ते पंधरा दिवस : १० ऑगस्ट १९४७

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Aug-2018   
Total Views |




दहा ऑगस्ट. रविवारची तशी आळसावलेली सकाळ. १, औरंगजेब रोड, या सरदार वल्लभभाईंच्या बंगल्यात मात्र बऱ्यापैकी हालचाल दिसत होती. सरदार सकाळी लवकर उठतात. त्यांचा दिवस लवकर सुरु होतो. बंगल्यातल्या सर्वांना याची सवय आहेच. त्यामुळे सकाळी जेव्हा जोधपुरच्या महाराजांची अलिशान चकचकीत गाडी पोर्चमध्ये उभी राहिली, तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांसाठी ती एक साधारण बाब होती.
 
 
जोधपुरचे नरेश, हनुमंत सिंह, ही तशी छोटी-मोठी आसामी नव्हती. राजपुतानातली ही सर्वात मोठी रियासत. हिचा इतिहास जाऊन भिडतो, तो थेट सन १२५० पर्यंत. पंचवीस लाख लोकवस्तीची ही रियासत, छत्तीस हजार चौरस मैल पसरलेली आहे. आणि गेल्या काही दिवसांपासून जीना, ही रियासत पाकिस्तानच्या घशात घालण्याच्या प्रयत्नात आहेत. व्ही. के. मेनन यांनी ही सर्व माहिती वल्लभभाईंना दिली होती. म्हणूनच सरदारांनी, जोधपुर नरेश, हनुमंत सिंह यांना घरी बोलावून घेतले होते.
 
 
सरदार, हनुमंत सिंहांना घेऊन, त्यांच्या त्या प्रशस्त दिवाणखान्यात आले. प्रारंभीच्या जुजबी गप्पा झाल्यावर सरदारांनी सरळ मूळ विषयाला हात घातला, “ मी ऐकलंय की तुमची भेट लॉर्ड माउंटबेटन बरोबर झाली होती. काय चर्चा झाली.?
 
 
हनुमंत सिंह : जी सरदार साहेब. भेट झाली. पण खास अशी चर्चा झाली नाही.
 
 
सरदार पटेल : मी हे पण ऐकलंय की तुमची भेट, जीनांबरोबर ही झालेली आहे, आणि तुमचा स्वतंत्र राहण्याचा इरादा आहे..?
 
 
हनुमंत सिंह : (ओशाळत) हो. तुम्ही बरोबर ऐकलंत.
 
 
सरदार पटेल : तुम्हाला स्वतंत्र रहायचे असेल तर तुम्ही राहू शकता. पण या निर्णयामुळे जर जोधपुर संस्थानात विद्रोह झाला, तर भारत सरकारकडून मदतीची अपेक्षा ठेऊ नका.
 
 
हनुमंत सिंह : पण जीना साहेबांनी आम्हाला बऱ्याच सवलती देऊ केल्या आहेत. त्यांनी जोधपुरला रेल्वेलाईन ने कराचीबरोबर जोडण्याची गोष्ट केली आहे. जर हे नाही झालं, तर आमचा व्यापार ठप्प होऊन जाईल.
 
 
 
 
 
 
सरदार पटेल : आम्ही जोधपुरला कच्छशी जोडून देऊ. तुमच्या व्यापारावर कसलाही फरक पडणार नाही. आणि हे बघा हनुमंत, तुमचे वडील, उमेश सिंह, हे माझे चांगले मित्र होते. ते तुम्हाला माझ्या देखरेखीखाली सोडून गेले आहेत. जर तुम्ही सरळ रस्त्याने नाही चाललात, तर तुम्हाला अनुशासनात आणण्यासाठी मला तुमच्या वडिलांची भूमिका निभवावी लागेल.
 
 
हनुमंत सिंह : सरदार साहेब, असं करण्याची आपल्याला गरज पडणार नाही. मी उद्याच विलीनीकरणाच्या करारनाम्यावर सही करतो..!
 
 
रविवार असल्यामुळे असेल कदाचित, पण कलकत्ता जवळच्या सोडेपूर आश्रमात, गांधीजींच्या प्रातः प्रार्थनेला बरीच गर्दी जमली होती. गांधीजींनी नेहमीच्या शैलीत प्रार्थना आणि सूतकताई केली आणि ते लोकांशी बोलायला सज्ज झाले. गांधीजी बसूनच लोकांशी संवाद साधत होते. ते बोलू लागले –
 
 
“मी नोवाखालीला जाण्यासाठी निघणार होतो. पण माझा तो नियोजित दौरा मी काही दिवस पुढे ढकलला आहे. कारण येथील अनेक मुस्लिम मित्रांनी मला तसं करण्याची विनंती केली आहे. मला असं वाटलं, की मी जर नोवाखालीला जाईन, आणि इथे काही विपरीत घडलं, तर माझ्या जगण्याचं प्रयोजनच नष्ट होईल. संथ स्वरात गांधीजी पुढे बोलू लागले, “मला फार वाईट वाटलं हे ऐकून की कलकत्त्याच्या अनेक भागांमध्ये मुस्लिम जाऊ शकत नाही आणि काही भागांमध्ये हिंदू जाऊ शकत नाहीत. मी स्वतः त्या सर्व भागांमध्ये जाऊन बघणार आहे. या शहरात फक्त २३% मुसलमान आहेत. ते काय कोणाचं वाकडं करू शकणार आहेत..? मी असं ऐकलं आहे की येऊ घातलेल्या कॉंग्रेस शासनाच्या आड, हिंदू पोलीस मुसलमानांना त्रास देताहेत. पोलिसांमध्येही जर ही अशी जातीयता शिरली, तर भविष्य हे निश्चितच अंधःकारमय असेल..”
 
 
प्रार्थनेला जमलेल्या लोकांमध्ये हिंदूंची संख्याही बरीच मोठी होती. त्यांना मात्र गांधीजींचं हे बोलणं पटलेलं दिसत नव्हतं. फक्त तेवीस टक्के मुसलमान असूनही जर गेल्या वर्षी ‘डायरेक्ट एक्शन डे’ ला हजारो हिंदूंच्या रक्ताचे पाट वाहत असतील, तर ते बहुमतात असताना काय होईल..? असा प्रश्न ते आपापसात विचारत होते.
 
 
प्रार्थनेनंतर गांधीजींनी, त्यांचं हलका आहार, म्हणजे कपभर बकरीचं दूध, थोडा सुका मेवा, आणि खजूर घेतला आणि ते आतल्या कक्षात आले. इथे ते कॉंग्रेस च्या मंत्र्यांबरोबर चर्चा करणार होते. हळूहळू मंत्री जमा होऊ लागले. पंधरा मिनिटातच भावी मुख्यमंत्री प्रफुल चंद्र घोष आणि त्यांचे आवश्यक ते सर्व सहकारी जमले.
 
 
मग गांधीजी हळुवारपणे, त्यांना समजाऊन सांगण्याच्या शैलीत बोलू लागले. ते म्हणाले, “सुहरावर्दींच्या शासन काळात हिंदुंवर काही अत्याचार झालेही असतील. कदाचित त्यांचे पोलिसही हिंदूंशी आकसाने वागले असतील. पण म्हणून याचा अर्थ, आपण प्रतिशोध घेणे असा होत नाही. कलकत्त्यातली एकूण एक मुसलमान सुरक्षित राहील याची चिंता तुम्हा सर्वांना करायची आहे..!”
 
 
तिकडे दूर, दिल्लीत, मंदिर मार्गावरील हिंदू महासभा भवनात भरलेल्या ‘अखिल भारतीय हिंदू संसदेचा’ आज दुसरा दिवस होता. अखंड हिंदुस्थानातून या परिषदेसाठी आलेल्या प्रतिनिधींमधे विभाजनाची चीड होती. आक्रोश होता. विस्थापित हिंदू – शिखांची वेदना होती.
 
 
आज प्रस्तावाचा दिवस होता. बरेच वक्ते बोलले. बंगाल हून आलेले न्यायमूर्ती निर्मल चंद्र चटर्जी फार छान बोलले. ते म्हणाले, “तीन जूनचा, ब्रिटीशांचा फाळणीचा प्रस्ताव स्वीकारून कॉंग्रेसने फक्त घोडचूकच केली नाही, तर कोट्यावधी भारतीयांच्या पाठीत सुरा खुपसला आहे. भारताचे विभाजन स्वीकार करणे म्हणजे कॉंग्रेसने मुस्लिम लीगच्या गुंडगिरी पुढे शरणागती पत्करणे होय.”
 
 
या परिषदेत, सकाळच्या सत्रात, सर्वात शेवटी बोलले ते वीर सावरकर. त्यांच्या त्या घणाघाती वक्तृत्वानी आणि तर्कशुद्ध मुद्द्यांनी सर्व प्रतिनिधी मंत्रमुग्ध झाले. सावरकर म्हणाले, “आता निवेदन नाही, विनंती नाही. आता प्रत्यक्ष कृती. सर्व पक्षीय हिंदूंनी, हिंदुस्थानाला पुनः अखंड बनविण्याच्या कामात लागले पाहिजे. ‘रक्तपात टाळायला आम्ही पाकिस्तानला मान्यता दिली’ हा नेहरूंचा तर्क फसवा आहे. रक्तपात तर टळला नाहीच, उलट रक्तपाताची धमकी देत देत मुसलमान या देशाचे आणखी तुकडे करण्याच्या मागे आहेत. आताच या गोष्टीला प्रतिबंध केला नाही, तर देशात चौदा पाकिस्तान उभे राहण्याचा धोका आहे. त्यामुळे, रक्तपातामुळे भयभीत न होता, जशांस तसे उत्तर दिले गेलेच पाहिजे. हिंदूंनी, पक्षभेद विसरून, संगठीत होऊन, सामर्थ्यवान झाले पाहिजे आणि देशाचे विभाजन नष्ट केले पाहिजे.”
 
 
याच सभेत एकमुखाने मागणी करण्यात आली की सर्व हिंदूंनी राजकीय पक्षांचे कुंपण तोडून, अखंड भारतासाठी एकत्र व्हायला हवं. भगवा ध्वज हा राष्ट्रध्वज व्हावा. हिंदी ही राष्ट्रभाषा व्हावी आणि भारत हे हिंदू राष्ट्र व्हावे. देशात लवकरच निवडणुका घेण्याची मागणीही करण्यात आली. ढगाळ वातावरणानी आणि हलक्या पावसाच्या शिडकाव्यांनी झाकोळलेलं कराची.
 
 
सिंध प्रोव्हिंशियल लेजिस्लेटीव्ह असेंब्लीच्या हॉलमध्ये पाकिस्तानच्या Constituent Assembly ची पहिली संक्षिप्त बैठक सुरु झाली. आज तसं फारसं कामकाज नव्हतंच. प्रामुख्यानं जे काय होणार, ते उद्याच. उद्या ‘कायदे-आझम’ जीना, असेंब्ली ला संबोधित करणार आहेत. बरोबर अकरा वाजता असेंब्लीच्या कामकाजाची सुरुवात झाली. एकूण ७२ सदस्यांपैकी ५२ उपस्थित होते. पश्चिम पंजाबच्या दोन शीख सदस्यांनी कामकाजावर बहिष्कार घातला होता. त्यामुळे साहजिकच ते उपस्थित नव्हते.
 
 
पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल म्हणून घोषित झालेले बॅरीस्टर मोहम्मद अली जीना, जेव्हा त्यांच्या पहिल्या रांगेतल्या जागेवरून व्यासपीठाकडे जाऊ लागले, तेव्हा सदस्यांनी टाळ्या आणि बाके वाजवून त्यांचे स्वागत केले. जीनांनी पाकिस्तानच्या कामकाजाच्या रजिस्टर वर पहिली सही केली. पाकिस्तानच्या Constituent Assembly च्या अध्यक्षपदासाठी बंगालच्या जोगेंद्र नाथ मंडल यांचं नाव प्रस्तावित करण्यात आलं आणि ते मंजूरही झालं. अखंड भारताच्या अंतरिम सरकारमध्ये कायदा मंत्री राहिलेले, दलितांचे नेते, जोगेंद्र नाथ मंडल हे पाकिस्तान च्या Constituent Assembly चे पहिले अध्यक्ष झाले.
 
 
जोगेंद्र नाथ मंडल, १९४० मध्ये कॉंग्रेस मधून निष्कासित झाल्यावर, मुस्लिम लीगमध्ये सामिल झाले. बंगालच्या शहीद सुहरावर्दीच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. १९४६ च्या बंगाल मधील ‘डायरेक्ट एक्शन डे’ च्या हिंसेच्या वेळी, या मंडल साहेबांनी संपूर्ण बंगालभर प्रवास करून, दलितांना, मुसलमानांच्या विरुद्ध न जाण्यास सांगितले. मुस्लिम लीग आणि जीनांनी, जोगेंद्र नाथ मंडल यांच्या, ‘या’ कामाची दाखल घेतली आणि त्यांना असेंब्लीचे अध्यक्ष बनविले.
 
 
 
 
असेंब्लीचं आजचं कामकाज फक्त एक तास दहा मिनिटेच चाललं. बाहेर फारशी गर्दी नव्हती आणि लोकांमध्येही उत्साह जाणवला नाही.
 
 
रविवारची भर दुपारची वेळ. जुन्या दिल्लीतील मुस्लिम लीगचे कार्यालय. बाहेर अनेक मुसलमान तावातावाने भांडताहेत. दिल्लीतील मुस्लिम व्यापाऱ्यांचा आरोप आहे की ‘मुस्लिम लीगचे पुढारी, आम्हाला उघड्यावर टाकून पाकिस्तानात पळून चालले आहेत’. रोजच सुटणाऱ्या ‘पाकिस्तान स्पेशल’ ट्रेन मधून ही मंडळी पाकिस्तानात निघून जात आहेत. त्यांच्या विरोधात, त्या आक्रोशित मुस्लिम व्यापाऱ्यांनी दर्यागंज वगैरे परिसर बंद ठेवले आहेत.
 
 
दिल्लीतील मुसलमानांना, ‘आपण नेतृत्वहीन झालो’ असं वाटायला लागलं आहे.  दिल्लीच्या म्युनिसिपल कमिटी ने बैठकांसाठी आणि लहान कार्यक्रमांसाठी एक सुरेख हॉल बांधलाय. दुपारी जेवण झाल्यावर, नेहरूंनी त्या नवीन बांधलेल्या हॉल चं निरीक्षण केलं.
 
 
संध्याकाळी १७, यॉर्क रोड, या आपल्या बंगल्यात, नेहरू आपल्या सेक्रेटरीला पत्राचं डिक्टेशन द्यायला लागले,

प्रिय लॉर्ड माउंटबेटन,

         
      तुमच्या ९ ऑगस्टच्या पत्राबद्दल आभार, ज्यात आपण पुढील वर्षापासून पंधरा ऑगस्टच्या दिवशीही शासकीय इमारतींवर ‘युनियन जेक’ फडकविण्यासंबंधी लिहिले आहे. मला सांगायला आनंद वाटतो की पुढील वर्षापासून, आपण सुचविल्या प्रमाणे, आम्ही १५ ऑगस्टला ही यूनियन जेक फडकवू.
 
 
तुमचा विश्वासू,
जवाहरलाल नेहरू
 
 
ज्या ध्वजाला खाली खेचण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी, अनेक सत्याग्रहींनी गोळ्या खाल्या, तोच यूनियन जेक हा भारताच्या स्वातंत्र्य दिनासकट १३ प्रमुख दिवशी, भारतातील सर्व सरकारी इमारतींवर फडकणार होता...!  दुपारच्या सावल्या आता लांब होत चालल्या होत्या. लाहौरच्या ‘बारूद खाना’ भागात मात्र लोकांच्या हालचाली त्याच जोमानं आणि उत्साहानं सुरु होत्या. हा तोच भाग आहे, जिथे दिवसा – ढवळ्या ही जायची हिंदू – शिखांची हिंमत होत नाही. मियां परिवाराचे एकछत्री राज्य असलेला हा भाग. लाहौरच्या प्रथम नागरिकाचा (मेयर) चा हा भाग. येथे एक भटारखाना सतत चालला असतो. हिंदू – शीख परिवारांना हुसकावून लावणाऱ्या गुंडांची येथे खाऊन – पिऊन व्यवस्था असते.
 
 
आज या मियां – की – हवेलीत बेत चालले होते, १४ ऑगस्टचे. १४ ऑगस्ट नंतर, लाहौरमध्ये एकाही हिंदू – शिखाला राहू द्यायचे नाही, यावर सर्वांचेच एकमत होते. आणि त्या संदर्भातच योजना तयार होत होती.
 
 
आता पुढील फक्त चार दिवसच अखंड असणाऱ्या भारतात संध्याकाळच्या छटा वेगवेगळ्या होत्या. सुदूर पूर्वेत, आसाम मध्ये, कलकत्त्यात घरोघरी दिवे लागणी झालेली होती. मात्र पेशावर, माउंटगोमेरी सारख्या ठिकाणी अजूनही उन्हं, हात – पाय लांब करत, आळसावलेल्या मुद्रेनं निघायचा विचार करत होती. आणि या पार्श्वभूमीवर अलवर, हापुड, लायलपुर, अमृतसर या ठिकाणी भयंकर दंगे उसळले होते... अनेक हिंदू घरांवर आगीचे पेटते बोळे टाकण्यात आलेले होते. अनेक हिंदू वस्तीतील व्यापाऱ्यांची दुकानं लुटून फस्त झालेली होती...
 
 
लाहोर मधल्या जेल रोड वर राहणारे वीर भान. असिस्टंट डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज. जिंदा दिल, परोपकारी माणूस. लाहौर शहराचं अस्थिर होत जाणारं चित्र बघून त्यांनी रविवारची सुट्टी साधून, शहर सोडण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी दोन ट्रक बुक केले. अनेक वर्ष त्यांच्या सेवेत असलेला, विश्वासाचा वाटणारा त्यांचा स्वतः चा ड्रायव्हर मुस्लिम होता. त्यालाच, ट्रक मध्ये सामान भरण्यासाठी, कुली आणायला, वीर भान यांनी पाठवले. त्या बदमाशानं, मोझंग भागातले मुस्लिम गुंडच, कुली म्हणून आणले. संध्याकाळ पर्यंत सर्व सामान त्या दोन ट्रक्स मध्ये भरण्यात आलं. आणि जेव्हा वीर भान, त्या कुलींना पैसे द्यायला गेले, तेव्हा त्यांना घेरून त्या कुलींनी त्यांच्यावर आक्रमण केलं आणि त्यांच्या शरीरावर चाकूचे सपासप घाव केले. आपल्या नवऱ्याला रक्ताच्या थारोळ्यात तडफडत असलेला पाहून, त्यांच्या बायकोला चक्कर आली. गुंडांनी तिला ट्रकमध्ये टाकलं आणि संपूर्ण भरलेल्या सामानासकट ते दोन्ही ट्रक, रात्रीच्या काळोखात, त्यांच्या इच्छित स्थळी रवाना झाले.
 
सुदैव इतकंच की वीर भानच्या दोन किशोरवयीन मुली, मागील दाराने पळाल्या, त्या सरळ हिंदू बहुल ‘किशन नगर’ मधेच थांबल्या. म्हणूनच त्या बचावल्या. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याची, पंजाबच्या राजधानीत, लाहौरमध्ये, भर वस्तीत, दहा ऑगस्टच्या संध्याकाळी अशी जबरदस्त दैना करण्यात आली...!
 
 
ज्या वेळेस लाहौरमध्ये वीर भान हे रक्ताच्या थारोळ्यात तडफडत आक्रोश करत होते, आणि ते मुस्लिम गुंड, त्यांच्या बायकोसकट, त्यांची सर्व चीज वस्तू पळवून नेत होते... त्याच वेळेस, संध्याकाळी, आठशे मैल दूर, कराची हून, पाकिस्तान चे होऊ घातलेले वझीर-ए-आझम, लियाकत अली खान यांचे वक्तव्य, वर्तमानपत्रांच्या कार्यालयात पोहोचत होते...!
 
 
 
 
 
लियाकत अलींनी लिहिलं होतं, “ आम्ही वारंवार हे आश्वासन देतोय की पाकिस्तानात बिगर मुस्लिमांना फक्त संरक्षणच दिलं जाणार नाही, तर त्यांना कायद्याप्रमाणे सर्व हक्क मिळतील. ते येथे पूर्ण सुरक्षित असतील. पण दुर्दैवाने हिंदुस्थानातील बहुसंख्यांक समुदाय, याप्रमाणे करताना दिसत नाही.” 

लियाकत अलींनी पुढे लिहिलं होतं, “भारताच्या विविध भागातून ज्या बातम्या येताहेत, विशेषतः पूर्व पंजाब, पश्चिम बंगाल आणि संयुक्त प्रांत, त्यानुसार आमच्या मुस्लिम बांधवांवर बहुसंख्यांक हिंदू प्रचंड अत्याचार करत आहेत. कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वतः सिंध प्रांतात दौरे करून येथील हिंदूंना आमच्या सरकार विरुद्ध भडकावत आहेत. मला ताज्या प्रेस रिपोर्ट्सवरून समजले आहे की कृपलानी यांनी धमकी दिली आहे की सिंध प्रांतातले हिंदू, कायदा आपल्या हातात घेतील, आणि जे बिहारमध्ये घडलं, तसंच सिंधमध्ये ही होईल...!

 
लाहौरचे संघ कार्यालय. तसे लहानसेच. पण कार्यकर्त्यांनी / स्वयंसेवकांनी नेहमीच गजबजलेले. रविवार, दहा ऑगस्टच्या रात्री दहा वाजता सुद्धा कार्यालयात बऱ्यापैकी वर्दळ होती. स्वयंसेवकांचे चेहरे, त्यांच्यावर आलेला ताण दाखवत होते. तेथील हिंदू आणि शिखांना, सुखरूप पणे पूर्व पंजाबात कसं पोहोचवायचं याचीच चिंता सर्वांना लागलेली होती.
 
 
 
 
कार्यालयाच्या बाहेर, संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवारांचा अर्धपुतळा, त्यावर पडणाऱ्या शेजारच्या खोलीतल्या पिवळ्या बल्बच्या प्रकाशाने चमकत होता. देशातला, डॉ हेडगेवारांचा हा पहिलाच पुतळा, साक्षी होता, पंजाब प्रांतात्तल्या स्वयंसेवकांच्या अदम्य साहसाचा, धैर्याचा आणि त्यांच्या विजीगिषु वृत्तीचा...!
 
 
 
- प्रशांत पोळ
 
 
 
मागील लेख तुमच्या वाचनातून राहिला असेल तर त्याची लिंक खालीलप्रमाणे : ९ ऑगस्ट १९४७
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@