भीष्मांना शरण!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Aug-2018
Total Views |


 

कृष्ण म्हणाला, युधिष्ठिरा, असा निराश नको होऊस. तुझ्यासोबत तुझे भाऊ आहेत, मी आहे. ते भीष्मांवर खूप प्रेम करतात म्हणून त्यांचे धाडस होत नसेल, तर मी त्यांना मारेन. मी भीष्मांना युद्धात आव्हान देतो. मला उद्याचा दिवस दे. जे पांडवांचे शत्रू ते माझेही शत्रूच.
 

भीष्म आजोबांच्या अतुलनीय पराक्रमापुढे पांडव सेना हतप्रभ झाली आणि युधिष्ठिर खूप दुःखी झाला. तो श्रीकृष्णाला म्हणाला, “कृष्णा, आम्ही हे युद्ध कधीच जिंकू शकणार नाही. जोवर पितामह भीष्म जीवंत आहेत, तोवर पांडवांचा असाच संहार होत राहील. त्यांच्यासमोर जणू आपलं सैन्य वितळून जात आहे. एकवेळ इंद्राचा पराभव होईल किंवा कुबेराला जिंकता येईल, गदाधारी यम पण माघार घेईल; परंतु भीष्मांच्या सर्पाकार बाणांपुढे कुणाचेही चालत नाही! मला तर हे युद्ध सोडून पुन्हा वनवासी व्हावं, असं वाटतं. मी त्यांना ठार कसे करु ते मला सांग.”

 

अरे, अर्जुनाने शपथ घेतली आहे की, तो भीष्मांचा वध करेल. त्याला हे काही फार कठीण नाही. तुम्ही सारे भाऊ चांगले आहात म्हणून तुम्हाला जर हे शक्य नसेल, तर मी ते करायला तयार आहे. तू हे काम माझ्यावर सोपव.” हे ऐकून युधिष्ठिर गहिवरला तो म्हणाला, “कृष्णा, तू भीष्मांना ठार करू शकतोस, हे मला चांगले ठाऊक आहे. तू आम्हा पांडवांवर खूप प्रेम करतोस आणि केवळ रथाचा सारथी नसून आमच्या जीवनाचाच सारथी आहेस; पण आमच्यासाठी आम्ही तुला तुझी शपथ मोडू देणार नाही. या युद्धात शस्त्र हाती घेणार नाही, असे वचन तूच दुर्योधनाला दिलं आहेस. तुझ्या नावाला आम्ही कलंक लागू देणार नाही. मला काहीतरी वेगळाच मार्ग शोधला पाहिजे.” तो पुढे म्हणाला, “युद्धाच्या पहिल्या दिवशी पितामह मला असं म्हणाले की, त्यांचा इलाज नाही म्हणून ते दुर्योधनाच्या बाजूने लढणार आहेत. मला खात्री आहे, त्यांचे आमच्यावर जास्त प्रेम आहे. तेव्हा मी त्यांनाच जाऊन विचारीन की, त्यांचा वध कसा होऊ शकेल.” श्रीकृष्ण म्हणाला, “मला तुझी ही कल्पना अतिशय आवडली. भीष्म तुला नक्कीच ते सांगतील. चल, आजच रात्री आपण त्यांच्याकडे जाऊया.” पाच पांडव आणि श्रीकृष्ण रात्री त्यांच्या राहुटीकडे निघाले.

 

दुर्योधनाच्या सैन्यतळावर शांतता होती. सर्व गाढ झोपेत होते. भीष्मांच्या तंबूत त्या सहाजणांनी प्रवेश केला. त्यांना बघून भीष्म आनंदित झाले. ते म्हणाले, “हे कृष्णा, तुम्हा सर्वांना पाहून मला खूप हर्ष झाला आहे. मी तुमच्याकरीता काय करू? तुम्ही असे चिलखताविना मध्यरात्री कसे काय आलात? तुमची काय इच्छा आहे?” युधिष्ठिर उदासपणे बोलला, “पितामह, आम्ही हे युद्ध कसं जिंकू? विजय तर तुमचाच आहे. तुम्ही आगीच्या वणव्याप्रमाणे आमचं सैन्य रोज जाळत आहात. मला तुम्हाला काही विचारायचं आहे, पण संकोच होतो.” पुढे तो बोलूच शकला नाही. त्याचा गळा भरून आला. डोळे अश्रूंनी भरले. पितामहांनी त्याच्या शिरावर हात ठेवला आणि म्हणाले, “वत्सा, मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. बोल, काय करू? ते जर मला शक्य असेल तर मी नक्कीच करीन.”

 

युधिष्ठिर म्हणाला, “पितामह, जोवर तुमचा वध होत नाही, तोपर्यंत आम्ही जिंकणे शक्य नाही. तुमचा वध कसा करायचा हेच विचारायला मी इथे आलो आहे. मी शांतिप्रिय माणूस आहे. मी युद्धाचा द्वेष करतो. क्षत्रियाचा जन्म घेतला म्हणून मला पश्चाताप होतोय. पण हे युद्ध जिंकायचं असेल, तर मला तुमचा वधचं पाहावा लागेल. तो कसा करायचा हे मला सांगा.” तो हुंदके देऊन देऊन रडत होता. त्याचं शरीर गदागदा हलू लागलं. त्याला पुढे बोलवेना. भीष्मांनी हसून पांडवांकडे पाहिले आणि म्हणाले, “तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. जोवर मी जीवंत आहे, तोवर तुम्ही जिंकणे अशक्य आहे. तुम्ही मला खरं तर लगेच ठार केलं पाहिजे.” युधिष्ठिर म्हणाला, “पितामह, तुमचा वध झालेला पाहणं तर मला असह्य वाटतं. कारण, तुम्ही आम्हा सर्वांनाच अतिशय प्रिय आहात. दुसरा काही मार्ग नाही का?” भीष्म म्हणाले, “वत्सा, नाही दुसरा कोणताच मार्ग नाही. मी आनंदाने माझे मरण स्वीकारीन. मलाच माझ्या अजिंक्यपणाचा आता वीट आला आहे. मला कुणीच हरवू शकत नाही, इंद्रही नाही. वत्सा, मला आता म्हणावी किती ओढ लागली आहे. हे तुला कळलं तर खूप बरं होईल. कारण मरण ही तर माझी दयामय सुटका आहे. तू मला माझा वध कसा करायचा हे विचारून उपकृतच केलं आहे. यासाठी मी तुझा ऋणी आहे.”

 

भीष्म पुढे म्हणाले, “दोनच व्यक्ती माझा वध करू शकतात. एक म्हणजे श्रीकृष्ण आणि दुसरा अर्जुन.” त्यांनी अर्जुनाला जवळ घेतले म्हणाले, “वत्सा, उद्याच तू माझा वध कर. मी खूप थकलो आहे. मला शांतीची नितांत गरज आहे. तू माझ्यावर खरं प्रेम करत असशील, तर माझा वध कर.” ते पुढे म्हणाले, “मी लढत असेन, तर तुम्ही माझा वध करू शकणार नाही. मी शस्त्र खाली ठेवली, तर तुम्ही ते करू शकाल. याकरिता एक करा, तुम्ही माझ्या समोर शिखंडीला उभे करा. मी लगेच माझी शस्त्रे खाली ठेवीन. कारण, मी स्त्रीबरोबर अथवा आधी स्त्री असलेल्या व्यक्तीशी लढणार नाही. पूर्वाश्रमीची अंबा ही काशीराजाची कन्या म्हणजेच आताची शिखंडी आहे. तुमच्या आज्या अंबिका अंबालिका यांची ही थोरली बहीण.” मग भीष्मांनी तिन्ही कन्यांचे केलेले हरण आदी सर्व कथा पांडवांना सांगितली. ते म्हणाले, “ही अंबा माझा द्वेष करते. तिचे माझ्याविषयीचे उत्कट प्रेम हेच माझ्या द्वेषाचे कारण आहे. द्वेष आणि प्रेम ही एकाच गोष्टीची दोन रूपे आहेत. या अंबेच्या मदतीनेच आता माझ्या मुक्तीची वेळ येईल. तिला माझ्यासमोर उभी करा. अर्जुना, तू तिच्या मागे उभा राहा, मी तिच्यासमोर शस्त्र खाली ठेवताक्षणीच तू माझा वध कर. आता कितीतरी दिवसांनी मला सुखाने झोपायचं आहे. तुम्हीही विश्रांती घ्या. आनंदाने मी तृप्त आहे. या आनंदाबद्दल मीच तुमचा ऋणी आहे.” भीष्मांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. सारे पांडव ओल्या डोळ्यांनी त्यांना वंदन करून निघाले. भीष्म अधिकच तेज:पुंज दिसू लागले. श्रीकृष्ण त्यांना म्हणाला, “या क्षणापासून तुम्ही आनंदातच राहाल. तुमचा आता पुनर्जन्म नाही. कुरुवंशातील सर्वश्रेष्ठ पुरूष तुम्ही असाल.”

-सुरेश कुळकर्णी

@@AUTHORINFO_V1@@