ते पंधरा दिवस : ११ ऑगस्ट, १९४७

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Aug-2018   
Total Views |
 


 
कलकत्ता
 
आज सोमवार असूनही, कलकत्ता शहराच्या काहिसे बाहेर असलेल्या सोडेपूर आश्रमात गांधीजींच्या सकाळच्या प्रार्थनेला बऱ्यापैकी गर्दी होती. गेले दोन / तीन दिवस कलकत्ता शहर तसे शांत होते. गांधीजींच्या प्रार्थनेचा प्रभाव तेथील हिंदू पुढाऱ्यांवर जाणवत होता. बरोबर एक वर्षापूर्वी मुस्लिम लीगने शहरात जो भीषण रक्तपात घडवून आणला होता, क्रौर्याची आणि नृशंसतेची जी परिसीमा गाठली होती, त्याचा बदला शहरातील हिंदू पुढाऱ्यांना घ्यायचा होता. मात्र गांधीजींच्या वास्तव्यामुळे ते सर्व कठीण झाले होते. आणि म्हणून अखंड बंगालचे ‘प्रधानमंत्री’ शहीद सुह्रावर्दीची पण इच्छा होती की गांधीजींनी कलकत्ता शहरातच थांबावं.
 
 
याला कारणही तसंच होतं. विभाजनानंतर कलकत्ता हिंदुस्थानात तर ढाका पाकिस्तानात जाणार हे स्पष्ट दिसत होतं. हिंदुस्थानातील बंगालचे नवीन मुख्यमंत्री सुद्धा ठरले होते. फक्त पाच दिवसांनंतर या पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम लीगचं शासन संपुष्टात येणार होतं. आणि म्हणूनच कलकत्त्याच्या मुसलमानांचे रक्षण व्हावे, म्हणून सुह्रावर्दींना, गांधीजी हे कलकत्त्यातच हवे होते.
 
 
आजच्या सकाळच्या प्रार्थनेत गांधीजीनी जरा वेगळेच विषय घेतले. ते म्हणाले, “आज मी, माझ्यासमोर उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. त्यापैकी एक आहे, ‘माझ्या प्रार्थना सभेत महत्वाच्या, श्रीमंत पुढाऱ्यांना जागा मिळते. पण सर्वसामान्य माणसाला जागा मिळत नाही’ हा आरोप. काल रविवार असल्याने आश्रमात बरीच गर्दी झालेली होती. त्यामुळे कदाचित असे घडले असावे. मी त्या सर्वांना कळकळीची विनंती करतो की त्यांनी धीर धरावा. मी कार्यकर्त्यांनाही सांगितले आहे की त्यांनी भेदभाव न करता, लोकांना आत सोडावे.”


“मी कलकत्त्याला आलो, त्याच दिवशी चिटगाव येथील पुराची बातमी वाचली होती. या भीषण पुरात किती जणांना मृत्यू आला, संपत्तीचं किती नुकसान झालं, ते नीटपणे कळायचंय. मात्र या अशा विपत्तीच्या काळात आम्हाला पूर्व किंवा पश्चिम, पाकिस्तान किंवा हिंदुस्थान असा विचार न करता, मदतीला धावून गेलं पाहिजे. चिटगावचा पूर म्हणजे संपूर्ण बंगालवर आलेली आपदा आहे. ‘ऑल बंगाल रिलीफ कमिटी’ बनवून त्यात सर्वांनी मदत करावी, अशी मी विनंती करतो. मी मनाने चिटगावच्या पूरग्रस्तांबरोबर आहे.”

 
 
 
“अनेक पत्रकार मला विचारताहेत की स्वतंत्र भारतात गव्हर्नर, मंत्री आणि तत्सम पदांवर कोणाला नेमणार आहात..? जसं काही मी कॉंग्रेस वर्किंग कमिटीचा सदस्य आहे आणि मी निर्णयाला प्रभावित करू शकतो..! मी हे मानतो की मी कॉंगेस जनांच्या हृदयात आहे. मात्र जर मी माझी मर्यादा ओलांडली तर मी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मनातून उतरू शकेन. मला कायद्याने कुठलाच अधिकार नाही. नैतिकतेने आहे.”
 
 
 
 
 
 
 
“तुम्हा सर्वांना हे पटतंय का की दोन्ही जमातीच्या पुढाऱ्यांनी पूर्व आणि पश्चिम बंगालमध्ये जाऊन शांततेचं आवाहन केलं पाहिजे, कारण आता भांडण संपलंय..? माझं उत्तर आहे, होय. जर सर्व पुढारी मनाने एक झाले तर प्रश्नच सुटतील. आणि म्हणूनच मी म्हणतो, प्रतिकार करू नका. ‘ठोश्याला ठोसा’ हा जंगली उपाय आहे. अहिंसा हेच या सर्व प्रश्नांना उत्तर आहे..!”
 
 
कराची
 
कराचीतील ब्रिटीश शैलीत बांधलेले असेंब्ली भवन. भव्य-दिव्य अशा राजप्रासादा सारखी दिसणारी इमारत. सोमवार. सकाळी बरोबर ९ वाजून ५५ मिनिटांवर नवनिर्मित पाकिस्तानचे पितृपुरुष, कायदे-आझम जीना, सजवलेल्या राजशाही बग्गीतून या इमारतीच्या पोर्चमध्ये उतरले. स्वागताला कडक इस्त्रीच्या गणवेशातील अधिकारी आणि लियाकत आली खान सारखी काही निवडक पुढारी मंडळी होती. बरोबर दहाच्या ठोक्याला पाकिस्तानच्या कोंस्टीट्युएंट असेंब्ली ची पहिली बैठक सुरु झाली. या बैठकीचे अस्थायी अध्यक्ष होते, जोगेंद्र नाथ मंडल.
 
 
जोगेंद्र नाथ मंडल यांनी बैठकीचा प्रारंभ केला, “अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी जो प्रस्ताव कालच्या बैठकीत ठेवण्यात आलेला होता, त्यातील पेरेग्राफ क्रमांक २ चे पालन करून मी हे घोषित करतो की सात नाम-निर्देशन पत्र, कायदे-आझम मोहमद अली जीना यांच्या समर्थनार्थ माझ्याजवळ आलेली आहेत. या सन्माननीय सदस्यांची नावे आहेत –  


१. गयासुद्दिन पठान
२. हमिदुल हक चौधरी
३. अब्दुल कासेम खान
४. मान्यवर लियाकत अली खान
५. ख्वाजा नझिमुद्दीन
६. मान्यवर एम. के. खुहरो
७. मौलाना शब्बीर अहमद उस्मानी


उपरोक्त सात मान्यवर सदस्यांनी या प्रस्तावाचे समर्थन केले आहे. इतर कोणाचेही नाम-निर्देशन पत्र प्राप्त न झाल्याने मी मान्यवर कायदे-आझम मोहमद अली जीना यांना पाकिस्तानच्या कोंस्टीट्युएंट असेंब्लीचे अध्यक्ष घोषित करतो. आता मी कायदे-आझम साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे आसन ग्रहण करावे.” कायदे-आझम जीनांना लियाकत अली खान आणि सरदार अब्दुल रब खान निश्तार हे अध्यक्षांच्या आसनापर्यंत घेऊन गेले. टाळ्यांच्या कडकडाटात, जीनांनी आसन ग्रहण केले.

 
 
 
 
 
पूर्व बंगालच्या लियाकत अली खान यांनी अध्यक्षांच्या गौरवाचे पहिले भाषण केले. त्यांनी जीनांची मुक्त कंठाने स्तुती केली आणि त्यांच्या बरोबर गेली अकरा वर्षे केलेल्या कामाच्या आठवणी सांगितल्या. त्यांनी म्हटलं, “हे ऐतिहासिक आश्चर्य आहे की काहीही रक्तपात न होता, रक्तरंजित क्रांती न करता, तुमच्या नेतृत्वात, आपण हे आपलं पाकिस्तान मिळवलं आहे.”
 
 
लियाकत अलींच्या नंतर पूर्व बंगालच्याच, कॉंग्रेस पार्टीच्या किरण शंकर रॉय यांनी कॉंग्रेस पार्टी तर्फे जीनांचे अभिनंदन केले. त्यांनी पंजाब आणि बंगाल च्या विभाजनाबद्द्ल आपली नापसंती व्यक्त केली. मात्र हे ही आवर्जून सांगितले की हा निर्णय कॉंग्रेस आणि मुस्लिम लीगच्या संगनमताने झाला असल्याने, आम्ही आमच्या पूर्ण निष्ठा या देशाप्रती व्हायल्या आहेत.”
 
 
रॉय यांच्यानंतर सिंधच्या एम. ए. खुहरो यांचं भाषण झालं. नंतर अस्थायी अध्यक्ष जोगेंद्र नाथ मंडल बोलले. पूर्व बंगालचे अब्दुल कासीम खान आणि पश्चिम पंजाबच्या बेगम जहांआरा शाह नवाज बोलल्यानंतर कायदे-आझम जीना बोलायला उभे राहिले, तेव्हा दुपारचे बारा वाजायला आले होते. जीना अत्यंत भावरहित चेहऱ्याने, कोर्टात आर्ग्युमेंट केल्यासारखं बोलत होते.
 
 
ते म्हणाले, “या असेंब्लीचे स्त्री – पुरुष सदस्य हो. आपण माझ्यावर जी जवाबदारी दिली आहे, त्याबद्दल मी आपला आभारी आहे.” “आपण ज्या पद्धतीने हे पाकिस्तान निर्माण केलं, त्यासारखं इतिहासात दुसरं कुठलंही उदाहरण नाही.” या कोंस्टीट्युएंट असेंब्लीचे दोन उद्देश आहेत. एक म्हणजे याच्याद्वारे आपल्याला पाकिस्तानची सार्वभौम घटना तयार करायची आहे. आणि दुसरं म्हणजे एक सार्वभौम आणि संपूर्ण राष्ट्र म्हणून आपल्याला उभं राहायचं आहे. आपलं पाहिलं उद्दिष्ट असेल, कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करणं. लाच-लुचपत, काळाबाजार पूर्णपणे बंद करणं.” “मला माहित आहे, की सीमेच्या दोन्ही बाजूंना पंजाब आणि बंगालचे विभाजन स्वीकार न करणारे अनेक असतील. मात्र मला तरी या शिवाय दुसरे कोठलेही उत्तर सापडले नव्हते. आता हा निर्णय झालाच आहे तर तो आपण व्यवस्थितपणे राबवूया.”


“तुम्ही कोणत्याही धर्माचे असा, पाकिस्तानात तुम्ही तुमच्या श्रद्धास्थानांना, पूजास्थळांना जाण्यास मुक्त आहात. तुम्ही मंदिरात जा, किंवा मशिदीत. तुमच्यावर कोणतेही बंधन नाही. पाकिस्तानात सर्व धर्म समान आहेत आणि राहतील. हिंदू, मुस्लिम, रोमन कॅथोलीक्स, पारशी हे सर्व पाकिस्तानात गुण्या गोविंदाने राहतील. धर्मावरून भेदभाव केला जाणार नाही...” आणि सभागृहात बसलेले मुस्लिम लीगचे सदस्य मनात विचार करतच राहिले की ‘हे असं असेल, तर मग आपण पाकिस्तान नेमका कशासाठी आणि कोणासाठी बनवला..?’


  
सकाळचे अकरा वाजताहेत. आज सूर्य चांगलाच तळपतोय. पावसाची चिन्हं नाहीत. आकाश निरभ्र आहे. आठवड्याभरा पूर्वी चांगला पाऊस झाल्याने वातावरण हिरवेगार आहे.
 
 
कलात
 
बलुचिस्तानच्या प्रमुख शहरांपैकी एक. उंच – सखल वसलेले. दाट लोकवस्तीचे शहर. क्वेटापासून फक्त ९० मैलांच्या अंतरावर. मजबूत भिंतींच्या आत वसलेल्या या शहराला दोन / अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. कुजदर, गंडावा, नुश्की, क्वेटा या शहरांना जायचं असेल, तर कलात ओलांडूनच जावं लागतं. त्यामुळे या शहराला एक वेगळंच ‘सामरिक’ महत्व आहे. विस्तीर्ण भिंतींच्या आत वसलेल्या या शहरात मध्यभागी एक भलीमोठी गढी आहे. ह्या गढीतील खानांचं ‘राजभवन’ म्हणजे बलुचिस्तान च्या राजकारणाचा केंद्रबिंदु.
 
 
या राजभवनात मुस्लिम लीग, ब्रिटीश सरकारचे रेसिडेंट आणि कलातच्या मीर अहमद यार खानांची एक बैठक चालली आहे. एका संधीपत्रावर या तिघांच्या सह्या व्हायच्या आहेत, ज्यायोगे आजपासून, म्हणजे ११ ऑगस्ट १९४७ पासून, कलात हा स्वतंत्र देश म्हणून काम करायला लागेल.
 
 
ब्रिटीशांच्या राज्य व्यवस्थेत बलुचिस्तानच्या कलातचं स्थान वेगळं आहे. सर्व ५६० संस्थानं त्यांनी ‘अ’ श्रेणीत ठेवली आहेत, तर सिक्कीम, भूटान आणि कलात ही ‘ब’ श्रेणीतील संस्थानं आहेत.
 
 
शेवटी दुपारी १ वाजता संधीपत्रावर तिघांच्या स्वाक्षऱ्या झाल्या. या संधीपत्राद्वारे हे घोषित करण्यात आलं की कलात हे भारताचे राज्य नाही. ते एक स्वतंत्र राष्ट्र आहे. मीर अहमद यार खान हे त्याचे राष्ट्रप्रमुख आहेत.  कलात बरोबरच, मीर अहमद यार खान साहेबांचं वर्चस्व शेजारच्या लास बेला, मकरान आणि खारान या भागांवरही होतं. त्यामुळे, या सर्व भागांसकट, बलुचिस्तान हे राष्ट्र, मीर अहमद यार खान यांच्या नेतृत्वाखाली, भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र होण्याच्या आधीच निर्माण झालं...!
 
 
‘ऑल इंडिया रेडियो’चे दिल्लीचे मुख्य कार्यालय. ए. आय. आर. ची प्रेस नोट तयार होऊन वर्तमानपत्रांकडे निघाली आहे. ए. आय. आर. च्या मुख्यालयात भलतीच गडबड आहे. चौदा आणि पंधरा ऑगस्टची तयारी अगदी जोरात आहे. चौदा तारखेच्या रात्रीचे धावते समालोचन ए. आय. आर. ला करायचे आहे. कार्यक्रम तयार झालेला आहे.
 
 
१४ ऑगस्ट
  
रात्री ८.१० ते ८.४५ इंडिया गेट वर राष्ट्रध्वज फडकवला जाणार आहे. त्याचे धावते समालोचन इंग्रजीत होणार. रात्री १०.३० ते ११.०० श्रीमती सरोजिनी नायडू यांचा इंग्रजीत संदेश. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा संदेश इंग्रजीत. या संदेशाचा गोषवारा हिंदीत नंतर सांगितला जाईल. ध्वनिलहरी असतील 17.84 MHz आणि 21.51 MHz  रात्री ११.०० ते १२.३० कोंस्टीट्युशन हॉल मधे चालणाऱ्या सत्तांतराचे धावते समालोचन. ध्वनिलहरी असतील – 17.76 MHz आणि 21.51 MHz
 
 
दिल्लीतील एक भला मोठा बंगला. गौहत्या विरोधी परिषद भरलेली आहे. अध्यक्षता करताहेत, जीनांचा बंगला विकत घेणारे, सेठ रामकृष्ण डालमिया. या बैठकीत एक प्रस्ताव पारित होतोय, ज्या द्वारे स्वतंत्र भारतातील सरकारला हे सांगितलं गेलंय की ‘गौवंशाची रक्षा करणं, गौवंशाची उत्तम देखरेख करणं हा भारतीयांचा मुलभूत हक्क असला पाहिजे. दरवर्षी कोट्यावधी गायींना मारले जाते, ते पूर्णपणे बंद व्हावे. देशाच्या विकासामध्ये गौवंशाची फार मोठी भूमिका आहे...’
रामकृष्ण डालमियांच्या डोक्यात आहे की औरंगजेब रोडवरच्या जीनांच्या बंगल्यालाच गौहत्या विरोधी चळवळीचे केंद्र करावे...!
 
 
कराची
 
जेवणानंतरच्या सत्रात, पाकिस्तान कोंस्टीट्युएंट असेंब्लीच्या बैठकीत, फारसे काही झाले नाही. फक्त त्यांचा राष्ट्रध्वज निश्चित झाला. एक चतुर्थांश पांढरा आणि उरलेला हिरवा रंग असलेल्या या चांद – ताऱ्याच्या राष्ट्रध्वजाचं डिझाईन असेंब्ली पुढे मांडण्यात आलं आणि ते मंजूर झालं.
 
 
मद्रास 


जस्टीस पार्टीची बैठक चालू आहे. एकतीस वर्ष जुनी ही पार्टी, आजही ब्राम्हणवादा विरोधातले राजकारण करतेय. अध्यक्ष पी. टी. राजन यांनी या बैठकीत भारताच्या स्वातंत्र्याचे स्वागत करणारा ठराव मांडला, जो बहुमताने पारित झाला. पंधरा ऑगस्टला मद्रास इलाख्यात जल्लोषात स्वातंत्र्यदिन साजरा करायचा, हे ही ठरलं. मात्र याचबरोबर हा ही प्रस्ताव पारित झाला की स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेचच भाषावार प्रांत रचना करण्यात यावी.
 
 
लॉर्ड माउंटबेटन यांचा आजचा दिवस बऱ्याच गडबडीचा गेला. उठल्या उठल्याच त्यांनी त्यांच्या शयनगृहात लावलेल्या मोठ्या कॅलेंडर कडे बघितलं. फक्तं चार दिवस. सार्वभौम ब्रिटीश साम्राज्याचा भारतातून गाशा गुंडाळण्याला फक्त चार दिवस शिल्लक आहेत...!
 
 
सकाळीच लॉर्ड साहेबांची डॉ. कुंवर सिंह आणि सरदार पणिक्कर यांच्याबरोबर भेट झाली. ही भेट फार महत्वाची होती. कारण या पूर्वी भोपाळच्या नवाबाच्या नादी लागून, बिकानेरच्या महाराजांनी त्यांचे संस्थान भारतात विलीन करण्यास अनुत्साह दाखवला होता. मात्र माउंटबेटन यांना मोकळी संस्थानं नको होती. जितकी जास्त स्वतंत्र संस्थानं राहतील, तितकीच ब्रिटीशांची डोकेदुखी वाढणार होती. आणि म्हणूनच या भेटीचे महत्व होते.
 
 
या भेटीत माउंटबेटन यांनी, ‘बिकानेर संस्थान हे पाकिस्तानला जोडले गेले किंवा स्वतंत्र राहिले तर कसा पद्धतीची अनिश्चितता निर्माण होऊ शकते, हे डॉ. कुंवर सिंह आणि सरदार पणिक्कर यांना समजाऊन सांगितले. या भेटीनंतर, बिकानेर संस्थानाच्या विलीनीकरणाचा फारसा प्रश्न उरणार नाही, असा विश्वास माउंटबेटन यांना वाटला.
 
 
दुपारी माउंटबेटन यांनी दख्खनच्या हैदराबाद संस्थानाच्या नवाबाला पत्र लिहिले की ‘हैदराबाद स्टेटसाठी सामिलिकरणाची ‘ऑफर’ ही अजून दोन महिने खुली राहील.
 
 
बंगालच्या पूर्वेला असलेल्या जेस्सोर, खुलना, राजशाही, दिनाजपुर, रंगपूर, फारीद्पूर, बारिसाल, नादिया.. या गावांमध्ये संध्याकाळी साडेपाचला दिवे लागणी झाली होती. पाऊस, रात्रीचं ते उदास वातावरण, दंग्यांच्या भीतीचं सावट या सर्वांमुळे एकुणातच, या सर्व परिसरावर मळभ दाटून आल्यासारखं वाटत होतं. ही सर्व शहरं हिंदू बहुल होती. मात्र गेल्या ‘डायरेक्ट एक्शन डे’ पासून मुस्लिम लीग प्रचंड आक्रामक झालेली होती. मुस्लिम गुंड, हिंदू डॉक्टरांना, प्राध्यापकांना, जमीनदारांना पश्चिम बंगालमध्ये पळून जायला सांगत होते.
 
 
बारिसाल. साठ / सत्तर हजार वस्तीचं लहानसं टुमदार शहर. पूर्वेचं व्हेनिस..! कीर्तनखोला या नयनरम्य नदीच्या काठावर वसलेलं. पूर्ण हिंदू संस्कृतीत रचलेलं आणि नटलेलं. बंगालच्या नवाबाला सुद्धा बारिसाल वर आपले राज्य करणे शक्य झाले नव्हते. इंग्रजांनी बंगालला आपल्या आधीन करण्यापूर्वी बारिसालचे शेवटचे महाराज होते, राजा रामरंजन चक्रवर्ती.  मुकुंद दास या कविराजाने बांधलेलं काली मंदिर आणि हिंदू राजाने बनविलेलं विस्तीर्ण दुर्गा सरोवर, ही बारिसाल ची वैशिष्ठ्ये. अश्या या हिंदू चेहऱ्या – मोहऱ्याच्या बारिसाल मधून हिंदूंनाच बाहेर काढलं जातंय. काय आणि कोणतं पाप केलंय या बारिसालच्या (आणि सगळ्या पूर्व बंगाल च्या) हिंदूंनी..?
 
 
 
 
 
दुपारचे साडे चार वाजताहेत. उन्हं उतरणीला आलेली आहेत. सोडेपूर आश्रमात काहीशी गडबड आहे. गांधीजी आत्ता, कलकत्त्यातील दंगलग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत. खंडित पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री डॉ. प्रफुल चंद्र घोष, कलकत्त्याचे मेयर एस. सी. रॉयचौधरी आणि पूर्व मेयर एस. एम. उस्मान हे आश्रमात पोहोचले आहेत. या सर्वांबरोबर गांधीजी हा दौरा करणार आहेत.
 
 
पाचच मिनिटात कलकत्त्याचे पोलीस कमिश्नर एस. एन. चटर्जी आले आणि हा दौरा सुरु झाला. पाच, सहा मोटारी. पुढे मागे पोलिसांच्या गाड्या... असा हा ताफा कलकत्त्याची परिस्थिती बघायला निघाला. पाईकपारा, चिटपोर, बेलगाछी, मानिकतोला, बेलियाघाट, नरकेलदंगा, एनटेली, तंग्रा आणि राजा बाजार... दंगलीत उध्वस्त झालेली घरं. जाळून खाक झालेली घरं, दुकानं, मंदिरं..!
 
 
चिटपोरमध्ये घरांचे जळालेले भग्नावशेष बघत गांधीजी तिथे काही वेळ उभे राहिले. बऱ्याच ठिकाणी दंगेखोरांनी उध्वस्त केलेल्या घरात आता कोणीच राहत नव्हतं. ती तशीच सामसूम पडून असल्याने त्या संध्याकाळी फार भयानक वाटत होती...
 
 
 
 
बेलीयाघाट परिसरात काही हजार माणसं जमली होती. त्यांनी ‘महात्मा गांधी की जय’ अशा घोषणा दिल्या. मात्र इतरत्र या काफिल्याला बघून लोकांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आपलं सर्वस्व गमावलेली ती माणसं, शुष्क आणि भकास चेहऱ्यानं या पुढाऱ्यांकडे पाहत होती..! पन्नास मिनिटांचा हा दौरा आटोपून गांधीजी जेव्हा सोडेपूर आश्रमात परत आले, तेव्हा त्यांचं मन विषण्ण झालेलं होतं...!
 
 
 
प्रशांत पोळ
 
 
 
 मागील लेख तुमच्या वाचनातून राहिला असेल तर त्याची लिंक खालीलप्रमाणे : १० ऑगस्ट १९४७
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@