जिल्ह्यातील शिक्षकांच्या खात्यात १ तारखेलाच पगार जमा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Aug-2018
Total Views |


 

आमदार निरंजन डावखरेंच्या प्रयत्नांना यश, ठाण्याचा पॅटर्न कोकणात राबविणार
 

ठाणे : जिल्ह्यातील सुमारे १८ हजारांहून अधीक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बॅंकेतील खात्यात प्रथमच १ तारखेला पगार जमा झाला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार अॅड. निरंजन वसंत डावखरे यांनी पगार होण्यातील तांत्रिक अडथळे दूर केल्यामुळे हजारो शिक्षकांना दिलासा मिळाला. यापुढे कोकणातील अन्य चार जिल्ह्यांतही शिक्षकांसाठीचा हा ठाणे पॅटर्न राबविणार असल्याचे आमदार डावखरे यांनी सांगितले. जिल्ह्यातील एक हजार २१८ शाळांच्या मुख्याध्यापकांकडून राज्य सरकारच्या वेतन पथकाकडे पगाराची बिले सादर केली जातात. त्यानंतर जिल्हा कोषागाराकडून वेतन पथकाला स्टेट बॅंक ऑफ इंडियाचा धनादेश दिला जातो. तो बॅंकेत वटल्यानंतर वेतन पथकाकडून टीडीसीसी बॅंकेला धनादेश दिला जात होता. त्यातच टीडीसीसीकडून टीजेएसबीतील खातेदार शिक्षकांची रक्कम वर्ग होत असल्यामुळे पगाराला दिरंगाई होत होती. या तांत्रिक बाबींचा फटका हजारो शिक्षकांना बसत होता. त्यामुळे हजारो शिक्षकांचे पगार उशीरा होत होते. या पार्श्वभूमीवर आमदार निरंजन डावखरे यांनी नुकतीच बैठक घेतली होती. या बैठकीला ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व वेतन पथकाचे अधिकारी उपस्थित होते.

 

मुख्याध्यापकांनी वेतन पथकाकडे दरमहा १० तारखेपर्यंत बिले सादर केली. त्यानंतर वेतन पथकाकडून २५ तारखेपर्यंत बिलांना मंजुरी देऊन ती जिल्हा कोषागाराला सादर केली गेली.त्याचवेळी बॅंकांच्या व्यवस्थापनाला पगारासाठी शाळांची यादीही दिली गेली. त्यानुसार बॅंकांनी पगाराबाबतची औपचारिकता पूर्ण केली. त्यामुळे प्रथमच १ ऑगस्ट रोजी शिक्षकांच्या खात्यात पगार जमा झाला, अशी माहिती आमदार डावखरे यांनी दिली. विशेषतः एखाद्या वेळी धनादेश न वटल्यास बॅंक व्यवस्थापनाकडून ओव्हरड्राफ्ट (ओडी) सुविधेचा वापर केला जाणार आहे. या संदर्भात टीडीसीसी व टीजेएसबी बॅंकेने हमी दिली होती. त्यानुसार अंमलबजावणी झाल्यामुळे शिक्षकांना १ तारखेला पगार मिळाला. ठाणे जिल्ह्याच्याच धर्तीवर कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशाच पद्धतीने शिक्षकांना एक तारखेपर्यंत पगार मिळविण्याचा ठाणे पॅटर्न राबविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली. ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांना पगार मिळण्यासाठीच्या निर्णयात सहकार्य केल्याबद्दल टीजेएसबी बॅंकेचे चेअरमन सी. नंदगोपाल मेनन, टीडीसीसीचे बॅंकेचे चेअरमन राजेंद्र पाटील, वेतन पथकाच्या प्राथमिक विभागाचे अधीक्षक सुनील सावंत, माध्यमिक विभागाचे अधीक्षक विष्णू पाटील आदींचे आमदार डावखरे यांनी आभार मानले आहेत.

@@AUTHORINFO_V1@@