जळगावचे महापौर ललित कोल्हे भाजपात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |
 
जळगाव :
युतीचा प्रस्ताव स्वतःहून पुढे करायचा आणि जागा वाटपात मात्र, भाजपाची पध्दतशीर अडवणूक करणार्‍या खाविआला रविवारी ना. गिरीश महाजन यांनी जोरदार दणका दिला. सुरेशदादांचे नेतृत्त्व स्वीकारलेेले महापौर ललित कोल्हे व मनसेच्या नगरसेवकांना भाजपात आणून आपल्याच पक्षाचे पारडे जड असल्याचे ना. महाजन यांनी सिध्द केले.
 
 
ना. महाजन यांच्या आक्रमक चढाईने खाविआत मोठा भूकंप झाला असून, उरलेले नगरसेवक हातातून निसटू नयेत म्हणून त्यांच्यावर पाळत ठेवावी लागण्याची वेळ आघाडीच्या नेत्यांवर आली आहे. शनिवार व रविवार असे सलग दोन दिवस खाविआचे नगरसेवक फुटून भाजपात आले आहेत. याशिवाय आणखीही काही दिग्गज नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी भाजपाच्या संपर्कात असल्याचे कळते.
 
 
कोल्हे यांच्या पक्ष प्रवेशानंतर भाजपा कार्यालयात पत्रकारांशी बोलताना ना. गिरीश म्हणाले की, महापौर ललित कोल्हे व त्यांचे आई-वडील आणि मनसेच्या नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. सर्वच पक्षातून भाजपात येणार्‍यांची संख्या मोठी आहे. यामुळे महापालिकेची निवडणूक एकतर्फी होईल की, काय? असे वाटू लागले आहे. महापौर भाजपाचा झाला पाहिजे हे जळगावकरांनाही वाटतेय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव शहराच्या विकासासंदर्भातील बॅकलॉग भरून काढण्याचे आश्‍वासन दिले आहे.
 
कुणी केला भाजपात प्रवेश
महापौर ललित विजय कोल्हे, नगरसेवक विजयबापू कोल्हे, नगरसेविका सिंधूताई कोल्हे, नगरसेवक खुशबू बनसोडे, पद्माबाई सोनवणे, संतोष पाटील.
 
 
आता भाजपाचे पारडे जड
युतीसाठी अजूनही प्रयत्नशील आहे पण जागा वाटपात भाजपाचे पारडे जड राहणार आहे. त्यामुळे भाजपाला सन्मानपूर्वक जास्तीत जास्त जागा मिळाल्या तरच युतीबाबत विचार होईल. शहराच्या विकासासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही हे अनेकांच्या लक्षात आले आहे. पक्षाकडील नगरसेवकांचे संख्याबळ वाढून ४० पेक्षा अधिक झाले असल्याचे ना. महाजन यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.
 
 
शिवसेनेच्या एन्ट्रीने कोल्हे भाजपात
ललित कोल्हे पूर्वी मनसेत होते. नंतर खाविआत गेले. सुरेशदादांसोबत राहून ते महापौर झाले. पण खाविआ आता शिवसेना म्हणून लढणार असल्याने कोल्हे यांनी भाजपात प्रवेश केला असल्याचे ना. महाजन अन्य एका प्रश्‍नावर बोलताना सांगितले.
 
 
ना. महाजनांचे नेतृत्त्व मान्य : कोल्हे
महापौर ललित कोल्हे म्हणाले की, ना. गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वात मनसेच्या सहा नगरसेवकांसह भाजपात प्रवेश केला आहे. हा प्रवेश करताना जनतेचा कौलही महत्त्वाचा मानला.
 
कार्यकर्त्यांची प्रचंड संख्या
जयनगरमधील आ. चंदूभाई पटेल आणि बळीराम पेठेतील भाजपा कार्यालयात महापौर व मनसे पदाधिकार्‍यांच्या पक्ष प्रवेशप्रसंगी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या राजकीय भूकंपाची माहिती कळताच अनेकजण दोन्ही ठिकाणी आवर्जून हजेरी लावतांना दिसत होते. इकडे पक्ष प्रवेश घडत असताना तिकडे खाविआत मात्र, अनेकांचे चेहरे उतरले असल्याचे सांगण्यात येत होते. ना. महाजन यांच्या आजच्या या खेळीने भलेभले चक्रावून गेले.
 
@@AUTHORINFO_V1@@