ते पंधरा दिवस : १३ ऑगस्ट, १९४७

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2018   
Total Views |
 
 
मुंबई. जुहू विमानतळ.

टाटा एयर सर्व्हीसेज च्या काउंटर जवळ आठ / दहा महिलांचा घोळका. सर्व अनुशासित, आणि चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास असलेल्या. राष्ट्र सेविका समिती च्या सेविका. त्यांच्या प्रमुख संचालिका, लक्ष्मीबाई केळकर, अर्थात मावशी, ह्या कराचीला निघालेल्या आहेत. कराचीच्या ह्या धामधुमीच्या आणि अराजकतेच्या काळात, हैदराबाद (सिंध) च्या सेविकेने त्यांना पत्र पाठवलं. जेठी देवानी हे त्या सेविकेचं नाव. देवानी परिवार हा सिंध मधला तसा साधारण परिवार. संघाशी जोडला गेलेला.
 
जेठी देवानींचं पत्र आल्यावर मावशींना राहवलंच नाही. सिंध मधल्या सेविकांच्या मदतीसाठी जाण्याचा त्यांनी निश्चय केला. राष्ट्र सेविका समितीची सुरुवात होऊन जेमतेम अकरा वर्ष झालेली. पण समितीचं काम झपाटयानं वाढत होतं. अगदी सिंध, पंजाब, बंगाल सारख्या सीमेवरच्या प्रांतातही पोहोचलं होतं.
 
उद्या कराचीत, कायदे-आझम जीना हे पाकिस्तान च्या राष्ट्र प्रमुखाची शपथ घेणार आहेत. उद्या तेथे सर्वत्र स्वातंत्र्य दिनाचे सोहळे सुरु असतील. पण तरीही जाणं तर आवश्यक आहे. म्हणून मावशी, त्यांच्या सहकारी वेणूताई कळमकर यांच्या बरोबर कराचीला निघाल्या आहेत.
 
 

 
 
 राष्ट्र सेविका समिती च्या संस्थापिका, श्रीमती लक्ष्मीबाई केळकर म्हणजेच - 'मावशी'.

 

“चाळीस / पन्नास लोकांच्या त्या लहानश्या विमानांत, सकच्छ (नऊ वारी) साडी नेसलेल्या लक्ष्मीबाई केळकर आणि वेणूताई कळमकर, ह्या दोनच महिला आहेत. हिंदूही फरसे दिसत नाहीत. कॉंग्रेस मधे समाजवादी विचारधारा जिवंत ठेवणारे जयप्रकाश नारायण हे या विमानात आहेत. पुण्याचे देव नावाचे एक गृहस्थही आहेत, ज्यांना मावशींनी ओळखलं.

मात्र हे दोघेही अहमदाबाद ला उतरले. चढणारे सुध्दा अधिकांश मुसलमानच होते. आणि अश्या ह्या प्रवाशांमध्ये फक्त दोन महिला..!

विमानात काही उत्साही प्रवासी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ च्या घोषणा देत आहेत. एक / दोघांनी ‘लड के लिया हैं पाकिस्तान, हंस के लेंगे हिन्दुस्थान..’ अश्या घोषणाही दिल्या... मात्र मावशींचा आत्मविश्वास कायम होता. निर्णय पक्का होता. चेहऱ्यावर करारीपणा आलेला होता. आणि हे सर्व बघून, हळू, हळू त्या पाकिस्तान च्या घोषणा विरत गेल्या...!.”.

____ ____ ____ ____
 
मुलतान – लाहौर रेल्वे खंड. नॉर्थ – वेस्टर्न स्टेट रेल्वे.
 
लाहौर च्या आधीचं रियाझाबाद स्टेशन. सकाळचे अकरा वाजताहेत. पाऊस नाही. आकाश निरभ्र. स्टेशन वर शे-सव्वाशे मुस्लिम, हातात तलवारी आणि चाकू घेऊन उभे आहेत.
 
 
 
 
 
 
 
अमृतसर आणि पुढे अंबाला केंट ला जाणारी ट्रेन हळू हळू स्टेशनात शिरतेय. स्टेशन वर या मुस्लिम गुंडांशिवाय इतर कोणीही नाही. स्टेशन मास्तर, त्याची खोली बंद करुन, आत लपून बसलाय. त्याचा असिस्टंट, रेल्वेच्या सिस्टम वर मोर्स कोड वापरून, मुख्यालयाला ही बातमी देण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याचे हात थरथरताहेत. त्यामुळे कड्ड कट्ट करून ‘डिड – डेश’ च्या भाषेत दिला जाणारा टेलीग्राफिक संदेश चुकतोय.
 
गाडी प्लेटफॉर्म वर येई पर्यंत शांतता आहे. भयाण शांतता. गाडी हळू हळू आत येते. एक जोरदार शिट्टी वाजते. आणि क्षणार्धात ‘दीन-दीन’, ‘अल्ला-हु-अकबर’ च्या गगनभेदी आरोळ्या फुटतात. ‘मारो-काटो सालों को..’ असे आवाज घुमतात....
 
आणि गाडीतून शरणार्थी म्हणून आलेल्या, मुलतान आणि पश्चिम पंजाब मधल्या गावांमधून आपलं सर्वस्व गमावून बसलेल्या, हिंदू आणि शिखांना डब्या बाहेर काढलं जातं. धारदार तलवारींनी तिथल्या तिथे त्यांचं मुंडकं उडवलं जातं. आपल्या ऑफिसातल्या खिडकीच्या फटीतून, भेदरलेला स्टेशन मास्तर हे सारं बघतोय. न कळत तो मोजू लागतो. २१ शीख आणि हिंदूंना तर पहिल्या झटक्यात मारलेलं आहे. आक्रोश करत असलेल्या त्यांच्या बायका, मुलींना हे गुंड, खांद्यावर टाकून विजयाच्या अविर्भावात पळवून नेताहेत. अजून किती हिंदू – शिखांना मारलं असेल, कोणास ठाऊक. तो स्टेशन मास्तर, ताबडतोप त्याच्या असिस्टंट ला ही माहिती टेलिग्राफ ने द्यायला सांगतो....
 
पंजाबात सेन्सरशिप मधे अश्या कितीतरी बातम्या दबून गेल्या असतील..!
____ ____ ____ ____
 
कराची
 
उद्या पाकिस्तान स्वतंत्र होण्याआधी, भारत, पाकिस्तान आणि ब्रिटीश अधिकाऱ्यांची एक गंभीर बैठक चालली आहे.
भारत आणि पाकिस्तानातील प्रशासनामध्ये सत्तेची सुरळीत वाटणी व्हावी, ह्या साठी ही बैठक आहे. व्यापार, दळणवळण, संचार, रेल्वे, कस्टम्स इत्यादी मुद्यांवर या बैठकीत चर्चा होतेय. चर्चेअंती असं निश्चित होतंय की सध्या संयुक्त भारताचं (अखंड भारताचं) जे धोरण आहे, तेच धोरण मार्च, १९४८ पर्यंत दोन्ही देशांचं राहील. मार्च नंतर दोन्हीही देश, आपापली धोरणं राबवू शकतील.
पोस्ट आणि टेलिग्राफ चं नेटवर्क मार्च पर्यंत एकच राहील. दोन्हीही देशांचे नागरिक, एक – दुसऱ्या देशात काहीही अडचण ने येता येऊ – जाऊ शकतील.
____ ____ ____ ____
 
 

 
 
भारताचे प्रथम न्यायाधीश - 'सर हरीलाल कनिया'.

 
 
 
दिल्ली.
 
ब्रिटीश अधिकारी आता सोडून जाणार. म्हणजेच त्यांच्या जागी भारतीय अधिकाऱ्यांची नियुक्ती, हे नेहरू सरकार पुढचं मोठं आव्हान आहे.
 
अखंड भारताचे मुख्य न्यायाधीश, सर विल्यम पेट्रिक स्पेंज, हे उद्या निवृत्त होणार. आपलं पद सोडणार. त्या जागी, उपयुक्त अशी व्यक्ती कोण असू शकेल..? काही नावं समोर आहेत. पण शिक्कामोर्तब झालं ते सर हरीलाल जयकिशनदास कनिया, या सुरत च्या व्यक्तीवर.
 
सर कनिया हे सुरत च्या मध्यमवर्गीय परिवारातून आलेले वकील आहेत. १९३० पासून ते मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत. ५७ वर्षांचे सर कनिया, सध्या सर्वोच्च न्यायालयात सहयोगी न्यायाधीश आहेत.
 
सध्याचे मुख्य न्यायाधीश, सर विल्यम पेट्रिक स्पेंज यांना ‘भारत – पाक आर्बिट्रेशन ट्रिब्युनल’ चे चेअरमन करण्यात आलेलं आहे.
____ ____ ____ ____
 
पॅरिस.
 
आझाद हिंद सेने कडून लढलेले अनेक भारतीय सध्या जर्मनीच्या ब्रिटीश आणि फ्रेंच भागात स्थानबध्द आहेत. मात्र आता हे सर्व सैनिक आणि अधिकारी, भारतीय पासपोर्ट साठी आवेदन करू शकतील आणि मोकळेपणाने फिरू ही शकतील. पॅरिस मधील ‘इंडियन मिलिटरी मिशन’ ने आज ही घोषणा केली.
 
या कैद्यांमध्ये डॉ. हरबंस लाल हे ही शामिल आहेत. ते नेताजींच्या आझाद हिंद सेनेत लेफ्टनंट होते. लवकरच, इतर कैद्यांबरोबर डॉ. लाल देखील भारतात परततील.
____ ____ ____ ____
 
१५१, बेलियाघाट, कलकत्ता.
हैदरी मंझील..!
दुपारचे तीन वाजताहेत.
 
सोडेपूर आश्रमातून गांधीजी एका जुनाट शेवरोलेट गाडीतून हैदरी मंझील येथे पोहोचले. सोबत मनू, महादेव भाई, आणि दोन कार्यकर्ते आहेत. मागच्या मोटरीतूनही असेच चार / पाच कार्यकर्ते आलेले आहेत.
 
नुकताच पाऊस पडून गेलेला आहे. सगळीकडे चिखल पसरलेला आहे. हैदरी मंझील च्या समोर बरेच लोकं उभे आहेत. त्यातले अधिकांश हिंदू आहेत.
 
गांधीजींची मोटर थांबताच, गांधीजींच्या नावाने प्रचंड घोषणा सुरु झालेल्या आहेत. मात्र ह्या घोषणा त्यांच्या स्वागताच्या नसून, त्यांना दिल्या जाणाऱ्या शिव्या – शापांच्या आहेत. गाडीतून उतरल्यावर, ह्या घोषणा ऐकताच, गांधीजींची चर्या काहीशी त्रस्त होते. पण ते चेहरा निर्विकार ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न करतात.
 
घोषणा चालून आहेत – ‘गांधीजी, चले जाव..’, ‘नोआखाली में जाकर हिंदू की रक्षा करो’, ‘पहले हिंदुओंको जीवदान – फिर मुसलमान को स्थान’, ‘हिंदू के गद्दार गांधी, चले जाओ...’ आता घोषणांबरोबर, दगडं आणि बाटल्यांचाही वर्षाव होतोय. गांधीजी थबकतात. शांतपणे मागे वळतात. जमावा कडे पहातात. हातातली शाल नीट करत जमावाला शांत राहण्याची सूचना करतात.
आणि तो उसळलेला जमावही शांत होतो.
 
गांधीजी शांतपणे बोलू लागतात, “मी येथे आलो आहे, हिंदू आणि मुसलमानांची सारखीच सेवा करण्यासाठी. मी तुमच्या संरक्षणाखाली येथे राहणार आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही सरळ माझ्यावर चालून येऊ शकता. तुमच्या बरोबर या बालियाघाट रस्त्यावर राहून मी नोआखाली च्या हिंदूंचे प्राण वाचवतो आहे. मुसलमान नेत्यांनी तशी शपथ घेतलीय, माझ्याजवळ. आता तुम्हा हिंदूंना माझी विनंती, तुम्हीही कलकत्त्यातल्या मुसलमान बांधवांच्या केसालाही धक्का लावू नका..”
 
त्या आवाक झालेल्या जमावाला तसंच सोडून गांधीजी शांतपणे हैदरी मंझील मधे प्रवेश करते झाले..!
 
मात्र ही शांतता पुढील काही मिनिटेच टिकली. शहीद सुह्रावर्दीचे आगमन होताच, तो शांत झालेला जमाव परत खवळला. त्याच्या संतापाचा स्फोट झाला. पाच हजारांवर हिंदूंच्या हत्येचा खलनायक, सुह्रावर्दी समोरून जात असताना, हिंदू शांत कसा राहील..? जमावानं आता त्या इमारतीला वेढा घातला, आणि त्यातील काही तर त्या इमारतीवर दगडं फेकू लागले.
 
अखंड हिंदुस्थानच्या आदराला पात्र झालेल्या त्या महात्म्याची, अशी क्रूर हुर्यो उडण्याची, अशी अपमानास्पद निर्भत्सना होण्याची ही पहिलीच वेळ आहे...!
____ ____ ____ ____
 
सकाळी साडे दहा वाजता मुंबईच्या जुहू विमानतळावरून निघालेलं मावशींचं विमान, अहमदाबाद चा टप्पा घेत, जवळपास साडे चार तासांच्या प्रवासानंतर कराची च्या द्रीघ रोड एयरोड्रम वर दुपारी तीन वाजता पोहोचलं.
 
विमानतळावर मावशींचे जावई, चोळकर हे स्वतः आलेले होते. मावशींची कन्या, वत्सला चे हे यजमान. तिला शिक्षणाची आवड होती, म्हणून मावशींनी घरी शिक्षक बोलावून तिला शिकवलं. वत्सलेने ही समिती च्या कामात खूप मदत केली. कराचीला शाखा वाढविण्यात तिचं मोठं सहकार्य होतं.
 
विमानतळावर समितीच्या पंधरा – वीस सेविकाही त्यांना घ्यायला आल्या आहेत. संघाचे काही स्वयंसेवक ही, सुरक्षेच्या दृष्टी ने उपस्थित आहेत.
 
एका सेविकेच्या गाडीत बसून, मावशींच्या बरोबर चा हा काफिला निघाला...!
____ ____ ____ ____
 
ज्या वेळेस राष्ट्र सेविका समिती च्या लक्ष्मीबाई केळकर यांचं विमान कराचीच्या द्रीघ रोड विमानतळावर उतरत होतं, जवळपास त्याच सुमारास, अखंड भारताचे गव्हर्नर जनरल, लॉर्ड माउंटबेटन यांचं खास डाकोटा विमान, कराची च्या मौरीपूर येथे असलेल्या रॉयल एयर फोर्स च्या विमानतळावर उतरलं होतं.
 
विमानातून लॉर्ड माउंटबेटन आणि लेडी एडविना माउंटबेटन बाहेर आले, तेंव्हा त्यांच्या स्वागताला नवीन होऊ घातलेल्या पाकिस्तान चे सर्वोच्च अधिकारीच होते. जीना नव्हते. माउंटबेटन दांपत्याला सांगण्यात आलं की कायदे - आझम जीना आणि त्यांची बहिण फातिमा, हे त्यांच्या सरकारी निवासस्थानी त्यांची वाट पहात आहेत.
 
जीनांचं कराचीतलं सरकारी निवासस्थान म्हणजे सिंध च्या गव्हर्नरांचा बंगला. व्हिक्टोरियन शैलीत बांधलेल्या ह्या भल्या मोठ्या बंगल्यातला प्रचंड दिवाणखाना आज झकपक सजवलेला आहे. जणु एखाद्या हॉलीवूड चित्रपटाचा सेटच मांडलेला आहे.
आणि अश्या ह्या सजवलेल्या हॉल मधे, कायदे - आझम आणि फातिमा यांनी, माउंटबेटन दांपत्याचं ‘शाही’ स्वागत केलं..!
____ ____ ____ ____
 

 
 
लाहौर चे दंगे..! 
 
लाहौर.

दुपारी चार वाजता.
 
टेंपल रोड वर राहणारा मुजाहिद ताज दीन. नान आणि कुलचे विकण्याचा व्यवसाय करणारा, तसा साधाच आणि फटका इसम. मात्र आज सकाळपासून त्याच्या डोक्यात काय शिरलंय, कोणास ठाऊक. त्याचे जवळपास सर्वच दोस्त हे मुस्लिम नेशनल गार्ड चे खंदे कार्यकर्ते. त्या सर्वांनी, आणि मुख्य म्हणजे पोलीस ठाण्याच्या हवालदाराने सुध्दा आज सकाळी त्याला सांगितले की “टेंपल रोड वरचा शिखांचा जो मोठा गुरुद्वारा आहे, त्यावर आक्रमण कर. त्याला उध्वस्त कर. हे आपल्या धर्माचं काम आहे..”
 
नान आणि कुलच्या शिवाय काहीही माहित नसणाऱ्या ताज दीन च्या डोक्यात काही तरी संचारलं. दुपारीच त्याने आपला धंदा बंद केला आणि गुरुद्वारावर आक्रमण करण्यासाठी तो मित्रांबरोबर उभा राहिला.
 
लाहौर च्या टेंपल रोड वरचा, मोझांग चा गुरुद्वारा ‘छेवीन पातशाही’ हा शिखांसाठी अतिशय पवित्र. खुद्द महाराजा रणजीत सिंह यांनी बांधलेला. सन १६१९ मधे गुरु हरगोविंद सिंह जी, दिवान चंदू बरोबर लाहौर ला आलेले. त्यावेळेस त्यांचे वास्तव्य जिथे होते, तिथे हा गुरुद्वारा बांधला.
 
या गुरुद्वारात रोजची अरदास, लंगर वगैरे व्यवस्थित चालू आहे. गुरुद्वाराच्या रक्षणासाठी निहंग संत, खड्या तलवारीनिशी सज्ज आहेत. मात्र त्यांची संख्या आहे, फक्त चार. अधिकांश शीख व्यवसाय करतात. आणि ही वेळ तर व्यवसायासाठी महत्वाची. रात्री सर्व शीख येथे जमतील. सध्या मात्र अगदीच तुरळक लोकं आत आहेत.
 
बरोबर चार वाजता, मुस्लिम नेशनल गार्ड नी ह्या गुरुद्वारा वर हल्ला चढविला. ताज दीन सर्वात पुढे होता. पेट्रोल बॉम्ब त्यानेच फेकला. पन्नास / साठ मुस्लिम गुंड, नंग्या तलवारी घेऊन धावत आलेले. त्यांच्या समोर ते चार निहंग संत किती लढणार..? पण तरीही त्यांनी असामान्य शौर्य दाखविलं. तीन / चार गुंडांना कापून काढलं. आणखी सात / आठ जणांना जखमी केलं. पण शेवटी हे चौघेही रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडले.
 
महाराजा रणजीत सिहांनी बांधलेला हा ‘छेवीन पातशहा’ गुरुद्वारा, निर्दोष शिखांच्या रक्ताने नाहून निघाला..!
____ ____ ____ ____
 
पेशावर.
 
नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स ची राजधानी. या पेशावर मधे, आपल्या गढीवजा घरात, सत्तावन वर्षांचे ‘खान अब्दुल गफ्फार खान’, विनमस्क बसले आहेत. विषण्ण असे. एकटेच..!
 
खान अब्दुल गफ्फार खान. भारदस्त नाव. तसंच भारदस्त व्यक्तिमत्व. साऱ्या नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स चं सर्वमान्य नेतृत्व. गांधीजींचे परम अनुयायी. म्हणूनच ‘सरहद गांधी’ ही उपाधी. मात्र त्यांच्या पठाणांमध्ये ते प्रसिध्द आहेत ते ‘बादशाहा खान’ म्हणून. त्या डोंगराळ भागातल्या सर्व अशिक्षित आदिवासींना त्यांनी कॉंग्रेस च्या दावणीला आणून बांधलं होतं.
 
म्हणूनच १९४५ च्या प्रांतिक निवडणुकांत, मुस्लिम बहुन प्रांत असुनही, सत्ता आली ती कॉंग्रेस कडे. मुस्लिम लीग ला फारश्या जागा मिळाल्या नाहीत. पुढे, विभाजन होणार हे स्पष्ट झाल्यावर, ह्या पठाणांसमोर प्रश्न उभा राहिला, की कोठे जावे..? त्याचं आणि पाकिस्तान वादी पंजाब्यांचं उभं वैर आहे. त्यामुळे ह्या प्रांतातल्या लोकांना भारतात विलीन व्हायचं होतं. प्रांतिक असेंब्ली मधे बहुमत ही याच बाजूने होतं. भौगोलिक सलगता हा प्रश्न होता. पण मग पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानात तर काही हजार मैलांचं अंतर होतं. शिवाय, जर काश्मीर ची रियासत भारताबरोबर आली, तर हा प्रश्न पण सुटत होता. गिलगीट च्या दक्षिणेकडेचा भाग हा या नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रांताला लागून होता.
 
पण नेहरू अडले. त्यांचं म्हणणं, ‘तिथे आपण सार्वमत घेऊया’. कॉंग्रेस कार्यकारिणीत हा मुद्दा उपस्थित झाला. सरदार पटेलांनी याला कडाडून विरोध केला. त्याचं म्हणणं, ‘प्रांतिक विधानसभा, ह्या कुठे शामिल व्हायचं ही ठरवतील. देशातल्या इतर भागात आपण हेच केलंय. आणि म्हणूनच, जिथे जिथे मुस्लिम लीग चं बहुमत आहे, ते सर्व भाग पाकिस्तानात जात आहेत. त्या न्यायाने हा भाग भारतात आला पाहिजे.’ पण नेहरू अडूनच बसले. ते म्हणाले, “मी लोकशाहीवादी आहे. त्यामुळे तिथल्या लोकांना जे वाटेल, तसा निर्णय त्यांना घेऊ द्या..”
 
आपल्या प्रांतात सार्वमत घेण्याचं ठरलं, हे सुध्दा बादशहा खानांना वर्तमान पत्रातूनच समजलं. ज्या माणसाने हा अवघा कठीण प्रदेश, कॉंग्रेस चा बनवून सोडला होता, त्याच्याशी ह्या महत्वपूर्ण प्रश्नावर चर्चा करण्याचीही गरज नेहरूंना वाटली नाही..! त्यामुळे ही बातमी ऐकूनच खान साहेब म्हणाले, “कॉंग्रेस ने हा प्रांत, मुस्लिम लीग ला थाळीत सजवून दिलाय..!”
 
२० जुलै, १९४७ ला सार्वमत घेण्याची प्रक्रिया सुरु झाली, जी पुढे दहा दिवस चालली. सार्वमत घेण्याच्या पूर्वी आणि सार्वमताची प्रक्रिया चालू असताना, मुस्लिम लीग ने प्रचंड प्रमाणावर धार्मिक भावनांवर प्रचार केला. हे सर्व बघून कॉंग्रेस ने या सार्वमतावरच बहिष्कार टाकला. खुदा-ई-खिदमतगार, अर्थात बादशहा खान हे, ‘नेहरूंच्या चुकीच्या आग्रहामुळे आपल्याला काय, काय भोगावं लागणार आहे’, याचीच चिंता करत होते. आणि हे झालेलं मतदान म्हणजे निव्वळ फार्स होता. सहा आदिवासी जमातींना, ज्यांच्यावर खान अब्दुल गफ्फार खान साहेबांचा चांगलाच पगडा होता, मतदानात भाग घेण्यापासून रोखलं. पस्तीस लाख लोकांपैकी मतदान करण्यास पात्र ठरले फक्त पाच लाख बहात्तर हजार आठशे. सवत, दीर, अंब आणि चित्राल ह्या तालुकांमध्ये मतदान झालेच नाही.
 
पात्र मतदारांपैकी एकूण मतदान फक्त ५१% झाले. पाकिस्तान च्या समर्थकांसाठी हिरवे डब्बे होते, तर भारतात विलीनीकरणा साठी लाल डब्बे. पाकिस्तान च्या डब्यांत २,८९,२४४ मतं पडली, तर बहिष्कार करूनही भारताच्या डब्यांत २,८७४ मतं पडली. थोडक्यात, पस्तीस लाखांपैकी फक्त तीन लाखांच्या आसपास ची मतं पाकिस्तान च्या बाजूनं पडली.
 
आणि याचाच राग बादशाहा खानांच्या डोक्यात घुमत होता. ‘नेहरूंनी, आणि अगदी गांधींनीही, आपल्याला उघड्यावर टाकून दिलं, आणि ते ही ह्या पाकिस्तानी लांडग्यांसमोर....’ अशी विचित्र भावना त्यांच्या मनात पसरली होती.
 
आणि म्हणूनच, पेशावर, कोहट, बानू, स्वात मधून त्यांचे कार्यकर्ते, ‘भारतात स्थलांतर करायचं’ म्हणत होते, तेंव्हा त्यांना काय उत्तर द्यावं, हेच खान साहेबांना कळत नव्हतं.
____ ____ ____ ____
 
कराची. कायदे – आझम यांचं सरकारी निवासस्थान.

रात्रीचे ९ वाजताहेत.
 
लॉर्ड माउंटबेटन यांच्या स्वागतासाठी, पाकिस्तान च्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला, जीनांनी ‘शाही खाना’ चं आयोजन केलं आहे. काही देशांचे राजदूत आणि राजनयिक तिथे जातीनं हजर आहेत. दारू पाण्यासारखी वाटली जातेय.
 
मात्र या सर्वांचे यजमान, खुद्द कायदे – आझम जीना, हे या सर्वांपासून दूर – दूर राहताहेत. काहीसे अलिप्तसे.
 
औपचारिक भोज सुरु होण्यापूर्वी, यजमानांच्या संक्षिप्त भाषणाची वेळ झाली. जीनांनी आपल्या एका डोळ्यावरचा चष्मा नीट केला, आणि ते वाचू लागले,
 
“युवर एक्सलेंसी, युवर हायनेस. हिज मेजेस्टी सम्राटांच्या दीर्घ आणि स्वस्थ आयुष्यासाठी आपणासमोर पेय प्रस्तुत करताना मला फार आनंद होतोय. युवर एक्सलेंसी, लॉर्ड माउंटबेटन, तीन जून च्या योजनेत निहित सैध्दांतिक आणि नीतिगत बाबींना, तुम्ही ज्या संपूर्णपणे आणि कुशलतेने लागू केलेत, त्याची आम्ही तारीफ करतो. पाकिस्तान आणि हिंदुस्थान तुम्हाला कधीच विसरणार नाहीत...”
इस्लाम साठी, इस्लामिक सिध्दांतांसाठी, जे राष्ट्र उभं राहतंय, त्या राष्ट्राची निर्मिती ही दारूच्या नद्या वाहून साजरी होतेय...!
____ ____ ____ ___
 
 
ऑल इंडिया रेडियो, लाहौर केंद्र.
रात्रीचे ११ वाजून ५० मिनिटे होताहेत.
रेडियो वर उद्घोषणा होते –

“ये ऑल इंडिया रेडियो, लाहौर हैं. आप चंद मिनिट तक हमारे अगले ऐलान का इंतजार कीजिये...”
पुढील दहा मिनिटे वाद्यवृंद...

बरोबर १२ वाजून १ मिनिटांनी –
“अस्सलाम आलेकुम. पाकिस्तान ब्रॉडकॉस्टिंग सर्व्हिस. हम लाहौर से बोल रहे हैं. कुबुले सुबहे आझादी...!”

आणि अधिकृतरित्या, पाकिस्तान चा जन्म झाला...! 
 
 
मागील लेख तुमच्या वाचनातून राहिला असेल तर त्याची लिंक खालीलप्रमाणे : १२ ऑगस्ट १९४७
 
 
 
 
- प्रशांत पोळ
@@AUTHORINFO_V1@@