अतिचंचलता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2018
Total Views |



आपल्या मुलांच्या वर्तनाबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घेऊन, शास्त्रीय चाचण्यांच्या आधारे त्याचे निदान करणे आवश्यक आहे. सर्वसामान्यपणे, अतिचंचलतेच्या लक्षणांमध्ये वयाबरोबर सुधारणा होत जाते.

 

मला वर्गात शिकवलेलं काही कळत नाही. मुलं मला सतत चिडवतात. मी मारलं की मलाच शिक्षा होते. आमच्या एकत्र कुटुंबात, सगळ्या भावंडांमध्ये मी मोठा आहे. सगळ्यांच्या खूप अपेक्षा आहेत माझ्याकडून. पण, मी त्या पूर्ण करू शकणार नाही. मला चांगले गुण मिळत नाहीत, अभ्यास लक्षात राहत नाही. मी वेंधळा आहे. कसा यशस्वी होणार मी? खूप ताण येतो. विचारांनी डोकं दुखतं. माझ्यासमोर मन मोकळे करून आदित्य (नाव बदलले आहे) रडायला लागला. थोड्या वेळाने शांत होऊन माझ्याकडे पाहू लागला. त्याच्या अगदी कंपासने मापून घ्यावे अशा गोल चेहेऱ्यावरचे त्याचे बोलके डोळे मला खूप प्रश्न विचारत होते. पण, त्यावेळी त्याच्या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नव्हती. पुढचे काही दिवस मी आदित्यकडून, पालकांकडून आणि शिक्षकांकडून त्याच्या वर्तनाबद्दल माहिती घेतली. काही प्रश्नावली भरून घेतल्या. आदित्यलाअतिचंचलताआहे असे निदान झाले. ही अवस्था काय आहे? त्याचा व्यक्तीच्या विचारांवर-भावनांवर-वर्तनावर कसा परिणाम होतो? हे आदित्यच्या कुटुंबाला शिक्षकांना समजावून सांगितले. घरात, शाळेत काय उपाय योजता येतील? याची चर्चा केली.

 

अटेन्शन डेफिसिट हायपरअक्टिव्हीटी डिसऑर्डरही एकाग्रता नसणे, अतिचंचलता आणि अधीरता अशा वर्तन समस्यांची अवस्था आहे. या अवस्थेची लक्षणे मुले लहान असतानाच लक्षात येऊ शकतात. मुलांच्या आयुष्यात काही महत्त्वाच्या घटना घडल्या, मोठे बदल झाले, तर ही लक्षणे जास्त तीव्रतेने समोर येऊ शकतात. अर्थात, चंचल स्वभाव आणि अतिचंचलता अवस्था यामध्ये गल्लत होऊ शकते. त्यामुळे आपल्या मुलांच्या वर्तनाबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घेऊन, शास्त्रीय चाचण्यांच्या आधारे त्याचे निदान करणे आवश्यक आहे. सर्वसामान्यपणे, अतिचंचलतेच्या लक्षणांमध्ये वयाबरोबर सुधारणा होत जाते. परंतु, काहीवेळा ही लक्षणे प्रौढपणीही दिसून येतात. सर्वसामान्यपणे एकाग्रता नसणे, अतिचंचलता अधीरता या सर्ववर्तन समस्याएकत्र आढळतात. परंतु, काही वेळा फक्त एकाग्रता नसण्याची समस्याच यातून उद्भवते, पण अतिचंचलता दिसत नाही. अशा वेळी लक्षणे तीव्रतेने समोर येत नसल्याने दुर्लक्षित होऊ शकतात. एकाग्रतेचा कालावधी खूप कमी असणे, वारंवार लक्ष विचलित होणे, सातत्याने चुका होणे, विसराळूपणा, वारंवार वस्तू हरवणे, भोवतालच्या धोक्यांचा अंदाज येणे, वेळखाऊ, किचकट गोष्टी करण्याबाबत अवधान राहणे, दिलेल्या सूचना पूर्णपणे ऐकण्याचा संयम नसणे, एक कृती अर्धवट ठेऊन दुसरी हातात घेणे, कामाचे नीट नियोजन करता येणे, स्थिर बसता येणे, सतत शरीराची हालचाल करत राहणे, सातत्याने खूप बोलत राहणे, आपल्याला संधी मिळेपर्यंत थांबता येणे, विचार करता कृती करून मोकळे होणे, इतरांचे संभाषण चालू असताना वारंवार मध्ये बोलणे यासारखी लक्षणे दिसतात. अतिचंचलता अवस्थेमागचे अचूक कारण अजूनही अज्ञात आहे. परंतु, अनुवंशिकता, मेंदूची रचना-कार्य, गर्भावस्थेत, नवजात अर्भकाच्या मेंदूला झालेली दुखापत अशा काही बाबी कारणीभूत असू शकतात.

 

अतिचंचलता अवस्थेचे निदान होऊन योग्य उपचार झाले, तर रोजच्या आयुष्यात या अवस्थेशी जुळवून घेणे शक्य होते. नैराश्याच्या गर्तेत अडकलेली निकिता (नाव बदलले आहे) जेव्हा माझ्याकडे येऊ लागली तेव्हा तिला तिच्या पालकांना तिचे वर्तन अनाकलनीय होते. दोन-तीन सत्रांनंतर तिच्या अतिचंचलतेचे निदान झाले. सुचवलेले बदल निकिताने खूप हिंमतीने स्वतःमध्ये घडवून आणले. एकेकाळी आत्महत्येचे विचार प्रयत्न करणारी निकिता आज वयाच्या २० व्या वर्षी नवीन शहरात स्वतंत्रपणे राहून एक अतिशय नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम उत्साहाने शिकत आहे. तिचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलताना चर्चिलेले एक जिते-जागते उदाहरण इथेही नमूद करावेसे वाटते. २३ सुवर्ण पदकांसह एकूण २८ ऑलिम्पिक पदकांचा मानकरी असणाऱ्या प्रसिद्ध तरणपटू मायकेल फेल्प्सच्या अतिचंचलतेचे निदान वयाच्या नवव्या वर्षी झाले होते. औषधोपचार, विचार-वर्तनातील बदल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोहण्याचे वेड या सर्व गोष्टींच्या साहाय्याने आज तो अतिशय यशस्वी समाधानी आयुष्य जगत आहे.

 

-गुंजन कुलकर्णी

@@AUTHORINFO_V1@@