नरेचि केला हीन किती नर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2018   
Total Views |



जितकी ही घटना आठवावी तितक्या यातना जास्त होतात. समाजमन इतकं क्रूर व्हावं? विवेक, तारतम्य, संवेदनशीलता, कायद्याची भीती समाजमनाने बेभानपणे लाथाडावी? त्याचे कारणही होते कायद्याची भीती शुद्धीतल्या लोकांना.

नरेचि केला हीन किती नर.. शब्दही कमीच पडतील, अशी धुळ्याच्या राईनपाड्याची ती घटना. अर्थात त्या निष्पाप भिक्षेकरूंच्या निर्घृण हत्याकांडाला एक आठवडा लोटला. त्यावर प्रसारमाध्यमांपासून, प्रशासनापासून ते समाजचिंतकांपर्यंत सार्‍यांनीच गंभीर भूमिका मांडली आणि घेतलीही. या घटनेमागच्या अनेक पापुद्य्रांचा विचार केला तर आधुनिक समाजाच्या प्रतिमेला कलंकित करणार्‍या बाबी पाहून मन सुन्न होते. धुळ्याच्या राईनपाड्यात पाच भिक्षुकांना जमावाने दगडाने, मिळेल त्या हत्याराने ठेचून मारत त्यांची निर्घृण हत्या केली. या जमावाला वाटले की, हे पाच जण मूल पळवायला गावात आले आहेत. सगळेच भयानक आणि अतार्किक, पण तरीही वाटते, या भिक्षेकर्‍यांना भर बाजारातून ग्रामपंचायतीमध्ये नेले जात असता सगळ्या गावाने पाहिले असेल? पण तरीही प्रत्यक्ष निर्घृण खून होत असतानाही सगळे थंड, बधिर, दगडासारखे का होते?

 

अर्थात याउलट बहुतेकांचे म्हणणे आहे की, पाच जणांचा खून करणार्‍या जमावामधील ६० ते ७० टक्के लोक दारूच्या नशेत होते. व्यसनाधीन शरीर हे त्या त्या व्यक्‍तीचे शत्रू असते, पण व्यसनाधीन व्यक्‍तीचं मन मात्र समाजाचे शत्रू असते. या पाच निष्पाप लोकांचा प्राणांतिक आकांत दारूच्या नशेत झिंगलेल्या आणि विवेक गमावलेल्या लोकांना ऐकू गेलाच नाही. या नशेखोर पशूबद्दल शब्दातीत घृणा वाटतेच, पण त्याचबरोबर ही घटना घडत असताना त्रयस्थपणे घटना पाहणार्‍या लोकांबद्दलही तितकीच किंबहुना त्याहून जास्त घृणा आणि संताप वाटतो. या घटनेनंतर पूर्ण गाव फरार आहे, असे चित्र आहे. राईनपाडा ओस पडला आणि त्या ओस पडलेल्या राईनपाड्याने समाजातल्या आटत गेलेल्या ओस पडलेल्या माणुसकीचे, कोणत्याही अफवेने टोकाची भूमिका घेणार्‍या दुबळ्या मनाचे, नशेच्या अधीन गावगाड्याचे चित्र उघडे पाडले. काहीही असो, क्रूर घटनेचा निषेध करावा तितका थोडाच...

पुन्हा राईनपाडा होऊ नये

राईनपाड्यामध्ये डवरी गोसावी समाजातील पाच जणांच्या हत्येने पुन्हा एकदा अण्णाभाऊ साठेंच्या कादंबरीतला ‘माकडीचा माळ’ जिवंत झाल्यासारखे वाटते. अर्थात माकडीचा माळ आणि राईनपाडा या घटनेबाबत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. पण तरीही वंचितांच्या दुःखाचा चिखल आहे तिथेच आहे का? राईनपाड्याच्या घटनेनंतर पुन्हा भटके विमुक्‍तांचे आजचे जगणे आणि प्रश्‍न जगासमोर आले. स्वातंत्र्यानंतर या समाजाच्या उन्नतीसाठी शासनाने खरोखर अनेक प्रयत्न केले. सध्याच्या सरकारनेही अनेक उपक्रम सुरू केले, पण तरीही भिक्षुकी मागण्यासाठी समाजबांधव वणवण करत फिरतो. अपमान, हालअपेष्टा, मागते म्हणून उपेक्षा सहन करतो.. आजही. याला काय म्हणावे?

 

गावातच हाताला काम असेल, पोटाला भाकर असेल तर कुणीही गावाबाहेर भटकेगिरी करणारच नाही म्हणा. पण तरीही वाटतेच की, कोणताही समाज असो धर्म असो किंवा कोणताही देश असो, त्याच्या उत्थानासाठी कितीही योजना आल्या, प्रकल्प आले तरी जोपर्यंत त्यांच्यासाठी त्या योजना, प्रकल्प आहेत, त्यांना जोपर्यंत ’अतः दीप भव’ ही भावना आतून येत नाही, तोपर्यंत सगळे शून्य आहे. त्यातच आजपर्यंत या समाजाच्या नावाने नेतागिरी करत अनेक चमकूंनी स्वतःचे चांगभले करून घेतले, पण नेते सत्तेेत तर हा समाज गर्तेत हीच स्थिती राहिली. आता तर काय राईनपाड्याच्या घटनेनंतर प्रत्येक राजकीय नेेत्यामध्ये या वंचित समाजासाठी नव्याने माणुसकीचे उमाळे फुटलेत. काहींनी तर, ”या घटनेचे मृत बांधव सोलापूरचे आहेत, त्यामुळे वंचितांच्या हक्‍काची लढाई लढू,” म्हणत आताच सोलापूर मतदारसंघात निवडणुकीसाठी दावे ठोकण्याची भाषाही केली आहे. असो, चालायचेच. मृत पावलेल्या दुर्दैवी बांधवांच्या कुटुंंबाला उभे करणे हे आज समाजाचे कर्तव्य आहेच. त्याचबरोबर मृत बांधवांचा मृत्यू हा ज्या कारणामुळे झाला, त्या कारणांना समजून घेणेही गरजेचे आहे. कारण असंवेदनशील समाजमनाचा कानोसा घेत त्यात पुन्हा करुणा, संवेदनशीलता आणि वास्तवतेसंबंधी जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. अर्थात शब्दांची कळा वापरून असे वास्तव निर्माण होतच नाही, पण पुन्हा राईनपाडा होऊ नये म्हणून या भावनांचा विचार तरी होणे गरजेचे आहे.

@@AUTHORINFO_V1@@