सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन सर्वांगीण विकासाचा आराखडा आखावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Aug-2018
Total Views |
 

 
 
जळगाव महानगराला अनेक अर्थाने संपन्न व वैभवशाली करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी वाद, अहंकार विसरून सुजाण, सेवाभावी नागरिकांना एकत्र आणावे आणि सर्वांगिण विकासाचा आराखडा आखून तो अंमलात आणावा अशी अपेक्षा मू.जे.महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य, जळगाव जनता सहकारी (शेड्यूल्ड) बँकेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ सी.ए. अनिल राव यांनी व्यक्त केली.
 
 
केशवस्मृती सेवासंस्था समूहात आणि अनेकविध शैक्षणिक चळवळीत अधिकारपदावर असूनही समर्पित व अभ्यासू, निगर्वी, पारदर्शी व्यक्तिमत्त्व म्हणून अनिल राव खान्देशात सुपरिचित आहेत. मनपा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘तरुण भारत’ने साधलेल्या सुसंवादात ते म्हणाले की,
 
 
* जिल्ह्याला त्या-त्या काळात बुद्धिवान, कर्तृत्त्ववान नेते मिळाले पण त्यांच्यातील विचार-दृष्टिकोनातील अंतर हा प्रगतीला जणू शाप राहिला आहे. हे चित्र सध्या मनपातही दिसते. ते संपावे.
 
* आधी आरोप-प्रत्यारोप आपण समजू शकतो, पण निवडून आल्यावर तरी संबंधितांनी शहरातील सर्व स्तरातील विचारी, सुजाण मंडळींशी संवाद साधत समन्वय, विचारपूर्वक शहर विकासाचा आराखडा तयार करुन अंमलात आणावा.
 
* काळाच्या ओघात अनेक बाबींकडे दुर्लक्ष झाल्याने जळगाव हे सध्या जणू मोठे खेडे झाले आहे. हे चित्र बदलण्यासाठी रोजगाराभिमुख औद्योगिक विकासाला पोषक वातावरण निर्माण केले जावे. खंडणीचे उद्योग तातडीने बंद झाले पाहिजेत.
 
* मनपाच्या शाळांमधील गळती थांबविण्यासाठी, अर्थात सामान्य-गरजू परिवारातील मुला-मुलींना नाममात्र खर्चात उत्तम शिक्षण दिले जावे यासाठी सामाजिक, सेवाभावी, शैक्षणिक संस्थांना त्यांचे पालकत्व द्यावे. त्यासाठी त्यांना करमुक्त सेवा व विशेष सवलती, अनुदान इ. द्यावे.
 
* स्वच्छता आणि आरोग्य संवर्धनासाठी भुयारी गटारी कराव्यात. सांडपाण्याचे शुद्धीकरण करुन त्याचा किमान शेतीसाठी उपयोग व्हावा. इंदूर मनपाकडून खूप काही योजना समजून घेत पारदर्शी पद्धतीने अंमलात आणाव्यात.
 
* नियोजित मेडिकल हबप्रमाणे जळगाव पर्यटन हब करता येईल, यादृष्टिने तारांगण, संग्रहालय इ. काही विशेष प्रकल्प व्हावेत.
 
* जळगावचे पूर्वीचे सांस्कृतिक वैभव पुन्हा प्राप्त होण्यासाठी वादविवाद, वक्तृत्त्व, सांगीतिक, नाट्य, साहित्यात्मक उपक्रम आदींना प्रोत्साहन मिळावे.
 
* क्रीडा क्षेत्रातही देश-जागतिक पातळीवर चमकतील असे खेळाडू घडविण्याचे भरीव प्रयत्न व्हावेत.
 
* व्यक्तिगत अहंकार, मोठेपणाच्या मोहातून मुक्त होत सर्वांनी मनपातील गाळ्यांचा प्रश्‍न सोडवावा आणि फेरीवाला धोरण अंमलात आणावे.
 
* लोकप्रतिनिधी आणि पक्षांनी दरवर्षी आश्‍वासने-जाहीरनाम्यांची काय पूर्तता केली, याचा कार्यअहवाल द्यावा, अशी अपेक्षाही अनिल राव यांनी व्यक्त केली.
 
@@AUTHORINFO_V1@@