भाजपाने उलटवली खेळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |
 
 
भाजपाला जागा वाटपात आतापर्यंत थट्टामस्करीत घेणार्‍या खाविआच्या नेत्यांना गेल्या दोन दिवसांत ना. गिरीश महाजन यांनी कायमचा लक्षात राहील, असा धडा शिकविला आहे. ‘भाजपाला ४० जागा कशाच्या आधारे द्यायच्या?’, असा प्रश्‍न करणार्‍यांना ना. महाजन यांनी तोंड दाखवायलाही जागा शिल्लक ठेवली नाही. खाविआच्या नेत्यांनी स्वतःहून पुढे येत महापालिका निवडणुकीत युती करण्याचा प्रस्ताव भाजपाला दिला होता.
 
‘शहराचा विकास’ या एकमेव मुद्यावर युती करण्याचे संकेत भाजपातर्फे देण्यात आले होते. पण जागा वाटपाचा तिढा काही केल्या सुटत नव्हता. भाजपाची ‘मिशन ५० प्लस’च्या अनुषंगाने जागांची मागणी होती तर खाविआचे नेते ४० देखील जागा देण्यास तयार नव्हते. एवढ्या जागा कशाच्या आधारे द्यायच्या? अशा अहंकारी स्वरात त्यांनी भाजपाच्या नेत्यांना विचारणा केली होती. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाला तुच्छ लेखण्याची केलेली चूक अल्पावधीतच आपल्या अंगाशी येईल याची सुतराम कल्पनाही या नेत्याला आली नसावी. अवघ्या दोनच दिवसात म्हणजे शनिवारी व रविवारी ना. गिरीश महाजन यांनी खान्देश विकास आघाडी, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसेला सुरूंग लावत त्यांच्या दिग्गज नगरसेवकांना भाजपात आणले. आजवर सुरेशदादांचे नेतृत्त्व मान्य करणारे महापौर ललित कोल्हे यांच्या भाजपा प्रवेशाने तर या सर्वांवर कळस चढविला. ही खेळी अत्यंत अनपेक्षितपणे खेळली गेल्याने खाविआतील भलेभले चाट पडले. अजूनही काही नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी भाजपाच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. या पक्ष प्रवेशाने भाजपाकडील नगरसेवकांचे संख्याबळ ४० च्याही पार गेले आहे. आता युती करायची असेल, तर ७५ पैकी सर्वाधिक जागा भाजपाच्या वाट्याला आल्या पाहिजे, अशी कडक सूचना आता ना. महाजन यांनी केली आहे. भाजपाने युतीचे संकेत दिले म्हणजे हा पक्ष दुबळा असल्याचा गैरसमज कुणी करून घेऊ नये, असा संदेशही यानिमित्ताने गेला आहे. भाजपाच्या या खेळीचीच आज कार्यकर्त्यांमध्ये खमंग चर्चा होती. एरवी नाथाभाऊंनीही स्वबळावर लढण्याचा सल्ला दिला होताच. त्या दिशेने होत असलेली वाटचाल पक्षाला संजीवनी ठरत आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@