आम्ही ‘शहाणे’ बाकी ‘वेडे’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Aug-2018
Total Views |
 
 
 
निवडणुका म्हंटल्या की मतदान आलं. आणि मतदान म्हंटलं की, ते करण्यासाठी आग्रह करणारेही ओघाओघाने आलेच. निवडणूकपूर्व विविध पक्षाचे नेतेमंडळी ज्याप्रमाणे आपापल्या पक्षाला विजय मिळावा म्हणून जनतेला मतदानाचे आवाहन करतात, त्याचप्रमाणे निवडणूक आयोगालाही लोकांना मतदान करण्याचा आग्रह करण्यासाठी वेगवेगळे कसब वापरावे लागतात. जनतेला ते विविध मार्गाने मतदान करण्याचा हक्क समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. पण मित्रांनो, या आयोगाला काही काम नसते बघा. लोकांना अगदी मूर्ख बनवण्याचा त्यांचा धंदा चालू असतो. काय भेटते हो मतदान करून? तेच ते भ्रष्टाचारी नेते निवडून येतात, जनतेची काही कामे करत नाही, जनतेच्या समस्या जाणून घेत नाही, विकास करत नाही, मग कशाला करायचं मतदान? आणि कश्यासाठी करायचं..? आणि जे काही लोक मतदान करतात, त्यांना फार काही पुळका असतो, असेही नाही बरं का. त्यांना लक्ष्मी प्रसन्न झालेली असते म्हणून ते मतदानाला जातात. नाहीतर हे मतदान वगैरे करणं म्हणजे साफ मूर्खपणाच आहे बघा.
 
 
लोकहो, अशीच मस्त मस्त दुषणं द्या नेत्यांना, मंत्र्यांना आणि सरकारलाही. त्यांना हजार प्रश्न विचारा. तो तर तुमचा अधिकारच ना. ही निवडून येणारी मंडळी म्हणजे धोकेबाज, लबाड, फसवे. आणि तुम्ही त्यांना प्रश्न विचारणारे नागरिक म्हणजे परिस्थितीची जाण असणारे, राजकारणी धुरंधर, विद्वान पंडितच जणू. देशावर असो किंवा गावावर, जे सत्ता गाजवतात त्यांना तुम्ही प्रश्न विचारता, म्हणजे खरंच हा तर जागृत नागरिक असल्याचा ज्वलंत पुरावाच नाही का? सत्ताधार्‍यांना जाब विचारायचा, कट्ट्यावर बसून शिव्या द्यायच्या, घरात ऐटित पेपर वाचत सरकारला फुकाचा सल्ला द्यायचा, न्हाव्याच्या दुकानात आणि चहाच्या ठेल्यावर उधारीवर घेतलेला कटिंग चहा घशात उतरेपर्यंत चाहावाल्याला आणि कटिंग दाढी होईस्तोवर न्हाव्याला राजकारणाचे फुकट पाठ पढवायचे, हे ही तितकेच चांगले गुण असलेले नागरिक आपण. आपली चेष्टा, निंदा नालस्ती करणार कोण? अशी आहे का कुणाची छाती? या राजकारणी मुरब्बी लोकांना नाही, तेवढी विद्वत्ता व शहाणपणा आपल्याला गावातील पारावर बसल्या बसल्या वीडीचा धूर नाका-तोंडातून सोडता सोडता सहज अवगत होतो. पण जेव्हा नागरिक म्हणून मतदान करण्याचा सर्वांत मोठा हक्क वापरायची वेळ येते, तेव्हा मात्र आमच्यातला नागरिक सर्व अक्कल गहाण ठेवून रजेवर गेलेला असतो, नाही का?
 
 
जळगावकरांनो, तुम्हीही फार काही विचार करू नका. सत्ता काय, कुणाची ना कुणाची ंयेणारच आहे आणि निवडून येणारे काही तुमची सेवा करणार नाही. तुम्हाला किराणा भरून देणार नाही, तुम्हाला मोफत पेट्रोल-डिझेल देणार नाही, मोफत वीज देणार नाही, राशन मिळवून देणार नाही, वीडी-सिगारेट-गुटख्याच्या किमतीही कमी करणार नाही, तुमच्या मुलांना मोफत शिक्षणही मिळणार नाही आणि एकंदरीत काय, तर तुमचे ‘अच्छे दिन’ कधीच येणार नाही. मग सांगा, काय उपयोग मतदान करून? त्यापेक्षा एक दिवसाची पगारी सुटी तुम्हाला मिळतेय. ती मतदानासाठी वाया घालवण्यापेक्षा आपल्या मुलांना व बायकोला घेऊन कुठेतरी हिल्स स्टेशनला फिरायला जा. ‘अच्छे दिन’ न आल्यामुळे आपली परिस्थिती जास्तच बिकट झाली असेल, तर आपल्या जवळची मनुदेवी संस्थान, पद्मालय, पाल, उनपदेवसारखी प्रेक्षणीय स्थळे आपली आतुरतेनं वाट पाहत आहेत, तिथं जा. मतदानासाठी काही आपला मौल्यवान वेळ वाया घालवत बसू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय ते माहीत आहे का? तुम्ही मतदान नाही केलं तर तुमचा सत्ताधार्‍यांना भविष्यात जाब विचारायचा नैतिक अधिकारही निघून जाईल. म्हणजे मग कसं, जे होईल ते चांगलं म्हणायचं. आहो, यालाच म्हणतात अच्छे दिन आणि ते तुम्हाला मिळणार! समाधानी जीवन जगाल.
 
 
महान नीतीशास्त्रज्ञ आर्य चाणक्य म्हंटले होते की, एखाद्या देशाची जनता जशी असते, तसेच तेथील सरकार असते. कारण या जनतेनेच ते निवडून दिलेले असते. त्यामुळे जसे आचार विचार जनतेचे, तसेच सरकारचे. जनता जर ढोंगी पाखंडी असेल तर तसेच त्यांचे सरकारही. जनता जर कर्तव्यदक्ष व जागृत असेल तर सरकारही सदैव जागृत व कर्तव्यदक्ष असते. पण जळगावकरांनो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. एक दिवसाची सुटी व्यर्थ जाऊ देऊ नका. तथापी, एक गोष्ट याद ठेवा की, पुढील पाच वर्षे तुमच्या मानगुटीवर सरकार नव्हे तर भूत बसलेले असेल, जे तुमच्या कर्माची फळं तुम्हाला अगदी मोफत देईल.
 
 
 
 
- कल्पेश गजानन जोशी
Kavesh37yahoo.com
 
@@AUTHORINFO_V1@@