वेदशास्त्राला आधार विज्ञानाचाच...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |

त्रिपदी परिवाराचे प्रमुख डॉ.बाबासाहेब तराणेकर : संवाद ‘तरुण भारत’शी 

जळगाव, ८ जुलै
वेदशास्त्र हे विज्ञानावर आधारित असून दैनंदिन जीवनात त्याचा आपल्याला अनुभव येतो, असे प्रतिपादन त्रिपदी परिवाराचे प्रमुख डॉ. बाबासाहेब तराणेकर (इंदूर) यांनी रविवारी ८ जुलै रोजी सायंकाळी ‘ जळगाव तरुण भारत’च्या सदिच्छा भेटीप्रसंगी केले. यावेळी माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नंदू नागराज, संचालक सचिन बोरसे व सौ. मीनल बोरसे, रा.स्व.संघाचे कार्यकर्ते अनिल तारे आदींनी सुसंवादात भाग घेतला.
 
 
जळगावशी ऋणानुबंध
त्रिपदी परिवाराच्या नानासाहेब परिवाराच्या ८ राज्यात ३५० शाखा आहेत. जळगावसह खान्देशात मोठा साधक परिवार आहे. जळगावशी असलेल्या ऋणानुबंधाला उजाळा देताना ते म्हणाले की, १९७२ साली एम.एस्सी. (जिऑलॉजी) पूर्ण केल्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत रुजू झालो. १९७३ ला पहिली नियुक्ती जळगाव येथेच झाली. त्यामुळे जळगावशी स्नेह विशेष आहे. यानंतर १९८६ ते १९८९ या कालखंडात उत्तर महाराष्ट्रासाठी जळगाव येथून सेवा बजावली. रा.स्व.संघाचे द्वितीय सरसंचालक स्व.माधवराव गोळवलकर गुरुजींचे सान्निध्यसुध्दा काही काळ लाभल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पर्यावरण व्यवस्थापनमध्ये डॉक्टरेट मिळवली आहे.
 
 
वेदशास्त्र आणि विज्ञान यांचा ताळमेळ जाणून घेण्यासाठी आणि तसा प्रयोग करण्यासाठी १९८५-८६ ला स्वदेशी विज्ञान संशोधन संस्था धंतोली (नागपूर) येथे स्थापन केली. यात विज्ञानावर मार्गदर्शन व व्याख्यान होत असत. खापरीला स्वदेशी विज्ञान परिषद झाली. यात दिल्लीचे डॉ.ए.के.जैन, नॅडेपकाका यांच्या सारखे लोक सहभागी झाले होते. तीर्थ आणि साधारण पाणी याचे विश्‍लेषण केले. गोमुत्राचे पृथक्करण करुन गोमुत्रावर भिंतीवरील घडयाळ चालवून पाहिले असता ते सुरु झाले, अशी माहितीही त्यांनी दिली.
 
 
वास्तुशास्त्राची माहितीही वेदशास्त्रात
वाचनाची आणि संशोधनाची आवड असल्याने त्यांच्या व्यक्तिगत ग्रंथालयात ३ हजार ५०० पुस्तके आहेत. वेद व अन्य शास्त्रात श्लोक स्वरुपात विटा कशा असाव्यात, कॉलम कसे बांधावेत, सिमेंट निर्मिती कशी करावी, याची माहिती मिळते. शिल्पशास्त्र आणि वास्तुशास्त्राची माहितीही वेद शास्त्रात आहे. सध्या ज्योतिष सांगणारे अनेकजण वास्तुशास्त्र सांगू लागले आहेत. ब्रिटिशंानी वातावरणाचा अभ्यास केला असल्याने भारतातील त्यांची अनेक कार्यालये उत्तर दिशेला आहेत, असे ते म्हणाले.
 
 
गाणगापूर येथील संस्थेची वास्तू ठरली
गाणगापूर येथे संस्थेची जागा आहे. तेथे एक वास्तूशास्त्रज्ञ आला होता. त्याने वास्तुचा दोष सांगितला होता. संचालकांनी त्याबाबत माहिती दिल्याने वास्तूशास्त्र जाणून घेण्यासाठी या शास्त्राचा अभ्यास सुरु केला होता.
साखरेचा गोडवा कडवट होत आहे
 
 
पश्‍चिम महाराष्ट्रात साखर उद्योग जोमात सुरु झाले त्यामुळे उसाची शेती सुध्दा मोठया प्रमाणात केली जाते. शेतीत वापरली जाणारी रसायने व साखर कारखान्यातील रसायनेयुक्त पाणी जमिनीत मुरल्याने त्यांच्याकडे गावातील विहिरींचे पाणी तुरट किंवा खारट होवू लागले होते, अशी माहितीही त्यांनी दिली.
 
 
विज्ञाननिष्ठ यज्ञ
कारंजा येथे गोवर्धन याग केला. यासाठी ८ ते १० एकर पडिक जमीन घेतली. या यागमध्ये शेतकर्‍यांसाठी प्रवचन न ठेवता शेतीवरील व्याख्याने ठेवली. धन्वंतरी यज्ञात सुमारे ६५ डॉक्टर सहभागी झाले होते. शास्त्रीय संगीतातील रागांचा प्रयोग २२ रुग्णांवर करुन सांधेदुखीच्या रुग्णांना त्याचा लाभ झाल्याचे दिसले. झाडांवरसुध्दा ध्वनीचा प्रभाव पडतो. छायाचित्राव्दारे हा प्रयोग तुम्ही करुन पाहू शकता, असा दावाही त्यांनी केला.
 
 
यज्ञामुळे पर्जन्यवृष्टी होवू शकते
दुष्काळी स्थितीत कृत्रिम पावसाचा प्रयोग होतो. परंतु तो यशस्वी होतोच असे नाही. तसेच पर्जन्य यागाचे आहे. विशिष्ट समिधा टाकून हा यज्ञ केला जातो. त्यामुळे पर्जन्याची शक्यता असते. पाऊस पडण्यासाठी तेथील हवा उष्ण असावी लागते तसेच वातावरणात बाष्प असावे लागते. उष्ण हवा निघून गेली की ढग गोळा होवून पाऊस पडतोे. घरातील किटाणू , विषाणू नष्ट करण्यासाठी याग करावा, त्यासाठी पुरोहिताची गरज नाही, असेही ते म्हणाले. औदुंबराचे महत्त्व, वातावरण संतुलनासाठी निर्माण झालेल्या आख्यायिका यांचीही माहिती त्यांनी दिली.
@@AUTHORINFO_V1@@