शाळा कुठली?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2018
Total Views |


 

मूल-पालक-शाळा हे बिंदू परस्परांना जितके जास्त घट्टपणे जोडलेले असतील; तितकी मुलांच्या भविष्याची पायाभरणी जास्त भक्कम होईल हे निश्चित. कुटुंबाबरोबरच शालेय जीवनाचा मुलांच्या जडणघडणीत मोठा हात असतो. त्यामुळे आपल्या कुटुंबातील मूल्यांच्या आधाराने ज्या शाळेशी आपण जास्त चांगल्या प्रकारे जोडले जाऊ शकतो, त्या शाळेची निवड आपल्या मुलांसाठी करणे जास्त श्रेयस्कर आहे.

 

माझ्यासमोर बसलेली आई खूप कळकळीने बोलत होती. समस्याही तशीच होती. लेकाला शाळेत पाठवण्याच्या विचारानेसुद्धा तिचा रक्तदाब वाढत असे. एरवी हसतमुख, खेळकर असणारा मुलगा शाळेत जायचे म्हटले की, रडारड सुरु करायचा. ‘आज मुलाला शाळेत जाण्यासाठी कसं तयार करावं?’ या प्रश्नामुळे सकाळी उठल्यापासूनच तिला खूप ताण यायला सुरुवात झालेली. पालक जेव्हा समुपदेशनासाठी येतात, तेव्हा त्यांनी आधी समस्या सोडवण्याचे काही प्रयत्न करून पाहिलेले असतात. त्यामुळे आत्तासुद्धा त्यांनी काय काय केले, याची आम्ही आधी चर्चा केली. त्यानुसार काही बदल, नवे उपाय सुचवले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोज सकाळचे हे ‘रणकंदन’ केवळ साक्षीभावाने पाहणाऱ्या बाबांना आम्ही जाणीवपूर्वक काही कामे दिली. या कुटुंबाने खूपच मनापासून सांगितलेले उपाय तर अंमलात आणलेच, शिवाय त्यांच्या कल्पकतेने अनेक नवीन उपाय शोधलेदेखील. शाळेनेही छान सहकार्य केले. पालकांच्या बदललेल्या दृष्टीकोनाचा त्यांना खूप फायदा झाला. “सकाळ इतकी शांत, आरामदायी सुरू होऊ शकते हे मी विसरलेच होते गेल्या काही महिन्यात.” ही आईची आणि “मला कळायचं की, माझा सहभाग हवा, पण एकतर सुचायचं नाही; सुचलं तर ते बरोबर असेल का? अशी शंका यायची. माझा सहभाग वाढवल्यापासून या समस्येवर तर आम्ही उपाय शोधलाच, पण माझी आणि लेकाची जवळीकही खूप वाढली.” ही बाबाची प्रतिक्रिया. या प्रतिक्रिया फार बोलक्या आहेत.

 

मागच्या महिन्यात एका मैत्रिणीला मुलगी झाली म्हणून अभिनंदनासाठी फोन केला होता. गप्पा मारताना ती म्हणाली, “तुझ्या मुलीच्या शाळेबद्दलचा तुझा अनुभव सांग बरं का! आमच्या मुलीला कुठल्या शाळेत घालायचं, याचा विचार करताना फायदा होईल.” ‘अजून एक महिन्याच्याही नसलेल्या या बाळाच्या शाळेबद्दल कसा विचार करतात तिचे पालक?’ असे मनात येऊन थोडी गंमत वाटली. पण आजचे सजग पालक शाळेचा विचार मुले खूप लहान असल्यापासून सुरू करतात हा अनुभव आहे. ‘शाळा व अभ्यासक्रमाची निवड’ हा आपल्या देशात अत्यंत कळीचा मुद्दा आहे. असणे आवश्यकही आहे. हा प्रश्न आपल्या मुलांसाठी सोडवताना आपण काय निकष लावतो हे फार महत्त्वाचे आहे. मुले दोन वर्षांची होण्याआधीच प्लेग्रुपमधे जातात. छोट्या कुटुंबांची संख्या समाजात वाढत आहे. त्यामुळे मुलांना समवयस्क सवंगड्यांबरोबर मुक्तपणे खेळायला मिळावे, यासाठी अशा खेळांच्या शाळेत त्यांना पाठवणे काही अंशी फायद्याचेही ठरते. परंतु अशा शाळांकडून पालकांची अपेक्षा ‘मुलांना कुटुंबापलिकडल्या समाजाची तोंडओळख व्हावी’ इतकीच असावी. विश्वास ठेवा, आपल्या नकळत आपली मुले खूप काही शिकत असतात. त्यामुळे शालेय जीवनाची पहिली दोन-तीन वर्षे त्यांना आकडे, अक्षरे, शब्द, वाक्ये, बेरजा-वजाबाक्या, देश-विदेश, राजधान्या (गरजेप्रमाणे हे सारे शब्द इंग्रजीत वाचावेत) याची पोपटपंची करता आली नाही तरी, त्यांना भविष्यात मिळणाऱ्या यशामधे तसूभरही फरक पडणार नाही. किंबहुना हे सगळे (न समजणारे) ज्ञानग्रहण करण्याचा ताण असह्य झाला तर त्यांच्या भावनिक अस्थिरतेचे पडसाद भविष्यावर उमटण्याची शक्यता मात्र वाढेल.

 

शाळा व अभ्यासक्रम निवडताना प्रत्येक कुटुंबाचे वेगवेगळे निकष असतील आणि असायलाच हवेत. कुटुंबाची आर्थिक-सामाजिक-शैक्षणिक-व्यावसायिक पार्श्वभूमी, कुटुंबातले वातावरण, मुलांच्या भविष्याबद्दलच्या अपेक्षा, मुलांची बौद्धिक क्षमता अशा अनेक निकषांचा, शाळा व अभ्यासक्रम निवडताना प्राथमिक पातळीवरच विचार व्हायला हवा. गरज पडल्यास याविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. परिस्थितीच्या तणावाला बळी पडून हा निर्णय घेणे धोक्याचे ठरू शकते. चुकीचे निकष लावून निवडलेल्या शाळांमुळे पालक व मुलांमधील दरी वाढताना काही ठिकाणी दिसते आहे. मूल-पालक-शाळा हे बिंदू परस्परांना जितके जास्त घट्टपणे जोडलेले असतील; तितकी मुलांच्या भविष्याची पायाभरणी जास्त भक्कम होईल हे निश्चित. कुटुंबाबरोबरच शालेय जीवनाचा मुलांच्या जडणघडणीत मोठा हात असतो. त्यामुळे आपल्या कुटुंबातील मूल्यांच्या आधाराने ज्या शाळेशी आपण जास्त चांगल्या प्रकारे जोडले जाऊ शकतो, त्या शाळेची निवड आपल्या मुलांसाठी करणे जास्त श्रेयस्कर आहे.

- गुंजन कुलकर्णी

बाल व कुटुंब मनोविकासतज्ज्ञ
नाशिक
@@AUTHORINFO_V1@@