मळमळ मणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2018
Total Views |


 

आपल्या मनातला दुखवटा छाती पिटून अवघ्या जगाला दाखवण्यासाठी काँग्रेसी घराणेशाहीने पाळलेली माणसे ठराविक अंतराने मोदीविरोधात गरळ ओकण्याचे काम इमानेइतबारे करत असतात. मणिशंकर अय्यर नामक नाठाळाने आताही तेच केले आणि गुजरात दंगलीवरून मोदींना लक्ष्य करत आपली लायकी चपला खाण्याचीच असल्यावर शिक्कामोर्तबही केले.
 

अश्वत्थाम्याच्या माथ्यावरची भळभळती जखम यदाकदाचित बरी होऊ शकते, पण काँग्रेसी घराणेशाहीने पाळलेल्या गुलामांची मोदीद्वेषाची जखम भरून निघणे अशक्यच! २०१४ ला राष्ट्रीय राजकारणात नरेंद्रसूर्याचा उदय होण्याआधी अगदी २००२ सालापासून देशातल्या तमाम भाजप संघविरोधकांचे एकमेव लक्ष्य मोदीच होते. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशातून काँग्रेसचा सुपडा साफ केल्यानंतर तर मोदीद्वेष्ट्यांचा जळफळाट वेळोवेळी तोंड फाटेस्तोवर बाहेर पडला. जवळपास ७० वर्षे सत्ता उपभोगल्यानंतरही देशाला स्वतःची जहागिरी समजणाऱ्या ना आजही नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्याचे दुःख वाटते. म्हणूनच आपल्या मनातला दुखवटा छाती पिटून अवघ्या जगाला दाखवण्यासाठी अशी माणसे ठराविक अंतराने मोदीविरोधात गरळ ओकण्याचे काम इमानेइतबारे करत असतात. मणिशंकर अय्यर नामक काँग्रेसी मानसिकतेत राहिलेला, वाढलेला नाठाळ त्यापैकीच एक. आताही मणिशंकर अय्यर यांनी मोदीविरोधातली मळमळ बाहेर काढत नरेंद्र मोदींसारखा एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री पंतप्रधान होईल, असा विचार कधी केला नसल्याचे विधान केले. गांधी घराण्याव्यतिरिक्त देशाचा कारभार हाकण्यासाठी कोणी लायक नसल्याची काँग्रेसी नेत्यांचीगुलाम मानसिकताती हीच.

 

मणिशंकर अय्यर यांच्या आताच्या मोदीविरोधी विधानाला संदर्भ होता तो २००२ सालच्या गुजरात दंगलीचा! काँग्रेसादी दाढी कुरवाळू पक्ष आणि पुरोगामी (की अधोगामी) विचारसरणीच्या मंडळींचा आवडता उद्योग म्हणजे २००२ सालच्या गुजरात दंगलीचे भांडवल करून नरेंद्र मोदींना कोंडीत पकडणे. खरे म्हणजे या कामात ही लोकं कधी यशस्वी होत नाहीतच, पण गाढवाला कितीही हाकलले तरी ते उकिरडा चिवडायचे काम थोडेच सोडते, तसलेच हे! दुसरीकडे गुजरात दंगलीवरून देशातल्या सर्वच न्यायालयांनी, चौकशी आयोगांनी नरेंद्र मोदींना निर्दोष जाहीर केलेले असतानाही अशा लोकांच्या मते मोदी गुन्हेगारच असतात. यामुळेच आताही मणिशंकर अय्यर यांनी गुजरात दंगलीच्या शिळ्या कढीला ऊत आणत आपला मोदीविरोधाचा कंडू शमवत त्यांच्या एका विधानावर आक्षेप घेतला. मणिशंकर अय्यर यांच्या विधानाचा समाचार घेण्याआधी आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की, या लोकांना गुजरात दंगल नेमकी का भडकली, गोध्रा स्थानकावर अयोध्येतून परतणाऱ्या कारसेवकांचा डबा कोणी आणि का पेटवला याच्याशी काहीही देणेघेणे नसते. कारण तिथे प्रश्न हिंदूंचा असतो आणि हिंदूंना वाऱ्या वर सोडणे, हे तर अशा लोकांचे कर्तव्यच असते.

 

२००२ सालच्या गुजरात दंगलीवरून काँग्रेससह सर्वच विरोधकांनी, पुरोगामी बोलभांडांनी आणि माध्यमांनीही काहूर माजवलेले असतानाच नरेंद्र मोदींना एकदा दंगलीबाबत प्रश्न विचारण्यात आला. दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबाबत आपल्याला काय वाटते? असा तो प्रश्न होता आणि मोदींनी अतिशय संवेदनशीलपणे या प्रश्न चे उत्तर दिले होते. रस्त्याने जात असताना एखादे कुत्र्याचे गोंडस पिल्लू गाडीखाली आले तरी आपल्याला दुःख होते, असा दाखला देत मोदींनी दंगलीत मृत्युमुखी पडलेली तर माणसेच होती, त्यामुळे मला दुःख झालेच, असे स्पष्ट केले होते. मात्र, मोदींनी दिलेला हा दाखला मुस्लीमविरोधी असल्याचा कल्ला करत देशभरातल्या मोदीविरोधकांनी सगळीकडेच गोंधळ घालायला सुरुवात केली होती आणि आता मणिशंकर अय्यरही तेच करत आहेत. इथे एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की, आपण एखादा विषय अधिक परिणामकारकतेने सांगण्यासाठी, पटवून देण्यासाठी उदाहरणांचा, वाक्प्रचारांचा, म्हणींचा, भाषेचा वापर नेहमीच करत असतो. ज्यामुळे ऐकणाऱ्या वर आपल्या म्हणण्याचा अधिक प्रभाव पडतो. आपण बोललेली गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या, समूहाच्या डोक्यात, हृदयात चटकन घर करते. मोदींनीदेखील अशाच प्रकारे एक उदाहरण देत नंतर दंगलीत बळी पडलेल्यांबाबतचे आपले म्हणणे सर्वांसमोर मांडले, पण मोदीविरोधाची राख कपाळी लावलेल्या भामट्यांना त्यातून मुस्लीम समाजाचा अपमान झाल्याचे वाटले. मग काय रस्त्यात, चौकात वा कुठेही पडलेल्या घाणीवर जसा कावळ्यांचा जत्था टोचा मारतो, तशाच प्रकारे देशभरातल्या सर्वच पुरोगामी तमासगिरांना मोदींना सापळ्यात अडकविण्यासाठी चांगलाच मुद्दा मिळाल्याचा आनंद झाला. याच आनंदाच्या भरात मोदींच्या विधानावर आक्षेप घेत या लोकांनी घिरट्या घालण्यास, टोचा मारण्यास सुरुवात केली पण मोदीविरोधात कितीही बडबड केली, मोदींना कितीही पाण्यात पाहिले तरी मोदींचे नाव झाकोळण्याऐवजी उजळतच गेले, हे त्यांच्या डोक्यात घुसलेच नाही. यावरूनच या लोकांचे धंदे किती बावळटपणाचे आणि फक्त मोदीद्वेषावर आधारित होते, हे पटते. जनतेनेदेखील मतदानाच्या माध्यमातून या लोकांना हेच दाखवून देत प्रत्येकवेळी त्यांचे थोबाडच फोडले, पण सुंभ जळाला तरी पीळ जात नसल्याने हे लोक त्याच त्याच गोष्टी उकरून काढत आपला बिनडोकपणा जगजाहीर करतच असतात. आता मणिशंकर अय्यर यांनीही तेच केले.

 

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे गुजरात दंगलीवरून मोदींविरोधात बेताल बडबड करणाऱ्या ची १९८४ सालच्या हजारो शीख बांधवांच्या कत्तली केलेल्या दंगलीवर मात्र नेहमीच दातखीळ बसते. आणखी एक म्हणजे, मणिशंकर अय्यर ही काही केवळ एखादी व्यक्ती नाही तर ती एक प्रवृत्ती आहे. ते ज्या विचारधारेचे प्रतिनिधीत्व करत होते, ज्या विचारांचे बाळकडू त्यांच्या नसानसात भिनलेले आहे, त्याच विचारांनी जन्माला घातलेली ही प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती नरेंद्र मोदी, भाजप, रा. स्व. संघाची विरोधक, द्वेष्टी जशी आहे तशीच ती हिंदू, हिंदुत्व आणि हिंदुत्वनिष्ठांसाठी आदर्श असलेल्या व्यक्तिमत्वांना, त्यांच्या कार्यकर्तृत्वाला, विचारांना पायदळी तुडवणारीही आहे. कारण ज्यांना क्रांतिकारकांचे मुकुटमणी म्हटले जाते, त्या स्वा. सावरकरांच्या अंदमानातल्या सेल्युलर जेलमधील काव्यपंक्ती उखडून फेकणारी प्रवृत्तीही काँग्रेसी-मणिशंकरीच होती आणि ही प्रवृत्ती मरणपंथाला लागली की, विझणाऱ्या वातीसारखी नेहमीच फडफडायला लागते. तशी ती आताही फडफडू लागली पण अशा प्रवृत्तींना वठणीवर आणणारी एक आठवण इथे नक्कीच सांगितली पाहिजे. ती म्हणजे ज्यावेळी मणिशंकर अय्यर यांनी स्वा. सावरकरांच्या काव्यपंक्ती अंदमानातील सेल्युलर जेलमधून काढल्या, त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला जोडे मारण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. यातून सावरकरांसारख्या देशभक्ताच्या काव्यपंक्ती उखडून टाकणाऱ्या महाभागाला बाळासाहेबांनी त्याची लायकी दाखवून दिली होती. आज मणिशंकर अय्यर यांनी मोदींविरोधात बेताल बडबड करत आपल्या त्याच चपला खाण्याच्या लायकीवर शिक्कामोर्तब केले, असेच म्हणावे लागेल.

 
 
@@AUTHORINFO_V1@@