मिरच्या झोंबल्याने उचलली जीभ, लावली टाळ्याला!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018   
Total Views |



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच, काँग्रेस पक्षास बेल-गाडीम्हणून ओळखले जाऊ लागल्याची टीका केली. ती टीका चुकीची नव्हती. कारण, काँग्रेसचे काही ज्येष्ठ नेते जामिनावर आहेत, ही वस्तुस्थिती आहे. अशा जामीनप्राप्त वरिष्ठ नेत्यांचे प्रमाण लक्षात घेऊन पंतप्रधानांनी हा जाहीर आरोप केला. तो होताच काँग्रेसच्या नेत्यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या.

 

सध्या देशाच्या राजकीय मंचावर वेगाने घडामोडी घडत आहेत. भारतीय जनता पक्षाची कोंडी करण्यासाठी सर्व त्या मार्गांचा वापर करून त्या पक्षाचा वारू आगामी लोकसभा निवडणुकीत अडवायचाच, या दृष्टीने विरोधकांची मोर्चेबांधणी चालू असली तरी त्यास म्हणावे तसे यश येताना दिसत नाही. कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवायची? समजा, निवडणुकीत बहुमत मिळाले तर पंतप्रधान कोणाला करायचे? तसेच आघाडी करताना कोणाला जवळ करायचे, कोणाला दूर ठेवायचे, यावर काथ्याकूट करण्यातच विरोधकांचा वेळ चालला आहे. त्याउलट भाजपने जोरदार प्रचार मोहीम उघडल्याचे दिसत आहे. अलीकडे राजस्थानमधील एका जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमधील नेत्यांचे जे जाहीर वाभाडे काढले, त्यामुळे तर त्या पक्षातील नेतेमंडळी खूपच अस्वस्थ झाली आहेत.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच, काँग्रेस पक्षास बेल-गाडीम्हणून ओळखले जाऊ लागल्याची टीका केली. ती टीका चुकीची नव्हती. कारण, काँग्रेसचे काही ज्येष्ठ नेते जामिनावर आहेत, ही वस्तुस्थिती आहे. अगदी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यापासून शशी थरूर यांच्यापर्यंतच्या नेत्यांनी न्यायालयांकडून जामीन मिळवून समाजात आपला मुक्त संचार चालू ठेवला आहे. अशा जामीनप्राप्त वरिष्ठ नेत्यांचे प्रमाण लक्षात घेऊन पंतप्रधानांनी हा जाहीर आरोप केला. तो होताच काँग्रेसच्या नेत्यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या. त्या झोंबणेही स्वाभाविक होते, पण आपल्या ज्येष्ठ नेत्यांनी जी कथित पापे केली आहेत, त्याबद्दल काही पटेल असे न बोलता विषय तिसरीकडे नेण्याचे काम अन्य नेत्यांना करावे लागत आहे. काँग्रेसचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे हे राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी आले असता, मुंबईतील कार्यक्रमात त्यांनी भाजपवर तोंडसुख घेतले. मोदी यांनी राजस्थानमध्ये केलेली टीका लक्षात ठेवून मोदी यांच्यावर निशाणा साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. काँग्रेसची भलामण केली. नेहमीचे तुणतुणे वाजविले. काँग्रेसने देशात ७० वर्षे लोकशाही टिकविल्यामुळे चहावाला पंतप्रधान झाला,” असे वक्तव्य त्यांनी केले. ज्या घराण्याची आपण गेली कित्येक वर्षे तळी उचलत आहोत, त्या नेहरू घराण्यास जनता नाकारत असल्याचा किती रागराग करायचा? सामान्य परिवारातून आलेली व्यक्ती पंतप्रधानपदी बसू कशी शकते, अशी जी खदखद काँग्रेस नेत्यांच्या मनात सदैव चालू असते, ती खरगे यांच्या वक्तव्याच्या रूपाने बाहेर आली इतकेच. देशात आणीबाणी आणून संपूर्ण देशास बंदीशाळा करण्याचा उद्योग काय विरोधकांनी केला? केवळ इंदिरा गांधी यांना विरोध केला म्हणून हजारो विरोधकांना तुरुंगात डांबायचे, लोकशाहीला काळिमा फासण्याचे अधम कृत्य कोणी केले? काँग्रेसनेच ना? मग कशाला उगाच फुशारक्या मारताय, ‘आमच्यामुळे देशात ७० वर्षे लोकशाही टिकून असल्याच्या!आणीबाणीविरुद्धच्या लढ्यात जयप्रकाश नारायण, नानाजी देशमुख यांच्यासह जे अनेक नेते आणि अगणित कार्यकर्ते व सामान्य लोकशाहीप्रेमी जनता उतरली होती आणि त्यांनी सिंहासन खाली करो...ची गर्जना केल्याने आणि एकाधिकारशाहीविरुद्ध शड्डू ठोकल्याने १९७७ साली देशात लोकशाहीची पुनर्स्थापना झाली, हा इतिहास खरगे विसरले असले तरी जनता विसरलेली नाही. त्याच लढ्यात सक्रिय सहभाग घेतलेले नरेंद्र मोदी आज पंतप्रधानपदी आहेत. त्यामुळे आमच्यामुळे देशात लोकशाही आहे, असल्या गप्पा काँग्रेसच्या नेत्यांनी मारू नयेत.

 

याच लोकशाहीचा मुद्दा पकडून आता काँग्रेससह विविध विरोधी नेत्यांनी लोकशाही धोक्यात आल्याची आवई उठविली आहे. ममता बॅनर्जी यांनी तर कमालच केली आहे. काँग्रेससमवेत काम करण्यास आपली ना नसल्याचे सांगताना त्यांनी केंद्र सरकारवर तोंडसुख घेतले. केंद्रातील सरकार हे शंभर हिटलरसारखे वागत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. या ममता बॅनर्जी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होत्या. भाजपच्या नेत्यांना त्यांनी जवळून पाहिले आहे. आणीबाणीविरुद्धचा लढा त्यांनी पाहिला आहे, तरीही त्या असले आरोप करतात? यालाही उचलली जीभ लावली टाळ्यालाअसेच म्हणावे लागेल!

 

भाजपचा वारू रोखण्यासाठी समाजमाध्यमांत चुकीची माहिती किंवा छायाचित्रे प्रसृत करण्याचा उद्योगही काँग्रेसने आरंभला आहे. त्याचे एक उदाहरण नुकतेच घडले आहे. नरेंद्र मोदी आणि वसुंधरा राजे यांच्यात मतभेद असल्याचे दाखविण्यासाठी त्या पक्षाने एक जुनाच व्हिडिओ आपल्या पक्षाच्या समाजमाध्यमांवर टाकला. जो व्हिडिओ टाकला होता, तो पाच महिन्यांपूर्वीचा होता! त्यावरून वादंग निर्माण झाल्यानंतर काँग्रेसच्या या विभागाच्या प्रमुख दिव्या स्पंदना यांनी दिलगिरी व्यक्त केली. दिलगिरी व्यक्त करताना, त्यातील तपशील तरी खरा आहे ना, अशी सारवासारव दिव्या स्पंदना यांनी केली. काँग्रेसच्या या अपप्रचारावर टीका करताना, भाजपच्या समाजमाध्यम विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी अशी कृती करून काँग्रेसने सेल्फ गोलकेला आहे, असे म्हटले आहे. या संदर्भात काँग्रेसचे पितळ उघडे पडल्याने त्या पक्षास माफी मागावी लागली. राजस्थानात लवकरच विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या लक्षात घेऊन भाजपची बदनामी करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांचा भाग म्हणून याकडे पाहायला हवे. लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येईल, तसतसे भाजपविरोधी अपप्रचाराचे पेव मोठ्या प्रमाणात फुटणार आहे, हे उघड आहे.

 

या पार्श्वभूमीवर, भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी, भाजप विरुद्ध केल्या जाणाऱ्या अपप्रचाराला समाजमाध्यमांतून जोरदार प्रत्युत्तर देण्याचे आवाहन पक्ष कार्यकर्त्यांना केले आहे. या पुढील निवडणूक ही समाजमाध्यमांतूनच लढविली जाणार असल्याचे सांगून, त्या दृष्टीने प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी तयार करायला हवी, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. अधिकृत संशोधनात्मक माहिती, आकडेवारी यांचे तुलनात्मक विश्लेषण करून विरोधकांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचे त्यांनी केलेले आवाहन पाहता, पुढील निवडणुकांमध्ये समाजमाध्यमे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजाविणार असल्याचे स्पष्ट आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तर सध्या या माध्यमाचा वापर करून भाजप, संघ परिवारावर तोंडसुख घेत आहेतच.

 

भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आर्य चाणक्याचा संदर्भ देऊन, घराणेशाहीतून आलेल्या पण सक्षम नसलेल्या व्यक्तीपेक्षा सक्षम नेताच देशाचा मुख्य असला पाहिजे, हे स्पष्ट केले. राहुल गांधी त्या पदासाठी अपात्र असल्याचेच त्यांनी लक्षात आणून दिले. सध्या देशातील वातावरण निवडणुकीच्या दृष्टीने तापू लागले आहे. भाजपविरोधक जुळवाजुळव करण्याचे विविध पर्याय हाताळून पाहत आहेत, पण त्यात त्यांना अद्याप यश आल्याचे दिसत नाही. असे असले तरी फक्त भाजपला लक्ष्य करून विविध पक्षांकडून भाजपवर हल्ले केले जात आहेत, पण तेवढ्याच सडेतोडपणे त्यास भाजप प्रत्युत्तर देत आहे. आता निवडणुकीच्या रणनीतीत कोण कोणावर मात करतो ते भविष्यात दिसून येईल!

9869020732

@@AUTHORINFO_V1@@