बेशिस्त कारभारामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिघडली : अजित पवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |
 

 
 
 
नागपूर : सरकारचा नियोजनशून्य, बेशिस्त कारभार, उधळपट्टी यामुळेच राज्याची आर्थिक स्थिती बिघडली आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते अजित पवार त्यांनी केली. आज पावसाळी अधिवेशनादरम्यान पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान बोलताना यांनी सरकारला विविध प्रश्नांवरुन धारेवर धरले. आम्ही सरकारमध्ये असताना राज्यावर २ लाख ७१ हजार कोटीचे कर्ज होते. आता राज्याची परिस्थिती पाहता येत्या काळात राज्यावर ५ लाख कोटीचे कर्ज होणार असे वाटत असल्याची व्यथा त्यांनी व्यक्त केली.
 
 
 
सरकारने २५० कोटी रुपयांची तरतूद बुलेट ट्रेनसाठी केली आहे. राज्यात अनेक महत्त्वाच्या प्रकल्पाची गरज आहे. अनेक आमदारांचा विरोध असतानाही बुलेट ट्रेनचा हट्ट कशासाठी? असा सवाल त्यांनी केला. शिवसेनेचा बुलेट ट्रेनला विरोध असेल तर त्यांनी पुरवणी मागणी मंजूर करून घेण्यासाठी विरोध नोंदवावा, असा सल्लाही त्यांनी शिवसेनेला दिला. आज दुधाचा धंदा बरबाद होण्याच्या मार्गावर आहे. सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देऊन हे क्षेत्र वाचवायला हवे. तसेच बोंडअळीमुळे ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही. पुरवणी मागणी मंजूर करून घेताना सरकारने मदतीबाबतही स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
 
 
 
 
राज्यात क्रीडाक्षेत्र दुर्लक्षित झाले असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. या क्षेत्रासाठी निधी नाही. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना, इतर क्रीडा संघटनांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. सरकारने बैठक घेऊन हे प्रश्न मार्गी लावावे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी योजना आखाव्यात अशी सूचना त्यांनी सरकारला दिली. राज्यात १५,४०० शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत त्याबाबत अजित पवार यांनी सभागृहात जाब विचारला. शिक्षणाची हेळसांड करणाऱ्या सरकारने याबाबत लवकरात लवकर उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
 
 
 
 
औरंगाबाद येथील बांधकाम खात्याचे सचिव सी.पी.जोशी यांनी डांबर घोटाळा केल्याचा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे. या सचिवांची पाठराखण का केली जात आहे, असा प्रश्न पवार यांनी सभागृहात उपस्थित केला. तसेच पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैधपणे वाळू तस्करी केली जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत. कारवाई करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर वाळूमाफियांमार्फत जीवघेणे हल्ले होत आहेत. सरकार याबाबत काही पाऊले उचलणार आहे का? असा प्रश्न विचारत त्यांनी सरकारला धारेवर धरले. कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मांडत, आजही प्रकल्पग्रस्तांची ही तिसरी-चौथी पिढी त्यांच्या हक्कांसाठी झगडत असल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी केले. सरकारने हे प्रश्न ताबडतोब मार्गी लावावे यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी त्यांनी केली.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@