माझे जवळचे मित्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2018   
Total Views |



 

इतकी वर्षे आपण फक्त वयाने वाढलो, ज्ञानाने फार वाढलो नाही. ती उणीव संविधान अभ्यासाने भरून निघाली. वाढत्या वयाबरोबर मी ज्ञानवयानेदेखील वाढत चाललो आहे, हा जीवन जगण्याचा आनंद देणारा विषय आहे. जो आपल्याला असा आनंद देतो. तो शेजारी असून निंदक असला तरी आपला सर्वात जवळचा मित्र असतो. म्हणून या दोघांचा मी जन्मभर ऋणी राहीन.

 

‘आम्ही आणि आमचे संविधान’ वाचून माझ्या मित्राने मला प्रश्न विचारले, “तुझे पुस्तक चांगले आहे. खूप माहिती मिळाली. पुस्तकात अनेक संदर्भ आहेत. पुस्तकांचे उल्लेख आहेत. एवढे सगळे वाचून पुस्तक लिहावसे तुला का वाटले?” त्याचा रोख असा होता की, ‘‘तू आता सेवानिवृत्त झाला आहेस, नसती कामे मागे लावून घेण्याचे तुझे वय नाही, तरी तुला असे का करावेसे वाटले?’’

 

मी त्याला म्हणालो, "या पुस्तक लेखनाचे सर्व श्रेय शरद पवार आणि बाळासाहेब आंबेडकर यांना द्यायला पाहिजे.” माझे हे उत्तर ऐकून तो क्षणभर गांगरला. पुस्तक लिहिण्यासाठी आणि सल्ला घेण्यासाठी मी शरदराव किंवा बाळासाहेबांकडे गेलो नाही, हे त्याला माहीत आहे. मग तरीही पुस्तक लिहिण्याचे श्रेय त्यांना कसे काय देतो? असा त्याचा दुसरा प्रश्न होता.

 

त्यावर मी त्याला म्हणालो, “तुकाराम महाराजांच्या अभंगातील एक ओळ तुला सांगतो- ‘निंदकाचे घर, असावे शेजारी’ तुकाराम महाराज सांगतात की, “आपली सतत निंदा करणारा आपला शेजारी असावा, तोच आपला खरा मित्र असतो. कारण, त्याच्या निंदेमुळे न रागवता आपण आत्मचिंतन करायचे असते. आपल्यातील उणीवा शोधायच्या असतात. त्या लक्षात आल्यानंतर त्या दूर करण्याचा प्रयत्न करायचा असतो.” शरदराव आणि बाळासाहेब हे आपले शेजारचे निंदक मित्र आहेत. हे दोघेजण सातत्याने एक विषय मांडतात की, “संघाचा आणि भाजपचा संविधान बदलण्याचा डाव आहे. तो त्यांचा छुपा अंजेडा आहे. ‘संविधान बचाव’ याच्यावर रॅली, मोर्चे आणि भाषणे होतात.”

 

मी त्याला पुढे म्हणालो, “तुम्ही सर्व माझा परिचय ‘संघातील एक विचारवंत’ असा करून देतात. मी विचारवंत आहे की नाही मला माहीत नाही. परंतु, मी संविधानातील अज्ञानी आहे, हे मला माहिती आहे आणि माझ्याप्रमाणे माझ्या पिढीतील सगळ्या संघस्वयंसेवकांची कमी-अधिक फरकाने तीच स्थिती आहे. माझ्या मागून येणार्या पिढीचीसुद्धा याहून वेगळी स्थिती आहे, असे मला वाटत नाही. म्हणून माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की, जो संविधान बदलण्याचा छुपा अंजेडा आहे, हे संविधान नेमके आहे तरी काय? हे एकदा समजून घेतले पाहिजे. कारण समजल्याशिवाय, शरदराव आणि बाळासाहेब म्हणतात, ‘त्याप्रमाणे त्यात आम्ही बदल कसा करणार?’

 

“मग तू पुढे काय केलेसं?” असे मित्राने विचारले. मी त्याला म्हणालो, “दुसरे काय करणार, संविधानावरील पुस्तके शोधत बसलो. जमतील तेवढी विकत घेतली आणि वाचायला सुरूवात केली. तुला खरे सांगायचे तर पहिले काही दिवस हे काम फारच कंटाळवाणे झाले. संविधानाची भाषा किचकट, पुन्हा ती कायद्याची भाषा, त्याचे फार गहन अर्थ, ते समजायला फार वेळ लागतो, बरे एक पुस्तक वाचावे तर त्यातून दहा प्रश्न निर्माण होतात. त्या दहा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आणखी दहा पुस्तके वाचावी लागतात आणि ही पुस्तके आणखी गहन प्रश्न निर्माण करतात, असा हा न संपणारा प्रवास सुरू झाला.”

 

 
 

“शरद पवार आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी सातत्याने ‘संविधान बदल...संविधान बदल’ ही हकाटी ठोकली नसती तर संविधानाच्या अभ्यासाच्या भानगडीत मी पडलो नसतो,” असे मी माझ्या मित्राला सांगितले. तो म्हणाला, “तुझा प्रवास मजेशीर आहे. त्यातील काही टप्पे सांगशील का?” मी म्हणालो, “माझा पहिला टप्पा संविधान सभेचा इतिहास समजून घेण्याचा होता. १९४६ साली आपली संविधान सभा अस्तित्त्वात आली. या सभेचे कामकाज सुमारे तीन वर्षे चालले. राज्यघटनेच्या मसुद्यातील प्रत्येक कलमावर सखोल चर्चा झाली. दोन हजारपेक्षा अधिक दुरूस्त्या सुचविल्या गेल्या. या सर्व दुरूस्त्यांना डॉ. बाबासाहेबांनी उत्तरे दिली. संविधानसभेत मांडले गेलेले सर्व विचार लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेबांनी घटनेचा मसुदा तयार केला आणि तो देशाला सादर केला. हे सर्व समजून घेण्याचा मी प्रयत्न केला.”

 

“त्यातून तुझ्या नेमके काय लक्षात आले?” माझ्या मित्राने विचारले. मी म्हणालो, “पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे संविधानाच्या संदर्भात मी ठार अज्ञानी आहे. त्याची मला लाज वाटली आणि असेही वाटले की, असे अज्ञानी आम्ही शरदराव आणि बाळासाहेब यांची इच्छा कशी काय पूर्ण करणार? पुढे असे लक्षात आले की, हे संविधान, संविधान सभेने सहमत करून सर्व भारतीय जनतेच्यावतीने निर्माण केलेले आहे. हे कोण्याही एका व्यक्तीचे काम नाही. सर्व विचारधारेचे प्रतिनिधी संविधान सभेत होते. विद्वतेच्या बाबतीत एकापेक्षा एक वरचढ होते. सर्वांनी आपले राजकीय जोडे बाहेर काढून ठेवले होते. ते राष्ट्राचा विचार करीत होते. त्या सर्वांना सर्वस्वी नवीन राज्य (स्टेट) जन्मास घालायचे होते. ते कसे चालेल, याचे नियम तयार करायचे होते. दुसऱ्या भाषेत देश आणि देशाची राज्यसंस्था त्यांना उभी करायची होती. देशाची एकता, अखंडता आणि एकात्मता त्यांना कायम ठेवायची होती. ती बलवान करायची होती. एक हजार वर्षाच्या पारतंत्र्यानंतर एक स्वतंत्र सार्वभौम भारत त्यांना उभा करायचा होता. छाती दडपून टाकणारे हे काम होते आणि हे काम या सर्वांनी अत्यंत प्रामाणिकपणे, देशाचा दीर्घकालीन विचार करून, अतिशय अप्रतिमपणे केले, हे जेव्हा माझ्या लक्षात आले तेव्हा, मला त्याचा अभिमान तर वाटलाच. पण, मी सर्वांपुढे नम्र झालो. आपले खुजेपण मला जाणवू लागले. याबद्दल शरदराव आणि बाळासाहेब यांना मी खूप धन्यवाद देतो आणि आभार मानतो.”

 

“तुझ्या पुस्तकात अमेरिकन संविधान, ब्रिटनचे संविधान, फ्रान्सचे संविधान यांचे उल्लेख येतात. त्यांचा तू काही अभ्यास केला आहेस का?” माझ्या मित्राने मला विचारले. मी म्हणालो,”संविधान ही संकल्पना, तिच्या मागची विचारधारा, संविधानाचे तत्त्वज्ञान, या देशांचा संवैधानिक इतिहास वाचल्याशिवाय लक्षात येत नाही. ‘संविधान’ या संकल्पनेचा उदय आणि विकास प्रथम ब्रिटनमध्ये झाला. अमेरिकेने जगातील पहिले लिखित संविधान तयार केले. फ्रान्सने त्यानंतर आपले लिखित संविधान तयार केले. ब्रिटिश संविधानाने ‘रूल ऑफ लॉ’ म्हणजे ‘कायद्याचे राज्य’ ही संकल्पना जगाला दिली आणि ‘बील ऑफ राईटस्’ म्हणजे ‘मूलभूत अधिकार’ ही संकल्पना दिली. अमेरिकेने मूलभूत अधिकार म्हणजे काय? हे लिखित स्वरूपात स्पष्ट केले. त्याचबरोबर सत्तेचे त्रिभाजन कसे करायचे हे दाखवून दिले. फ्रेंच राज्यघटनेने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वत्रयी परस्पर कशी संलग्न आहे, हे दाखवून दिले.

 

या राज्यघटनांचा अभ्यास करताना तज्ज्ञ, विद्वान घटनातज्ज्ञांचे बोट धरावे लागते. एडमंट बर्क, थॉमस पेन, जोसेफ स्टोरी, ए. व्ही. डायसे, जस्टीस मार्शल, जेफर्सन, मेडिसन, हॅमिल्टन अशा तज्ज्ञांचा आधार घ्यावा लागतो. मग लक्षात येते की, ‘संविधान किंवा कॉन्स्टिट्यूशन’ हा विषय अतिशय गंभीर विषय आहे. त्यावर वाट्टेल ते बडबडण्याचा हा विषय नाही. सवंग भाषेत बोलण्याचा तर मुळीच विषय नाही. तो खूप गंभीरपणे घेण्याचा विषय आहे, अभ्यास करण्याचा विषय आहे आणि हळूहळू समजून घेण्याचा विषय आहे.”

 

“तू जी सगळी नावे सांगितलीस, त्या सर्वांची तू पुस्तके वाचली आहेस का?” त्याचा हा प्रश्न मला क्षणभर गुंग करणारा होता. “वाचली,” म्हणावे, तर मी खोटे बोलतो, याची मला बोचणी लागेल आणि “नाही वाचली,” असे जर म्हणालो, तर तेही खोटे आहे, हे मला जाणवत होते, मग खरे काय आहे? मी त्याला म्हणालो,”ही सर्व पुस्तके कथा, कांदबरीसारखी वाचता येत नाहीत. एका अर्थाने ती तत्त्वज्ञानावरील पुस्तके आहेत. जेथे आपले अडले आहे, जेथे आपल्याला संकल्पना समजून घेता येत नाही, तेथे आपल्याला या गुरुंकडे जावे लागते, त्यांचा ग्रंथ उघडावा लागतो आणि आपले शंकासमाधान होईपर्यंत वाचावे लागते. ते मी कालही करत होतो, आजही करतो आणि उद्याही करावे लागणार आहे. या गुरूंच्या वाचनातून संविधान म्हणजे काय? संवैधानिक कायदा म्हणजे काय? ‘रूल ऑफ लॉ’ म्हणजे काय? ‘सोशल कॉन्ट्रक्ट’ म्हणजे काय? न्यायालयाचे स्वातंत्र्य कशासाठी? राज्यसत्ता काय असते? तिचे त्रिभाजन कसे करायचे? लोकशाहीचा अर्थ काय होतो? बहुमताचे सरकार आणि सहमतीचे राज्य म्हणजे काय? अशा सर्व संकल्पनांचे अर्थ हळूहळू उलगडत जातात आणि त्यानंतर घटना थोडी थोडी समजायला लागते.”

 

“तू तर सर्व विदेशी लोकांची नावे घेतलीस, भारतात कुणी घटनातज्ज्ञ नाहीत का?” माझ्या मित्राने मला विचारले. मी त्याला म्हणालो,” कॉन्स्टिट्यूशन म्हणजे राज्यघटना या संकल्पनेचा विकास पाश्चात्य जगात झाला. तिथून तो आपल्याकडे आला. विचार मानवजातीचे असतात. त्यावर कुण्या देशाची मक्तेदारी नसते. तो विदेशी जन्माला म्हणून विदेशी, असे प्रत्येक विचाराबाबात म्हणता येत नाही. आपल्याकडे घटनातज्ज्ञांचे पितामह म्हणून डॉ. बाबासाहेबांचे नाव घ्यावे लागते. त्यांचे घटनाशास्त्रातील ज्ञान केवळ अफाट होते, असे नाही तर आपल्या देशाला यातील कुठल्या ज्ञानाची गरज आहे, याचे उत्तम भान त्यांना होते. पं. नेहरूदेखील थोर घटनातज्ज्ञ होते. के. एम. मुन्सी, टी. टी. कृष्णमाचारी, अय्यंगार, अशी अनेक नावे घेता येतील. बी. एन. राऊ यांनी तर राज्यघटनेचा चर्चेसाठी मसुदा तयार केला होता. घटना समितीवर त्यांचे पुस्तक आहे. (दुर्दैवाने ते बाजारात उपलब्ध नाही.) याला जोडून नंतरच्या पिढीत उपेंद्र बक्षी, एच. व्ही. शिरवाई, नानी पालखीवाला, कृष्णा अय्यर, हंसराज खन्ना, फली नरीमन, गजेंद्र गडकर, अशी सर्व घटनातज्ज्ञ मंडळी आहेत. यातील बहुतेकांची पुस्तके आहेत. ही पुस्तके आपल्या राज्यघटनेवर उत्तम भाष्य करणारी आहेत आणि ती आपल्या राज्यघटनेला जागती आणि जिवंत ठेवणारी आहेत.”

 

माझा मित्र मिश्किलपणे म्हणाला, “शरदराव पवार आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी तुला घाण्याला जुंपलेला बैलासारखा कामाला लावलेले दिसते.” मी म्हणालो, “मी त्यांचे मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी मला कष्टात काय आनंद असतो, याची अनुभूती दिलेली आहे. तुला म्हणून सांगतो, जेव्हापासून मी राज्यघटना या विषयाचा अभ्यास सुरू केला तेव्हापासून ‘नित्य नवा दिस जागृतीचा’ अशी माझी स्थिती आहे. इतकी वर्षे आपण फक्त वयाने वाढलो, ज्ञानाने फार वाढलो नाही. ती उणीव संविधान अभ्यासाने भरून निघाली. वाढत्या वयाबरोबर मी ज्ञानवयानेदेखील वाढत चाललो आहे, हा जीवन जगण्याचा आनंद देणारा विषय आहे. जो आपल्याला असा आनंद देतो. तो शेजारी असून निंदक असला तरी आपला सर्वात जवळचा मित्र असतो. म्हणून या दोघांचा मी जन्मभर ऋणी राहीन.

9869206101

@@AUTHORINFO_V1@@