जिंदगी हर कदम, एक नयी जंग है ।

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |



 

जिंदगी हर कदम एक नयी जंग है।’ म्हणत संघर्षातून समन्वयाची भूमिका घेणारे संदीप घुगे. अनपेक्षितता, अनिश्‍चिततेच्या प्रत्येक वळणावर घेतलेली योग्य पकड म्हणजे संदीप घुगेंचे आयुष्य...

 

कामगार, मग तो कोणत्याही क्षेत्रातला असो, नेहमीच तळपती तलवार नसतो, हे सत्य संदीप घुगेंनी लहाणपणीच अनुभवले. कारण, संदीपचे अनेक नातेवाईक मुंबईत हमाली करायचे. त्यांचे जगणे आणि मरणेही संदीप जवळून पाहत होता. संदीपचे मूळगाव अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर. वडील पोटापाण्याच्या संघर्षासाठी मुंबईत आले आणि कायमचे ‘मुंबईकर’ झाले. हातगाडी चालवणे, केळी विकणे, इतर छोटीमोठी कामे करणे, सतत राब राब राबत यांनी ग्रँट रोड परिसरात तीन दुकाने विकत घेतली. त्यावेळी मुंबईत आजच्या इतकी गर्दी नव्हती. मुंबईत मोठ्याप्रमाणात हमाली करणार्‍या आपल्या वंजारी समाज बांधवाच्या कल्याणासाठी ते नेहमी तत्पर असत. भरपूर कष्टाने घुगे कुटुंबीयांना आर्थिक आणि सामाजिक सुबत्ता स्थिरताही आली होती. पण, संदीप सातवीच्या वर्गात शिकत असताना वडील तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने वारले. नांदत्या घरावर आभाळ कोसळले आणि संदीपला जगाचे वेगळे रंग दिसले. आईला व्यवसायातले काही कळत नाही, संदीप आणि त्याचा भाऊ वयाने लहान शाळेत शिकणारे. त्यामुळे कै. घुगेंच्या संपत्तीत वाटा मागायला, घुगे कुटुंबीयांना छळायला अनेक जण उभे राहिले. भाड्याने चालवायला दिलेल्या दुकांनावर दुकानदाराने कब्जा केला. चारही बाजूंनी संकट कोसळले. सुबकतेत असलेले घुगे कुटुंबीय आर्थिक गर्तेत कोसळले. संदीप म्हणतात, “त्यावेळी आईच्या मदतीला आमचा वंजारी समाज धावून आला. काही चांगल्या नातेवाईकांनी पाठबळ दिले. त्यामुळे आम्ही तगलो, जगलो. जर वडिलांनी जोडलेली माणसे आमच्या पाठीशी उभी राहिली नसती तर?? त्यामुळे माणसे जोडणे, त्यांच्या भल्याबुर्‍या काळात करता येईल तितकी त्यांना मदत करणे, हे मी आयुष्याचे ध्येय ठरवले.”

 

पुढे दुकानावर काम करत, छोट्यामोठ्या नोकर्‍या करीत त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. नोकरी करत असताना असंघटित कामगारांचे होणारे शोषण, अक्षम्य फसवणूक त्यांनी पाहिली होती. या कामगारांचा दबलेला आवाज त्यांना अस्वस्थ करत होता. त्यातच मुंबईत हमाली करत असलेले त्यांचे समाजबांधव, त्यांचे जगणेही तसेच अस्वस्थ आणि तरीही कुणाच्याच खिजगणतीत नसणारे. आपल्या समाजाचा नेता म्हणून संदीप यांच्यावर गोपीनाथ मुंडेंचा प्रभाव होताच. संदीप म्हणतात, “मुंडेसाहेब नेहमी म्हणत ज्यांचा कोणी वाली नाही, ज्यांची कोणती वाणी नाही माझा संघर्ष त्यांच्यासाठी... पोरांनो, तुम्ही पण अशा लोकांसाठी संघर्ष करा.” हे सूत्र धरून संदीपने आपल्या आयुष्यातही कर्मचारी वर्गाच्या कल्याणासाठी खारीचा वाटा उचलायचे ठरवले. सर्वप्रथम हमाल आणि सुरक्षारक्षकांच्या हक्‍कासाठी लढायला सुरूवात केली. त्यांच्या कामाची व्याप्‍ती वाढत होती. पुढे राजकीय क्षेत्रातही त्यांनी चांगला ठसा उमटवला.

 

चतुर्थ श्रेणी कामगारामध्ये भटके-विमुक्‍त समाजाचे बांधव मोठ्या प्रमाणात असतात. अपुरा पगार, पायाभूत सुविधांचा अभाव त्यातच समाजश्रेणीतही मागास असणे या सर्वांचा परिणाम या बांधवांवर होतो. संदीपने हे अनुभवले होते. सुरक्षारक्षकांच्या हक्‍कांसोबतच त्यांनी भटके-विमुक्‍त समाजाच्या बांधणीसाठीही काम सुरू केले. पुढे संदीपच्या कार्याची दखल घेत शासनाने त्यांना महाराष्ट्र सुरक्षारक्षक सल्‍लागार समितीमध्ये नियुक्‍त केले.

 

त्यामुळे संदीपच्या कार्याचे क्षेत्र विस्तारले. चित्रपटनगरीतील तार्‍यांचा झगमगाट आणि चकाकते जीवन असले तरी या झगमगाटाच्या आडचा अंधार ‘बॅक स्टेज’च्या नावाने रेंगाळत असतो, ज्युनिअर आर्टिस्टच्या रूपात वावरत असतो. मात्र, मुंबईतल्या फिल्मसिटीच्या दिखाऊ दुनियेत मात्र त्यांच्यासाठी आवाज उठवला गेला. संदीप घुगे यांनी अमृता फडणवीस यांचे सहकार्य घेऊन हा आवाज उठवला. या ‘बॅक स्टेज’कलाकारांच्या मूलभूत गरजा, त्यातही अपुरी शौचालये, सुरक्षेचा अंतर्भाव वगैरे अनेक मागण्या फिल्मसिटीच्या व्यवस्थापकांनी मान्य केल्या, तर दुसरीकडे या ‘रिल’ दुनियेच्या पलीकडल्या ‘रिअल’ दुनियेतल्या सुरक्षारक्षकांच्या दुनियेतही असाच सुखद बदल झाला. सुरक्षारक्षक बोर्डात आजपर्यंत पगारवाढ ५०० रूपयांपेक्षा जास्त कधी झाली नव्हती. ती ३ ,५०० रूपये इतकी झाली. सुरक्षारक्षकांना देण्यात आलेले ओळखपत्र इंग्रजीतून असायचे, आता ते मायबोली मराठी भाषेतून मिळू लागले. सगळ्यात मुख्य म्हणजे सुरक्षारक्षक जर मुंबईतून भरती होत असेल, तर पूर्वी तो मुंबईतच नोकरी करू शकत होता. पण, आता त्याची जिल्हानिहाय बदलीसुद्धा शक्य झाली. अर्थात, चित्रपटनगरीतल्या अत्यंत कनिष्ठ श्रेणीतील कर्मचारी वर्ग आणि समाजजीवनातील चतुर्थ श्रेणीचे जगणे व ते जगणारा सुरक्षारक्षक या दोन टोकांना आवाज देणार्‍या व्यवस्थेत प्रमुख म्हणून होते संदीप घुगे. संदीप घुगे म्हणतात, आयुष्य कुणाचेच सरळ नसते, अनेक वळण घेत आयुष्य उभे राहते. त्यात कामगारांचे जगणे तर खरेच सर्वच पातळ्यांवर आव्हानात्मक असते. आयुष्याचे आवाहन स्वीकारायलाच हवे... जिंदगी हर कदम, एक नयी जंग है।

@@AUTHORINFO_V1@@