रोग म्हणजे काय?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |


 

 

शरीराच्या पेशींमध्ये जेव्हा बदल होतो तेव्हा रोग होतो, असा एक समज रूढ आहे. म्हणजेच आपण जर तेवढ्या पेशीला बरे केले की, रोग बरा झाला असा एक समज केलेला असतो.
 

सर्वसाधारणपणे जेव्हा एखाद्या माणसाला आजार होतो किंवा तो अस्वस्थ होतो, तेव्हा त्याची तपासणी करून त्याच्या आजाराला एक नाव दिले जाते. उदाहरणार्थ, आपण म्हणतो की, एखाद्याला संधीवात आहे किंवा एखाद्याला कॅन्सर झाला आहे इत्यादी. तर औषध प्रणालींमध्ये रोगाच्या नावावरूनच रोग्याला औषध दिले जाते. म्हणजेच, संधीवात हा आजार सांध्यांशी निगडीत आहे, तर सांध्यांसाठीची औषधे दिली जातात. म्हणजेच आजाराच्या नावावरूनच आजाराची औषधे ठरवली जातात. या सर्वांमागचा मूळ विचार असा असतो की, रोग हा एक स्थानिक प्रश्‍न आहे. म्हणजेच काय तर, आधुनिक औषधशास्त्रात माणूस हा विविध पेशी आणि संस्था (system) यांनी बनलेला असतो. परंतु, होमियोपॅथीमध्ये या पेशींच्या पलीकडे जाऊन विचार केला जातो. प्रत्येक माणूस आजारी पडतो. त्याच्या मागे काहीतरी ठोस कारण असते, नुसत्या पेशी आजारी झाल्या म्हणजे रोग होत नाही, तर माणूस आजारी पडतो आणि यामुळे पेशींमध्ये बदल होतात. थोडक्यात काय तर होमियोपॅथी या संपूर्ण आजारी माणसाचा अभ्यास करते व नुसत्या पेशींचा अभ्यास करून औषधे दिली जात नाहीत.

 

एक छान उदाहरण पाहूया- आपल्याला जेव्हा भूक लागते किंवा तहान लागते किंवा स्त्रीला मासिक पाळी सुरू होते तेव्हा आपण असे म्हणतो का की, ‘माझ्या जठराला भूक लागली किंवा जठराला तहान लागली.’ किंवा स्त्री असे म्हणते का की, ‘माझ्या गर्भाशयाला पाळी सुरू झाली.’ असे म्हटले जात नाही, तर आपण काय म्हणतो, तर मला भूक लागली, मला तहान लागली किंवा स्त्री म्हणेल की, मला मासिक पाळी सुरू झाली. यातील ‘मी’ जो आहे तो खरा आजारी असतो, नुसत्या पेशी नाही. अजून एक उदाहरण देतो- ज्याने हा विचार नीट कळेल. जेव्हा एखादा अबक नावाचा माणूस मृत्यू पावतो, तेव्हा त्या माणसाचे शरीर समोर ठेवलेले असते. त्या माणसाचे नातेवाईक, मित्र जवळ उभे असतात परंतु सर्व जण काय म्हणत असतात? की अबक गेला. प्रत्यक्षात पाहता, त्याचे शरीर जे हाडांनी पेशींनी बनलेले आहे, ते तर समोर असते. मग तरीही आपण का म्हणतो की तो गेला? याचाच अर्थ या हाडांच्या व पेशींच्या पलीकडे जाऊन पाहिले तर, या हाडामांसाच्या घरात जो ‘मी’ होता तो गेला. म्हणजेच, जी ऊर्जा होती ती गेली. जे चैतन्य होते ते गेले. या ऊर्जा व चैतन्य असलेला जो ‘मी’ आहे, तो खरा माणूस व हाडे व पेशी हे त्याचे घर आहे. त्यामुळे जेव्हा रोग होतो, तेव्हा तो प्रथम माणसाला होतो व नंतर तो पेशींमध्ये दिसून येतो, म्हणूनच जर त्या रोगाचे समूळ उच्चाटन करायचे असेल तर नुसत्या पेशींमधील बदल अभ्यासून चालत नाही,तर त्या माणसामधील बदल हे तपासले पाहिजेत. कारण, पेशी या कारणाशिवाय आजारी पडत नाहीत, ते कारण शोधणे गरजेचे आहे.

 

आपण टायफॉईडचे उदाहरण घेऊ. एखाद्याला टायफॉईड झाल्यावर आपण काय म्हणतो की, टायफॉईडच्या जीवाणूंमुळे माणूस आजारी पडला. पण नीट लक्षात घ्या. होमियोपॅथी काय म्हणते की, माणूस आजारी आहे. म्हणूनच टायफॉईडचा जीवाणू शरीरात प्रवेश करु शकला. म्हणजे काही कारणाने माणसाची रोगप्रतिकारकशक्ती कमी झाली आणि म्हणूनच हा जीवाणू शरीरात शिरला व रोगाची चिन्हे दाखवू लागला. यात प्रथम माणूस कमजोर झाला व नंतर बॅक्टेरिया (जीवाणू) आला. म्हणजेच बॅक्टेरिया किंवा जीवाणू हा आजाराचे कारण असू शकत नाही, हा तर आजाराचे उत्तर आहे. आजाराचे कारण, तो माणूस कमकुवत झाला हे आहे आणि माणूस कमकुवत का झाला, हेच होमियोपॅथीमध्ये शोधले जाते. डॉ. हॅनेमान यांनी म्हणूनच म्हणून ठेवले आहे की, “Bacteria is not a cause but the result of the disease” आणि “There are no diseases, but sick people.” म्हणजे जगात रोग नाहीत, तर आजारी माणसे आहेत. या आजारी माणसांना झालेला आजार ओळखला तर रोग होणार नाहीत. पुढील भागात आपण याबद्दल अधिक जाणून घेऊया...

 

-डॉ. मंदार पाटकर

@@AUTHORINFO_V1@@