सत्ताधार्‍यांनी ठेवले तरुणांना बेरोजगार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Aug-2018
Total Views |
 
 

जळगाव शहरातील तरुणांना जळगावात नोकरीसाठी वणवण करावी लागत असल्याने ते नोकरी-धंद्यांसाठी मुंबई, पुण्यासारख्या मेट्रो सिटीकडे धाव घेताना दिसत आहेत. जळगाव शहरात कुठल्याही नोकरीच्या संधी उपलब्ध नसल्याने त्यांना जळगावात पर्याय उपलब्ध होत नसल्याने त्यांना हा निर्णय घ्यावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. शहरात सुसज्ज समजल्या जाणार्‍या एमआयडीसीत केवळ बोटावर मोजण्याइतक्या कंपनी असल्याने आणि नोकरीच्या हव्या तशा संधी उपलब्ध नसल्याने जळगावातील तरुणांवर बेरोजगारीचा शिक्कामार्तब केला जात आहे. चांगल्या शिक्षणाचा पर्याय आपल्या जळगाव शहरात उपलब्ध आहे. आपल्या शहरात अनेक बिझनेस मॅनेजमेंट, एमबीए, वैद्यकीय, लॉ महाविद्यालय असताना शहरात अनेक तरुण आजही नोकरीच्या शोधात फिरताना दिसतात. तरुणांना नोकरी मिळालीही तर ती या महागाईच्या दुनियेत साथ देणारी नसल्याची खंत जळगावातील तरुणांनी तरूण भारतशी बोलताना व्यक्त केली.
 
आज आपल्या शहरात एमआयडीसी असूनही त्यात नोकरीच्या संधी नाही. यासाठी जळगावातील तरुण मुंबई, पुण्याची वाट धरत आहेत. तर काही आपला छोटासा व्यवसाय थाटत आपला जीवन चरितार्थ चालवताना दिसत आहे. नकळत शिक्षाची गंगोत्री आपल्या शहरातून वाहत असली तरी त्याचा या तरुणांना काहीएक फायदा होत नसल्याचे समजते. यासाठी महानगरपालिकेने व सत्ताधार्‍यांनी पुढाकार घेऊन आपल्या शहरात चांगल्या उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देत येण्याची परवानगी द्यायला हवी. तेव्हाच आपल्या जळगाव शहराची ओळख पटेल. आणि जर आपल्या शहरातून शिकून आपल्या तरुणांचे ज्ञान जर दुसर्‍या शहरासाठी वापरण्यात आले तर जळगाव शहर १०० वर्ष अविकसनशील म्हणून ओळखले जाणार, यात शंका नाही. आजकालची तरुणाई ही स्मार्ट असून त्यांना जास्त सांगण्याची गरज पडत नसल्याची स्थिती आहे. अनेक तरुण हे आपले शिक्षण संपल्यावर जेथे पैसा जास्त आहे, त्या गावाला जाणे पसंत करतात. चांगली नोकरी आणि हुद्दा त्यांना याच ठिकाणी मिळत असल्याने त्यांचा बाहेर जाण्यासाठीचा कल वाढत आहे. पण याचा सत्ताधार्‍यांनी विचार करून या तरुणांचे ज्ञान जर जळगावच्या विकासासाठी वापरले जर जळगावचा विकास झपाट्याने होऊन जळगाव महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशात नावलौकिक मिळवेल. त्याचबरोबर घर सोडून जाण्यात कोणालाही स्वारस्य राहणार नाही. एमआयडीसी भागात केवळ दालमिल आणि मसाल्याच्या कंपनी असल्याने कोणीही या भागात जाण्यास तयार होत नाही. जे तयार होतात त्यांना तुटपुंज्या पगारात आपले घर भागवावे लागते. योग्य शिक्षण असूनही जर एकप्रकारे तरुणांना बेरोजगारीचा सामना करावा लागत असेल तर सत्ताधार्‍यांनी यासाठी उपाययोजना करून बेरोजगारीचे सावट जळगावातून काढून तरुणांना आपल्या हक्काच्या ठिकाणी काम द्यायला काहीच हरकत नाही. जेणेकरून तरुणांना आपले घर न सोडता जळगावातच नोकरी मिळून हव्या त्या पगारावर काम करून आनंद उपभोगता येईल.
 
शहरात केवळ सुप्रीम, जैन आणि बोटावर मोजण्याइतक्या कंपनी असल्याने बेरोेजगारीने तरुणांना नको त्या मार्गाकडे जावे लागत असल्याची स्थिती आहे. कोणी वाममार्गाला लागून आपले भविष्य खराब करत असून यातून त्यांना समाधानकारक न्यायही मिळेल अशा भावनाही काही बेरोजगार तरुणांनी व्यक्त केल्या आहेत. सत्ताधारी तसेच महानगरपालिका यांनी पुढाकार घेऊन आता जळगाव शहर कशाप्रकारे मेट्रो सिटी बनेल आणि तरुणांना कशाप्रकारे रोजगार मिळेल याचा विचार करायला हवा. आणि यासाठी एकच उत्तम पर्याय आहे आणि तो म्हणजे शहरात कंपन्यांना येऊ देणे.
 
पाण्याची सोय असतानाही सत्ताधारी शांत
 
शहरातील एमआयडीसीत मुबलक पाण्याचा साठा आहे. यासाठी बर्‍याच कंपन्या या जळगावात येण्यासाठी आजही उत्सुक आहेत. उद्योग करण्यासाठी जी पाण्याची आवश्यकता असते, ती जळगावातील या भागात उत्तम आहे. मात्र, तरीही सत्ताधार्‍यांनी अनेक वर्षात तरुणांचा विचार न करता आपल्या अट्टाहासापोटी उद्योगधंद्यांना या ठिकाणी येण्यासाठी नन्नाचा पाढा वाचला. जळगाव शहराचा विकास झाला तर यात वाईट काय, मात्र सत्ताधारी आणि महानगरपालिका असे का करत आहे, हा यक्ष प्रश्‍न आहे. बेरोजगार तरुणांना आता कामाची गरज असून नवीन कंपन्यांना जळगावात येऊ देणे हे सत्ताधार्‍यांचे काम आहे, तरीही असे काही होत असेल तर नक्की यात विकासाला खिंडार पडून विकासाला अडथळा येणार असल्याचे बोलले जात आहे.
 
तरुण देताहेत मुंबई, पुण्याला पसंती
 
शहरातील तरुणांचे शिक्षण झाल्यावर आजही ते पहिली पसंती मुंबई आणि पुण्याला देत असल्याने जळगाव शहर हे भकास झाल्याचे दिसून येते. दरम्यान, जळगाव शहरात जर विविध उद्योगधंद्यांना एमआयडीसीत योग्य ते स्थान मिळाले तर जळगावातील बेरोजगार तरुणांना आपले कौशल्य तर दाखवता येईलच सोबत आपल्या जळगाव शहराचा विकास साधला जाणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. मात्र, असे होत नसल्याने आजही जळगावातील तरुण हा बेरोजगार शिक्का आपल्या माथ्यावर घेऊन नोकरीसाठी चपला झिजवताना दिसून येतो. असेच राहिले तर जळगाव शहर हे विकसित न होता आहे त्याच पदावर राहणार असल्याचे हे द्योेतक आहे.
 
सत्ताधार्‍यांची उद्योगांना ‘ना’...
 
महापालिकेने व सत्ताधार्‍यांनी जळगावात आपले साम्राज्य कायम ठेवण्यासाठी कुठल्याही उद्योगांना येऊ दिले नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरात येण्यासाठी काही कंपन्यांनी प्रस्तावही पाठवला होता. मात्र, त्यांना येऊ न दिल्याने त्या कंपन्या औरंगाबादमध्ये स्थायिक झाल्या. जळगाव शहर आजही मागासलेले असल्याची भावना काही तरुणांनी व्यक्त केली आहे.
 
गेल्या १५ वर्षांपासून नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले असून जळगावचा विकास झाला नसल्याचे शहरवासीयांकडून बोलले जात आहे. रस्ते, गटारी, पथदिवे, कचरा आदी समस्या महापालिका सोडवू शकली नाही, तर बेरोजगार तरुणांचा प्रश्‍न काय सोडवणार, अशी तीव्र भावनाही व्यक्त होत आहे. सत्ताधार्‍यांनी स्वतःचा विकास करण्यापेक्षा तरुणांचा विकास करावा, जेणेकरून जळगावचा विकास होईल, असा सूर निघत आहे.
 
 
 
 
प्रतिक्रिया - १
 
सत्ताधार्‍यांच्या खुर्चीला घाम फुटेल का?
 
जळगावातील तरुणांना कुठेही नोकरीची व्यवस्था नाही. आयटी, डॉक्टर्स, एमबीए, बिझनेज मॅनेजमेंट झालेले तरुण नोकरी नसल्याने बाहेर गावी जाणे पसंत करतात तर काही पोलीस भरतीतही उतरतात. मात्र, तरीही सत्ताधार्‍यांच्या खुर्चीला घाम फुटत नाही. आजच्या तरुणाला जर योग्य अशी नोकरी आपल्या जन्मगावी मिळाली तर तो योग्य असा विकास शहराचा करू शकतो. इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवण्याच्या कंपनीने काही वर्षांपूर्वी जळगावातील एमआयडीसीत येण्यासाठी पुढाकार घेतला होता. पण कारणे दाखवून त्या कंपनीला काहींनी पिटाळून लावले. आज तिच कंपनी दुसर्‍या गावात स्थित असून त्या गावातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. जळगावात नवीन कंपन्यांना आणून बेरोजगार तरुणांना दिलासा द्यावा, अशी मागणी आहे.
- दीपक भालेराव, नागरिक
 
प्रतिक्रिया - २
 
बेरोजगार आंदोलनाच्या पवित्र्यात
 
जळगावातील तरुण हे बेरोजगार असून त्यांना कामाची कुठेही संधी उपलब्ध नाही. तरीही काही तरुण हे आपले छोटे मोठे उद्योग करून पोट भरत आहेत. काही वर्षांपूर्वी बर्‍याच कंपन्यांनी जळगावात येण्यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु, दुसरी कंपनी आली तर आपले मजूर वर्ग हे कमी होऊन कंपन्यांमध्ये पगारावरून स्पर्धा होईल, याची भीती काहींना होती. दरम्यान, तरुण बेरोजगार राहिला तरी बेहत्तर, पण आपले स्थान कायम राहिले पाहिजे, अशी भूमिका जळगावात आधीच स्थित असलेल्या कंपन्यांची आहे. पण यावर तरुण बेरोजगार आता मोर्चा काढून आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.
- मुकेश चौधरी, व्यावसायिक
 
@@AUTHORINFO_V1@@