकदेखील या वृत्तीमुळे आनंदी नसल्याचे दिसून येते.

 

मुळात लोकसंख्येचा भस्मासूर असलेल्या या देशात संसाधनांचा अधिक वाटा मला मिळावा तोही किमान कर्तव्य पराकाष्ठा करून असा आपला भाव असतो. त्यामुळेआनंद पोटात माझ्या माईना,’ असा भाव आपल्या मनात येणे दुरापास्तच नाही का! कधी जात, कधी धर्म, तर कधी भाषा तर कधी प्रदेश, आता आरक्षण अशा भिन्न आधारांवर एकत्र येत दबावगट बनवून आपले ईप्सित साध्य करण्याच्या प्रयत्नात आपण असतो. त्याचाच एक भाग म्हणजे सतत आपल्यावर अन्याय होतोय, हे इतरांना पटवून देण्यात आपण धन्यता मानतो. सर्वेक्षणात कदाचित भारताची हीच मानसिकता त्याचे स्थान एवढे खाली घसरण्यास बाधक ठरली असावी. याउलट युरोपीयन देश मी, माझं, आपलं या धारणेतून जीवनमान व्यतीत करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा जरी आपण घेत असलो तरी तो कुठेतरी आपली काजळी झाकण्याचा आपणच केलेला प्रयत्न असावा. कारण; जेव्हा हा सूर्य, हा जयद्रथ करण्याची वेळ येते तेव्हा अहवालातील वास्तव समोर येते. स्कँडेनेव्हियन देशांइतकेच नैसर्गिक सौंदर्य आपल्याकडेही आहे. मात्र त्यांनी ते जतन केले आहे आणि आपण त्याचे संवर्धन करण्याऐवजी ते ओरबाडण्यातच धन्यता मानत आहोत. हा मूलभूत मानसिकतेचा फरकच जगातील इतर देश भारत यांच्यात आनंददरी निर्माण करण्यास कारणीभूत ठरत असावा. ‘राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या,’ असे ज्या भारतात तुकडोजी महाराजांनी सांगितले आहे. जिथे आनंदमठ लिहिली गेली आहे, जिथे आनंदवन साकारले गेले आहे आणि जिथे इतिहासात सोन्याचा धूर निघत होता, तो आपला भारत आनंदाला पारखा नसावा, इतकीच अभिलाषा.

 
@@AUTHORINFO_V1@@