जळगावनगरीचा ‘विवेकसिंह’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Aug-2018
Total Views |
 

 
एक होती जळगावनगरी. तिथे प्रजासिंह नावाचा एक महान राजा राहत होता. पण त्या राजाची काम करण्याची मर्यादा संपुष्टात आली. राजा वयोवृद्ध झाला होता. त्याला तीन पुत्र होती. परंतु त्यांच्या आपापसातील वादामुळे व श्रेयवादाच्या चढाओढीमुळे राजा त्यांच्यापैकी कुणालाही सत्तेवर बसवू शकला नाही. आता राजा फारच त्रासला होता. त्या तिघांपैकी कुणा एकाला तरी सत्तेवर विराजमान करणे फार आवश्यक झाले होते. तेव्हा योग्य व्यक्तीला निवडण्यासाठी राजाने एक शक्कल लढवली. आपल्या दरबारातील काही लोकांचा गट तयार करून त्यांना आपला भावी राजा निवडण्याचे अधिकार दिले. पण तुमच्या निवडीमागचे योग्य कारण सांगावे लागेल, अशी अट राजाने त्यांना घातली.
 
 
ठरलेल्या दिवशी सगळे सदस्य राजदरबारात हजर झाले. सगळ्या सदस्यांनी राजाच्या तिन्ही पुत्रांबद्दल निरीक्षण व अभ्यास केला होता. राजाने निवड केलेल्या व्यक्तीचे नाव घोषित करण्याचे सांगितले. सगळ्या सदस्यांनी आपल्या मनातील भावी राजाचं नाव लिहिलेल्या चिठ्ठ्या राजापुढे ठेवल्या. राजाने प्रधानाला त्या चिठ्ठ्या उघडून पाहण्यास सांगितले. प्रधानाने सर्व चिठ्ठ्या वाचल्या व राजाला विनम्रपणे सांगू लागला, की महाराज या चिठ्ठ्यांमध्ये कुणा एकाला पूर्ण कौल दिलेला नाही. प्रत्येकाला कमी अधिक मत दिले गेले आहे. परंतु, सर्वात अधिक कौल राजपुत्र विवेकसिंह यांना मिळाले आहेत. ते ऐकून राजासह सार्‍यांनाच आनंद झाला.
 
परंतु, ठरल्याप्रमाणे आता आपल्या निवडीमागचे कारण सांगायची वेळ आली होती. राजाने आज्ञा केली. राजाने सदस्यांना आपल्या थोरल्या पुत्रास लबाडसिंहास कौल देण्यामागचे कारण विचारले.
 
 
तेव्हा सदस्यांनी उत्तर दिले, महाराज लबाडसिंह फार चांगले वक्ते आहेत. त्यांची वाणी माणसाचे परिवर्तन केल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी ते विविध लोकांची नक्कलही करतात. त्यांच्या सभेला प्रचंड गर्दी असते. अधूनमधून विनोदी कविताही करून दाखवतात. शिवाय आश्वासनं देण्यात त्यांचा कुणी हात धरू शकत नाही आणि दिसायलाही रूपवान आहेत. नगरीतील स्त्रिया त्यांच्यावर भाळतात. त्यांचा रुबाबही वाघासारखाच आहे. म्हणून आम्ही लबाडसिंहास कौल दिला.
 
 
राजाने पुढे आपल्या दुसर्‍या मुलास चतुरसिंहास कौल देण्यामागचे कारण विचारले.
 
 
सदस्यांनी सांगितले, महाराज राजपुत्र चतुरसिंह वेळेचा सदुपयोग कसा करावा, हे चांगलं जाणतात. कोणती कामं केव्हा करावी व ती कामं केल्यामुळे आपला काय फायदा होणार हे जाणतात. जातींचा लाभ आपल्या राज्यासाठी कसा करता येऊ शकतो, हे त्यांनी जाती-जातींना आपापसात लढवून दाखवून दिले. आपले ध्येय गाठण्यासाठी ते जीवाचं रान करतात. पैसा उधळतात. पाहिजे ते हासिल करतातच. शिवाय ते नास्तिक आहेत. अंधश्रद्धेला तर अजिबात थारा देत नाही. धार्मिक लोकांना बडवायला कमी करत नाहीत. साक्षात देवी-देवतांना शिव्या देऊन शांतीप्रिय निरीश्वरवादी समाजास ते जीव लावतात. त्यांचा हा जिद्दीपणा व वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या राज्यास पुरोगामी व विज्ञाननिष्ठ बनवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्ही त्यांना कौल दिला.
 
 
राजाने सदस्यांना आता सर्वात जास्त कौल मिळालेल्या आपल्या धाकट्या पुत्रास विवेकसिंहास कौल देण्यामागचे कारण विचारले.
सदस्य म्हणाले महाराज, विवेकसिंह विचारपूर्वक निर्णय घेतात. प्रजेला समान न्याय देण्याचा प्रयत्न करतात. कुणातही भेद करत नाही. गरजूंना दान करतात. रोग्याला उपचार देतात. पीडितांची सेवा करतात. अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जातात. प्रजेच्या सुख-दु:खात सहभागी होतात, विचारपूस करतात. राहणीमान अतिसामान्य आहे. आपण राजपुत्र आहोत याचा गर्व नाही. विवेकसिंहांनी प्रवासात असताना आपला रथ थांबवून वाटसरूंची नानाप्रकारे मदत केली आहे. जनसेवेचा निर्मळ भाव त्यांच्या अंतर्मनात असल्यामुळे आपल्या राज्याची भरभराट करण्यास तेच सर्वार्थाने पात्र ठरतात. म्हणूनच आम्ही त्यांना कौल दिला.
राजा प्रजासिंह सदस्यांच्या योग्य कौलामुळे बेहद खूश झाला. त्याने श्रावणातील चांगला मुहूर्त पाहून आपल्या विवेकसिंहाचा राज्याभिषेक सोहळा पार पाडला.
 
 
 
- कल्पेश गजानन जोशी
Kavesh37yahoo.com
 
@@AUTHORINFO_V1@@