पंजाबी मुलीही नशानादात...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2018   
Total Views |



कुणे एकेकाळी पंजाबचा उल्लेख आला की, ‘हरितक्रांती’, ‘सरसों के खेत’, ‘आर्थिक कृषी सुबत्ता’ वगैरे चित्र डोळ्यासमोर उभे राहायचे. पण, आता पंजाब म्हटले की नशेच्या धुंदीत आकंठ बुडालेली तरुणाईच समोर येते. त्यातच नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, पंजाबमधील नशेला बळी पडणाऱ्या महिलांचे प्रमाणही वाढले आहे. तसं पाहायला गेलं तर व्यसनाधीनतेला स्त्री-पुरुष कुणीही अगदी सहज बळी पडू शकतात. बिनधास्तपणे सिगारेट ओढणाऱ्या, ड्रिंक्स घेणाऱ्या मुली-महिलाही आता सर्रास निदर्शनास येतात पण, आता त्यात ड्रग्जचीही भर पडलेली दिसते. पंजाबमध्ये ड्रग्जमुळे व्यसनाधीनतेचे आकडे पाहिले की, डोळे अगदी च्रकावून जातात. तब्बल 4.1 दशलक्ष पंजाबी तरुण-तरुणींचे आयुष्य नशेच्या दुनियेत हरवून गेले आहे. त्यापैकी 0.1 दशलक्ष इतकी महिला ड्रग्ज अ‍ॅडिक्टची संख्या असून गेल्या 10-15 वर्षांत महिलांचा नशेकडे वाढलेला कल चिंताजनक आहे. ओपिऑईड्स या ड्रग्जच्या जाळ्यात अडकलेल्या महिलांची संख्या तब्बल 10 हजारांच्या घरात आहे, तर दोन लाख पंजाबी पुरुष या ड्रग्जच्या आहारी गेलेले दिसतात. पंजाबमध्ये केवळ सरकारी पातळीवर 31 व्यसनमुक्ती केंद्रे चालवली जातात, त्यापैकी केवळ कपूरताळा येथील व्यसनमुक्ती केंद्र हे फक्त महिलांसाठी खासकरून चालवले जाते पण, व्यसनमुक्तीसाठी तेथे दाखल होणाऱ्या महिलांचे प्रमाणही फारसे नाही. कारण, तसे अगदी स्पष्ट आहे. व्यसनमुक्ती केंद्रात आलो तर आपली, आपल्या कुटुंबीयांची नाचक्की होईल, या भीतीनेच व्यसनाधीन महिला अशा केंद्राच्या पायऱ्यादेखील चढायला कचरतात. गरज पडली तर त्या दिल्लीमधील खाजगी व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये प्रवेश घेतात आणि अशा खाजगी केंद्रातील उपचारार्थींची संख्याही निश्चितच जास्त असू शकते. तेव्हा, ड्रग्ज आणि नार्कोटिक्स विभाग त्यांच्या पातळीवर या असल्या ड्रग्जमाफियांची नशा उतरवत आहेच, पण पंजाब असेल अथवा देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात आपला मुलगा असेल अथवा मुली, नेमके काय करतात, कुणासोबत फिरतात, पैसे कुठे खर्च करतात, याकडेही पालकांनी कटाक्षाने लक्ष द्यायलाच हवे. कारण, एकदा हा नशेचा कीडा मन-बुद्धी पोखरून गेला की, केवळ शारीरिक-मानसिक आरोग्यच नाही, तर अवघे आयुष्यच उद्ध्वस्त होऊन जाते.

 

शहरं राहण्यायोग्य ठेवूया...

 

‘पुणे तिथे काय उणे’ असे काहीसे गमतीने पुण्याची टांग खेचत आपण नेहमीच म्हणत असतो पण, आता महाराष्ट्राच्या या शैक्षणिक-सांस्कृतिक राजधानीने भारतातील सर्वाधिक राहण्यायोग्य शहरांच्या यादीत बाजी मारली आहे. केंद्र सरकारच्या शहर विकास मंत्रालयाने या संबंधीची आकडेवारी जारी केली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने कौतुकास्पद बाब म्हणजे, पहिल्या दहा शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील चार शहरांचा यामध्ये समावेश आहे. पुणे प्रथम क्रमांकावर, त्यानंतर नवी मुंबई आणि तिसऱ्या क्रमांकावर बृहन्मुंबई, तर सहाव्या क्रमांकावर आहे ठाणे शहर. महाराष्ट्रातील या प्रमुख शहरांनंतर क्रमांक लागतो तो तिरुपती, चंदीगढ, ठाणे, रायपूर, इंदूर, विजयवाडा आणि भोपाळचा. विशेष म्हणजे, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये महाराष्ट्रानंतर मोठी शहरे असूनही त्यांची गणना या यादीमध्ये नाही. त्याचबरोबर भारतातले सर्वात कमी राहण्यायोग्य शहर म्हणून उत्तर प्रदेशातील रामपूरचे नाव यादीमध्ये शेवटच्या स्थानी आहे. केंद्र सरकारने केलेले हे सर्वेक्षण चार प्रमुख पायांवर आधारभूत आहे. संस्थात्मक, सामाजिक, आर्थिक आणि भौतिक. या चारही आघाडींवर पुण्याने सर्वाधिक गुणांची कमाई करत या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. हे सर्वेक्षण करताना एकूण 78 निदर्शकांचा वापर करण्यात आला आणि त्यांना एकूण 100 गुणांमध्ये विभागण्यात आले. संस्थात्मक आणि सामाजिक निकषांना प्रत्येकी 50 गुण, भौतिकतेला 45 तर आर्थिक निकषांना 5 गुण निश्चित करण्यात आले होते आणि या सर्वांमध्ये पुणे शहर इतर शहरांपेक्षा सरस ठरले. पुणे शहर आज देशातील सर्वाधिक राहण्यायोग्य शहर ठरले असले तरी वाहनांची वाढती संख्या, प्रदूषणाच्या पातळीत झालेली वाढ, ट्रॅफिकचे अडथळे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे उडालेले तीन-तेरा, कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न यांसारख्या शहरीकरणामुळे उद्भवलेल्या गंभीर समस्यांकडे कानाडोळा करून अजिबात चालणार नाही. विद्यानगरी म्हणून विकसित झालेले, ‘आयटी हब’ म्हणून विस्तारलेले पुणे आज देशभरातील तरुणांना आकर्षित करते पण, मुंबईसारखा हळूहळू पुण्यावरील ताणही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे आज राहण्यायोग्य वाटणारी ही शहरे आगामी काळात राहण्यायोग्य ठेवणे, हीच आपली नागरिकांची सर्वस्वी जबाबदारी आहे.

@@AUTHORINFO_V1@@