गणपतीला तरी सोडा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Aug-2018
Total Views |




गणेशोत्सवाच्या निमित्ताने भाजपच्या नावाने रडारड करण्यापेक्षा गणेशभक्तांसाठी मुंबईतले रस्ते पूर्ववत करण्याचा प्रण उद्धव ठाकरेंनी घ्यावा म्हणजे गणपती सुखाने घरी नेता येतील.
 

ग्रहण आले की गल्लीत आरोळ्या ऐकू येऊ लागतात. ‘दे दान सुटे गिरान.’ ग्रहणाच्या दिवशी काही ठरलेल्या महिल्या गल्लीच्या तोंडावर अशा आरोळ्या देत फिरताना दिसतात. शिवसेनेचेही काहीसे असेच झाले आहे. ग्रहणाचे भय दाखवून दान-दक्षिणा गुंडाळण्याचे उद्योग तसे शिवसेनेला नवे नाहीत, पण गणपतीच्या नावानेही आता गळे काढायला सुरुवात झाली आहे. एरव्ही वर्षभर आपले छंद पुरे करीत फिरत राहायचे आणि हिंदूंचे सणवार आले की, हिंदुत्वाचा बेगडी आवेश आणून घुमायला लागायचे. विषय खरंतर साधा सोपा आहे. गणेश मंडपांना परवानग्या देण्याचे काम सुरू आहे. मात्र, यातही शिवसेनेला स्वत:ची टिमकी वाजवायची संधी दिसते. विघ्नहर्त्याच्या आगमनापूर्वीच विघ्नकर्त्या कायदेपंडितांचे सोटे वाजतात, अशी रंजक कोटी उद्धव ठाकरेंनी केली आहे. अशा कोट्या करण्यात उभ्या महाराष्ट्रात त्यांचा हात कुणीही धरू शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातल्या रटाळ टीव्ही सीरियल्सना कंटाळलेल्या तमाम जनतेने राजकीय फार्स वठविण्याचे कंत्राट ठाकरे बंधूंनाच दिलेले असते. आता या दोन भावांमध्येच कलगीतुरा सुरू आहे. मध्येच उद्धव ठाकरे वाराणसीला जाणार होते. मग कार्यक्रम कुठेतरी बारगळला किंवा आपण फार मोठी हूल दिल्याच्या आर्विभावात अजूनही उद्धवजी खुश आहेत. ज्या ठिकाणी वाराणसीवारीची होर्डिंग्ज लागली होती, त्याच ठिकाणी आता मनसेने ‘आधी गणपतीचे मंडप उभारा, नंतर अयोध्येत जाऊन राममंदिर उभारा,’ असे बोर्ड लावले आहेत. चाललंय काय? हे लोक बोलतायत काय? कशाचाही कशालाही मेळ नाही. उद्धव ठाकरेंनी आता हे सरकारच हिंदूविरोधी असल्याची घोषणा केली आहे. खिशातून बाहेर येणारे राजीनामे पुन्हा आत कोंबून शिवसेनेचे मंत्री मंत्रालयाकडे पळत असतात. असे असतानासुद्धा उद्धव ठाकरे इतके नामानिराळे कसे राहू शकतात, ते गजाननालाच ठाऊक. उद्धव ठाकरेंनी आपला पहिला निशाणा लावला आहे, तो महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांवर. महापालिकेत सत्ता यांची. आपल्याच घरात वाढलेल्या भावाचा पक्ष फोडून तगवलेली ही महापालिकेची सत्ता. आता मुद्दा असा आहे की, जर हीच मंडळी तुम्हाला ऐकत नसतील तर ‘महापौर आमचाच’ हे तुणतुणे मुंबईकरांच्या दारावर जाऊन कशाला वाजवायचे?

 

जिथे या मनभावी हिंदूद्रोहाचा मजकूर तिथेच आदित्य ठाकरे लोकसभेत आणि केंद्रीय मंत्र्यांशी गाठीभेटी घेत असल्याचा फोटो आणि बातमी छापली आहे. भाजपचा हिंदूविरोधी चेहरा उघडा पाडण्याच्या केविलवाण्या धडपडीत जे काही उदाहरण त्यांनी इथे दिले आहे, ते तर त्याहून हास्यास्पद आहे. मोहरम आणि दुर्गाविसर्जन एकाच दिवशी आल्याने ममता बॅनर्जी यांनी त्या दिवशी विसर्जनावर बंदी घातली होती. म्हणूनच भाजपने ममता बॅनर्जींना हिंदूविरोधी म्हटले, अशी उद्धव ठाकरेंची तक्रार आहे. ही तक्रार खरी मानली तरी भाजपचे सोडा, तुम्ही त्या बाईंना कुर्निसात करायला का गेला होतात? या प्रश्नाचे उत्तर उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे द्यावे. शिवसेनेचा मोदीद्वेष जाहीर आहे. मोदींच्या नावाने उद्धव ठाकरे आणि शिवसेना कशी बोटे मोडीत असते, ते साऱ्या देशाने पाहिले आहे. पण, त्याचबरोबर सत्तेत राहण्याची लाचारीदेखील शिवसेनेची एक ओंगळवाणी बाजू दाखवित असते. राजकीय विरोध म्हणजे काय हे दाखविणाऱ्या करुणानिधींचा परवा अस्त झाला. शिवसेनेचा विरोध हा असा दुटप्पी. लोकशाहीत विरोध असूच शकतो, मात्र आपली कर्तृत्वहीनता झाकण्यासाठी शिवसेनेने मोदीद्वेषाचा जो काही बुरखा घातला आहे, तो दिवसेंदिवस अधिकाधिक किळसवाणाच दिसायला लागला आहे. मंडप बांधून झाल्यावर गणपतीबाप्पाची मूर्ती सुखरूप मंडपात कशी आणायची हा आज गणेशोत्सव मंडळांसमोरचा खरा प्रश्न आहे. रस्त्यावर खड्डे इतके आहेत की, त्यातून वाट काढत मुंबईकरांना आपला गणपती घरी न्यायचा आहे. मात्र, याकडे उद्धव ठाकरेंनी नेहमीप्रमाणे कानाडोळा केला आहे.

 

हिंदू धर्मातील सण-उत्सवांचे राजकारण करायचे आणि जबाबदारी घ्यायची वेळ आली की, पसार व्हायचे, हा शिवसेनेचा खाक्या. महानगरपालिका जर का मंडपांना परवानगी नाकारत असेल, तर ती का नाकारत आहे, हे न पाहाता हिंदूद्रोहाचा कांगावा करणे हे सवंगतेचे लक्षण मानावे लागेल. हिंदू धर्माची धुरा आजपर्यंत ज्यांनी वाहिली त्यांनी त्यात सुधारणा घडवून आणण्याचेच काम मोठ्या प्रमाणावर केले. मात्र, एकदा हिंदुत्वाच्या नावाखाली मतांवर डोळा ठेवण्याची वृत्तीच निर्माण झाली की, सुधारणांची जबाबदारी अलगदपणे दूर ढकलून देता येते. वाहतुकीची कोंडी, त्यात रस्त्याला पडलेले खड्डे यामुळे सर्वसामान्य मुंबईकर अत्यंत त्रस्त आहे. आपल्या गणोशोत्सवांमध्ये सुधारणांना वाव नक्कीच आहे. सवंग मागण्या मान्य करून घेणे म्हणजे हिंदुत्वाचे पोषण करणे नाही. ज्योर्तिभास्कर जयंतराव साळगावकर यांचे स्मरण इथे अनिवार्य आहे. गणेशोत्सव दर्जा व पावित्र्य राखूनच साजरा केला जावा म्हणून त्यांनी केलेले प्रबोधनाचे काम व त्याला गणेशमंडळांनी दिलेला प्रतिसाद न आठवण्याइतके उद्धव ठाकरेंचे वय झालेले नाही. भाजपच्या नावाने रडारड करण्यापेक्षा गणेशभक्तांसाठी मुंबईतले रस्ते पूर्ववत करण्याचा प्रण त्यांनी घ्यावा. आपल्या सकारात्मक वागणुकीसाठी प्रसिद्ध असलेले देवेंद्र फडणवीस त्यांना नक्कीच प्रतिसाद देतील.

@@AUTHORINFO_V1@@