‘ग्लेशिअर मॅन’ चेवांग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2018   
Total Views |


आता सर्वजणग्लेशिअर मॅनम्हणून त्यांना ओळखतात. एखादा सरकारी सेवानिवृत्त माणूस काय करू शकतो, याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला आहे. त्यांच्याविषयी थोडेसे...

 

ग्लोबल वॉर्मिंगच्या भीषण परिणामांचा अनुभव सध्या हिमालयातील लडाख परिसराला येतो आहे. याच भागातील पाणीटंचाईवर मात करणारे चेवांग नॉर्फेल यांना आता सर्वजण 'ग्लेशिअर मॅनम्हणून ओळखतात. एखादा सरकारी सेवानिवृत्त माणूस काय करू शकतो, याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला आहे.

 

हिमाच्छादित लडाख परिसरात पाण्याची टंचाई आहे, असे कुणी सांगितले तर त्यावर विश्वास बसणार नाही आणि कुणी तसे सांगितलेच तर त्याची बदनामी केली जाईल किंवा तो खोटी माहिती पसरवतो, असे सांगितले जाईल. ग्लोबल वॉर्मिंगमुळे येत्या काळात अनेक भीषण संकटांना सामोरे जावे लागणार असल्याच्या बातम्या अधूनमधून येतच असतात. पण, ही संकटे नक्की काय आहेत आणि या संकटांना कुणाला तोंड द्यावे लागत आहे, याची माहिती फारच क्वचित येते. पण, लडाख परिसर सध्या ग्लोबल वॉर्मिंगच्या छायेत असून त्याचे मोठे परिणाम तेथे पाहायला मिळत आहेत. त्याचे कारण म्हणजे, उन्हाळ्यात तेथे निर्माण होणारी पाणीटंचाई. याच भीषण टंचाईवर प्रभावी काम करणारे आहेत चेवांग नॉर्फेल अर्थातग्लेशिअर मॅन.’ त्यांची कारकीर्द अतिशय रंजक आणि आव्हानांनी भरलेली आहे. हिमालय पर्वतरांगांमधील लडाख परिसरात जन्मलेले चेवांग यांचे शिक्षण लडाख परिसर आणि त्यानंतर श्रीनगरमध्ये झाले. त्यानंतर १९६० मध्ये त्यांनी लखनौ येथे सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला. जम्मू-काश्मीरच्या ग्रामविकास विभागात त्यांना नोकरी करण्याची संधी मिळाली आणि ते रूजूही झाले. याच नोकरीच्या काळात त्यांना ग्रामीण भागातील जनजीवन अगदी जवळून अनुभवता आले. नागरिकांची जीवनशैली, त्यांचे राहणीमान, त्यांच्या अडीअडचणी हे सारेच त्यांनी पाहिले, अनुभवलेही. ज्या गावात त्यांना इमारत, शाळा किंवा कुठलेही काम करायचे असे तिथे कुशल मनुष्यबळच उपलब्ध नसायचे. शिक्षणाच्या फार सुविधा नसल्याने तेथे असे चित्र होते. मग अनेकदा आहे त्या साथीदारांनाच शिकवावे लागे. त्यात वेळ आणि पैशाचाही खूप अपव्यय व्हायचा. पण, त्यांनी कधी त्याची पर्वा केली नाही. या साऱ्या प्रकारातून कुशल मनुष्यबळ तयार झाले आणि त्या व्यक्तींना चांगले पैसेही मिळायला लागले. दऱ्याखोऱ्यांमधील गावांना विविध सोयी-सुविधा पुरविण्यासाठीचे चेवांग यांचे अथक प्रयत्न असायचे. हे सारे करता करता १९९५ साल उजाडले. दररोज कामासाठी भरपूर वेळ असायचा, पण आता रिकामेपण आले. याच रिकामेपणात त्यांचे निरीक्षण त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. आसपासची स्थिती, पाण्याची टंचाई, शेतीचे घटते क्षेत्र, रोजगाराच्या अत्यल्प संधी आणि नागरिकांच्या अडीअडचणी यांना ते अगदी जवळून पाहत होते. बर्फ समोर दिसत असला तरी पाणी मात्र नसायचे. गेल्या काही वर्षांत तर डोंगरावरील बर्फाचे थरही विरळ होत होते. म्हणजे, ज्या बर्फाच्याच मुशीत चेवांग आणि त्यांचे गाव जगत होते, तो बर्फच आता हळूहळू नष्ट होत होता. त्यामुळेच उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न बिकट होत होता. जिथे पिण्याच्याच पाण्याचे वांधे तिथे शेतीला कसे पाणी मिळणार? यातूनच पुढे मग स्थलांतराची लाट आली, पण जाणार तरी कुठे? आसपासच्या गावातही हीच स्थिती.

 

लडाख परिसरात वर्षाकाठी ५० मिलीमीटर पाऊस पडायचा. त्यामुळे बर्फ, हिमनद्या हाच स्थानिकांच्या पाण्याचा स्त्रोत होता. परिसरातील 80 टक्के जनता ही शेती आणि त्यावर आधारित उद्योगांवर अवलंबून असल्याने या साऱ्यांवरच उपासमारीची टांगती तलवार होती. उन्हाळ्यात बर्फाचे होणारे पाणी हा मोठा आधार असायचा. पण, पावसाळा आणि उन्हाळा या दोन्ही काळात बर्फाचे पाणी होणे आणि हे सारे पाणी डोंगरउतारावरून निघून जाण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे पाणी कसे उपलब्ध करायचे? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला. चेवांग यांची निरीक्षण क्षमता इथेच कामी आली. एके दिवशी ते नळातून टप टप गळणारे पाणी पाहत होते. हेच पाणी खाली जमिनीवर कोसळले की, जमलेल्या पाण्याचे रूपांतर बर्फात होत होते. हा जणू चेवांग यांच्यासाठी साक्षात्कारच होता. आपल्याकडे ठिकठिकाणी असलेले पाणीच साठवले तर? असा विचार करुन ते जणू झपाटलेच. काय करता येईल, कुठे करता येईल, कसे करता येईल याचा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. गाव परिसरात, दऱ्याखोऱ्यांमध्ये ते भिरभिरले. यातून त्यांना असे लक्षात आले की, वितळणारे बर्फ ज्या मार्गाने निघून जाते तो मार्ग आधी आपण पाण्यासाठी खडतर केला पाहिजे. म्हणजे, पाण्याच्या प्रवाहाचा वेग मंदावेल आणि एका ठिकाणी या पाण्याला बांध घातला पाहिजे. यासाठी त्यांनी एका हिमनदीच्या मार्गावर हा प्रयोग करून पाहिला. त्याची प्रचिती त्यांना लगेच आली.

 

 
 

चेवांग यांना गावाची साथ लाभली आणि त्यातून बंधारे बांधण्याचा आणि कृत्रिम हिमनदी तयार करण्याचा प्रयोग सुरू झाला. यातून मग भूगर्भातील पाण्याची पातळीही हळूहळू वाढण्यास मदत झाली. २०१२ पर्यंत चेवांग यांनी पाहता-पाहता १२ कृत्रिम हिमनद्या साकारल्या. आपण सर्वांनी पाण्याचे मूल्य ओळखायला हवे. सतत प्रयत्न केले तर सारे शक्य आहे. आपणही शहरात रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी आपल्या सदनिकांमध्ये आग्रही असायला हवे. पाणी, झाडे ही भविष्याची गरज आहे.

@@AUTHORINFO_V1@@