‘शतप्रतिशत’च्या दिशेने आणखी एक पाऊल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |



 

विधानपरिषदेतही आता भाजपच सर्वात मोठा पक्ष

 

११ सदस्यांची निवडणूक अखेर बिनविरोध होणार
 

मुंबई : २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवून राज्यातील सर्वांत मोठा पक्ष ठरल्यानंतर आता साडेतीन वर्षानंतर राज्य विधीमंडळाचे ‘ज्येष्ठ सभागृह’ अर्थात विधानपरिषदेतही भारतीय जनता पक्ष सर्वांत मोठा पक्ष ठरणार आहे. ११ विधानपरिषद सदस्यांची निवडणूक अखेर बिनविरोध होण्यावर शिक्कामोर्तब झाले असल्याने, आणि या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक ५ सदस्य निवडून येत असल्याने भाजपचे विधानपरिषदेतील संख्याबळ आता २२ पर्यंत पोहोचले आहे.

 

विधानसभा सदस्यांद्वारा निवडल्या जाणाऱ्या विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी नुकतीच निवडणूक जाहीर झाली होती. या ११ जागांमध्ये विद्यमान राष्ट्रवादीकडे सर्वाधिक ४ जागा असून कॉंग्रेसचे ३ आणि भाजपचे २ आणि शिवसेना, शेकापचे प्रत्येकी एक असे संख्याबळ होते. मात्र, आता भाजप विधानसभेतील सर्वांत मोठा पक्ष असल्याने ११ पैकी भाजपचे ५, कॉंग्रेस, शिवसेनेचे प्रत्येकी २, राष्ट्रवादीचा एक उमेदवार निवडला जाणार आहे. प्रत्येक उमेदवार विजयी होण्यासाठी २५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत प.दु.म. मंत्री महादेव जानकर, भाई उर्फ विजय गिरकर यांना पुन्हा उमेदवारी दिली तसेच, भाजपचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष राम पाटील-रातोळीकर, कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश नारायण पाटील, यवतमाळ जि.प.चे माजी अध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू निलय नाईक यांना उमेदवारी दिली. तसेच, सांगलीतील पृथ्वीराज देशमुख यांच्यारूपाने सहावा उमेदवार देत निवडणुकीत चुरस निर्माण केली. कॉंग्रेस, राष्ट्रवादीने तसेच शिवसेनेने आपल्या कोट्याइतकेच उमेदवार देत निवडणूक बिनविरोधच होईल, असा प्रयत्न केला, तर अकरावा उमेदवार म्हणून सर्वानुकुलता मिळवण्यात शेकापचे जयंत पाटील यशस्वी ठरले.

 

दरम्यान, पृथ्वीराज देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीतील चुरस संपुष्टात आली व निवडणूक बिनविरोध होण्यावर शिक्कामोर्तब झाले. या निवडणुकीमुळे विधानपरिषदेचा चेहरामोहरा बदलणार असून आतापर्यंत विधानपरिषदेत बहुमत टिकवणाऱ्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीला अल्पमतात जावे लागणार आहे. दि. २८ जुलै रोजी होणारे मतदान निवडणूक बिनविरोध झाल्याने केवळ औपचारिकता ठरले आहे. तर दुसरीकडे, विधानसभेत स्पष्ट बहुमत असणाऱ्या भाजप-शिवसेना सरकारला विधानपरिषदेतही आता स्पष्ट बहुमत मिळणार आहे. विधानसभेत संमत होऊन विधानपरिषदेकडे मान्यतेसाठी जाणारी महत्वाची विधेयके आता सरकारला विरोधकांच्या अडवणुकीशिवाय संमत करून घेता येणार आहेत. तसेच, गेल्या चार वर्षांत लोकसभेपासून अनेक राज्यांतील विधानसभा, महानगरपालिका-जिल्हा परिषदादि स्थानिक स्वराज्य संस्था, ते ग्रामपंचायतींपर्यंत देशासह राज्यातील सर्वांत मोठा पक्ष ठरलेला भाजप हा महाराष्ट्र विधानपरिषदेतील सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. भाजपच्या २२, तसेच भाजपसमर्थित ३ अपक्ष अशा २५ सदस्यांसह भाजप ‘नं. १’ ठरणार आहे. यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शाह यांनी दिलेला ‘शतप्रतिशत भाजप’चा कानमंत्र पक्षाने विधानपरिषदेतही प्रत्यक्षात सिद्ध केल्याचे दिसत आहे.

 

विधानपरिषदेतील पक्षीय बलाबल

 

निवडणुकीपूर्वी

निवडणुकीनंतर

भाजप

१८

२२

शिवसेना

११

१२

कॉंग्रेस

१८

१७

राष्ट्रवादी

२०

१७

इतर

अपक्ष

 

हे बडे नेते लोकसभा लढणार ?

या निवडणुकीत कॉंग्रेसने माजी प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री तसेच, विद्यमान विधानपरिषद उपसभापती माणिकराव ठाकरे यांना तर राष्ट्रवादीने माजी मंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना ठेंगा दाखवत विधानपरिषदेसाठी उमेदवारी नाकारली. या दोन बड्या नेत्यांना पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या. परंतु, हे दोन्ही नेते आता २०१९ मध्ये लोकसभा निवडणुका लढवणार असल्याचे या दोघांच्याही पक्षांतील सूत्रांनी सांगितले. सुनील तटकरे यांनी यापूर्वीही २०१४ मध्ये रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र शिवसेनेच्या अनंत गीते यांनी त्यांचा पराभव केला होता.

@@AUTHORINFO_V1@@