स्त्रीरोग तज्ज्ञांच्या प्रयत्नांमुळे रुपालीला मिळाला पुनर्जन्म

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Aug-2018
Total Views |
 
जळगाव :
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांच्या प्रयत्नामुळे २३ वर्षीय महिलेची फाटलेली गर्भपिशवी वाचवित तिला पुनर्जन्मच मिळाला आहे.
 
 
पाचोर्‍यातील २३ वर्षीय रुपाली पाथरवटच्या पोटात असलेले बाळ मृतावस्थेत होते. तसेच तिची गर्भपिशवी फाटून तिच्या जीवावर बेतले होते. अशा स्थितीत तिला उपचारासाठी जळगाव येथे आणले असता एकाही रुग्णालयाने तिच्यावर उपचाराची तत्परता दाखविली नाही. हताश झालेल्या कमलाकर पाथरवट यांनी रुपाली हिला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रक्तस्त्रावामुळे तिच्या अंगातील रक्त अवघे साडेतीन ते चार प्रमाणापर्यंत आले होते. अशा स्थितीत विभागप्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संजय पवार, डॉ. शुभांगी चौधरी, डॉ. रुपेश पाटील, डॉ. राहुल भातखडे यांनी रुपाली पाथरवट हिची तपासणी करून अवघ्या अर्ध्या तासात तिच्यावर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेत पोटातील मृत असलेले बाळ काढून फाटलेली गर्भपिशवी शिवण्यात आली. डॉ. पवार आणि डॉ. राहुल भातखडे यांच्या चमूने प्रसंगावधान राखून केलेली ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्याने रुपालीचा जणू पुनर्जन्मच झाला. तसेच तिची गर्भपिशवी कायम राहिली.
 
 
शस्त्रक्रियेसाठी भूलरोगतज्ज्ञ डॉ. सागर व्यास, डॉ. ऋतुराज काकड, डॉ. देवेंद्र चौधरी, डॉ. शीतल फेगडे यांनी सहकार्य केले. स्त्रीरोगतज्ज्ञ चमूच्या प्रयत्नामुळे रुपालीची प्रकृती आता झपाट्याने सुधारत आहे. तिच्यावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च लागणार होता. मात्र कुटुंबाची स्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे डॉ. माया आर्विकर व डॉ. राम होकर्णे यांनी वैद्यकीय रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांना सूचित केले असता माणुसकीचा धर्म जोपासत या महिला रुग्णावर संपूर्ण उपचार मोफत केले. रुग्णाची देखभाल डॉ. राम होकर्णे, डॉ. सायदीप गॉरथी, डॉ. प्रियंका गादगे, डॉ.धनश्री तरल, डॉ. ऋतुपर्णा सूर्यवंशी, डॉ. ज्योत्स्ना गारापथी, डॉ. अमित गुप्ता हे करीत आहेत.
 
 
समयसुचकतेसह अनुभव महत्त्वाचा : डॉ. संजय पवार
रुग्ण जेव्हा रुग्णालयात दाखल होतात, तेव्हा प्रसंगावधान राखून समयसुचकता दाखवणे आवश्यक असते. कारण अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया करताना बर्‍याचदा गर्भपिशवी कायमची निकामी होण्याचा संभव असतो. त्यामुळे पुन्हा मातृत्व प्राप्त होणे अशक्य होते. तसेच अती रक्तस्त्राव होऊन रूग्णाचा जीवदेखिल जाण्याची अधिक शक्यता असते. अशावेळी समयसुचकता, निर्णय आणि अनुभवाच्या जोरावरच ही शस्त्रक्रिया यशस्वी केली जाऊ शकते, असे मत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संजय पवार यांनी व्यक्त केले.
 
@@AUTHORINFO_V1@@