कोणाच्या हट्टामुळे अधिवेशन नागपुरात घेतले : अजित पवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |
 

 
 
 
नागपूर : पावसाळी अधिवेशनाचे पहिले तीन दिवस वाया गेले. नागपुरात अधिवेशन घेण्यापूर्वी सरकारने नियोजन केले नव्हते का? कोणाच्या हट्टामुळे अधिवेशन नागपुरात घेतले गेले, असा प्रश्न विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी विचारला आहे. पावसामुळे गेल्या आठवड्यात सभागृहाचे कामकाज रखडल्यानंतर आजचा दिवस सुरू होताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. विधिमंडळाचे कामकाज तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा सुरु झाले. त्यावेळी सभागृहाच्या वाया गेलेल्या कालावधीबद्दल पवार यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
 
 
 
आज मुंबई जलमय झाली आहे, त्यादिवशी नागपुरात विधानभवनात पाणी शिरले होते. संपूर्ण राज्यात जलयुक्त शिवार योजनेचे काम अतिशय जोमाने सुरू आहे. पण शहरात जलयुक्त आवार झाले आहे, असा टोला त्यांनी लगावला. सरकार यावर उडवाउडवीची उत्तरे देत आहे, अशी उत्तरे देऊन चालणार नाही. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा वाकून बघतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. हा विधिमंडळाचा अवमान आहे, असेही ते म्हणाले. आमदारांना राहण्याची व्यवस्था नाही, रामगिरी बंगल्यात साप आढळला आहे, मुख्यमंत्र्यांना काही झाले असते तर, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.
 
 
 
अनेकांना पावसाळ्यात पिकनिकला जाण्याचा शौक असतो. परंतु पिकनिकला गेलेल्या लोकांच्या जिवीताच्या सुरक्षिततेकडे प्रशासन लक्ष देत नाही, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. राजधानी, उपराजधानी आणि अवघ्या महाराष्ट्राची परिस्थिती बिकट आहे. शुक्रवारी नागपूर जलमय होण्याचे कारण काय होते? ही जबाबदारी कोणाची होती? लोकांचा पैसा वाया गेला आहे. याला जबाबदार कोण हे स्पष्ट झालेच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
 
@@AUTHORINFO_V1@@