जिद्दी मानसीची गोष्ट...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2018   
Total Views |


 

 

भीषण अपघातात पाय गमावल्यानंतर पुन्हा कोर्टवर उतरू का? रॅकेट घेऊन पूर्वीसारखे खेळू शकू का? असे नानाविध प्रश्न त्यांच्या मनी निर्माण झाले होते. मात्र, तरीही मानसी यांनी बिलकूल हार मानली नाही आणि मोठ्या जिद्दीने कोर्टवर परतल्या आपले जोरदार पुनरागमन सिद्ध करून दाखवले.
 

इच्छा असेल तर मार्ग सापडतो, मार्ग निघतो, मार्ग तयार करता येतो. फक्त अंतर्मनापासून तीव्र इच्छा असायला हवी. मात्र, काही माणसेमला जमत नाही, मला वेळ नसतो, माझ्याकडे पैसे नाहीत, माझे शिक्षण कमी आहे,‘ अशा अमुक-अमुक प्रकारची रडगाणी सांगत सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या मनात काही विशेष करून दाखविण्याची तयारी नसते किंवा त्यांचे ध्येय ठरलेलेच नसते. त्यामुळे त्यांच्या मनासारखे काही घडत नाही आणि त्यांना आयुष्यभर रडत बसावे लागते. याउलट प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द आणि ध्येय असलेल्या व्यक्ती अपयश, संकटे, शारीरिक व्यंग, बाह्य परिस्थिती यांच्यामुळे डगमगून जाता आपल्या ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असतात. म्हणूनच असे म्हटले जाते की, स्वत:ला सिद्ध करण्याची इच्छा असेल, तर जगात काहीच अशक्य नसते. मग समोर परिस्थिती कशीही असली तरी त्याचा बिलकूल विपरित परिणाम होत नसतो. अशाच ध्येयवादी आणि प्रबळ इच्छाशक्ती असणाऱ्या मध्ये मुंबईच्या मानसी जोशी यांचा समावेश होतो. मुंबईकर असलेल्या २९ वर्षीय मानसी या एक बॅडमिंटन खेळाडू असून त्या एका पायाने दिव्यांग आहेत. थायलंडमध्ये नुकत्याच खेळवण्यात आलेल्या पॅरा बॅडमिंटन स्पर्धेमध्ये त्यांनी कांस्यपदक पटकावून, ऑक्टोबर महिन्यात जकार्तामध्ये होत असलेल्या पॅरा आशियाई स्पर्धेत आपणच सुवर्णपदकाची दावेदार असल्याचे सिद्ध केले आहे. दुर्दैवी गोष्ट म्हणजे प्रसारमाध्यमांनी या हरहुन्नरी खेळाडूला अपेक्षित असे कव्हरेज दिले नाही. मानसी यांचा हा प्रवास खडतर आहे. डिसेंबर २०११ साली झालेल्या एका भीषण रस्ता अपघातामध्ये मानसी यांना आपला एक पाय गमवावा लागला होता. बॅडमिंटनपटू होण्याचे स्वप्न उराशी बाळगणार्या मानसी जोशी यांना हा प्रचंड मोठा धक्का होता. आता सारे काही संपले, आपल्या स्वप्नांचा चक्काचूर झाला, असे काही काळ त्यांना वाटले. मात्र, यानंतर त्यांचा आत्मविश्वास जराही कमी झाला नाही. आपण भारतासाठी खेळायचे, आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवायच्या, असे त्यांनी आपल्या मनी अधिकच दृढ केले. या भीषण अपघातात पाय गमावल्यानंतर आपण पुन्हा एकदा बॅडमिंटन कोर्टवर उतरू का? रॅकेट घेऊन पूर्वीसारखे खेळू शकू का? असे नानाविध प्रश्न त्यांच्या मनी निर्माण झाले होते. मात्र, तरीही मानसी यांनी बिलकूल हार मानली नाही. मार्गात आलेल्या संकटावर, अडथळ्यावर, समस्येवर, अडचणीवर मात करत मोठ्या जिद्दीने त्या बॅडमिंटन कोर्टवर परतल्या आणि आपले जोरदार पुनरागमन सिद्ध करून दाखवले.

 

२०१५ पासून निरनिराळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या मानसी जोशी यांनी आजपर्यंत विविध स्पर्धांमध्ये अनेक पदकांची कमाई केली आहे. विशेष बाब म्हणजे कृत्रिम पायाच्या साहाय्याने खेळताना त्यांनी ही कामगिरी बजावली. अपघातात पाय गमावल्यानंतर मानसी जोशी यांनी मुंबईत रिहॅबिलिटेशन क्लिनीकमधून कृत्रिम पाय बसवला. या कृत्रिम पायामध्ये सेंसर लावण्यात आले असून यामुळे त्यांना हालचाल करणे सोपे जाते. सध्या त्या आगामी स्पर्धेसाठी हैदराबाद येथील पी. गोपीचंद अकॅडमीमध्ये वरिष्ठ भारतीय बॅडमिंटनपटू पी. गोपीचंद यांच्या प्रशिक्षणाखाली बॅडमिंटनचे धडे गिरवत आहेत. कृत्रिम पाय आणि त्याच्या खर्चाचे ओझे असतानादेखील त्यांनी आपली मेहनत चालू ठेवली आहे. मानसी जोशी यांच्या बॅडमिंटन आणि देशाप्रति खेळण्याच्या मेहनतीमुळे, जिद्दीमुळे आणि त्यांच्या खेळामुळे पी. गोपीचंद चांगलेच प्रभावित झाले आहेत. होणारच ना, कारण मानसी जोशी देशातल्या सर्वांसाठीच प्रेरणास्थान बनल्या असून येणारा काळ नक्कीच त्यांचा असणार असल्याचा दावा गोपीचंद यांनी केला आहे. मुंबईकर असलेल्या मानसी जोशी यांनी मात्र आपल्या कृत्रिम पाय, बॅडमिंटनबाबत सांगितले की, "मी माझा पाय गमावला असला तरी कृत्रिम पायाच्या जोरावर मी हे सर्व करू शकले. मात्र, मी सध्या जो पाय वापरते आहे तो खूप महाग आहे. सरकारने कृत्रिम अवयवांवर टक्के जीएसटी लावला आहे. यामुळे याच्या खर्चात आणखीच वाढ होत आहे. मला हा पाय दर पाच वर्षांनी बदलावा लागत असून त्याची किंमत २० लाख रुपयांच्या घरात जाते. त्यामुळे मला आशा आहे की, सरकार मला यात काही सूट देईल आणि खर्चाचे ओझे कमी होऊन मी माझ्या खेळावर अधिक लक्ष केंद्रीत करेन भारतासाठी आणखीन पदके प्राप्त करू शकेन.“ मानसी जोशी यांचा हा जीवन प्रवास नक्कीच संघर्षमय, थक्क करणारा आणि तरुणाईला, खेळाडूंना प्रेरणादायी आहे, त्यांच्या याच जिद्दीला दै. ‘मुंबई तरुण भारतचा सलाम!

 
 
@@AUTHORINFO_V1@@