बॅक टू स्कूल!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |




शाळेत मुलांवर एकप्रकारचा ताण असण्याची शक्यता असते आणि याचा परिणाम नक्कीच पालकांवरही होत असतो. एक पालक म्हणून, आपल्याला मुलांच्या शैक्षणिक कामगिरीबद्दल, त्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल तसेच, त्यांच्या मानसिक स्थिरता आणि वर्गमित्रांसोबत- शिक्षकांबरोबरच्या नात्याबद्दल काळजी वाटत असते. शाळेत गेल्यानंतर मुलांच्या प्रत्येक हालचालींकडे बारकाईने लक्ष ठेवणे, आपल्याला कठीण जाते. असे असले तरीही, आपले पाल्य आणि आपल्यातली ही संवादाची दरी कमी करण्यासाठी त्यांच्यासोबत संवादात्मक नाते निर्माण करणे महत्त्वाचे ठरते. लहान वयातच आरोग्यपूर्ण सवयींना चालना दिल्यास, ही प्रक्रिया अधिक सोपी होते.

 

सकारात्मक मैत्रीला चालना

आपले पाल्य जास्त सुरक्षित असेल, अशा वर्गमित्र वा मैत्रिणींशी मैत्री करण्यासाठी त्याला पालकांनी प्रोत्साहन द्यावे. शाळेच्या पहिल्या काही दिवसातच याबद्दल मुलांशी बोलणे, कदाचित थोडे कठीण जाऊ शकते. विशेषतः अबोल मुलांच्या बाबतीत हे अधिक जाणवते. परंतु, शालेय वर्षाच्या सुरुवातीलाच याबाबत बोलल्याने कोणतेही नकारात्मक अनुभव पुढच्या वाटचालीत येण्याची शक्यता कमी होते. एकसमान रूची असेल तर ती मैत्री अधिक यशस्वी मैत्री ठरते. त्यामुळे आपल्या पाल्याला अधिक समाजाभिमुख होण्यासाठी विविध उपक्रम व शालाबाह्य उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास त्याला प्रेरणा मिळते. सकारात्मक मैत्रीची कौशल्ये आपल्या मुलांमध्ये विकसित केल्याने, ती अधिक आनंदी आणि अधिक आत्मविश्वासू बनतील.

 
 

स्वतःच्या शरीराची काळजी घेणे

बरेचसे पालक आजकाल चांगला व वाईट स्पर्श या विषयावर मुलांशी बोलतात. तरीही, बाल्यावस्थेतील मुलांसाठी हे समजून घेणे तितकेसे सोपे नाही. एक पालक म्हणून, आपण सर्व गोष्टींची मुलांना कल्पना द्यायला हवी. तसेच प्रत्येक वेळी त्यांना जागरुक राहायला शिकवणे गरजेचे आहे. लहान वयातच शरीरातील सर्वात खासगी अवयवांविषयी बोलताना योग्य संकल्पना व शब्द वापरून मुलांना सांगणे आवश्यक ठरते. आंघोळीच्या वेळी मुलांना या गोष्टी सहज समजावता येतात. हे अवयव आपले खासगी आहेत आणि कुणीही इतर व्यक्ती त्यांना स्पर्श करू शकत नाही, हे त्यांना समजवणे आवश्यक आहे. घराबाहेर पडल्यानंतर, आपल्याला कुणीही कपड्यांशिवाय पाहू नये किंवा पाहू शकत नाही, हे मुलांना समजावून सांगा. कुणाही अनोळखी व्यक्तीसह एकटे बाहेर फिरू नये, हे त्यांना सांगितले पाहिजे. आपल्या खासगी अवयवांची छायाचित्रे कुणीही काढू शकत नाही, हे त्यांना कळले पाहिजे.

आपले मूल पहिल्यांदाच आपल्याशी काही बोलले, तर ते शांतपणे ऐकून घ्या. त्यासाठी धाडस लागते. आपल्या मुलांचा विश्वास जिंकणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘आपले आईबाबा आपल्या मदतीसाठी कायम आपल्यासोबत आहेत,’ असा विश्वास मुलांना वाटू द्या. आपल्यापासून कोणतीही गोष्ट त्यांनी लपवून ठेऊ नये, हे मुलांना पटवून द्या. या नियमांबाबत मुलांशी वारंवार बोलत राहा.

 

दादागिरीविरुद्ध आवाज उठवण्यासाठी प्रोत्साहन द्या

आपल्यावर दादागिरी किंवा मुजोरी करणार्‍यांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्या व्यक्तीचे वागणे चूक आहे, हे दिसून येते. तसेच, त्याचे वागणे अक्षम्य आहे हेही नमूद होते. तुम्ही एकटे असाल आणि तुमच्यावर दादागिरी करणारी व्यक्ती त्याच्या घोळक्यात असेल तर तिथे बोलायला जाऊ नका. आपल्या शिक्षकांशी बोला, त्यांची मदत घ्या. शाळा, महाविद्यालये किंवा कोणत्याही ठिकाणी दादागिरी सहन केली जाणार नाही, हे मुलांना सांगा.

काही संभ्रम असणे, भीती वाटणे किंवा अस्वस्थ असणे काही वेळा चालू शकते. नवीन शैक्षणिक वर्ष हे काहीसे तणावपूर्ण असू शकते आणि वरच्या वर्गांमध्ये जाण्याची भावनाही काहीशी भीतीदायक वाटू शकते. नवीन विषय, नवे शिक्षक, नवे वर्गमित्र-मैत्रिणी या सगळ्या वेगळेपणात स्वतःला सामावून घेणे, एकाच वेळी कठीण जाते. सुरुवातीला काहीसे अस्वस्थ असणे साहजिक आहे. हे आपल्या मुलांना समजवा. तसेच, ही परिस्थिती धैर्याने निभावून नेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. यातून बाहेर पडण्यासाठी आपण त्यांना मदत करू शकतो, याची खात्री बाळगा.

 

विश्वास

आपल्या मुलांच्या वाढीच्या काळापासूनच विश्वासार्हता हा गुण त्यांच्या अंगी बाणणे अत्यावश्यक असते. मित्रपरिवारासोबत विश्वासू नाते तयार करण्यासाठी आपल्या मुलांना प्रोत्साहन द्या.

 

-डॉ. पारूल टंक

@@AUTHORINFO_V1@@