पसंतांचे संत...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2018   
Total Views |



खऱ्या चोरांवर भुंकायला स्वयंभूपणा लागतो आणि इथे तोच गहाण टाकलेला आहे ना? भारतीय पत्रकारिता व बुद्धिवादाची हीच तर शोकांतिका आहे. त्यांना इस्लामी व ख्रिश्चन धर्मनिधीने विकत घेतलेले असून, त्याच्या ‘पसंतीच्या संतां’च्या आरत्या आणि हिंदू संतांची निंदानालस्ती, हे कर्तव्य बनून गेलेले आहे. त्याला ‘पुरोगामित्व’ असे गोंडस नाव देण्यात आलेले आहे.

 

भाजपचे वायव्य मुंबईचे खा. गोपाळ शेट्टी यांनी एका कार्यक्रमात काही वादग्रस्त विधान केली, म्हणून कल्लोळ माजवला गेला. ‘स्वातंत्र्य लढ्यात मुस्लीम व हिंदू खांद्याला खांदा लावून लढले आणि ब्रिटिशांची सत्ता असल्याने ख्रिश्चन मात्र स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नव्हते,’ असे काहीसे विधान असल्याच्या बातम्या झळकल्या. या ‘देशाचे टुकडे टुकडे व्हावे’ अशा घोषणा देण्याला अविष्कार स्वातंत्र्य मानले जाते आणि त्यासाठी आपली सर्व बुद्धी पणाला लावण्याला ‘बुद्धिवादी’ मानले जाते. पण तसेच काहीसे बोलण्याचा अधिकार भाजपच्या आमदार-खासदार वा समर्थकाला असू शकत नाही. शेट्टी यांचे विधान योग्य की अयोग्य? हा विषय तात्पुरता बाजूला ठेवू. मुद्दा अविष्कार स्वातंत्र्याचा असेल, तर कोणालाही बेताल बोलण्याचा अधिकार राज्यघटना देते, असा एकूण बुद्धिवादी पुरोगामी सूर असतो. मग त्यातून गोपाळ शेट्टी यांना कसे वगळता येईल? जो अधिकार नेहरू विद्यापीठातील कन्हैय्या वा उमर खालीदला असतो, तोच गोपाळ शेट्टींना कसा नाकारता येईल? थोडक्यात ज्यांनी कोणी अवसान आणून कन्हैय्या वा उमरचे समर्थन केले असेल, त्यांनी तितक्याच उत्साहात शेट्टी यांच्याही समर्थनासाठी बाहेर आले पाहिजे. पण तसे सहसा होत नाही. कारण गोपाळ शेट्टी भारताचे नागरिक असले तरी ‘दुय्यम नागरिक’ असतात. कारण प्रथम ते ‘हिंदू’ असतात आणि दुसरे कारण ते ‘हिंदुत्ववादी’ असतात. साहजिकच राज्यघटनेने दिलेले कुठलेही अधिकार त्यांच्यासाठी लागू होत नाहीत. संधी मिळेल तिथे त्यांना गुन्हेगार ठरवण्याला ‘पुरोगामित्व’ मानले जाते. तीच कहाणी आसाराम बापू वा अन्य हिंदू संत-महंत वा बुवामहाराजांची असते. त्यांना भोंदूगिरी करण्याची मुभा नसते आणि अन्य धर्माचे कोणी मुल्लामौलवी किंवा फादर-बिशप वगैरे असतील, तर त्यांना मुले पळवण्यापासून बलात्कार करण्यापर्यंत ‘अविष्कार स्वातंत्र्य’ मिळालेले असते.

 

गोपाळ शेट्टी यांचे विधान एका कार्यक्रमातले आहे. पण त्याच दरम्यान केरळच्या चर्चमध्ये अगतिक महिला-मुलींचे लैंगिक शोषण व बलात्कार ख्रिश्चन धर्मगुरूंनी केल्याच्या किरकोळ बातम्या आलेल्या होत्या. आम्ही ती बातमी लपवलेली नाही, अशी शपथ घेण्याची मोकळीक असावी, म्हणून त्या बातम्या छापण्यात आल्या किंवा देण्यात आल्या. पण त्यावर कोणी चर्चा केली नाही वा अग्रलेख लिहिले नाही. पण अशा वेळी मूग गिळून गप्प बसणाऱ्यांची रसवंती रामरहीम नावाच्या हरियाणाच्या कुणा बुवा महाराजाच्यावेळी दुथडी भरून वाहत होती. आसाराम बापूने किती मुली-महिलांचे लैंगिक शोषण केले, त्याचा शोध दुर्बिणी व भिंगे लावून घेतला जात होता आणि एकामागून एक अध्याय रंगवून मांडले जात होते. तसे काही केरळचे ख्रिश्चन पाद्री वा धर्मगुरू करून बसले, मग त्याविषयी कोणाला चार शब्द सविस्तर कथन करायची हिंमत होत नाही. कशी गंमत आहे ना? देशाचे संविधान एकच आहे, पण त्याची धर्मनिहाय वा पक्षनिहाय अंमलबजावणी भिन्न होत असते. म्हणजे असलाच प्रकार कुठल्या मुल्लामौलवीने केल्यास चार ओळींची बातमी पुरेशी असते, ख्रिश्चन धर्मगुरूने केल्यास त्याचा गवगवा होऊ द्यायचा नसतो. मग आपण पुरोगामी आहोत, याचे समाधान मिळत असते. ना पत्रकार बोलणार ना त्यांचे एकाहून एक जाणकार मठाधिपती-विचारवंत तोंड उघडणार. मदर तेरेसा किंवा तत्सम संत लोकांच्या गोष्टी तर खूपच प्रतिबंधित असतात. कोणा बुद्धिमंत संपादकाने त्यावर आघात केला, तरी त्याला थेट संपादकीय लेख मागे घेण्यापर्यंत आपलीच थुंकी गिळावी लागली. कारण, मदर तेरेसा या ‘पसंतांच्या संत’ असतात आणि बापू आचार्य वगैरे ‘असंतांचे संत’ असतात. साहजिकच चुकून कुठे ‘पसंतांच्या संता’ला धक्का लागला, तर थेट लोटांगण घालून पुरोगामी चरणावर शरणागती पत्करावी लागते.

 

यामागे मोठे कारण आहे. जगभरच्या चर्च वा इस्लामी संघटना या धार्मिक निधी गोळा करून गुंतवणुकीच्या माध्यमातून प्रसार साधनांना मुठीत ठेवत असतात. २००१ साली न्यूयॉर्कच्या जुन्या मनोऱ्यावर विमान आदळून घातपात करण्यात आला. तेव्हा आरंभी त्यामागे सौदी अरेबियाचा जिहादी असल्याचा दावा केला जात होता आणि तेच सत्य होते. पण, दोन तासानंतर सगळ्यांनी ‘सौदी’ हा शब्द वगळून निमूटपणे ‘इस्लामिस्ट’ हा शब्द वापरायला सुरूवात केली. पुढे कुठल्याही पाश्चात्य वाहिनी वा माध्यमात ‘सौदी’ हा शब्द येऊ शकला नाही. कारण, अशा बहुतांश माध्यम समूहांच्या कंपन्यांमध्ये सौदीच्या राजपुत्राची प्रचंड गुंतवणूक होती आणि त्याने ती गुंतवणूक काढून घेण्याची धमकी देताच जगभरातील माध्यम समूहांचे अवसान गळाले. अविष्कार स्वातंत्र्य गुंडाळून त्यांनी ‘सौदी घातपाती’ हा शब्द काढून टाकला. हे जगभरच्या एकाहून एक मोठ्या माध्यम कंपन्यांसाठी घडत असेल, तर भारतातल्या नव्याने रांगणाऱ्या माध्यम समूह कंपन्यांची काय कथा? त्यांना विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गुंतवणुकीवरच रुबाब मारता येत असतो. त्यांचे परस्पर नियंत्रण अशा बहुराष्ट्रीय कंपन्या करीत असतील, तर मालकाच्या ‘पसंतीचे संत’ यांच्या गुणांचे पुतळे ठरवण्याला पर्याय नसतो. मग घरात उगाच शिरजोरी करावी लागते. जगभर थपडा व खेटरे खाऊन दारूच्या धुंदीत घरी परतणाऱ्या पराभूत बेवड्या नवऱ्याने घर सांभाळणाऱ्या बायकोच्या कंबरेत लाथ घालण्याची मर्दुमकी गाजवावी, तसा हा एकूण पुरोगामी पुरूषार्थ असतो. आसारामला लाथा घातल्याने त्यांना आपल्या अविष्कार स्वातंत्र्याच्या बेडकुळ्या फुगवल्याचा टेंभा मिरवता येतो. ख्रिश्चन धर्मगुरू वा मौलवींच्या पापावर पांघरूण घातल्याच्या नामुष्कीची बेअब्रू झाकताही येते. म्हणूनच मदर तेरेसा यांच्या ‘निर्मल हृदय’ नावाच्या संस्थेतून मुले पळवून विकली जातात, पण त्यावर छातीठोकपणे बोलायची हिंमत नसते. त्यापेक्षा शेट्टीला झोडणे सोपे असते ना?

 

झारखंड राज्यातील या निर्मल हृदय संस्थेतील एका अर्भकाला लाखाहून अधिक किंमतीत विकण्यात आले आणि त्याविषयी तक्रार आल्यावर मदर तेरेसांच्या संस्थेतील दोघा जोगिणींना पोलिसांनी अटकही केली. पण हे एकमेव प्रकरण आहे वा तिथून असेच राजरोस खरेदी-विक्रीचे प्रकार चालतात का? याचा शोध छुपे कॅमेर लावणाऱ्यांना वा गौप्यस्फोट करणाऱ्यांना आवश्यक वाटलेला नाही. कुठल्याही वाहिनीला त्याविषयी सविस्तर चर्चा करण्याची गरज वाटलेली नाही. जणू कुठल्या नाक्यावर कुत्र्याचे पिल्लू गाडीखाली सापडून मेले असावे, इतक्या तटस्थपणे अलिप्तपणे या बातम्या छापून सर्वजण मोकळे झाले. बिचाऱ्यांना राज्यघटनेने खूप अधिकार दिलेले आहेत. पण, ते वापरण्यासाठी जी स्वयंभूवृत्ती लागते वा स्वतंत्र बुद्धी लागते, त्याचाच दुष्काळ असल्यावर दुसरे काय व्हायचे? हाच प्रकार हिंदूंच्या बाबतीत असला, मग गळ्यातले पट्टे सैल होतात आणि शिकारी शोधक कुत्र्यासारखे अविष्कार स्वातंत्र्याचा सुसाट वास काढत गुन्हेगारांचा शोध घेऊ लागतात. धार्मिक निधीच्या गुंतवणुकीवर ज्यांच्या चरितार्थाची गरज भागवली जात असते, त्यांना अशा गोष्टीतले स्वातंत्र्य गहाण टाकावेच लागणार ना? मालकाने छू केल्यावर भुंकायचे हे कर्तव्य बनलेल्यांना कुठलीही राज्यघटना वा अविष्कार स्वातंत्र्य कसली हिंमत देऊ शकते? त्यांच्याकडून कुठली अपेक्षा बाळगता येते? तात्काळ असे स्वातंत्र्यवीर पाद्-यांच्या पायघोळ झग्याखाली दडी मारतात आणि डोळ्यावर तोच झगा ओढून शेट्टी काय म्हणाले त्याच्यावर भुंकू लागतात. कारण, खऱ्या चोरांवर भुंकायला स्वयंभूपणा लागतो आणि इथे तोच गहाण टाकलेला आहे ना? भारतीय पत्रकारिता व बुद्धिवादाची हीच तर शोकांतिका आहे. त्यांना इस्लामी व ख्रिश्चन धर्मनिधीने विकत घेतलेले असून, त्याच्या ‘पसंतीच्या संतां’च्या आरत्या आणि हिंदू संतांची निंदानालस्ती, हे कर्तव्य बनून गेलेले आहे. त्याला ‘पुरोगामित्व’ असे गोंडस नाव देण्यात आलेले आहे.

@@AUTHORINFO_V1@@