साईडपट्टया उठल्या नागरिकांच्या जीवावर...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |

समांतर रस्ते होतील तरी कधी? जनतेच्या प्रतिक्रियेतून उमटला संतप्त सूर

 
जळगाव :
शासनाच्या निष्काळजीपणामुळे मनपा हद्दीतून जाणार्‍या महामार्ग क्रमांक ६वर शिवकॉलनी स्टॉपवर सतत होणार्‍या अपघातात शनिवारी, ७ रोजी महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
 
 
महामार्गावरील साईडपट्ट्यांवर टाकलेला मुरुम पावसामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे साईडपट्ट्यांची खोली वाढली आहे. अशा धोकादायक स्थितीत दुचाकी रस्त्यावर चढविणे अथवा उतरविणे अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे साईडपट्टया नागरिकांच्या जीवावर उठल्या आहेत.
 
 
वारंवार घडणार्‍या अपघातांमुळे समांतर रस्ते होतील तरी कधी, असा सूर ‘तरुण भारत’ने जनतेच्या घेतलेल्या प्रतिक्रियांमधून उमटला. दरम्यान, शिवकॉलनी स्टॉप सर्वाधिक धोकादायक ठरल्याचे तरी सद्यस्थितीला दिसत आहे.
 
 
शहरातून जाणारा महामार्ग क्र.६ बांभोरी ते तरसोद फाट्यापर्यंत जाणारा महामार्ग जीवघेणा झाला आहे. याकडे संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. शिवकॉलनी स्टॉपवर १३ ते १४ विद्यार्थी, अबालवृध्द, महिलांचे हकनाक बळी गेले आहे. अशाच एका घटनेत शनिवारी ७ जुलै रोजी दुपारच्या सुमारास साईडपट्टी नसल्यामुळे दुचाकीवरुन महिला खाली पडून भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने तिला चिरडून महिलेचा मृत्यू झाला.
 
 
यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी वारंवार मागण्यांसह पाठपुरावा करुनही अद्यापही संबंधितांकडून दखल घेतली गेली नाही. निष्पाप लोकांच्या बळींना आणि कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी महामार्ग जाम करुन आंदोलनाचा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
 
 
निवेदनातील मागण्या मान्य न झाल्यास स्थानिक प्रशासन आणि शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्यांची होळी करण्यात येईल, असेही त्यात नमूद केले आहे. निवेदनावर चेतन बोरसे यांच्यासह शिवकॉलनी परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षर्‍या आहेत. कुंभकर्णी निद्रावस्थेत असलेल्या प्रशासनाने काही एक हालचाल केली नसल्याने अपघात सुरू आहे. सर्वेक्षणात जिल्ह्यातील शिव कॉलनी स्टॉप, तरसोद फाटा व चिंचगव्हाण फाटा (ता. चाळीसगाव) हे सर्वाधिक जास्त अपघाताचे स्थळ असल्याची नोंद केली आहे. तसेच शिव कॉलनी स्टॉपवर १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१७ या कालावधी दरम्यान ६ अपघातात ६ जणांचे मृत्यू तर १० जण गंभीर जखमी झाल्याचे १६ महिन्यांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात म्हटले आहे. यासंदर्भात जिल्हा नियोजन भवनात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची पहिलीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत अपघाताविषयी आकडेवारी जाहीर केली; पण अधिकारीच हजर नसल्यामुळे ही बैठक रद्द करण्याची नामुष्की ओढवली होती. त्यानंतर आजतागायत ही बैठकच झाली नाही.
शिव कॉलनी स्टॉपजवळ इतर वाहने, पादचार्‍यांची महामार्गाच्या दोन्ही बाजूने बेकायदेशीर प्रवेश तसेच रेल्वे पुलाकडून येणारा उतारामुळे अपघात होता. त्यामुळे याठिकाणी अपघात स्थळाचा फलक लावणे, पाइप रेलिंग बसवणे असे पर्यायही यापूर्वी सुज्ञ नागरिकांनी प्रशासनाला सूचविले आहेत. मात्र, त्याचीही अद्याप अंमलबजावणीच झालेली नसल्याने जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे शासनाने हा प्रश्न त्वरित मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
 
समांतर रस्त्याची नागरिकांना प्रतीक्षा
शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने अपघात होत असल्याने समांतर रस्ते कधी मार्गी लागतील याची नागरिकांना प्रतीक्षा आहे. दरम्यान, समांतर रस्त्याच्या कामांना विलंब झाल्याचे मान्य करीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा विषय प्राधान्याने मार्गी लावण्याचे आश्वासन आहे. समांतर रस्त्यासाठी १३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याबाबतचा तांत्रिक मंजुरीचा विषय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडे थांबून आहे. याबाबत माजी आ. सुरेशदादा जैन यांनी मागील महिन्यात केंद्रीयमंत्री गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यावेळी त्यांनी महिन्याभरात विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. महिना होऊनही समांतर रस्त्यांच्या फाइलला मंजुरी अद्यापतरी दिलेली नाही.
या मागण्यांचा आहे समावेश
शिवकॉलनी स्टॉप चौफुलीवर त्वरित सिग्नल बसविण्यात यावा. स्पीड ब्रेकर स्टॉपपासून ठराविक अंतरावर दोन्ही बाजूला जाण्या-येण्याचा मार्ग मधला मार्ग सोडून बसविण्यात यावा. हायवेलगतचे साईडपट्ट्या त्वरित टाकण्यात याव्यात. कायम स्वरुपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी. शहर हद्द ते मौजे बांभोरी ते मौजे तरसोद फाटा महामार्ग क्र.६वर कायम स्वरुपी स्पिडो डिटेक्टर मशिन यंत्रणा राबवून फिरते पथक नेमावे. रा.म.क्र.६ च्या खालून भुयारी मार्ग द्यावा. शिवकॉलनी स्टॉप चौफुलीवरील अतिक्रमणे त्वरित हटविण्यात यावे. जळगाव शहर हद्द ते मौजे बांभोरी ते मौजे तरसोद फाटा महामार्ग क्र.६ च्यालगत आजूबाजूने रस्त्यांची त्वरित निर्मिती करावी. शिवकॉलनी ते गणेश कॉलनी परिसरातील तसेच जळगाव शहर मनपा हद्दीतील अवास्तव स्पीड ब्रेकर काढावे.
 
समांतर रस्त्यांची गरज
वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे. अपघातांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यासाठी रस्ते चांगल्या दर्जाचे असायला हवे. त्यामुळे अपघातांवर आळा घालण्यास मदत होईल. साईड पट्ट्यांमुळे अपघातांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शिवकॉलनी स्टॉपजवळील साईड पट्ट्यांची दयनिय अवस्था झाल्याने प्रशासनाने कुंभकर्णी झोप न घेता समांतर रस्त्यांसाठी तातडीने प्रयत्न करण्याची गरज आहे.
- चंद्रभान पाटील, हॉटेल व्यावसायिक
अतिक्रमणधारकांचा वाढता त्रास
शासनाला समांतर रस्ते करण्याची गरज असून मात्र, त्याआधी रस्त्यालगतची वाढती अतिक्रमणे स्वच्छेने काढण्याची गरज आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण न होता त्यांना जागा देऊन रस्ते मोकळे होण्यास मदत होवू शकते. शासनाने पोकळ आश्वासने न देता समांतर रस्त्यांचा प्रश्न लवकर सोडवावा. भविष्यात जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय शासन जागे होणार नाही. सामंजस्याने प्रश्न मिटल्यास अपघातांची मालिका थांबून निष्पाप प्राण वाचण्यास मदत होईल.
-चेतन बोरसे, नागरिक
साईडपट्ट्यांची सुधारणा व्हावी
शिवकॉलनी स्टॉपजवळील भाग अपघातांना निमंत्रण देणारा ठरला आहे. शासनासह अधिकार्‍यांनी याकडे गंभीरतेने पाहून रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा. डोळ्यासमोरील घटनांमुळे मन हेलावून जाते. अपघातात दिवसेंदिवस बळी जाणार्‍यांची संख्या वाढत राहिल्यास आश्वासने फोल ठरू नये. त्यावर कठोर अंमलबजावणी होऊन साईडपट्ट्यांची सुधारणा होणे महत्त्वाचे आहे.
- सुमनबाई भोई, व्यावसायिक
आश्वासने नको, कृती हवी
वाढती वाहनांची संख्या लक्षात घेऊन वाहनधारकांनी वाहने शिस्तीत चालविणे गरजेचे आहे. एसटीच्या चालकांनी आपली वाहने उभी करतांना दक्षता घेण्याची गरज आहे. रस्त्यालगतची अतिक्रमणे दूर केल्यास रस्ते मोकळे होतील. अतिक्रमणधारकांचा दिवसेंदिवस वाढत जाणारा त्रास अपघात कमी करण्यास महत्त्वाचा भाग ठरु शकतो. प्रशासनाने नुसती आश्वासने न देता कृती करुन दाखवायला हवी.
- महेंद्र पाटील, रिक्षा चालक
हकनाक बळी जातायेत
शासन आणि अधिकार्‍यांच्या आश्वासनामुळे सर्वसामान्य जनतेला अपघाताला निमंत्रण द्यावे लागते. त्यामुळे दोघांनीही गंभीररित्या रस्त्यांचा प्रश्न सोडविल्यास अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल. दिलेली आश्वासनांची वेळीच पूर्तता झाल्यास निष्पाप जिवांचे हकनाक बळी जाणार नाही. एसटी बसेस थांब्यावर थांबल्या पाहिजे. अवजड वाहनांनी जबाबदारीने वाहने चालविण्याची गरज आहे. शिवकॉलनी स्टॉपजवळ कुठेही सिग्नल नसल्याने अनेकवेळा वाहनधारकांमध्ये गोंधळही निर्माण होतो.
- अमोल गायकवाड, महाविद्यालयीन विद्यार्थी
 
@@AUTHORINFO_V1@@