द्रविड राजकारणाच्या अंताचा प्रारंभ...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
 
 
 
 
 
द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे संस्थापक आणि सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांच्या निधनाने तामिळनाडूच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. हे त्यांचे कट्टर विरोधकही मान्य करतील, यात शंका नाही. करुणानिधी एक वादळी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी त्यांच्या पद्धतीने राजकारण केले. तसे राजकारण दुसर्यांना, अगदी त्यांच्या मुलांनाही जमेल की नाही, सांगता येत नाही. याचे एक उदाहरण आपण महाराष्ट्रात बघतच आहोत. करुणानिधी यांच्या निधनानंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू, विविध माध्यमांतून समोर येत आहेत. मरण पावल्यावर त्या व्यक्तीशी वैर संपवायचे असते, अशी आपली संस्कृती सांगते. परंतु, जी व्यक्ती आपली संस्कृती मानत नव्हती, धर्म मानत नव्हती, तिच्या बाबतीत हा दंडक पाळणे आवश्यक नाही. सोनिया गांधींचे वेगळे आहे. त्या राजकारणी आहेत आणि राजकारणात कुणाची मदत केव्हा लागेल सांगता येत नाही. त्यातच सत्ताप्राप्ती हेच ध्येय असलेल्या राजकीय पक्षांचे तर हे धोरणच असते. सोनिया गांधींनी, करुणानिधी यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना म्हटले की, ते मला पितृतुल्य होते. माझी वैयक्तिक हानी झाली आहे. राजकीय अपरिहार्यतेमुळे सोनिया गांधी, करुणानिधींचा भूतकाळ विसरू शकतात. परंतु, तशी अपरिहार्यता सामान्यांना नसते.
 
 
केंद्रातील इंद्रकुमार गुजराल यांच्या सरकारमध्ये द्रमुक सहभागी होता व त्याला कॉंग्रेसचा बाहेरून पाठिंबा होता. राजीव गांधी यांची हत्या ज्यांनी घडवून आणली, त्या लंकेतील लिट्टे दहशतवादी संघटनेशी द्रमुक पक्षाचे घनिष्ठ संबंध होते. असे म्हणतात की, लिट्टेला सर्व प्रकारची म्हणजे आर्थिक व शस्त्रास्त्रांची मदत द्रमुक पक्षाकडून होत होती. या आरोपावरून सोनिया गांधी यांनी इंद्रकुमार गुजराल यांचे सरकार पाडले. एवढेच नाही, तर याच आरोपावरून तामिळनाडूतील करुणानिधी यांचे बहुमतातील सरकार राज्यपालांकरवी बरखास्त करविले. वैरत्वाची भावना इतकी तीव्र होती की, सूड उगविण्यासाठी सोनिया गांधींनी संविधानाच्या तरतुदीदेखील बाजूला सारल्या. असे असताना, 2004 साली केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी निर्लज्जपणे द्रमुकचे समर्थन घेण्यात आले. 2004च्या निवडणुकीपर्यंत वाजपेयींच्या सरकारमध्ये सहभागी असलेला द्रमुक पक्ष एक क्षणात सोनिया गांधींच्या आश्रयाला गेला. डॉ. मनमोहनिंसग यांच्या सरकारमधील द्रमुकच्या ए. राजा या मंत्र्याने नंतर काय धिंगाणा घातला, हे सर्वज्ञात आहे. भ्रष्टाचाराच्या प्रचंड आरोपांमुळे संपुआचे हे सरकार निवडणुकीत हारले. त्यात ए. राजा यांनी केलेला टू-जीचा घोटाळा प्रमुख होता. तरीही सोनिया म्हणत असतील की, करुणानिधी गेल्यामुळे माझी वैयक्तिक हानी झाली, तर त्या धन्य आहेत! अयोध्येत राममंदिराच्या जागेवरच (जिथे बाबरी मशीद बांधली होती) भव्य राममंदिर बांधण्यासाठी आंदोलन सुरू असताना, अनेक विद्वान आपली अक्कल पाजळत होते.
 
त्या वेळी करुणानिधींनी म्हटले की, आज जर राम जिवंत असता, तर बाबरी मशिदीच्या ऐवजी दुसर्या जागेवर त्याचे मंदिर बांधले म्हणून तो नाराज झाला असता काय? बाबरी मशिदीचाच हट्ट का म्हणून? असे म्हणणार्या करुणानिधींवर काळाने कसा सूड उगवला ते बघा! मरिना बीचवरच अंत्यसंस्कार व्हावा म्हणून करुणानिधींच्या पुत्राला रात्री उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. म्हणजे करुणानिधींचा अंत्यसंस्कार मरिना बीचवरच झाला पाहिजे आणि रामाचे जन्मस्थान मंदिर मात्र दुसरीकडे बांधले तरी चालेल! भारत आणि श्रीलंकेला जोडणारा ऐतिहासिक रामसेतू तोडण्याचे कारस्थान द्रमुक पक्षाचेच होते. त्या वेळी करुणानिधी म्हणाले होते की, रामाने हा सेतू बांधला म्हणता. पण त्याने कुठल्या कॉलेजातून इंजिनीअरिंगची पदवी घेतली होती, हे सांगा.
 
 
करुणानिधी अत्यंत गरीब परिवारातून आलेले होते. नास्तिकता, कम्युनिस्ट विचारसरणी, आर्य-द्रविड वंशवाद, उत्तर-दक्षिण भारत भेदभाव इत्यादींच्या आधारे त्यांनी 60 वर्षे तामिळनाडूच्या राजकारणात धुमाकूळ घातला. अमाप म्हणजे डोळे पांढरे होतील इतकी संपत्ती गोळा केली. हे त्यांचे ‘कर्तृत्व’ फिके पडावे असे एक कर्तृत्व त्यांच्या खाती आहे. ते म्हणजे तामिळनाडूतून हिंदू संस्कृती, हिंदू धर्म आणि ब्राह्मण यांना संपविण्याचा खटाटोप. त्यासाठी त्यांनी आपली लेखणी, वक्तृत्व, राजकीय शक्ती पणाला लावली. ब्राह्मणांना या राज्यात राहणे किती असह्य झाले होते, याचे अनुभव कुठलाही तमीळ ब्राह्मण सांगू शकतो. द्रविड आणि आर्य या दोन स्वतंत्र संस्कृती आहेत आणि आर्यांनी द्रविडांवर आक्रमण करून त्यांना दक्षिणेत हुसकावून लावले, हा करुणानिधींचा अत्यंत आवडता सिद्धान्त. त्यामुळे त्यांनी आर्यांचे प्रतिनिधी म्हणून ब्राह्मणांवर जबरदस्त सूड उगवला. कम्युनिस्टांच्या मदतीने इतिहासात वाट्टेल तसे बदल करून, वामपंथी इतिहास शाळेत शिकविला. आज जो आपल्याला उत्तर व दक्षिण भारतीयांमध्ये भेदभाव दिसतो आहे, त्याला खतपाणी देण्याचे काम करुणानिधींनी मनोभावे केले. हिंदू धर्म, हिंदू संस्कृती यांच्याबद्दल करुणानिधी यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. रावणाला पूर्वज मानून दसर्याला रामदहनाचे कार्यक्रमही करुणानिधी घेत असत. अशा या ‘कर्तृत्वसंपन्न’ राजकारण्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते चेन्नईत पोहचले होते. राजकारण आणि त्यातही सत्ता, व्यक्तीला किती लाचार करते, याचे हे ताजे उदाहरण आहे. पण म्हणून, हा देश एक राहावा यासाठी धडपडणार्यांनी, हा इतिहास विसरावा असे नाही.
 
करुणानिधींनी ज्या विचारसरणीचा आयुष्यभर पुरस्कार केला, ती किती ठिसूळ होती, याचे पुरावे आता समोर येऊ लागले आहेत. करुणानिधी गंभीर आजारी असताना, त्यांच्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून, त्यांची कन्या खा. कनिमोळी राज्यातील प्राचीन मंदिरांना भेटी देऊन नवस बोलत होत्या. धार्मिक अनुष्ठाने केलीत. हिंदू संस्कृतीचा प्रचंड तिरस्कार म्हणून आपल्या मुलाचे नाव, कल्पनातीत नरसंहार करणार्या कम्युनिस्ट हुकूमशहा स्टॅलिनवर ठेवणार्या करुणानिधींचा आणि त्यांच्या विचारधारेचा हा दारुण पराभवच मानावा लागेल. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या अपरिपक्व निर्णयामुळे लंकेत भारतीय सेना गेली होती. तिथे लिट्टेशी लढताना लष्कराचे 214 जवान शहीद झाले होते. परंतु, भारताने ही कारवाई थांबवावी म्हणून करुणानिधी उपोषणाला बसले होते. भारतीय जवान शहीद होत आहेत याचे त्यांना दु:ख नव्हते.
 
लिट्टेचे दहशतवादी मरू नये म्हणून ते अस्वस्थ होते. अशा व्यक्तीच्या अंत्ययात्रेत त्यांच्या पार्थिवाला लष्करी सन्मान देताना, तसेच त्याच्या बाजूने लष्करी शिस्तीत चालताना, भारतीय जवानांच्या मनात काय विचार येत असतील?द्रविड राजकारणाने तामिळनाडूचे प्रचंड नुकसान केले आहे. तमीळ लोकांमध्ये भारतापासून फुटून नवा देश तयार करण्याची भावना याच राजकारणाने निर्माण केली आहे. लिट्टेला जो पाठिंबा होता, तो याच कारणाने होता. श्रीलंकेत तमीळभाषकांवरील अत्याचार हाच केवळ मुद्दा असता, तर करुणानिधी यांची वागणूक निश्चितच वेगळी राहिली असती. परंतु, ते तसे नव्हते. त्यांना तमिळांचा वेगळा देश हवा होता आणि त्यासाठी तमीळ संस्कृती ही हिंदू संस्कृतीपासून किती वेगळी आहे, हे दाखविण्यासाठी ते प्रयत्नीशील होते. हिंदी भाषेचा द्वेषही याच द्रविड राजकारणाने शिकविला आहे. याच राजकारणामुळे राज्यातील बुद्धिमत्ता, प्रतिभा दुसर्या राज्यात गेली. हे नुकसान रुपयांनी मोजता येणार नाही. त्यामुळे द्रविड राजकारण संपणे, काळाची गरज आहे. ते सर्वांच्याच हिताचे आहे. त्यासाठी द्रमुक पक्ष खिळखिळा व्हायला हवा. या पक्षाचे सर्वसामान्य मतदार भाविक आहेत, परंपरा मानणारे आहेत. फक्त नेतृत्व नष्ट व्हायला हवे. रजनीकांत यांच्या रूपाने तशी आशा दिसत आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणावर सहा दशके प्रभाव पाडणारे एक राजकारणी म्हणून करुणानिधी यांचे निधन पोकळी निर्माण करणारे असले, तरी देशाच्या दृष्टीने ही घटना, द्रविड राजकारणाच्या अंताचा प्रारंभ ठरावा, अशी आशा आहे...
@@AUTHORINFO_V1@@