मुंबईत पावसाचा मुक्‍काम कायम; आज मुसळधार पावसाची शक्यता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2018
Total Views |


 

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरामध्ये शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाची संततधारा रविवारीदेखील कायम होती. पावसामुळे मुंबई-ठाणेकरांना घरातून बाहेर पडणे कठीण झाले होते. आज झालेल्या पावसामुळे हिंदमाता, चेंबूर, दादर, किंग्ज सर्कल, शीव, कुर्ला, वडाळा, सिद्धार्थनगर गोरेगाव आदी सखल भागत पाणी साचले होते. त्यामुळे याठिकाणी काही प्रमाणात वाहतूककोंडी झाली. तसेच काही परिसरांमध्ये पाणी साचल्याने ’बेस्ट’च्या बसचे मार्गही वळविण्यात आले.
 

दादर, शीव, भायखळा यांचा पुढचा भाग अर्थात मुख्य मुंबईच्या दिशेने पावसाचा जोर अधिक होता. शीव आणि किंग्ज सर्कल परिसरात गुडघाभर पाणी साचले होते तर, गांधी मार्केटमधल्या दुकानांमध्ये पाणी शिरले होते. कुर्ला ते टिळकनगर स्थानकादरम्यान हार्बर रेल्वे मार्गावर रुळावर पाणी भरले होते. कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक असल्याने लोकल सेवा बंद असल्याने प्रवाशांनी रूळावरून चालण्याचा पर्याय निवडला. अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, दहिसरमध्ये पावसाच्या जोरदार सरी सुरू होत्या. जोरदार पावसामुळे असल्फा परिसरात पाणी साचले होते. तर; मेट्रोच्या पश्‍चिम द्रुतगती महामार्ग स्थानकाखालीही पाणी साचलेे होते. दरम्यान, येत्या २४ तासांसाठी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. शनिवारीदेखील पावसाने मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला. मुसळधार पावसामुळे ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली. येथील सर्व नद्या दुथडी भरून वाहत होत्या. तसेच रायगड, पालघर, ठाणे या जिल्ह्यांना पावसाने झोडपले.

@@AUTHORINFO_V1@@